संवाद ...मनामनांचा

संवाद मनामनांचा .... !

✍©️जया पाटील 



काही दिवसांपूर्वीच "एक सांगायचं " हा मराठी चित्रपट पहायचा योग आला आणि चित्रपट पाहून खूप मोठी समस्या डोळ्यापुढे आली , ती म्हणजे आजच्या काळात पालक आणि  किशोरवयीन मुलं यांच्यात कमी असलेला अथवा लोप होत चाललेला संवाद. 


वरचेवर पाहता ही समस्या आपल्याला फारशी गंभीर वाटायची नाही पण वेळीच या समस्येचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे.


आजकाल प्रत्येक जण आपापल्या करियरसाठी धडपडत आहे , मान्य आहे की ती देखील अत्यंत आवश्यक गोष्ट आहे पण या सगळ्यात आपल्या मुलांना सगळयात जास्त आवश्यक असलेला आपला वेळ देण्यात मात्र आपण अयशस्वी ठरतोय.


प्रत्येक पालक मुलांना सगळया सोयीसुविधा पुरवत असताना मात्र extra curricular activities च्या नावाखाली कराटे , डान्स अशा अनेक गोष्टी आपण त्यांच्या वर लादू लागलो आहोत , पण त्यांच्या सोबत गप्पा मारणे , मित्रमैत्रिणीच्या नात्याने त्यांच्या मनातील जाणुन घेणे देखील गरजेचे आहे.  


युवाअवस्थेत त्यांनी भरकटू नये यासाठी योग्य ती काळजी लहानपणीच घेणे आवश्यक आहे. माॅलमधे खरेदी, पिझ्झा पार्टी, मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल हे सगळे घेउन दिले म्हणजे आपण सगळे सुख विकत घेऊन दिले असे आपल्याला वाटते. मुलांचे सुख पैशात मोजण्याची चुक आपण करतो , परंतु मुलांचे सुख पालकांच्या प्रेमात,त्यांनी केलेल्या कौतुकात असते.


एक छोटा प्रसंग सांगते , प्रतिक्षा ,अंकित आणि छोटी ईशा , अगदी सुखी कुटुंब. आईबाबा दोघे जाॅब करत असल्याने दोन वर्षीय ईशा घरी केयर टेकर लता काकूंसोबत राहत असे आणि संध्याकाळी प्रतिक्षाची वाट पाहत असे , परंतु नंतर नंतर मात्र ईशाने लता काकूंसोबत राहण्याचा हट्ट धरला , तिनं सायंकाळी देखील प्रतिक्षाची वाट पाहणं बंद केले आणि लता काकूंनाच ईशा आपली आई मानु लागली.


एकुलत्याएक लेकीचे असे वागणं पाहून प्रतिक्षा आणि अंकित खूप हताश झाले , आपली मुलगी दुरावल्याची खंत वाटू लागली परंतु पुन्हा ईशाचे मन वळवणे खूप कठीण होते.  


या सगळ्यात पालकांची जबाबदारी खूप मोठी आहे. ज्या कोमल वयात मुलांचे भावविश्व पालक असतात , त्यांच्या मनातील भावना शब्दबद्ध होवून पालकांजवळ व्यक्त होतात , परंतु पालकांचा वेळ अथवा प्रेम न मिळाल्याने ते दुसरा आधार शोधू लागता.


मुलांना मोठे करण्यासाठी तुमच्या माझ्यासारखे सगळेच पालक झिजत असतात परंतु बरेच पालक मुलांसोबत मित्रता करण्यात अयशस्वी ठरत आहे. गप्प बस , तुला काय कळतंय ? असे सांगून त्यांना गप्प बसवणारे बरेच पालक आजही आहेत. मुलांचे धोक्याचे वय म्हणजे सोळा वर्षे त्यांनी ओलांडल्यावर पालकांनी त्यांच्यासोबत ' पालक ' म्हणून नव्हे तर एक ' मित्र ' म्हणून संवाद साधायला हवा पण यातच आपण पालक म्हणून कुठेही कमी पडत नाही ना ? याचे परीक्षण आपण स्वतःच करायला हवे.


मुलांच्या शारीरिक बदलासोबत त्यांच्यात मानसिक बदल देखील घडत असतो त्यामुळे त्यांच्या वागण्यात थोडा लहरीपणा असतो. मनाविरुद्ध झालेली एखादी गोष्ट ते समजून घेऊ शकत नाही त्यावेळेस त्यांच्यावर न चिडता त्यांना त्या चुकीचे महत्व पटवणे हि पालक म्हणून आपलीच नैतिक जबाबदारी आहे.


मुलांमध्ये घडणारे शारीरिक आणि मानसिक बदल पालकांनी योग्य रित्या हाताळून आपल्या पाल्यांवरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. 

मुलांना आपल्या जवळ येऊन मनातली बाब कुठलीही अढी न ठेवता सांगता येण्या इतपत आपला विश्वास वाटलाच पाहिजे. 


मुलांच्या चुकांना पूर्णपणे समजून न घेता त्यांना चारचौघात त्यांना सुनावणे आपण बंद करायला हवे. या सगळ्या गोष्टींचे दुष्परिणाम मुले आणि पालक दोघांच्याही नात्यांवर होत असतात. या सगळ्यांची भविष्यात मोठी किंमत मोजण्याआधीच आपण पालक म्हणून मुलांसोबत मित्रत्वाचे संबंध जोपासणे आजच्या काळाची खरी गरज आहे.


पालकांच्या दृष्टीने पैसा कमवणे ,आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे जितके महत्वाचे आहे तितकेच आपल्या मुलांचा भक्कम आधार बनणे देखील तितकेच महत्वाचे आहे. 


" आनंदाचे डोही आनंद तरंग ..." आनंदी पालक आणि आनंदी मुलं एक उत्तम पिढी घडवू शकतात आणि हे सगळं  एकमेकांसोबत असलेल्या संवादातूनच शक्य आहे. चला तर मग, संवाद वाढवुया , नाती जपुया.... एक आनंदी भविष्य घडवूया. 


लेख आवडल्यास लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ...... !


धन्यवाद!🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 



फोटो साभार - pixels and pinterest 



✍©️ जया पाटील

Post a Comment

0 Comments