#परतफेड
©️ जया पाटील
" थांब ग वहिनी , दादाच्या नावाचा उखाणा घेतल्याशिवाय मी तुला घरात घेणारच नाहीये , मला कुठलाच बहाणा नकोय ..आटोप पटकन ..."
" अग विशाखा , मला नाही जमत ग उखाणा वगैरे घ्यायला ..प्लीज .. " रश्मी विशाखाला समजावणीच्या सुरात सांगत होती पण रश्मीचे विशाखा पुढे काही चालले नाही आणि शेवटी रश्मीने विशाखाचे म्हणणे मान्य केले.
" आमच्या दोघांचेही स्वभाव आहेत complementary .... ,
दिनेशचे नाव घेऊन करते घरात पटकन entry "
असा गमतीशीर उखाणा घेत रश्मीने माप ओलांडले आणि रश्मी शिर्के घराण्याची गृहलक्ष्मी झाली. दिनेश आणि रश्मी दोघांचाही संसार सुरु झाला. दोघांचाही संसार पाहून दिनेशचे आईबाबा केशवराव आणि रजनीताई दोघेही भरून पावत होते.
रश्मी आणि दिनेश दोघांचाही प्रेमविवाह. दोघेही एकाच कंपनी मध्ये कामाला होते. तिथेच त्यांची मैत्री झाली आणि ती कधी प्रेमात बदलली दोघांनाही पत्ता लागला नाही. दोघांच्याही घरी लग्नाची घाईगडबड सुरु झाली. रश्मी आणि दिनेश दोघांनीही आपल्या नात्याबद्दल आपापल्या घरी सांगितले. दोघांच्याही घरचे अगदी समजूतदार होते. रश्मीचे कुटुंबीय दिनेशच्या आईबाबांना येऊन भेटले.
दिनेशचे कुटुंब देखील स्थिरस्थावर होते. दिनेश आणि विशाखा दोघेच भाऊबहीण होते. दिनेशचे आईबाबा देखील समजदार होते. त्यामुळे रश्मीच्या कुटुंबियांना दिनेश पसंत पडला. आपल्या मुलाचा आनंद तोच आपला आनंद शेवटी संसार तर रश्मी आणि दिनेशला करायचा आहे म्हणून दिनेशच्या आईबाबांनी देखील त्यांच्या विवाहास संमती दिली. दोघीही कुटुंबियांच्या सामंजस्याने रश्मी आणि दिनेश दोघांचाही विवाह अगदी थाटामाटात पार पडला. लग्नसोहळ्यामधे तर रश्मी आणि दिनेश अगदी लक्ष्मीनारायणा प्रमाणे भासत होते.
रश्मी तिच्या आईबाबांची खूप लाडकी आणि independent मुलगी असल्यामुळे तिला एकत्र कुटुंबात राहण्याची सवय नव्हती. त्यामुळे केशवराव आणि रजनीताईंनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तिला सल्ला देणे अथवा टोमणा मारणे असाच वाटत असे. या गोष्टींमुळे दिनेश आणि रश्मी दोघांमधील वाद वाढीस लागले. खरे तर केशवराव आणि रजनीताई कधीच रश्मी आणि विशाखा मध्ये फरक करत नसत परंतु रश्मी मात्र कोणतीही गोष्ट समजून घेण्याच्या मनःस्थितीत नसायची. त्यामुळे शिर्केंच्या घरातील आनंद मावळला.
रश्मीच्या सतत विचित्र वागण्यामुळे केशवराव आणि रजनीताई दोघांनीही गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. दिनेश आणि रश्मी दोघांचाही संसार आपल्यामुळे मोडू नये , तर ते दोघेही नेहमी आनंदी राहावे म्हणूनच त्यांच्यापासून दुर राहण्याचा निर्णय रजनीताई आणि केशवरावांनी घेतला.
विशाखाच्या लग्नाची जबाबदारी पार पाडून ते दोघेही आपल्या गावी जाऊन राहू लागले. दिनेशने त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरला. आईबाबांच्या अश्या निघुन जाण्यामुळे दिनेश मनातून खूप हताश झाला परंतु रश्मीला कसे समजवावे तेच त्याला समजत न्हवते. एक दिवस कधी तरी रश्मीचे मत बदलेल अश्या विश्वासावर तो ठाम होता.
हळूहळू दिवस पुढे सरकत होते. दिनेश आणि रश्मीचे सगळे काही खूप छान चालू होते. त्यातच रश्मीच्या भावाचा शुभविवाह मोठ्या थाटामाटात पर पडला. नव्याचे नऊ दिवस रश्मीच्या भावाची बायको अर्थातच रश्मीची वहिनी अनु खूप छान वागली पण रश्मीच्या माहेरी देखील रश्मीच्या वागण्याची पुनरावृत्ती होऊ लागली. अनुचे वागणे देखील बदलले.
अनु सतत रश्मीच्या आईबाबांचा पाणउतारा करू लागली. रश्मीला हे सहन होत नसे. अनुच्या वागण्याची तिला चीड येत असे परंतु रश्मीची आई मात्र रश्मीला मध्ये बोलु देत नसे. रश्मीच्या आईला वाटत असे की आपल्यामुळे रश्मी , तिचा भाऊ आणि अनु मध्ये दुरावा नको म्हणून ते सतत रश्मीला गप्प करत असत.
एक दिवस मात्र रश्मी तिच्या आईबाबांकडे गेली
असताना अगदी छोट्याश्या कारणावरून अनुने रश्मीच्या आईबाबांचा अपमान केला. आता मात्र रश्मीच्या सहनशक्तीच्या पार झाले होते. त्यामुळेच रश्मी अनुला बोलु लागली....
"अनु , आजपर्यंत तुझे सगळे वागणे सहन केले याचा अर्थ असा नाही की तुलाच फक्त बोलता येते. सासूसासरे पण आईवडिलांच्या जागेवर असतात ना ... माझ्या आईबाबांना त्रास देतांना , त्यांचा अपमान करताना तुला काहीच कसे वाटत नाही ग ...? जनाची नाहीतर मनाची तर लाज बाळग ... ! कानामागून आली आणि तिखट झाली अशीच गोष्ट झालीय तुझी ...! "
" हे बघ रश्मी , तुला मला हे सगळे बोलायचा अधिकार नाहीये ... , स्वतःच्या सासूसासऱ्यांना त्यांची काही एक चुकी नसतानाही घर सोडून जायला भाग पडणारी तु ...., तु मला सासूसाऱ्यांसोबत कसे वागायचे ते शिकवते आहे. आधी स्वतःच्या वागण्याकडे लक्ष दे आणि मग दुसऱ्यांना ज्ञान शिकव .... " अनुने रश्मीला चांगलेच खडसावले.
अनुचे बोलणे रश्मीच्या खूप जिव्हारी लागले. ती घरी आली आणि दिनेशला धरून खूप रडू लागली. तिला तिच्या वागण्याचा खूप पश्चाताप होत होता. रडत रडत रश्मी दिनेशला सांगू लागली ...
" I am really sorry दिनेश ..., मी चुकले .., खरेच मला माफ कर... मी असे वागायला नको होते... खरेच खूप मोठी चूक झाली माझ्याकडून"
....असे बोलत रश्मी आणखीनच जोरात रडू लागली.
" नेमके काय झालंय रश्मी ...? नीट सांगशील का ? कोणती अशी चुकी झालीय तुझ्याकडून ....शांत हो ..आणि मग मग सांग ..." दिनेश रश्मीला शांत करत म्हणाला.
रश्मी जरा शांत झाली आणि मग बोलु लागली ...
" मी तुझ्या आईबाबांसोबत जे वागली ते खरंच चुकीचे होते रे ...! खरे सांगायचे तर जे काही सांगत असत ते माझ्या चांगल्यासाठीच असायचे पण लहानपणापासून मी खूप independent असल्यामुळे त्यांच्या चांगल्या गोष्टी सांगणे देखील मला बंधन वाटायचे."
" ज्या गोष्टी ते मला सांगायचे त्याच ती दोघेही विशाखाला देखील सांगायचे परंतु माझा इगो माझ्या नात्यांपेक्षा देखील जास्तच महत्वाचा झाला होता माझ्यासाठी ... माझे आईबाबा देखील मला समजवायचे की रश्मी तु खूप नशीबवान आहेस की केशवराव आणि रजनीताईंसारखे सासू सासरे तुला मिळाले. त्यांना आमच्यासारखेच तुझे आईबाबा म्हणून स्वीकार... ! पण मी मात्र त्यांचे देखील काही एक ऐकून घेतले नाही. "
" आपण जसे दुसऱ्यांसोबत वागतो , बोलतो ते चांगले असो अथवा वाईट त्याची परतफेड देखील इथेच होत असते.
" सबका हिसाब यही पे होता है " हे वाक्य अगदी तंतोतंत खरे आहे. "
" मी तुझ्या आईबाबांसोबत जे वागली तेच आज अनु माझ्या आईबाबांसोबत वागते आहे. तिने माझ्या आईबाबांचे जगणे कठीण करून ठेवले आहे. दिवसातला प्रत्येक क्षण न क्षण त्यांचा फक्त अपमान होतोय. माझ्या चुकीच्या वागण्याची शिक्षा माझे आईबाबा भोगताय याचेच मला वाईट वाटते आहे. "
" तु आजच आईबाबांना फोन करून इकडे बोलावून घे. मला त्यांचे पाय धरून माफी मागायची आहे. ते कदाचित मला माफ करणार देखील नाही परंतु माफी मागुन प्रायश्चित केल्याचे समाधान तरी मिळेल मला दिनेश ....! "
रश्मीच्या सांगण्यावरून दिनेशने त्याच्या आईबाबांना फोन करून बोलावून घेतले परंतु त्यांना शहरात बोलावण्याचे कारण मात्र सांगितले नाही. अचानक दिनेशचा असा फोन आल्यामुळे केशवराव आणि रजनीताई दोघेही चिंतातुर झाले. सकाळी मुलाकडे जायचे आहे या गोष्टीने ते आनंदी देखील झाले पण रश्मीचे वागणे आठवून ते हिरमुसले. रश्मीने पुन्हा काही भांडण वाढवून ठेवले नसेल ना ...? अशी शंका त्यांच्या मनात घर करून होती.
सकाळ झाली आणि सगळे आवरून सांशक मनाने केशवराव आणि रजनीताई दिनेश कडे जायला निघाले. शहरात पोहोचताच दिनेश आणि रश्मी त्यांना न्यायला आलेले त्यांना दिसले. रश्मीने त्यांचे अगदी हसमुखाने स्वागत केले. त्यांना आदराने तिने घरी आणले. रश्मीच्या वागण्याचे केशवराव आणि रजनीताई दोघांनाही खूप अप्रूप वाटत होते. रश्मीने आज जेवणात केलेले सगळे पदार्थ केशवराव आणि रजनीताईंच्या आवडीचे होते. तिने अगदी आग्रहाने दोघांनाही जेवायला वाढले. जेवण आटोपून सगळेजण दिवाणखाण्यात सोफ्यावर येऊन बसले.
त्यावेळेस रश्मी बोलु लागली ....
"आईबाबा , मला तुमच्या सोबत काही बोलायचे आहे . आज मी तुमच्याकडे काहीतरी मागणार आहे ..प्लीज मी मागेल ते मला द्याल ना ....प्लीज नाही म्हणू नका .."
"अग , आमचे जे काही आहे ते सगळे तुझे आणि दिनेश दोघांचेच आहे ना रश्मी ... असे वेगळे अजून काय देऊ शकणार आहे आम्ही तुला अजून ....? "
तरीही तु मागुन बघ ..आम्हाला शक्य असेल ते देण्याचा प्रयत्न आम्ही दोघेही नक्कीच करू. केशवरावांनी रश्मीला सांगितले.
" बाबा , मला प्रॉपर्टी पैसा हे सगळे नको आहे ...मला तुमच्या दोघांकडूनही माफी हवी आहे .., माझ्या चुकीच्या वागण्याची .., मी तुमच्यासोबत आजपर्यंत जे काही वागले त्याबद्दल मला माफ करा आईबाबा ... "
" मी चुकले ...आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी ...आईबाबा ...! मला माहिती आहे मी तुमच्या माफीच्या लायकीची नाहीये तरी पण मोठ्या मनाने मला माफ करा आईबाबा .. प्लीज मला माफ करा .."
असे बोलत रश्मी केशवराव आणि रजनीताई दोघांचेही पाय धरून रडू लागली. रडणाऱ्या रश्मीला रजनीताई आणि केशवरावांनी सावरले. प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवून ते बोलु लागले...
" अग रश्मी , तु आमची लाडाची लेक आहेस ...विशाखा आणि तु दोघीही आमच्यासाठी एकसमान आहात ...मग आईवडील आपल्या मुलांच्या चुकांवर कधीच रागावतात का .....? नाही ना ...? मग आम्ही तरी कसे रागावणार तुझ्यावर ..? आम्ही तुझ्यावर कधीच रागावलो नव्हतो बाळा ....
रश्मी रजनीताईंना मिठी मारून रडत होती. त्यांच्या या परिवाराचा पुनर्भेटीचा आनंद सोहळा रश्मीचे आईबाबा , तिचा भाऊ आणि अनु दारातूनच पाहत होते.
अनुला दरवाज्यात पाहून रश्मी अगदी चूप झाली. त्यावेळेस अनु रश्मीसोबत बोलु लागली ...
"मला माफ कर रश्मी पण तुला तुझी चूक कळावी म्हणून मी आणि आईबाबा ..आम्ही सगळे मिळून हे नाटक केले होते. तुला आईबाबांनी खूप वेळा समजावले जेव्हा तु ऐकत नाही त्यावेळेस त्यांनी मला देखील त्यांच्यासोबत तुझ्यासारखे वागण्याचे नाटक करायला भाग पाडले. मला माफ कर रश्मी .. आणि आईबाबा तुम्ही देखील मला माफ करा .."
हे सगळे ऐकुन रश्मीने अनुला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली ..,
" अनु , आज तुझ्यामुळे आणि तुझ्या आईबाबांमुळे ... हो माझ्या नाहीतर तुझ्या आईबाबांमुळे मला माझीच चूक समजली कारण मी त्यांना समजून घेऊ शकली नाही पण तु सगळे समजून त्यांना मदत केलीस म्हणून तु त्यांची सून नाहीतर त्यांची लेक आहे .."
" आणि हो .अनु ...., जास्तच भाव खाऊ नकोस हा ... तुला दोन दोन आईबाबा मिळाले म्हणून ...! नाहीतर इथे असलेल्या माझ्या आईबाबांकडे तुझी तक्रार करीन ..." असे हसत हसत केशवराव आणि रजनीताईंकडे हात दाखवत रश्मी अनुला उद्देशून म्हणाली.
सगळा परिवार अगदी मनमुराद हसत होता आणि या मनमोकळ्या हास्यामुळे वातावरणात सुंदर रंग चढला होता.
कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद !🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box