जिद्द .. आई होण्याची !

#जिद्द.. आई होण्याची .. !

✍©️जया पाटील 



गौरी , अतिशय सुंदर देखणी आणि हुशार मुलगी होती. ती अतिशय सुसंस्कृत घरात वाढलेली असल्यामुळे लहानपणापासूनच खूप गुणी आणि संस्कारी होती. तिच्या आईबाबांनी तिला खूप लाडात वाढवले होते. तिच्या संगोपनात त्यांनी कशाचीही कमी ठेवली नव्हती.


गौरी आता उपवर झाली होती. कॉलेजचे शिक्षण संपल्यावर तिच्या बाबांनी तिच्यासाठी वरसंशोधन सुरु केले. आपल्या लाडक्या लेकीसाठी त्यांनी खूप समजदार राहुलची निवड केली. राहुल अतिशय कर्तबगार , देखणा आणि  गुणी मुलगा होता.  


गौरीच्या आईबाबांनी अगदीच थाटामाटात गौरीचा विवाह राहुलसोबत लावून दिला. लग्नाच्या दिवशी गौरी आणि राहुल दोघेही अगदीच साक्षात लक्ष्मीनारायण भासत होते. राहुलसारखा जावई मिळाल्यामुळे गौरीचे आईबाबा दोघेही खूप खुश होते.


राहुल अतिशय शांत आणि मेहनती मुलगा होता. त्याने त्याचा छोटासा व्यवसाय खुप पुढे नेला होता. त्याच्या कष्टाचे फळ देखील त्याला मिळत होते. तो खुप प्रगती करत होता .


गौरी देखील एका छोट्या फर्म वर काम करत होती. दोघांचा अगदी राजाराणीचा संसार सुरु होता. एकमेकांसोबत वेळ घालवणे , रुसणे आणि  एकमेकांना मनवणे अश्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे दोघांचाही संसार बहरत चालला होता. एक छानसा जोडीदार जो फक्त आपल्यावर प्रेम करेल आणि आपल्याला समजून घेईल यापेक्षा जास्त काय हवे असते एका मुलीला ? राहूलच्या प्रेमळ वागणुकीमुळे गौरी खूपच खुश होती.


लग्नानंतर काहीकाळ गेल्यानंतर सगळ्याच जोडप्यांना वाटते तसे आता आपल्याही जीवनात  एका छोट्याश्या पाहुण्याचे आगमन व्हावे असे राहुल आणि गौरी दोघांनाही वाटत होते परंतु पूर्वसंचित म्हणा किवा त्यांचे दुर्दैव म्हणा गौरीची आई होण्याची इच्छा मात्र काही केल्या पुर्ण होत नव्हती.


उपवास , डॉक्टर , दवाखाना , नवस काहीच फळाला येत नव्हतं आणि गौरी निराश होत होती. आई होणे सगळ्याच स्रियांच्या आयुष्यात महत्त्वाचं असते , त्याचप्रमाणे ते गौरीच्या आयुष्यात देखील महत्त्वाचं होते कारण मुल एका स्रीच्या आयुष्याला जगण्याचा खरा अर्थ देते. गौरीची ही अवस्था मात्र राहुलला पहावत नव्हती. तो तिला या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत होता.


अखेर सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता राहुलने मुल दत्तक घेण्याचे ठरवले आणि गौरीला घेउन तो अनाथ आश्रमामधे गेला , सुरुवातीला दत्तक  मुलासाठी नाही म्हणणारी गौरी मात्र बाळाला पाहुन त्यातच हरवली. दोन महिन्याच्या छोट्या वेदला घेउन ती घरी आली , दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. 


वेदच्या येण्यामुळे राहुलच्या आईबाबांचा राग देखील नाहीसा झाला होता. वेदच्या बाललीलांचे खुप कौतुक होते घरातील सगळ्यांनाच..... ! वेदच्या घरात येण्यामुळे सगळीकडेच आनंदी आनंद पसरलेला होता.


राहुलची देखील व्यवसायात खुप प्रगती होत होती. राहुलच्या आईबाबांच्या मदतीने राहुलने स्व:ताचे टूमदार घर घेतले होते.


वेद देखील वर्षाचा झाला होता , त्याचा पहिला वाढदिवस देखील राहुल आणि गौरीने मोठ्या धामधुमीत साजरा केला.  


राहुलला आपला व्यवसाय अजून मोठा करायचा होता , परंतु पैसे थोडे कमी पडत होते , त्यामुळे राहुल पैशाची जुळवाजुळव करायचा प्रयत्न करत होता. राहुलची अडचण गौरीने ओळखली आणि तिने स्वःताचे सगळे दागिने राहुलला गहाण ठेउन पैश्यांची व्यवस्था करण्यास सांगितले परंतु गौरीचे दागिने गहाण ठेवण्यास राहुल तयार होत नाही  , परंतु गौरी त्याची समजूत काढते की ...


" राहुल , तु जे काही करत आहेस ते आपल्या दोघांच्याही संसाराची काळजी करुन करत आहेस ना.. , मग थोडे दिवस मी माझे दागिने नाही देऊ शकत का तुला..? "


गौरीच्या या समजुतीच्या गोष्टी राहुलला पटतात त्यामुळे तो गौरीचे दागीने गहाण ठेवुन पैश्यांची   व्यवस्था करतो.


दृष्ट लागण्यासारखा दोघांचा सुखी संसार सुरू असतो परंतु सुखालाही कधीतरी दृष्ट लागते , तसेच काही गौरी आणि राहुलच्या आयुष्यात घडते.


एक दिवस राहुल कामा निमित्त बाहेर गावी गेला असतानाच अचानक त्याचा ऐक्सीडेंट होऊन  त्यातच त्याचा अपघाती मृत्यु होतो. गौरीवर तर दुखाःचे आभाळ कोसळतं. तिच्या आयुष्याचा जोडीदार तिला एकटीला सोडून कायमचाच निघुन गेल्यामुळे गौरी खूप खचून जाते.   


पण खरी लढाई तर नंतर सुरु होते. वेद गौरीचा दत्तक पुत्र असल्याने राहुलचे आईबाबा त्याला वारस म्हणुन स्विकार करायला नकार देतात आणि गौरीला त्याला अनाथ आश्रमामधे परत  सोडायला सांगतात.


राहुलच्या मृत्युनंतर गौरीची आव्हाने आणखीच वाढू लागतात. राहुलने त्याच्या व्यवसायाकरिता  गौरीचे दागिने गहाण ठेऊन त्याने बरेच कर्ज उचललेले असते. राहुलच्या अवेळी मृत्यूमुळे त्याचा व्ययसाय ठप्प होतो आणि त्याच्या कर्जाचे हप्ते भरणे गौरीसाठी कठीण होऊन बसते.  


त्यातच वेद गौरी आणि राहुलचा दत्तक मुलगा असल्यामुळे राहुलचे आईबाबा त्याला आपल्या घराचा वारसदार मानण्यास नकार देतात. आधीच राहुलची सुटलेली साथ आणि त्यातच ही सगळी संकटे गौरीला आणखीनच खचवून टाकतात.

वेदला स्वीकारायला नकार दिलेल्या राहुलचे आईबाबा गौरीचे रहाते घर देखील गौरी कडून परत घेतात.  


ते गौरीचा सांभाळ करण्यासाठी तयार असतात , फक्त आपल्या मुलाच्या अंश नसल्यामुळे ते  वेदला स्वीकारायला तयार होत नाही , पण रक्ताचे नाते नसले म्हणुन एक आईचे नाते गौरी बदलु शकत नसते , वेदला स्वःतपासुन वेगळे करण्याचा विचार देखील ती सहन करु शकत नाही.  


बायोलॉजिकली जरी वेद गौरीचा मुलगा नसतो तरी मनाने मात्र ती फक्त आणि फक्त वेदची आई असते. काही वेळा रक्तापेक्षा मनाची नाती जास्तच महत्वाची असतात. त्यामुळे एक आई म्हणुन मी माझ्या वेदला माझ्यापासून मी कधीच दूर करणार नाही, कितीही संकटे आली तरी देखील मी वेदला अंतर देणार नाही असे गौरी मनाशी ठरवूनच टाकते.


वेदच्या घरात येण्यामुळे त्याचा सांभाळ करण्यासाठी , त्याला पूर्णपणे वेळ देता यावा म्हणुन गौरीने आपले फर्म वरचे काम देखील  सोडलेले असते , तरीही अश्या प्रतिकुल परिस्थितीत गौरीचे आईबाबा मात्र तिच्या पाठीशी उभे असतात. 


गौरीच्या हक्कासाठी ते कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवितात , पण गौरीला मात्र हे मान्य नसते. ज्या राहुलने आपण आई होऊ शकत नाही हे माहीत असुनही गौरीच्या आईपणाला , तिच्या भावनांना जपले होते आणि त्याच्यावरच्या प्रेमापोटी गौरीला त्याच्या आई बाबांचा आणि राहूलच्या प्रेमाचा देखील अपमान करायचा नसतो. राहुलच्या प्रेमामुळे गौरीला त्याच्या आईबाबांबाना कोर्टात खेचायचे नसते कारण पर्यायाने हा राहुलचाच अपमान असतो, त्याच्या विश्वासाचा अपमान असतो.


गौरी पुन्हा नव्याने काम करायचे ठरवते. पुन्हा या नव्या परीक्षेत पास होण्यासाठी ती झुंजू लागते. अनेक ठिकाणी प्रयत्न करुन देखील तिला यश मिळत नाही. ती हताश होते पण तिचे आई बाबा मात्र धीर सोडत नाही. 


गौरीचे आईबाबा तिला धीर देण्याचे आणि तिला पुन्हा नव्याउमेदीने लढण्यासाठी तयार करत असतात .


जुनी माणसे म्हणतात ना..


"चांगले वागणे कधीतरी आपल्याला नक्की कामात येते.."  गौरीला देखील तसाच एक अनुभव येतो. एका फर्म वर मुलाखतीसाठी गेल्यावर कळते की तिची  मुलाखत घेणारा आकाश तिच्याच बाबांचा विद्यार्थी असतो.


गौरीच्या कागदपत्रांवरुन त्याला समजते की गौरी ही त्याच्या आयुष्यातील देव माणसाची मुलगी आहे. गौरीच्या बाबांनी आकाशला त्याच्या उतरत्या काळात खूप मदत केलेली असते. आकाश आज जे काही असतो ते गौरीच्या बाबांच्या मदतीमुळे असतो.


आकाश आपल्या गुरुंच्या लेकीला मदत करायची ठरवतो , पण स्वाभिमानी गौरीला मात्र हे नको असते. अखेरीस आकाश तिची एक परिक्षा  घेण्याचे ठरवतो आणि या परिक्षेत गौरीला यश येते. आकाशच्या फर्मवर गौरी उत्तम काम करते. . राहुलच्या व्ययसायाला ती आकाशच्या आणि तिच्या आईबाबाच्या मदतीने पुन्हा उभे करते.


वेदच्या शिक्षणाची संपुर्ण जबाबदारी ती एकटी पार पाडते. एक उत्तम माणुस म्हणून ती वेदला घडवते. तिच्यातले आईपण तिला लढण्याची जिद्द देते. शेवटी सगळया अडचणी पार करुन ती जिंकते.  एका आईची प्रेमाची ताकद तिला लढण्याचे बळ देते या सगळ्या संकटात मात्र एका आईची जिद्द जिंकते.


मला असे वाटते की असे बळ फक्त एका आई मधेच असु शकते. मग तुमच्या आमच्या मधे देखील असेलच ......हो की नाही..? नक्किच असणार. 


एका आईच्या जिद्दीपेक्षा मोठी ताकद माझ्यामते या संपुर्ण विश्वात नसेल. तुम्हाला देखील असेच वाटत असणार , मग तुमच्या प्रतिक्रिया कळवायला मात्र अजिबात विसरु नका. 


तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहे.


धन्यवाद !🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.



फोटो साभार - pixels



✍©️ जया पाटील 













Post a Comment

0 Comments