#इत्ती_सी_हसीं_इत्ती_सी_खुशी
©️जया पाटील
प्रसंग एक -----
" माझी भाची रुजूलची घरात एन्ट्री ...तिची घरात एन्ट्री झाली कि मला बुवा धडकीच भरते कारण इन्स्पेक्शनला येणारे साहेब किंवा सीबीआय ऑफिसर सुद्धा इतकी झडती घेणार नाही इतकी झडती माझी घेतली जाते मॅडमकडून ...! "
" मामी , ही भांडी नवीन घेतली का ..? "
" ही बेडशीट आणि पिल्लो कव्हर नवीन कि जुने ..?..छान आहेत हा ..मला आवडले ..आम्हाला पण आणशील असेच ...? "
" रिषीला काही नवीन टॉय घेतले का ..? घेतले असतील तर दाखव ना मला , प्लीज ..! "
" तु नवीन ड्रेस घेतले कि नाही ..? मामी , मला ना तुझी चॉईस खूपच आवडते .."
" बीनबॅग मध्ये नवीन बीन्स फिल्ड केले कि नाही ग ..? आता मस्त वाटते आहे बीनबॅग वर बसायला .."
" तु नेहमीच बनवते ते आईस्क्रीम बनवून पाठवलेच नाही माझ्यासाठी ..? बनवले नाही का ग ..मामी ..? "
एक ना एक किती तरी प्रश्न ...कुठल्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचे हाच मोठा प्रश्न असतो नेमका माझ्यासमोर ...
आज पण राणीसाहेब ऐटीतच आल्या. आईबाबांजवळ पाच मिनिट शांत बसल्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. उन्हाळा सुरु झाला असल्यामुळे मी फ्रिजमध्ये पाणी भरण्यासाठी नवीन बॉटल्सचा सेट आणला होता.
रुजूलताईंच्या हातात नेमका तोच सेट लागला. तिला तो मनापासून आवडला पण आईबाबा तरी घेऊन जाऊ देणार नाहीत हे तिला माहित होते म्हणून तीने माझ्या सोबत गप्पा मारायला सुरुवात केली.
" ऐ मामी , तु फ्रिज मध्ये भरण्यासाठी आणलेला बॉटल्सचा सेट किती छान आहे ग .! मला त्याचा कलर आणि शेप खूपच आवडला ... "
" थँक्यू बेटा ..! " मी
" माझी शाळेत नेण्याची बॉटल खूप जुनी झाली आहे. आईला किती वेळा सांगितले नवीन घेऊन दे ..पण तुला माहिती आहेस ना , मामी ...आई माझी कुठलीच गोष्ट नाही ऐकत गं ..लवकर ..."
" अग बाळा , आई जे काही सांगते ते आपल्या भल्यासाठीच असत बाळा ..! " मी
" हो गं मामी , ते माहित आहे मला. पण मला पण काही वेळा कंटाळा येतो गं त्याच त्याच ओल्ड वस्तू वापरण्याचा .. "
" मामी , मी तुला एक रिकवेस्ट करू का ...? तु ऐकशील ना गं माझे ..प्लीज ... ! "
" ऐकणार ना .. ! का नाही ऐकणार ...माझ्या लाडक्या बोलक्या बाहुलीची रिकवेस्ट .." मी
( प्रेमाने मी तिला नेहमीच बोलकी बाहुली असे म्हणते. )
" मामी , मी यातली एक बॉटल घेऊन जाऊ का स्कूल मध्ये पाणी नेण्यासाठी ...प्लीज ..? "
" हो , घेऊन जा ...तु जो आवडेल तो कलर घेऊन जा ...ओके ..."
" थँक्यू मामी ...लव्ह यू .."
" वेलकम पिल्लू ..." मी
मॅडमची एन्ट्री आता हॉल मध्ये ...
मामी कडून बॉटल तर न्यायची आहे मग आईबाबांना पटवायला नको का ..?
रुजूलची पुन्हा एकदा बडबड सुरु ...
" बाबा , माझी स्कूलमध्ये पाणी घेऊन जायची बॉटल खूपच जुनी झाली आहे ना ...मग मामी मला बोलली ..रुजूल ..इतकी जुनी बॉटल नको गं नेत जाऊस स्कूलला ... मी आजच न्यू बॉटल्सचा सेट आणला आहेस ..त्यातला तुझा फेव्हरेट कलर तु घे ... हो कि नाही गं मामी ... ! "
" लबाड लांडगा , आम्हाला सगळे समजते बर का ...तुझी लबाडी ..? मामी असे काहीच नाही म्हटली तुला ...तु स्वतःच मामी कडून बॉटल मागुन घेतली .. हो कि नाही ...? " रुजूलचे बाबा तिला म्हणाले.
आणि काहीही न बोलता ती खदखदून हसली.
" ऐसी हँसी पे तो लाखो बॉटल कुर्बान ..! "
रुजूलची मामी अर्थातच मी मनातल्या मनात म्हणाली.
आपल्याला मनापासून आवडणाऱ्या वस्तू समोरच्या व्यक्तीकडून किती शिथापीने घ्याव्या हे या बच्चा पार्टी कडून शिकायला हवे .
तुम्हाला काय वाटते ... हो कि नाही ...?
मला कंमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.
प्रसंग दोन -----
घरात लग्नसमारंभाची धावपळ. सगळे नटून थटून तयार झालेले पण रुजूलचे नटणे अजूनही संपलेच नव्हते. प्रत्येक मावशी , मामी , काकू ,आजी सगळ्यांचा मेकअप पाहून यायचा आणि स्वतःच्या मेकअप मध्ये जी स्टेप बाकी असेल ती पूर्ण करायची....
नटण्यात तर रुजूलचा हात कोणीच धरू शकत नाही. त्यादिवशी देखील तिचा संपूर्ण मेकअप झाला पण तिला हव्या असणाऱ्या रंगाची नेलपेंट मात्र तिला मिळाली नाही. आता हव्या असलेल्या वस्तूचा जुगाड लावणार नाही ती रुजूल कसली...?
त्यात घरी अष्टीवरांचा कार्यक्रम म्हणजे आठ जोडप्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक करून जेवू घालणे. त्यांचा मानसन्मान करणे होय. आम्ही देखील सगळे काही प्रथेप्रमाणे केले. आठ सवाष्ण स्त्रियांना साडी ,खण- नारळाची ओटी , शृंगाराचे साहित्य जसे कि मेहंदी , टिकल्या , बांगड्या ,रुमाल ,नेलपेंट ,कंगवा हे सगळे देऊन त्यांचा मानसन्मान केला.
हे सगळे छोटी रुजूल पाहतच होती मग काय ...तिच्या डोक्यात लगेच ट्यूब पेटली. तिने लगेच सगळ्यांच्या हातातील शृंगाराचे साहित्य चेक केले ....( चेक केले म्हणजेच हाताने नव्हे ..तर तिच्या चाणाक्ष नजरेने ...)
शेवटी एका आजींच्या हातात तिला हवा असलेला नेलपेंटचा कलर दिसला आणि मग काय ...रुजूल लागली आपल्या कामाला ...
त्या आजींच्या जवळ जाऊन रुजूलने आपल्या गोड गोड गप्पा सुरु केल्या. ती आहेच इतकी क्युट , लाघवी , गोड ..! त्यामुळे सगळेच तिच्या प्रेमात पडतात. तसेच त्या आजींचे पण झाले.
" आजी , तुम्ही नेलपेंट नाही लावत बहुतेक ...तुमच्या बोटांना नेलपेंट दिसत नाहीय .." रुजूल
" नाही गं बाळा , नाही लावत मी नेलपेंट ...आता म्हातारी झाली गं ..आता या सगळ्या गोष्टींची आवडच उरली नाही मला .." आजी
" आजी , मला मात्र नेलपेंट लावायला खूपच आवडते. आणि तुमच्याकडे जी नेलपेंट आहे ना तो माझा फेव्हरेट कलर आहे .. प्लीज आजी , तुम्ही तुमची नेलपेंट मला देणार का ...? " रुजूल
" अरे हो , घे ना बाळा ...तुला आवडते तर घेऊन जा माझी नेलपेंट ... !" आजी
" थँक्यू आजी ...लव्ह यू ...." रुजूल
रुजूलच्या हातात नवीन नेलपेंट पाहून तिच्या मावशीला जरा आश्चर्य वाटले कारण तो दोघींचाही फेव्हरेट कलर पण संपूर्ण घर शोधले तरी तसा कलर मिळाला नाही आणि रुजूलने तो शोधून आणला याचे तिच्या मावशीला जरा अप्रूप वाटले.
प्रेमाने जवळ घेऊन तिने विचारले कि...
" रुजूल ही नेलपेंट तु कुठून आणलीस ...? "
" अग मावशी , त्या समोरच्या आजी आहेत ना ..त्यांनी मला बोलवून सांगितले कि रुजूल तुझ्यासाठी एक गिफ्ट आणले आहे. तुला आवडते ना म्हणून ...आणि मला ही नेलपेंट गिफ्ट केली. "
रुजूलचे उत्तर ऐकून तिची मावशी गालातल्या गालात हसली आणि काय समजायचे ते समजली.
इतके लहान वय, पण कमालीची समयसूचकता.!
कधी कधी रुजूलच्या या सुप्तगुणांचे मला देखील आश्चर्य वाटते.
प्रसंग तीन -----
रुजूल सारखाच आमचा श्रीहान माझा पुतण्या... तो देखील काही कमी नाही हा ..... ! त्याचा एक किस्साच ऐकुया ...
श्रीहानला भाऊ किंवा बहीण होणार आहे ही बातमी कळल्यावर तो जाम खुश झाला. रोज आईच्या पोटातील बेबीसोबत बोलून तो खूपच खुश होत होता. मी मुलगा आहे मग मला राखी बांधण्यासाठी मला दीदीच हवी असा त्याचा हट्ट होता.
दीदी आली कि आपण असे करूया , तिला खूप छान छान फ्रॉक घेऊया ..मग माझ्या सगळ्या वस्तू , टॉईज मी तिच्या सोबत शेयर करेल अशी किती तरी स्वप्नरंजन तो रोजच्या रोज करत होता. त्याची ही उत्सुकता पाहून घरचे सगळेच खूप खुश होते.
अखेर तो दिवस उजाडला. श्रीहानच्या आईला बाळंतकळा सुरु झाल्या आणि तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आले. आईसोबत मी देखील दीदीला आणण्यासाठी जाणार असा हट्टच धरला त्याने .. शेवटी सगळ्यांनी त्याच्या हट्टापुढे हात टेकले आणि त्याला घेऊन ते हॉस्पिटल मध्ये आले.
" अभिनंदन , मुलगा झाला आहे..." हे डॉक्टर सांगायला आले त्याचवेळेस मुलगा झाला हे ऐकून छोट्या श्रीहानचा संताप अनावर झाला. त्याला वाटले या डॉक्टर काकांनीच आमची दीदी बदलून आम्हाला मुलगा दिला आणि त्यामुळे त्याने डॉक्टरांनाच फटके द्यायला सुरुवात केली.
एका लहान मुलाचा गोड राग म्हणून डॉक्टरांनी देखील गंमत म्हणून ते सहन केले. श्रीहान थोडा शांत झाल्यावर डॉक्टरांनी त्याला जवळ घेतले आणि ते बोलु लागले.
" बाळ श्रीहान , दादा किंवा दीदी देणे हे आपल्या हातात नसते. ते देवबाप्पाच्या हातात असते. तुला दीदी हवी होती पण तुझा हा छोटासा भाऊ तर तिच्यापेक्षा पण जास्त क्युट आहे , खूप स्पेशल आहे म्हणून तर देवबाप्पाने तुला बेबी बॉय दिला..तुझ्यासोबत खेळण्यासाठी , तुझ्यासोबत सगळ्या गोष्टी शेयर करण्यासाठी ..."
डॉक्टरांच्या समजदारीच्या गोष्टी श्रीहानला पटल्या आणि त्याने त्याच्या छोट्या भावाचा एक गोड गोड पापा घेतला. हा प्रसंग पाहून सगळ्यांनाच आनंदाच्या अश्रुंनी भिजवले.
प्रसंग चार -----
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले पण काही वेळेस ही मुले इतकी मोठी झाल्यासारखी वागतात. त्याचा एक किस्साच ऐकुया.
आम्ही दक्षिण भारतात वास्तव्यास परंतु कोरोनाच्या महामारीमुळे आम्ही आमच्या घरी गावाकडे आलेलो. माझा मुलगा रिषी त्याला हिंदी बोलायची सवय जास्त , मग त्याला कितीही शिकवले तरी मराठी बोलताना त्यात हिंदी भाषा मिक्स होतेच..
घरी आलो असल्यामुळे रिषीचे आजी आणि आजोबांकडून खूपच लाड सुरु झाले. त्याला राजगिरा लाडू खूप आवडतात. त्यामुळेच आजोबा त्याला लाडू आणण्यासाठी गेले.लाडू आणल्यानंतर माझी आई ( त्याची मम्मा ..माझ्या आईला तो मम्मा आणि पप्पाना पण पप्पा म्हणतो )
रिषीची मम्मा त्याला म्हणाली ...
" रिषी , पप्पाना थँक्यू म्हण पाहू ते तुला किती खाऊ आणतात ना ...."
त्यावर रिषीचे उत्तर ...
" मम्मा , मेरे डॅडा तो पप्पाको ये सब लड्डू लाने के लिए पैसे देते रहते है 😳🙊🤦♀️।
" और पापा ने लड्डू लाये तो क्या हुआ ...वो तो मेरी मम्मा के भी पप्पा है ना ...🤦♀️😳😳! "
हे वाक्य ऐकून मला आश्चर्यच वाटले. इतके लहान वय आणि किती तो मोठेपणाचा आव ....
--------------------------------------------------------------
हे काही किस्से झाले आमच्या बच्चा पार्टीचे आणि हो वासू , श्लोक आणि क्रिश या तिघांचेही किस्से ऐकायचे आहेत तुम्हाला अजून..पण सध्या ते खूपच लहान आहेत त्यामुळे नेक्स्ट टाइम पक्का ....
खरंच लहानपण किती निरागस असते ना ...!
संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे...
लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा ....
ऐरावत रत्न थोर
त्यासी अंकुशाचा मार ....
जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण ....
तुका म्हणे बर्वे जन
व्हावे लहानहुनी लहान ....
आपण लहान असताना इतके आनंदी होतो, मग तो आनंद मोठं झाल्यावर का टिकुन राहत नाही?
लहान असताना आपण किती गोंडस, निरागस होतो, वयाने कितीही मोठे झालो तरी आपण आपल्यातली निष्पापता, निरागसता का जपु शकत नाही ?
असं जर झालं तर आयुष्याकडे बघणं, आणि जीवन जगणं, किती सोप्पं होवुन जाईल ना? आपण लहान असताना आपल्यात जी निरागसता होती , ती मोठं झाल्यावर आपल्याकडुन कळत-नकळत निसटुन जाते?
लहान मुलासारखं आपणही आपलं जीवन विश्वासाने त्या संपूर्ण विश्वाचा कारभार चालवणाऱ्या परमेश्वरावर सोपवुन निश्चिंत व्हायला शिकलो तर सार्या चिंता नष्ट होतील. मन हलकं होऊन आपण कुठल्याही संकंटांची चिंता न करता त्या सोबत लढायला तयार होऊ आणि खरंच आयुष्य खूप सुंदर होईल.
आपल्या सर्वांच हरवेललं बालपण आणि निर्मळ , मनमोहक हास्य पुन्हा एकदा आपल्याला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!
समाप्त!
कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद !🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels/google
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box