म्हंजे आम्ही येडे




#म्हंजे_आम्ही_येडे

© Velvet Kavisha


प्रसंग १-

वेळ संध्याकाळी साडेसातची. तो चार वाजल्यापासून टीव्हीला चिपकलेला.  20-20 भारत न्युझीलंड सामना. आणि तिची साडेसातची मालिका. दोन्हीकडे त्याचा अटीतटीशी सामना. Match पंधरा मिनिटात संपेल. पण त्याचं सरकार रिमोटसाठी अडून बसलेलं.  


"तू रिमोट देतोस की नाही ते सांग.." ती.


"देतो. जरा थांब. पंधरा मिनिटात मॅच संपेल. Highlights सुद्धा बघणार नाही. लगेच देतो. शेवटची एक ओव्हर बघू दे फक्त..." तो.


" नाही म्हणजे नाही. दुपारपासून टीव्हीसमोर आहेस. आता दे. बाकीची मॅच मोबाईलवर बघ." ती हट्टाला पेटलेली. 


त्याने तिच्या कडे गोड कटाक्ष टाकला.  तिला हाताला धरून समोरच्या खुर्चीत बसवलं. तिच्या नजरेत नजर मिळवली. थेट डोळ्यात पाहत प्रश्न केला.  

"आज माझ्याबद्दल आणि माझ्यावरच्या प्रेमाबद्दल सांग मला. ऐकायचयं तुझ्या तोंडून. तुझं झालं की मी सांगेन तुला, तुझ्याबद्दल काय वाटतं मला...."

तिला एकदम भरून आलं. ती सुरू... एकदम भावनिक होत म्हणाली - - 

"तू आयुष्यातील एका वळणावर भेटलेला वाटसरू आहेस.  देवाने खुप विचार करून तुझी माझी जोडी जुळवली असेल. तू जेव्हा माझ्या आईबाबांची काळजी घेतोस ना, तेव्हा जगातला एकमेव भारी पुरुष वाटतोस. तुला काय वाटेल ते खरेदी कर म्हणतोस तेव्हा एकमेव श्रीमंत व्यक्ती भासतोस. तुझं माझ्यासाठी जगणं, माझ्यावर प्रेम करणं सगळंच्या सगळं एकदम भारी. असं वाटतं की, कदाचित मी दुसऱ्या कोणावर इतकं प्रेम करूच नसते शकले. मला आवडणाऱ्या रंगाचा शर्ट घालून तू समोर आलास की कलेजा खल्लास. एकदम हँडसम हंक... हां, आता काही गोष्टी तुझ्या आवडतं नाहीत मला. तू पटकन कोणावरही विश्वास ठेवतोस. नात्यात सगळेच तुझा वापर करून घेतात. ऑफिसमध्ये ही कोणाला उलटून बोलत नाहीस. त्यामुळे सगळे तुझा गैरफायदा घेतात...   अमुक आवडतं. तमुक आवडत नाही.  माझ्यासाठी अमुक केलसं ते आवडलं. तमुक केलंस ते आयुष्यातील अविस्मरणीय." बरचंस बोलून ती थांबली. 

आणि हुं हुं करणारा तो.."बास्स इतकचं?" म्हणाला. 

ती पुन्हा सुरू.... पहिल्या भेटीपासून आतापर्यंतचे अनेक प्रसंग आठवून झाल्यावर "फक्त मीच एकटी बोलतेय.... चल आता तू सांग माझ्याबद्दल.." ती बोलली.

तो उठला. वाकून तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि "तुला असं शब्दांत मांडण्यासारखी नाहीसच तू.. शब्दांच्या पलिकडची आहेस... मला कधीच तुला शब्दांत बांधायला आवडणार नाही..." म्हणत त्याने रिमोट तिला दिला... मॅच संपून, हाय लाईट्ससहित मॅन ऑफ द मॅच ही दाखवून झालेलं.  

इंडिया आणि तो. दोघेही match जिंकलेले. ती आनंदाने सिरीयलमध्ये गुंतली फक्त पाच मिनिटं उरली होती साडे सातची सिरीयल संपायला...

Men will be men....And women will be  women..... 🙊🙊🙊 नेहमीप्रमाणे - - 

बाब्बो.....!!! म्हंजे आमी येडेच की नै...😜😜😜

टीप:- सदर प्रसंग आणि टीव्ही सिरीयलचा माझ्याशी काडीमात्र संबंध नाही. 


प्रसंग २-

काय झालं ना.., की वर्षभर बाहेर राहून आम्ही आमच्या घरी परतलेलो. सगळं आवरून झोपायला रात्री अडीच वाजलेले. सकाळी वॉचमनने बेल वाजवली तसं सासुबाईंनी दरवाजा उघडला. 

कसं आहे ना झोपेच्या बाबतीत मी फार सुखी प्राणी आहे. अलार्म वगैरेंचा काही impact होतं नाही. बहिणी म्हणतात. " मगरीसारखी जमीन हुंगत झोपतेस. "मैत्रिणी म्हणतात. "तुझं अपहरण करायचं असेल तर जागेपणी शक्य नाही, झोपेतच करावं लागेल. डोळ्यांवर पट्टी बांधायचीही गरज लागणार नाही." काही सुखं परमेश्वराने मला भरभरून दिलीत. त्यातलंच एक हे निद्रासुख. असो.

आईंनी आम्हांला दोघांना उठवलं. दाराबाहेर गेलो तर शेजारच्या घराचा लोखंडी सेफ्टी डोअर चोरांनी तोडलेला. लाकडी दरवाज्याचा ही लॅच उचकटून काढलेला.  त्या घरी भाडेकरू राहत होते आणि ते गावी गेलेले. त्यांना फोन केला. घरमालकांना फोन केला. सोसायटीच्या सेक्रेटरी, अध्यक्षांना फोन केला.  

मी इमानेइतबारे शेजारधर्म सांभाळत शेजारच्या दारासमोर खुर्ची टाकून बसले. बऱ्याच जणांना बातमी मिळाली तसे एक एकजण येत होते आणि मी पाठ केल्यासारखी त्यांना घटनाक्रम सांगत होते. मध्ये एक दोन वेळा चहा पिऊन झाला बसल्या जागी. एक दोनदा भाडेकरुंचाही फोन येऊन गेला. म्हणाले. "ताई , जरा घरात जाऊन बघा ना, पोरीने पसंत केला म्हणून पंधरा दिवसांपूर्वी चाळीस हजारांचा टीव्ही घेतलाय तेवढा आहे का ते चेक करून सांगा ना प्लीज."  पण घरात जाणार कसं ? पोलिस कंप्लेट करायची असेल तर..!! माझे फिंगरप्रिन्ट्स सापडले तर पोलीस मलाच पकडून नेणार नक्की. मग माझीच  उलटतपासणी. शेजारधर्म पाळायला हवा पण जरा तब्बेतीत.... नाही तर चोर सोडून माझ्यासारख्या संन्याशीला ?? फाशी.

आणि मी आजवर पोलीस स्टेशनमध्ये गेलेली नाहीय. कोर्टाची पायरी तर खुपच लांब.. त्यामुळे असे विचार माझ्या मनात येतातच. तरीही पुराव्याशिवाय पोलीस ऍक्शन घेत नाहीत हे माहिती आहे...

एका तासांनी घरमालकांचे नातेवाईक आले. भाडेकरुंना फोन लावला गेला. ते म्हणाले, " माझा टीव्ही असला तर मला पोलिसांच्या भानगडीत पडायचं नाही. कोण हेलपाटे मारत बसेल..?? कामाला जाऊ की तेच करत बसू. तुम्हां शेजाऱ्यापाजाऱ्यांनाही उगाच त्रास होईल. त्यापेक्षा पोलीस कंम्प्लेट नकोच.."  

घरमालकांच्या नातेवाईकांसोबत घरात गेले. अस्ताव्यस्त घर पाहावलं गेलं नाही. कपाटाची तिजोरी फोडलेली. भाडेकरुंना फोटो पाठवले. बाई म्हणाली, "माझे दागिने मी घेऊन आले गावी. लग्नाला आलोय ना." पोरांचे लहानसहान दागिने, साठवलेले पैसे, पिग्गी बँक सगळचं नेलयं. तांदूळ, गहूचे ओतलेले डब्बे, फाडलेल्या गाद्या, उश्या सगळंच डोळ्यात पाणी आणणारं. सोबतचे सगळेच हळहळले. सुदैवाने टीव्ही भिंतीवर होता. 

आमच्या घराचं कुलूप त्यांच्या घरी लावत असतानाच एक काकू भिरभिरत आल्या. त्यांना इत्यंभूत सांगितल्यानंतर त्या माझ्याकडे वळल्या. म्हणाल्या,  "तुम्ही शेजारीच राहता ना..?? आणि सांगताय  हॉलमध्ये झोपलेलो म्हणून.?? मग बाजूचं घर फोडलं तर तुम्हांला जाग कशी आली नाही??  दोन्ही दरवाजे फोडलेत. तुम्हाला लोखंडी दरवाज्याचा ही आवाज आला नाही.. इतक्या ढाराढूर झोपलात. काय तरी बाई येड्या तुम्ही..."  

देवा, आता एकतर हिला तरी उचल नाहीतर मला तरी. नंतर आलास तर मी काही यायची नाही.  मैत्रिणींनी "तु वेडीच आहेस"  किंवा  "येडू" किंवा  "वेडी ताई" किंवा  नवऱ्याने "किती वेडी गं तू"  म्हणणं, मनाला सुखावणारं. प्रेम, आपुलकी दाखवणारं.  

या बाईला काय बोलावं ..!! ज्या डोक्याच्या भरवशावर इथपर्यंत पोहोचले. त्याला वेड्यात काढलं ना बाईने. देणं ना घेणं. 

आयला एकतर घर शिफ्टींगची दगदग. त्यात आज अकरा वाजले तरी दोन वेळच्या चहाशिवाय पोटात काहीच नाही. घरात बोचकी, बॉक्स तसेच पडलेले. आंघोळ, स्वयंपाक काहीचा पत्ता नाही. या काकूंना आता काही चांगलं सांगितले नाही तर आयुष्याभर चुकल्याची खंत राहिल मनात. कोणाचं उधार ठेवणं जमत नाही... कोणीही यावं टपली मारून जावं..??

म्हटलं. "अहो काकू, काल खरंतर मिस्टरांना म्हटलेलं की, आपण सिक्युरिटी गार्ड नसलो म्हणून काय झालं.  शेजारी गावी गेलेत तर आपण त्यांच्या दाराबाहेर चटई टाकून झोपूया. शेजाऱ्यांच्या घराची काळजी घेणं हा शेजारधर्म असतो. पण आम्ही कालच शिफ्ट झालो तर दमलेलो खुप. म्हणून मग स्वतःच्याच घरीच झोपलो.  सॉरी हां."  

नंतर कोणीतरी त्यांना बाजूला घेऊन समजावत होतं की, "तोंड लै बेकार आहे. सटकली तर तुम्ही गेल्या कामातून." खरतरं या काकू कोणाच्या कोणीच नव्हत्या. बघ्यांमध्ये मोडणाऱ्या.  तरी बिनधास्त "येड्या" म्हणून गेल्या. 

नवऱ्याला म्हटलं, " आता याच्यापुढे फ्लोअरवरचं कोणीही गावी गेलं तर मी त्यांच्या दारावर ' चोरांसाठी सूचना - आम्ही गावी जात असून घरातील मौल्यवान वस्तू, दागिने आणि पैसे नातेवाईकांकडे ठेवलेले आहेत, तरी घर फोडायची तसदी घेऊ नये. कष्ट वाया जातील. ' असं लिहून पेपर चिकटवणार आहे."   च्यायला उगाचच कोण काहीही ऐकून घेईल रावं..!!

कोणाचं काय तर कोणाच काय. अडीच वाजेपर्यंत आमच्या लाईट्स चालू होत्या. चोरांना अक्कल असते. लाईट्स बंद झाल्यावरच ते आले असतील ना.  सगळी तयारी असते त्यांची. वॉचमन आहे. तो कधी जाग्यावर नसतो, कधी पाणी चढवायला जातो याची सगळी माहिती असते चोरांना. कोण गावी गेलयं. कोणाचं घर बंद आहे याची रेकी करतात. त्यांच्या प्रोफेशनमध्ये बराच अभ्यास करतात ते. 

पण यांना कोण सांगणार..🙄🙄 या काकू म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांपैकी. जाऊ दे. 

पहिल्यांदा कुणीतरी इतकं डोक्यात जाऊन राहिलं ना बाब्बो...🙆🏻‍♀️🙆🏻‍♀️

पोस्ट नावासहित शेअर करा. नाहीतर कायदेशीर "बाऊ" होईल. आणि लोकं तुम्हाला ही येडे म्हणतील


© Velvet Kavisha

Post a Comment

0 Comments