गुंतता हृदय हे ..!

#गुंतता_हृदय_हे_..!


©️जया पाटील 





" अनन्या , अगं ऐक माझे ..., रितेश फक्त फसवतो आहे तुला... त्याचे काही खरं प्रेम वगैरे नाही आहे तुझ्यावर ...." 


" कॉलेजच्या सगळ्यात सुंदर मुलीला माझ्या प्रेमात नाही वेडे केले तर माझे नाव बदला... ,असे त्याच्या मित्रांना सांगताना मी स्वतः ऐकले आहे अगं माझ्या कानाने ..."


" अनन्या , तू माझी खूप जवळची आणि खास मैत्रीण आहेस म्हणूनच तुला समजावते आहे.. प्लीज ... ,ऐक माझे ..... सोड त्या रितेशचा नाद .!"


अनन्याची मैत्रीण रश्मी तिला समजावणीच्या सुरात सांगत होती.


" तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे गं  , रश्मी .." 


" रितेश तसा मुलगा नाहीच ...आमचे नाते तोडण्यासाठी कोणीतरी त्याला बदनाम करते आहे. या गोष्टीची कल्पना त्याने मला आधीच दिली होती , त्यामुळेच तुझा देखील गैरसमज होणे साहजिकच आहे...! "


रितेशने आपल्याला त्याच्या मित्रांसोबतचे बोलणे ऐकताना पाहिले आणि मी काही सांगण्याच्या आधीच स्वतःची बाजू अनन्याला क्लिअर करून तिला स्वतःच्या बाजूने वळविले असा रश्मी मनोमन विचार करू लागली.


" आज तर तू मला खोटं ठरविण्यात यशस्वी झाला पण आता मात्र मी तुझे भांडे फोड करूनच शांत बसेल " 


रश्मी स्वता:सोबतच पुटपुटत होती. 


रितेशचे सत्य काहीही करून अनन्या समोर आणायलाच हवे असा तिने मनाशी निश्चय केला.


" अगं स्वतःसोबतच काय बडबडतेस रश्मी ... , झाला ना तुझा रितेश बद्दलचा गैरसमज दुर ... , मग झाले ...! "


" अं...  हं.... हो हो... झाला गैरसमज दुर ..."


स्वतःसोबत बोलत असणाऱ्या रश्मीने अनन्याला हो सांगून वेळ मारून नेली.


अनन्या सायन्स विषयातील पोस्ट ग्रॅजुएशनच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी एक हुशार विद्यार्थीनी होती. दिसायला अतिशय सुंदर ,काळेभोर केस , गोर्या गालांवर रेंगाळणारी कुरळ्या केसांची बट तिचे सौंदर्य आणखीनच खुलवत असे. मोहक डोळे , चाफेकळी नाक , गुलाबी ओठ ....जशी काय स्वर्गातील अप्सराच जणू.....!


स्वभावाला देखील तितकीच मनमिळाऊ ...आणि प्रेमळ ...! 

सगळ्यांना मदत करणे , सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहणे या सगळ्यांमुळे तिचा मित्र परिवार ही मोठा होता. रश्मी तर तिची अगदीच जिवलग मैत्रीण ...!  


कॉलेज लाइफ म्हणजे आयुष्य बिनधास्त होऊन जगणेच असते. तसा या कॉलेज मध्ये शिकणारा रितेश देखील अतिशय बिनधास्त ...! 


प्रत्येक मुलीला फक्त सौंदर्याच्या दृष्टिकोनातून पाहणे आणि मुलांसोबत पैज लावून त्या मुलीला पटवणे हा त्याच्यासाठी जणू खेळच झालेला होता.आपण चुकतो आहे किंवा हे सगळेच चुकीचे आहे हे रितेशच्या लक्षातच येत नव्हते. आपल्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी आपल्या प्रेमाच्या माणसांची गरज असते परंतु तश्याप्रकारे समजवणारे रितेशच्या आयुष्यात मात्र कोणीही नव्हते. 


अनन्या तर कॉलेज मधली सर्वात सुंदर आणि हुशार मुलगी ...त्यामुळे तिला पटवण्याच्या पैजेचा विडा उचलणार नाही तो रितेश कसला ....!

अनन्यासोबत मैत्री करून तिला आपल्या प्रेमात फसवायचे असे त्याने मनोमन ठरवले.


अनन्यासोबत मैत्री करण्यासाठी रितेशचे प्रयत्न सुरु झाले. कॉलेजचे स्नेहसंमेलन जवळच आलेले होते. त्याच्यामध्ये नाटकाचा प्रयोग होता. अनन्याने देखील त्यात भाग घेतला होता. रितेश देखील त्याच प्रयोगात पार्टीसिपंट होता. त्यानिमित्ताने अनन्या आणि रितेशची मैत्री झाली. दोघेही बराच वेळ सोबत घालवत होते. रितेशला हवे तसे अनन्या ला तो आवडू लागला होता. 


अनन्या आणि रितेश बराच वेळ सोबत घालवत होते. शेवटी रितेशने तिला प्रपोज केले आणि अनन्या ने देखील हो म्हटले. अनन्याला स्वतःच्या  प्रेमात फसविण्याची पैज तर रितेश तिथेच जिंकला होता. त्यानंतर मात्र रितेश जेव्हाही अनन्याला भेटायला जायचा त्यावेळेस तिच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. अनन्या मात्र कधीच रितेशला जवळ येऊ देत नसे. ह्या सगळ्या गोष्टी लग्नानंतर ....,  असे सांगून ती त्याला दुर सारत असे.  


अनन्या आणि रितेश दोघेही भेटत त्यावेळेस अनन्या त्यांच्या सोनेरी भविष्याची , त्यांच्या लग्नाच्या स्वप्नांविषयी त्याच्यासोबत बोलत असे परंतु प्रत्येक वेळेस लग्नाचा विषय निघाला कि रितेश त्या विषयाची टाळाटाळ करत असे. कारण अनन्या सोबत लग्नाची कमिटमेन्ट त्याला कधीच  करायची नव्हती. रितेशला फक्त तिचा उपभोग घ्यायचा होता पण अनन्या मात्र त्याला कधीच जवळ येऊ देत नसे ..तिचे रितेशवर कितीही प्रेम असले तरीही ....!  


कॉलेजचे दुसरे वर्ष संपायला अवघा एक महिना बाकी होता. त्याचवेळेस अनन्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात झाली. कुटुंबातील मोठ्या माणसांनी अनन्यासाठी वरसंशोधनाला सुरुवात केली.


घरच्यांनी अनन्याच्या लग्नाचा विचार सुरु केल्यामुळे अनन्या खूप टेंशन मध्ये आली आणि ती सगळे काही रितेशला सांगण्यासाठी रितेशला भेटली. त्याला भेटून ती सांगू लागली ..


" रितेश , माझ्या घरचे आता माझ्या लग्नाचा विचार करताय .., त्यांनी स्थळ पाहायला सुरुवात केली आहे. " 


" प्लीज... , तू ये ना माझ्या घरी आपण दोघेही मिळून आपल्या नात्याबद्दल घरी सांगूया. घरी समजावून सांगितले तर घरचे नक्कीच ऐकतील ..." 


खरंतर रितेशला अनन्यासोबत लग्न करायचेच  नव्हते  पण वेळ मारून नेण्यासाठी त्याने तिला सांगितले ....


" अगं अनु , आता आपल्या नात्याबद्दल सांगितलं तर आपले घरचे नाही ऐकून घेणार कारण अजून मी नोकरी देखील नाही करत. तू तुझ्या घरच्यांकडून परीक्षा होईपर्यंतचा वेळ मागुन घे. मग मी लवकरात लवकर जॉब मिळवण्याचा प्रयत्न करेन. एकदा जॉब मिळाला कि मी स्वतःहून येईल तुला लग्नासाठी मागणी घालायला ... !"  


अनन्याला रितेशचे बोलणे पटले आणि तिने त्याच्या बोलण्याला सहमती दर्शविली. शेवटच्या वर्षाची परीक्षा संपली. सगळे कॉलेजचे मित्रमैत्रिणी जॉब शोधण्याच्या मोहिमेवर निघाले. रितेशने देखील अनन्यासोबत संपर्क कमी केला. अनन्याला वाटले रितेश जॉब शोधण्यात खूप व्यस्त आहे आणि हे सगळे तो आपल्या दोघांसाठीच करतोय म्हणूनच तिने या गोष्टीवर आक्षेप घेतला नाही.  


रितेश पुढील काही कोर्स करण्यासाठी दुसऱ्या शहरात निघून गेला. तेव्हापासून मात्र त्याने तिच्यासोबत संपर्क तोडला तो कायमचाच ...!

अनन्या मात्र त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. कारण अनन्याचे रितेशवर जीवापाड प्रेम होते. रितेश एक ना दिवस तिच्याकडे परत येईल या आशेवर ती जगत होती.  


त्याच वेळेस अनन्यासाठी अनिकेतचे स्थळ सांगून आले. हुशार , सद्गुणी , शांत स्वभावाचा अनिकेत एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर कामाला होता. खरं सांगायचे तर अनन्यासाठी तो सगळ्यात उत्तम जोडीदार होता. घरच्यांनी अनन्याला अनिकेत सोबत भेटायला सांगितले. अनन्याने या लग्नास नकार दिला. अनन्याचे घरचे तिला लग्नासाठी मनवू लागले. तुला अनिकेत पसंत नसेल तरी हरकत नाही.  तुझी कोणी पसंत असेल तर सांग .... असे सगळ्यांनी तिला सांगितले. मात्र रितेशचा काहीच पत्ता नसल्यामुळे ती काहीच बोलू शकली नाही.


नाईलाजाने तिने अनिकेतसोबत लग्नाला होकार दिला. अनिकेत तर खूप खुश होता कारण पाहताचक्षणीच तो अनन्याच्या प्रेमात पडला होता. रितेशची वाट पाहून पाहून अनन्या थकली आणि शेवटी तिचे लग्न अनिकेत सोबत झाले. लग्नानंतर जेव्हाही अनिकेत अनन्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असे त्यावेळेस अनन्या त्याला नकार देत असे. मला अजूनही वेळ हवा आहे असे सांगून वेळ मारून देत असे.  


अनन्याची उदासी रितेशला जाणवत होती. त्याने अनेकदा तिला कारण विचारण्याचा देखील प्रयत्न केला परंतु अनन्याने अनिकेतला कधीच काही सांगितले नाही. दिवसामागून दिवस जात होते. अनिकेत आणि अनन्या च्या लग्नाला एक महिना होण्यात आला होता.


आणि एक दिवस अचानक अनन्याला रितेशचा फोन आला. अनन्याला तर आभाळाएवढा आनंद झाला. रितेशने घडलेल्या सगळ्या प्रकाराबद्दल तिची खुप माफी मागितली आणि अनन्याला त्याच्याकडे निघून यायला सांगितले. रितेशच्या प्रेमात वेडी असलेल्या अनन्याला काही सुचेनासे झाले होते. त्यामुळे अनिकेत , तिचे आईबाबा यांचा आणि मागचा पुढचा कुठलाच विचार न करता तिने रितेशकडे जाण्याचा निर्णय घेतला.  


घरातून जाताना अनिकेतसाठी ती एक चिट्ठी सोडून निघून गेली आणि रितेशला जाऊन भेटली.   रितेशला पाहताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. 


" कुठे गेला होतास मला सोडून ...?" 


" मी जिवंत असूनही मेल्यासारखी होती रे , 

रितेश तुझ्याशिवाय .... ! " 


" आज आईवडील , नवरा सगळे काही सोडून आली आहे मी तुझ्यासाठी कारण नाही जगू शकत मी तुझ्याशिवाय ... ! "


" आपण लगेच लग्न करूया कारण अनिकेत आणि माझे लग्न कागदोपत्री अजूनही रजिस्टर नाही. आपल्याला लग्नासाठी लागणारी कागदपत्रे  मी सोबत घेऊन आली आहे..."  


असे बोलून रितेशला भेटून ती रडू लागली. यावर रितेश मात्र काहीच बोलला नाही.


दिवसभर सोबत फिरुन रितेश तिला घेऊन मित्राच्या फार्महाऊस वर गेला. खुप रात्र झाली होती. फार्महाऊसवर अनन्या आणि रितेश फक्त दोघेच होते. तो अनन्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. अनन्याने त्याला पुन्हा दुर केले. अजून थोडे दिवस थांब ..मग लग्न झाले कि हे सगळे करायचेच आहेस ...असे तिने रितेशला सांगितले आणि रितेशचा मात्र पारा सरकला. तो चिडून बोलू लागला ...


" काय लावले आहेस गं  ...लग्न ..लग्न..? नाही करायचे आहे मला तुझ्यासोबत लग्न ...कॉलेज मध्ये असतानाही लग्न सोडून कुठलाच विषय नव्हता तुला बोलायला ... कधीच जवळ येऊ दिले नाही तुझ्या ..." 


असे बोलून रितेश तिच्या सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला. रितेशच्या या बोलण्यामुळे अनन्याला खूप मोठा धक्का बसला ...ती रडून बोलू लागली ...


" नाही रितेश , तु असे नाही करू शकत ...."


" हो मी असे करू शकतो ..कारण आता तुझ्याकडे कुठेही जाण्याचा पर्याय उरला नाही. लग्न झाल्यानंतर एका पर पुरुषासोबत पळून जाणाऱ्या बायकोला कोणताही नवरा स्वीकारणार नाही. तुझेच आईवडील देखील तुला घराचे दरवाजे बंद करतील.तुला मला हो म्हणण्या शिवाय पर्याय उरला नाहीय... "  


असे बोलून रितेश राक्षसी हसू लागला. अनन्याला आपली चूक लक्षात आली. रश्मीचे समजावणे आठवले परंतु आता वेळ निघून गेली होती. जिवाच्या आकांताने अनन्या आपली अब्रू वाचविण्यासाठी प्रयत्न करू लागली मात्र रितेशला तिची कुठलीही दया येत नव्हती. तो तिला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळेस एक फुलदाणी अनन्याच्या हातात लागली. तिने रितेशच्या डोक्यात त्या फुलदाणीने वार केला. डोक्यावर वार झाल्यामुळे रितेश तात्पुरता बेशुद्ध पडला. स्वतःची इज्जत वाचवून अनन्या तिथून पळून जाण्यात यशस्वी झाली.


इकडे अनिकेतला अनन्याने त्याच्यासाठी लिहिलेली चिट्ठी सापडली. ती चिट्ठी वाचून तो तडक अनन्याच्या आईबाबांच्या घरी गेला. त्याने ती चिट्ठी अनन्याच्या आईबाबांच्या हातात दिली. 

दोघांनाही ती चिट्ठी वाचून धक्का बसला. ते अनिकेतचे पाय धरून त्याची माफी मागण्यासाठी पुढे सरसावले. त्यावेळेस अनिकेतने त्यांना सावरले. तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाही असे त्यांना समजून सांगितले. तो बोलू लागला ...


" आईबाबा , अनन्या जे काही वागली त्यासाठी तुम्ही स्वतःला दोषी मानू नका. मी तुमच्या मुलासारखा आहेस त्यामुळे माझी माफी मागुन तुम्ही मला लाजवू नका... " 


" मान्य आहे अनन्याने मला फसविले पण आजही माझे तिच्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे तिचा जोडीदार योग्य असेल तर मी स्वतः तिचे लग्न त्याच्यासोबत लावून देईल कारण शेवटी तिच्या आनंदात माझा देखील आनंद आहे. परंतु तीची निवड चुकीची असेल तर मात्र तिचे संपूर्ण आयुष्य खराब होईल त्यामुळेच तिचा शोध आपण लवकरात लवकर घ्यायला हवा .. " 


" तुम्ही कोणतेच टेन्शन घेऊ नका आईबाबा ..मी तिला सुखरूप परत आणेल फक्त या गोष्टीची तुम्ही कुठेही वाच्यता करू नका ...येतो मी .." 


असे बोलून अनिकेत तिथून निघून गेला.


स्वतःचा जीव वाचवून अनन्या पळून गेली आणि  रेल्वेस्टेशनवर तिने रात्र काढली. रात्रभर अनिकेत तिचा शोध घेतच होता. त्याचवेळेस रेल्वेस्टेशनवर तिचा तपास करण्यासाठी तो आला आणि समोरच्या बाकावर अनन्या बसलेली त्याला दिसली. अनिकेतला पाहताच अनन्या घाबरली. अनिकेतने तिला हात धरून उठवले , पाणी प्यायला दिले आणि गाडीत बसवून तिच्या आईबाबांकडे नेऊन सोडले. या सगळ्यात एकही शब्द तो तिला बोलला नाही.

अनन्याला खूप अपराधी वाटत होते.


अनिकेत त्याच्या घरी निघून गेल्यावर घडलेली सगळी हकीकत तिच्या आईबाबांनी अनन्याला सांगितली. हाती सोने असताना तु मात्र कोळश्याच्या मागे धावत होती , असे बोलून तिची चूक तिच्या लक्षात आणून दिली. अनिकेत आजही तुझ्यावरच प्रेम करतो म्हणून त्याच्याकडे परत जा , असा प्रेमळ सल्ला तिच्या आईबाबांनी अनन्याला दिला.


अनिकेतला आवडते तसेच सजून अनन्या अनिकेतकडे जाण्यास निघाली. सुंदरशी पिवळ्या रंगाची साडी घालून ती तयार झाली. पिवळ्या रंगाची साडी , त्यावर सुंदर मखमली लाल रंगाचे ब्लॉउज , गळ्यात सुंदर ठसठशीत मंगळसूत्र , एक नाजूकसा राणीहार ,  हातात मोत्यांचे तोडे , गुलाबीसर हातात हिऱ्याची अंगठी , कपाळावरची नाजूक चंद्रकोरी टिकली , लांबसडक केसांना मोकळे सोडून त्यावर लावलेली छोटीशी पिन या सगळ्यात ती खुपंच सुंदर दिसत होती.


घरी येताच दरवाज्याची बेल वाजवून ती बाहेर उभी राहिली. अनिकेतने दरवाजा उघडला. बाहेर उभ्या असलेल्या अनन्याचे रूप पाहून तो पुन्हा एकदा तिच्यावर मोहित झाला. त्याने तिला घरात बोलावले. कितीवेळ झाला पण दोघेही एकमेकांसोबत काहीच बोलत नव्हते. न राहवून अनन्याने सुरुवात केली ...


"I am very sorry , अनिकेत ... , मला माहिती आहे मी तुझी गुन्हेगार आहे आणि माझा गुन्हा माफ करण्यासारखा नाही , पण तरीही मला माफ कर. मला तुझ्या आयुष्यात जागा दे , असे सांगण्याचा अधिकार देखील नाही रे मला ....! "


" रितेशसारख्या नालायक माणसाच्या प्रेमात पडले मी .. , हीच माझी चुकी होती. त्याला माझे प्रेम नाही तर माझे शरीर हवे होते , त्याला फक्त शारीरिक भूक होती. तो आधीही माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असे पण मी त्याला दुर सारत असे. त्यामुळेच त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो माझा असा वापर करेल असे कधी स्वप्नात देखील वाटले नाही. माझी अब्रू वाचवून पळताना मला जाणवले , प्रेम पण पारखून करायला हवे नाही तर हाती हिरा असतानाही ... , आपण कोळश्याच्या मागावर असतो .... ! " 


" मला माफ कर अनिकेत ...i am sorry ....!

i am really very very sorry ....! "  


असे बोलून अनन्याच्या डोळ्यातुन अश्रू येऊ लागले. तिचा अश्रूचा थेंब डोळ्यातून खाली पडण्यापूर्वीच अनिकेतने तो आपल्या तळहातावर  झेलला आणि बोलू लागला ...


" तुझ्या डोळ्यात अश्रू यावे म्हणून तुझ्यासोबत लग्न नव्हते केले मी .... ! " 


" तुझे हे अश्रू खूप मौल्यवान आहेत माझ्यासाठी ...! " 


" तुला पाहताक्षणीच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो  आणि माझे हृदय , माझे मन सारे काही तुझ्यात गुंतले होते ....! "


"  चुका ह्या माणसाकडूनच होतात ...आपण देव थोडीच आहोत ..एकही चूक न करायला ...! " 


" झाले गेले सारे विसरून आता पुन्हा नव्याने सुरुवात करूया ... !"


" अजून एक गंम्मत सांगायची आहे तुला ... मला कवितेचा " क "  सुद्धा येत नाही तरीही तुझ्यासाठी एक कविता तयार केली आहे ...ऐकवतो ...ऐकल्यावर कशी वाटली ते नक्की सांग .....! "


गुंतता हृदय हे ....

मी तुझाच झालो .... ! 


पाहताक्षणी मी तुझाच झालो ...

मिटले सारेच अंतर आपल्यातले ....! 


प्रेमात तुझ्या मी नव्याने पडलो .... 

गुंतता हृदय हे .... 

मी तुझाच झालो ....!


सुख तुझेच दुःख माझे असावे ....

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रेम फक्त तुझेच असावे .... !


वलय असावे तेजाचे आपुल्या प्रेमाला ....

पुन्हा कधीही नजर ना लागो या आपुल्या नात्याला 


मोहात तुझ्या मी पुन्हा पुन्हाच पडलो ...

गुंतता हृदय मी तुझाच झालो .... !  


कविता ऐकतानाच अनन्याचे डोळे आणखीनच पाणावले आणि तिने अनिकेतला घट्ट मिठी मारली... 


त्या मिठीतच खरे प्रेम ...म्हणजे आयुष्याचे सार सामावले होते .....! 


समाप्त !


कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.


धन्यवाद !🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 


फोटो साभार - pixels/google 


✍©️ जया पाटील




Post a Comment

0 Comments