शिदोरी ..
©️जया पाटील
" मम्मा , प्लीज try to understand , माझा बर्थडे आहे ना ...माझ्या बर्थडे पुरते तरी तुझे ethics आणि thoughts बाजूला ठेव ना ग .."
"नेहमीच काय ग प्रत्येक गोष्टीत तुझे वेगळे वेगळे नियम असतात .... मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सना प्रॉमिस केले आहे की या वेळेस मी माझ्या बर्थडे ची पार्टी घरी नाहीतर एका मोठ्या फाईव्हस्टार हॉटेल मध्ये देणार... आणि मी तसे केले नाही ना तर ते सगळे मला कंजूष म्हणून चिडवणार ..,
पूर्ण क्लाससमोर माझे हसू होणार ..."
प्लीज , मम्मा ...माझी इतकी विश तरी पूर्ण कर ना ...
"रोहन , तुला माहिती आहे की मला अश्या गोष्टीवर पैसे खर्च करायला आवडत नाही , तु जोपर्यंत स्वतः पैसे कमवत नाहीतर तोवर तुला पैश्याची किंमत समजणार नाही."
मी असे नाही म्हणत आहे की तुझा बर्थडे आपण सेलेब्रेटच करणार नाही म्हणून ...पण मी घरीच तुझे आणि तुझ्या फ्रेंड्सचे आवडीचे पदार्थ जेवणात बनवेल , तुझे बाबा , मी , तुझे सगळे मित्रमैत्रिणी आपण सगळे मिळून वेगवेगळे गेम्स खेळू .. खूप धम्माल करू ...अरे असा बर्थडे तर त्या फाईव्हस्टार हॉटेलच्या बर्थडे पेक्षा पण स्पेशल असणार ..हो की नाही ...?
" अग पण मम्मा , मी माझ्या फ्रेंड्सला दिलेल्या प्रॉमिसचे काय ...? " मला माझे सगळे फ्रेंड्स हसतील ग ..इतके छोटेसे प्रॉमिस पण पूर्ण करता आले नाही म्हणून ...इतकी छोटीशी गोष्ट तुझ्या मम्मा आणि डॅडाला समजावण्यासाठी तु capable नाहीस ...रोहन ..? असे म्हणून माझे सगळे फ्रेंड्स माझी टिंगल करतील ग ..मम्मा ....
अरे रोहन , तुझी capability ओळखणारे ते कोण ..? तु किती सक्षम आहेस हे ठरवणारा तु स्वतःच आहे ..दुसरे कोणीही नाही... अगदीच आम्ही सुद्धा नाही...
राहता राहिले तु तुझ्या मित्रांना दिलेल्या प्रॉमिस ची गोष्ट ..तर तु हे प्रॉमिस देण्यापूर्वी एकदा तरी मला विचारले का ? कोणालाही खात्रीने सांगण्याआधी एकदा तरी तु माझा सल्ला घ्यायला हवा होतास की नाही ...?
रोहन आपल्या आईला म्हणजेच शैलजाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होता. शैलजा मात्र रोहनचा वाढदिवस फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये करण्याचा त्याचा हट्ट पूर्ण करायला तयार होत नव्हती.
रोहन शैलजा आणि हितेशचा एकुलता एक मुलगा. हितेश एका मोठ्या कंपनीत व्हीपीच्या पोस्टवर काम करत होता. शैलजा देखील एका मोठ्या पोस्टवर काम करत होती. लक्ष्मी आणि सरस्वती दोघांचाही वरदहस्त हितेश आणि शैलजा दोघांवरही होता. त्यामुळे दोघांनाही त्यांच्या कामात भरपूर यश प्राप्त होत होते. पैशाची देखील अजिबात कमी नव्हती. रोहन त्यांच्या दोघांचाही एकुलता एक मुलगा .., परंतु एकटा असला तरी देखील शैलजा आणि हितेश त्याचे नको ते लाड कधीच करत नसत.
सगळे कितीही खरे असले तरी एकुलत्या एका मुलाचे मन कसे मोडावे ...? त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तो नाराज असेल तर शैलजाला तरी कसे बरे वाटेल कारण शेवटी आई ती आई असते.... ! त्यामुळे शैलजाने जरी रोहनचा वाढदिवस हॉटेल मध्ये साजरा करायला नकार दिला होता तरी देखील त्याचे मन दुखवल्याचं दुःख एक आई म्हणून तिलाही होतेच.
मुले ही आईवडिलांचे प्रतिबिंब असतात. त्यामुळे आपण जसे संस्कार करू त्यानुसार आपली मुले घडतात हे शैलजा जाणून होती म्हणूनच रोहनला समजवण्यासाठी एखादा नवीन मार्ग शोधायचा असे तिने मनोमन ठरवले ज्यामुळे रोहनचे मन देखील दुखावणार नाही आणि त्याला वागण्याची योग्य दिशा देखील मिळेल.
शैलजाने रोहनला समजावले आणि सांगितले की ...
ठिक आहे रोहन .... तु म्हणतोस तसा तुझा बर्थडे आपण मोठ्या हॉटेल मध्ये साजरा करूया पण .. त्यासाठी माझ्या काही अटी आहेत ...
मम्मा बर्थडे सेलेब्रेशनला हो म्हणते आहे म्हणून रोहन अगदी हरकून गेला आणि म्हणाला ..
" थँक्यू सो मच ..मम्मा , तुझ्या सगळ्या अटी मला मान्य आहेत ...."
अरे पण रोहन , माझ्या अटी आधी ऐकून तर घे ..
कोणालाही कुठलीही गोष्ट हो म्हणण्याआधी एकदा तरी विचार करायचा असतो बाळा....
अगदी मी तुझी मम्मा असले तरी देखील ....
तु असा कोणताही विचार न करता समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणशील तर नेहमीच प्रॉब्लेम मध्ये फसशील. शैलजा रोहनला समजावणीच्या सुरात म्हणाली कारण तिच्या प्रत्येक कृतीत ती रोहनला नवीन गोष्ट शिकविण्याचा प्रयत्न करत असे.
" ओके , सॉरी मम्मा , या पुढे नक्कीच लक्षात ठेवेल. आता सांग ना तुझ्या कंडिशन काय आहेत ? "
तुझ्या वाढदिवसाच्या आदल्यादिवशी तु तुझा दिवसातील अर्धावेळ आपल्याकडे कामाला येणाऱ्या निर्मलामावशी आहेत ना त्यांच्या मुलांसोबत घालवायचा आणि मग तुला मी अजून एका सरप्राईज व्हिसिटला घेऊन जाईल.
शैलजाने रोहनला सांगितले.
मम्मा , प्लीज काहीपण नको सांगत जाऊस ग...
ती निर्मला मावशी किती स्लम एरिया मध्ये राहते. " आय डोन्ट लाईक दॅट टाइप ऑफ एरिया ..." रोहन चिडून म्हणाला.
"ओके रोहन , मग तुझी बर्थडे पार्टी पण मी घरीच करणार .." मग तुझ्या फ्रेंड्सला काय सांगायचे ते तुझे तूच ठरव. याबाबतीत मात्र मी तुला काही हेल्प करू शकणार नाही. " इझ इट ओके फॉर यू ? " शैलजाने रोहनला सांगितले.
रोहनला आपल्या मित्रांसोबत बर्थडे सेलेब्रेशन तर करायचे होते. मम्मा ऐकत नाही म्हटल्यावर त्याने तिची कंडिशन मान्य करायचे ठरवले.
ओके मम्मा , मी निर्मलामावशी कडे जाण्यासाठी तयार आहे पण फक्त एकदाच हा...नाहीतर एकदा गेलो तिकडे की तु पुन्हा पुन्हा मला तिच्याकडे जायला सांगशील ...किती डर्टी आहे ग तिचे घर पण ...
अश्याप्रकारे रोहनने शैलजाचे म्हणणे मान्य केले.
रोहनचा वाढदिवस जवळ आला होता आणि आता शैलजाची कंडिशन पूर्ण करण्याची वेळ आली होती. आज निर्मला मावशी कडे जायचे आहे म्हणून तयार हो असे शैलजाने रोहनला सांगितले.
निर्मला शैलजाकडे कामाला आल्यावर शैलजाने निर्मलाला सांगितले ...
निर्मला ..., प्लीज माझे आज खूप महत्वाचं काम आले आहे आणि आज रोहन घरी एकटाच आहे तेव्हा थोडा वेळासाठी रोहनला तुझ्या घरी नेशील ..? त्याला इकडे एकटे राहू देण्याची मला भीती वाटते ग ...आणि आज हितेश पण घरी नाहीये ...तुझी सगळी कामे झाली आहेत तर प्लीज रोहनला तुझ्यासोबत नेशील ?
शैलजाच्या प्रश्नावर निर्मलाला काय उत्तर दयावे तेच सुचत नव्हते.
ताई , रोहनबाबाला न्यायला माझी काय बी हरकत नाही ...पण माये घर पाहिलं असं छोटे ...त्यात काय बी सुखसोयी नाहीत.... रोहनबाबाला सगळे काही आलिशान पाहायची सवय ....त्यामुळे त्याला माझ्याकडे आवडंल की नाही... ? म्हणूनच मला लई भ्या वाटतंय ताई ...
अग निर्मला , सोयी नसल्या म्हणुन काय झाले ..? घर हे घर असते. मी सांगते आहे ना ...घेऊन जा तु रोहनला ..मी माझे काम आटोपले की तिकडेच येईल त्याला नेण्यासाठी ...शैलजा निर्मलाला समजावणीच्या सुरात म्हणाली.
मनाविरुद्ध का असेना रोहन निर्मलासोबत जाण्यासाठी निघाला. निर्मलाच्या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे पाहूनच रोहनला कसे तरी होत होते. कसेबसे त्या बकाल वस्तीतून रोहन आणि निर्मला तिच्या घरी पोहोचले. छोट्याशा एका खोलीत खाली बसून एकच तुटके खेळणे खेळणाऱ्या निर्मलाच्या मुलांकडे पाहून रोहनला हायसे वाटले.
रोहनला खरे तर तिथे अजिबात करमत नव्हते पण मम्माचे ऐकले नाही तर बर्थडे सेलेब्रेशन होणार नाही म्हणून रोहन कसाबसा निर्मलाच्या घरी बसला होता.
रोहनला बसण्यासाठी निर्मलाने खालची जागा अगदी चकपाक पुसली होती त्यावर तिच्या घरातील एकमेव मोडका पाट ठेवला होता. रोहनला बसायला सांगून रोहनला पाणी पिण्यासाठी म्हणून बिसलेरी आणण्यासाठी निर्मला बाहेर गेली. येताना बिसलेरी सोबत तिने रोहनसाठी थंडगार आईसक्रीम देखील आणले.
तिच्या हातातील आईसक्रीम पाहून तिची मुले देखील ते आईसक्रीम मागू लागले पण तिने त्यांना रागावून सांगितले की ते आईसक्रीम तुमच्यासाठी नसून फक्त रोहनबाबासाठी आहे.
तिचे रागावणे ऐकून तिची मोठी मुलगी हिरमुसून कोपऱ्यात जाऊन बसली. लहान मुलगा देखील ताईशेजारी जाऊन बसला परंतु रोहनच्या हातातील आईसक्रीम पाहून त्याच्या तोंडाला पुन्हा पाणी सुटू लागले म्हणून त्याने पुन्हा निर्मलाच्या मागे आईसक्रीम साठी तगादा लावायला सुरुवात केली. निर्मलाने त्याला पुन्हा एकदा समजावले परंतु तिचा मुलगा ऐकायलाच तयार होत नव्हता. त्यावेळेस तिने त्याला रागावून त्याच्या पाठीवर एक जोरदार फटका ठेवला. तिचा मुलगा कळवळला. हे सगळे पाहून रोहनला खूप वाईट वाटले आणि त्याने त्याच्या हातातील आईसक्रीम निर्मलाच्या मुलाला देऊन टाकले.
निर्मलाच्या घराच्या खिडकीतून शैलजा ही सगळी घटना पाहत होती. त्यानंतर ती घरात आली. आपल्या मुलातील माणूसपण जागे झाले हे पाहून तिला खूप आनंद झाला. तिने रोहन आणि निर्मलाच्या दोन्ही मुलांना खाऊचे पॅकेट दिले. निर्मलाला थँक्यू म्हणून ती रोहनला घेऊन निघाली. रोहनला घेऊन ती एका अनाथाश्रमात आली. त्यावेळेस तिने तिथली सगळी मुले रोहनला दाखवली. तिथल्या मुलांना मिळणाऱ्या सोयी आणि इतर सगळ्या गोष्टींची माहिती शैलजाने रोहनला दिली. त्यांचे आईबाबा या जगात नसल्यामुळे त्या सगळ्या मुलांना आहे त्या सगळ्या गोष्टीत कसे भागवावे लागते या गोष्टीची जाणीव तिने रोहनला करवून दिली.
त्यांनतर रोहनला शॉप मध्ये नेऊन तिने त्याच्या बर्थडे साठी सगळी त्याच्या आवडीची शॉपिंग त्याला करवली. त्याच्या आवडीचा डिनर करून रोहन आणि शैलजा घरी आले. सगळे नित्यक्रम आटोपून तिने रोहनला जवळ घेतले आणि सांगू लागली ...
रोहन बाळा , आज तु निर्मलामावशीकडे गेलास त्यावेळेस एक छोटे आईसक्रीम घेण्याइतके पैसे सुद्धा तिच्या कडे नव्हते. त्याच्यानंतर आपण त्या अनाथाश्रमात गेलो तिकडे तर त्या मुलांना आईबाबा नसल्यामुळे हट्ट करण्याचा प्रश्नच नव्हता.
हे बघ रोहन , उद्या हॉटेलमध्ये तुझा बर्थडे आपण सेलेब्रेट करू त्याचवेळी आपण जितके पैसे खर्च करू त्या पैश्यात आपण निर्मला मावशीची मुले म्हण किंवा आणखी इतर मुले आपण त्यांना अगदी छोटा आनंद देऊ शकतो. कदाचित त्यांना मिळालेला आनंद तुझ्या फ्रेंड्सच्या स्टेटस पेक्षा जास्तच असेल ..हो की नाही ....
मी तुझी मम्मा आहे , तुला हवा तसा बर्थडे तु सेलेब्रेट कर , मी तुला नाही म्हणणार नाही पण बाळा आपण जेव्हा दुसऱ्याला हैप्पी करतो ना त्या वेळेस आपण खूप जास्तच हैप्पी होतो ..बाकी तुझी मर्जी ... तुला जसा आवडेल तसाच बर्थडे आपण सेलेब्रेट करूया ...तुझी इच्छा माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची असणार आहे...
रोहन हे सगळे शांतपणे ऐकत होता. त्याने टेबलवरचा फोन घेतला आणि त्याच्या मित्राला फोन करून सांगितले ...
हॅलो कुशल , रोहन हीयर...
सॉरी फ्रेंड् , उद्याची माझी जी बर्थडे पार्टी आहे ना ती आपण मोठ्या हॉटेल मध्ये नाहीतर माझ्या घरीच सेलेब्रेट करणार आहोत ..आणि हो आज माझे जे न्यू फ्रेंड्स झाले आहेत ते सगळे देखील माझ्या बर्थडेला असणार आहे ... आणि हो माझ्या स्पेशल फ्रेंड्सला हेल्प करून मी माझा बर्थडे आणखीन मेमोरेबल बनवणार आहे ..पण हॉटेलला मात्र बर्थडे होणार नाही... तुला यायचे असेल तर तु नक्कीच येऊ शकतो असे बोलून रोहनने फोन कट केला आणि शैलजा येऊन एक घट्ट मिठी मारली.
वाचकहो , कमीअधिक फरकाने एक पालक म्हणून आपल्यादेखील जीवनात असे प्रसंग येत असतात पण एक पालक म्हणून ते प्रसंग हाताळण्याची जबाबदारी फक्त आपलीच असते कारण आपली मुले ही आईवडिलांचीच प्रतिबिंब असतात. पालक म्हणून आपण मुलांना एकवेळ पैसे देण्यात कमी पडलो तरी हरकत नाही पण संस्कार देण्यात कमी पडता कामा नये कारण हे उत्तम संस्कारच आयुष्यभर पुरणारी , कधीही न संपणारी शिदोरी आहे.
या कथेतील मुळ विचारांचा स्रोत हा सौ. सुधा मूर्ती मॅम यांचा असून त्यांच्या विचारातून मला आलेला अनुभव मी या कथेतून मांडत आहे. त्यांचे विचार तुमच्या माझ्या सारख्या सगळ्याच आयांनी अवलंबात आणले तर किती छान बदल होऊ शकतो ...त्याचसाठी ह्या कथेचा प्रपंच ...
कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद !🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box