ते "डिप्रेशन" म्हणजे काय हो ताई...?? 🤔🤔
© Velvet Kavisha
तर्रर्रर्र... काही दिवसांपासून या शब्दाने जाम डोकं उठवलंय. स्त्रिया आणि मनाचा संघर्ष हे गणितच जणू. मग आर्थिक परिस्थिती फार श्रीमंत किंवा अगदीच वाईट असो. छोटे छोटे मानसिक संघर्ष त्यांनी पेललेले असतात. थोड्याफार प्रमाणात समाजातील ७०% स्त्रियांना हे अनुभव येतातच....
#नीता..... कळत्या वयातली... एक नजर फिरून गेली अंगभर. ती अगदीच किळसवाणी वाटली. विसरू म्हणता विसरू येईना. मनाचा विचारांचा ताबा घेतलेला. अगदी छळ झाला मनाचा. नकोसं वाटलं जीवन. समजावलं स्वतःला. लोकांनी कुठे पाहावं, कसं पाहावं हे आपल्याला नाही ठरवता येणार नाही. अशा लोकांना जमेल तेवढं टाळायचं ठरवलं आणि तिने तिच्या नैराश्यावर मात केली.....
#वेदा..... शिक्षण, नोकरीनिमित्त घराबाहेर पडावं लागलं रिक्षा, बस, ट्रेनमधून प्रवास घडतो आजही. गर्दीच्या नावाखाली सहेतूक स्पर्श केले जातात. (कृत्रिम गर्दी करणारे ही काही असतात)...त्यांना आपल्या परीने नडते. शिव्या देते, भांडते. घरी येऊन बादलीमागे बादली डोक्यावर रिकामी करते... अंग खसखसा घासून काढते. मनातून काही केल्या जात नाही पुन्हा उदासीनता येते... पुन्हा त्यातून मार्ग काढते. "देवा, अशांना तूच बघून घे म्हणते." नवा उत्साह आणत नव्याने जगते.
#क्षमा... नोकरीत राजकारण वगैरे होतंच असतं. कधीतरी चूकबिक होते. कधीतरी तिची चूक नसताना वरीष्ठांकडून फायरिंग मिळते. कधी कधी तर भरपाई वगैरे पण करावी लागते. ज्या नोकरीसाठी रक्त आटवलं. इतकी वर्षे इमानेइतबारे काम केलं ते वायाच गेलं की काय असं वाटून जातं... पुन्हा नैराश्य अन् औदासिन्य. "धरणी माते आताच दुभंगून पोटात घे बाई त्या सीतामाई सारखं" असा विचारही येतो. पण तेवढ्यापुरताच. यापुढे न चुकण्याचं आणि सतर्क राहायचं ठरवून ती पुन्हा कामाला लागते...
#सुनिता.... एका मोठ्या घरी दिवसभरासाठी कामाला. शेठजींची सून आणि मुलगा चांगला. पण विधूर शेठजी घरी कोणी नसताना लगट करू पहायचा. एक दोनदा सांगून झालं शेठजीला. असं वागू नका म्हणून. पण काही फायदा झाला नाही. शेठजीच्या मुलाला किंवा सूचनेला सांगावं तर शेठजी त्यांच्यासमोर सुनिताला "बेटा, बेटा" म्हणायचे. मानसिक कोंडमारा. सुनिताने नोकरी सोडून दिली. बटण कंपनीत जाऊ लागली. पगार थोडा आणि मेहनत जास्त. पण तरीही तिने तिच्या परीने मार्ग शोधून पुढच्या आयुष्यात मार्गस्थ झाली....
#रेखा.... लग्नाचा वगैरे विचार सुरू झाला. काही बरी तर काही कशीही स्थळं सुचवली गेली. तिने न आवडणाऱ्याला नाही वगैरे म्हटलं. कारण मनासारखं स्थळ आल्याशिवाय लग्न करायचं नव्हतं.... अशी दहा पाच स्थळ पाहून झाल्यावर घरच्यांनी विचारलं
"तुझ्या मनात कोणी दुसरं आहे का...?" अरे देवा..!! म्हणजे कोणी आवडला नाही, पटला नाही तर नाही सुध्दा म्हणायचं नाही कमालच आहे. असा विचार आला. वाईटबिईट वाटलं. निरस वाटलं सगळं. पुन्हा समजावलं स्वतःला. मग काही तडजोडी करत लग्न वगैरे झालं......
#आसावरी.... लग्नानंतर संसार सुरु झाला. "हाय काय नाय काय" म्हणत सगळं सुरु झालं. जिला आई आणि जिला ताई म्हणत होती अशा दोघीही आपल्या रोल घुसल्या...... जास्त त्रास तेव्हा झाला जेव्हा माहेरच्यांवर बोट ठेवलं गेलं. आशेने जोडीदाराकडे पाहिलं - तिच्या आयुष्याभराचा सोबती पण त्याची मूगाची शेती. तो स्वतःच निरुत्तर. तिला मात्र का जगतोय?? कशासाठी जगतोय?? काहीच कळत नव्हतं. कमालीची निराशा आणि औदासिन्य. जन्मदात्यांना आठवलं, बछड्यांना पोटाशी धरलं आणि पुन्हा पाय रोवून उभी राहिली....
#नेहा.... चाळीशीतली. वाटलं फार झालं आतापर्यंत. थोडं स्वतःसाठी जगायला हवं. दोनचार मैत्रिणींना फॉलो केलं. मेकओव्हर वगैरे केला. भान ठेवून थोडंस स्वच्छंदी वागायचा प्रयत्न केला. लोकांनी पाहिलं. आपापसात कुजबुजली. - "काय ही थेरं....!" पण आता ती बऱ्यापैकी तावूनसुलाखून निघालेली होती. अशांना फाट्यावर मारत, आनंदी राहत पुढे निघून जायला शिकली...
#सरोज...... मुलं मोठीबिठी झाली, तिनेच लहानाची मोठी केलेली तिचीच मुलं कधीतरी "येड्यात" काढतात. "तुला काय कळतं" म्हणत अक्कल वगैरे काढली जाते. तेव्हा तिला खुप आतून तुटल्यासारखं होतं. पुन्हा नवीन पिढीशी जुळवून घेत नवीन विचार आत्मसात करत नवीन पिढीशी जमवून घेत अजूनही जगते आहे.....
#मीनाताई.... छानशी सून आणली. चमचा ही कोणाला न देणारी ती. मुलगा सूनबाईंनी देऊन बसली. मुलगा आपला राहिलाच नाही आता, या विचाराने अस्वस्थ, निराश राहू लागली. जगण्यात काही राम नाही वाटून गेलं. पुन्हा धीराने उभी राहिली. भजनी मंडळ, बचत गट जॉईन करून स्वतःला रमवू लागली. तिच्यापरीने तिला जमेलं तसं स्वतःला जगवलं तिने. आता नातवंडांच्या प्रेमात न्हाऊन निघालीय........
#शकुंतला... नवरा बेवडा. पंधरा वर्षांनी मोठा. मारझोड करायचा कितीतरी वेळा जीव द्यावासा वाटला. पण अशा नवऱ्यापायी स्वतःचा जीव का वाया घालवायचा....??? नवऱ्याला त्याच्या आईबाबाकडे ठेवून मुलांना घेऊन भाड्याच्या खोलीत राहिली. चार घरची धुणी भांडी करून मुलांना मोठं केलं... मुलं जिल्हापरिषदेच्या शाळेत शिकले. मोठी झाली. शकुंतला आता मुलासोबत त्याच्या घरी राहतेय.....
#निर्मला..... चार पोरं पदरात असताना नवरा वारला... पेशंट सांभाळायचे जास्त पैसे मिळतात म्हणून ते काम करू लागली... पेशंटच सगळं करताना दमायची. शी-सू काढून मन विटायचं. जेवणही जायचं नाही. बऱ्याचदा स्वतःसहित पोरांनाही मारण्याचा विचार येऊ लागला.... तिने प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये झाडूपोछाचं कामं स्विकारलं. पैसे थोडे कमी मिळत पण जगण्याची हिम्मत आली.....
"लैंगिक शोषण, अत्याचार, बलात्कार, एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले, हुंड्यासाठी होणारा छळ आणि यातून बाहेर पडून पुन्हा नव्याने जीवन जगणाऱ्या कितीतरी स्त्रिया...हे अजून मोठे विषय आहेत. तुर्तास त्यावर नको बोलुयात...."
मैत्रिणींनों...,
मी ही काही ठराविक उदाहरणं द्यायचा प्रयत्न केलायं. आपण सगळ्याजणी कितीतरी प्रसंगातून जातो. कधी जीवलगांची आजारपणं, अपघात, म्रुत्यु आणि बऱ्याचशा प्रचंड आघात करणाऱ्या गोष्टी घडतात आयुष्यात. कधी कधी घरातील "कर्ता" असणारी व्यक्तीही सोलवटून निघते अशावेळी. आणि मग आपण उभें राहतो. प्रसंगी दुःख बाजूला सारून. आपल्याच माणसांसाठी. आणि त्या वाईट काळातून बाहेर पडतो.
कितीतरी वेळा नैराश्य, औदासिन्य, अस्वस्थता येते. बेचैन व्हायला होतं. कितीतरी वेळा फिनेल, झोपेच्या गोळ्या, सुरी अशा वस्तू फेर धरून नाचतात. वाटतं जगूच नये. संपवावं आयुष्य...
......पण पुन्हा सारं डोळ्यासमोर आणतो. जन्मदाते आईबाबा. भावंडे. मैत्रिणी. नवरा. आणि..... सगळ्यात महत्त्वाची आपली मुलं. सगळ्या निराशाजनक गोष्टींवर मात करत पुन्हा नव्याने उभे राहतो. त्या ठराविक काळावर अंकुश ठेवतो. त्यातून बाहेर पडतो... आणि पुन्हा नव्याने जगतो. नव्या उमेदीने. नव्या उत्साहात.....
मैत्रिणींनों..... लोकं डिप्रेशन, डिप्रेशन म्हणून बोंब मारतात ते तर आपण सर्वसामान्य स्त्रियां रोज जगतोय की.. कोणताही बाऊ न करता... मग आपण अशा गोष्टींची पाठराखण का बरं करावी..... आपण जगलोय ना, अजूनही जगतोय ना धीराने, धीटपणे--- तर आता आपल्या मुलांनाही शिकवुया.... एक रस्ता बंद झाला म्हणून निराश न होता नवीन रस्ता बनविण्याचा आत्मविश्वास आपल्या मुलांमध्ये निर्माण करूया... अजून सुशांतसिंग रजपूत बनणार नाहीत याची काळजी घेऊया.... काय वाटतं तुम्हांला...!!!
(मैत्रिणींनों.... मी स्त्रियांबद्दल लिहिते कारण मी एक स्त्री आहे. स्त्रियांना खुप जवळून पाहते. बऱ्याचजणीं स्वतःहून सांगतात. व्यक्त होतात. पुरुषांना डिप्रेशन येण्याची काही वेगळी कारणं असू शकतात. स्त्रियांपेक्षा पुरुष आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे... आपण भावाला, वडिलांना, नवऱ्याला सांगण किंवा त्यांनी ते ऐकणं आपल्या हातात नसेलही.. पण आपल्या मुलांना मात्र आपण यापासून नक्कीच वाचवू शकतो.... एवढाच मुद्दा आहे. माझे विचार मांडण्याची पध्दत कदाचित तुम्हांला अरेरावीची किंवा चुकीची वाटत असेल तर क्षमस्व... )
◆तुम्हांला लेख आवडल्यास शेअर करताना माझ्या नावासहित शेअर करा. अन्यथा ते साहित्यचोरी म्हणून समजलं जातं. आणि साहित्यचोरी हा दखलपात्र गुन्हा आहे...
© Velvet Kavisha

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box