सारथी .. भाग एक

#सारथी .. भाग एक 


©️जया पाटील





" अभिनंदन श्वेता , मुलगा झाला तुम्हाला ... छोट्या कृष्णाचा जन्म झाला तुमच्या घरी ... "


छोटासा कान्हा श्वेताच्या हातात देत हॉस्पिटल मधील नर्स बोलत होती.


छोट्या बाळाला हातात घेताच आयुष्यभराचे समाधान प्राप्त झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. बाळाच्या माथ्यावर एक गोड पापा घेऊन ती भरून पावली. श्वेता हातातील बाळाला पाहून ती मनोमन बाळासोबत बोलु लागली ...


"बाळा , तुझ्या येण्याने माझे आयुष्य जणू  इंद्रधनुष्याच्या सप्तरंगी रंगाने रंगून गेले आहे. तु माझ्या उरात असल्यापासुन मला झालेला त्रास आताही आठवतोय मला परंतु तुझ्या येण्याच्या चाहुलीमुळे तो त्रास देखील सुखावणारा होता. तुझ्या येण्याच्या चाहुलीपासुन ते आज तुझ्या जन्मापर्यंतच्या सगळया आठवणी आज डोळ्यांपुढे तरळत आहे. तु माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठे गिफ्ट आहेस ..आणि यात निखिलने म्हणजे तुझ्या बाबाने मला साथ दिली नसती तर आज परिस्थिती काही वेगळी असती ...


आणि तिचा सगळा भूतकाळ तिच्या  नजरेसमोरून सरकत होता. तिला तिचे जुने दिवस आठवले ...


लग्नापूर्वीची श्वेता ...एक बोलकी , हुशार आणि चुणचुणीत मुलगी...फार सुंदर नसली तरीही तिचे डोळे मात्र खूपच बोलके होते त्यामुळेच पहिल्याच नजरेत कोणाच्याही नजरेत भरायची अशीच होती श्वेता .... ! इंजिनीरिंगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेणारी श्वेता शाळेत असतानाही खूप मैदानी खेळ खेळायची. कधी कधी मात्र तिला खूपच थकवा जाणवायचा पण मुली नाजूक असतात , त्यात श्वेता तब्येतीला देखील फारशी सुदृढ नसल्यामुळे तिच्या आईबाबांना वाटायचे थकवा असेल आणि थोडा वेळ आराम केला कि तिला बरे वाटायचे.


दिवसेंदिवस श्वेताचा थकवा वाढतच चालला होता. थोडे देखील काम करण्यात आले तरी तिला प्रचंड थकवा येत असे. तिच्या मासिक पाळीच्या वेळेस तिला होणारा त्रास हा सहनशक्तीच्या पलीकडे होता. डॉक्टरांनी काही मेडिसिन दिले कि काही दिवसासाठी त्रास कमी व्हायचा पुन्हा तेच .... श्वेताला आणि तिच्या आईबाबांना तिची खूप काळजी वाटत होती. 


एक दिवस श्वेताच्या मैत्रिणीची बहीण त्यांच्या घरी आली. पेशाने डॉक्टर असल्यामुळे श्वेताच्या आईने श्वेताच्या तब्येतीबाबत सगळ्या गोष्टी तिला सांगितल्या. तिने श्वेताच्या काही तपासण्या करून घेण्याचा सल्ला दिला. त्या सगळ्या तपासण्या करण्यासाठी तिने तिच्या ओळखीच्या डॉक्टरांचा रेफरन्स दिला.  


ठरलेल्या दिवशी दिलेल्या वेळेत श्वेता आणि तिचे आईबाबा तिच्या टेस्ट करण्यासाठी पोहोचले. सगळ्या टेस्ट झाल्यावर दुसऱ्या दिवशी रिपोर्ट येणार होते. रिपोर्ट आल्यावर श्वेता आणि तिचे आईबाबा डॉक्टरांना भेटायला गेले.


डॉक्टरांनी श्वेताला तिला होणाऱ्या त्रासाबद्दल विचारले. सतत थकवा , मासिक पाळीच्या वेळेस रक्तस्त्राव न थांबणे , टूथब्रश करतांना हिरड्यातून येणारे रक्त न थांबणे अश्या अनेक गोष्टींना श्वेता रोजच्या रोज सामोरी जात होती.  


श्वेता सोबत आजाराच्या संपूर्ण लक्षणांची चर्चा केल्यानंतर डॉक्टरांनी धीराने श्वेताला आणि तिच्या आईबाबांना तिच्या आजाराबद्दल सांगायला सुरुवात केली. डॉक्टर बोलु लागल्या ...


" श्वेता , तुझ्यासोबत बोलताना मला जाणवलं कि तु अत्यंत धीराची आणि समजदार मुलगी आहेस..त्यामुळे आता मी तुझ्या आजाराबद्दल जे काही तुला सांगणार आहेस त्याबद्दल तु अगदीच संयमाने ते सगळे समजुन घेशील.. आणि तु ट्रीटमेंटला सपोर्ट केलास तर तु लवकरात लवकर बरी होशील ...! "


" डॉक्टर , काही सिरिअस आहेस का ...? प्लीज तुम्ही सांगा लवकर आणि हो मी माझा संयम नाही ढासळू देणार कारण आलेल्या परिस्थितीला मलाच सामोरे जायचे आहे. त्यामुळे तुम्ही मला सांगू शकतात माझ्या आजाराबद्दल.."  


श्वेता डॉक्टरांचे बोलणे मधेच तोडत म्हणाली.


" Thats the spirit ...! मला तुझ्या कडून हीच अपेक्षा होती श्वेता .." 


" तुला हिमोफेलियाचे निदान झाले आहे , श्वेता "


 डॉक्टर बोलत होत्या...


" हिमोफेलिया म्हणजे काय ...? 


" तर आपल्याला छोटीशी जखम झाली कि थोडा वेळ त्यातून रक्त येते आणि काही वेळाने ते रक्त गोठते , त्यामुळे तो रक्तस्राव बंद होतो आणि पुढील हानी टळते."  


" पण शरीराने स्वत:च्या बचावासाठी तयार केलेली ही यंत्रणा कधीतरी निकामी ठरली तर... रक्तातील काही महत्त्वाच्या घटकांनी काम केले नाही किंवा त्या घटकांचा अभाव असेल तर त्या आजारास हेमोफिलिया म्हणतात. थोडक्यात सांगायचे तर हिमोफेलिया म्हणजे रक्त न गोठण्याचा आजार.. "


" हिमोफिलिया हा एक अनुवांशिक आजार आहे. रक्तामध्ये एकूण १३ प्रकारचे घटक असतात. आपण याला प्रथिने म्हणू शकतो. यांपैकी एक जरी घटक कमी असला, किंवा नसला, तर रुग्णाला आपोआप रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. किंवा रक्तस्त्राव झाला, तर थांबत नाही.


रक्त न गोठण्याचे २० प्रकारचे आजार आहेत. पण त्यात हिमोफिलिया सर्वसाधारणपणे आढळतो. त्यामध्ये तीन प्रकार आहेत. ए, बी आणि सी. यामध्ये ‘ए’ हा प्रकार मोठ्या प्रमाणावर आढळतो. या प्रकारामध्ये रक्तात फॅक्टर ८ अर्थात ८ क्रमांकाचे प्रथिन उपलब्ध नसते."  


" ‘बी’ या प्रकारामध्ये फॅक्टर ९ उपलब्ध नसतो. तर ‘सी’ या प्रकारामध्ये फॅक्टर ११ उपलब्ध नसतो."


" सी हा प्रकार अतिशय कमी लोकांमध्ये आढळतो. (‘व्हॉन विलीब्रांड डिसीज’, या नावाचाही एक आजार आहे. हा हिमोफिलीयाचा प्रकार नसला, तरी रक्तस्त्राव होण्याचाच एक आजार आहे.)


" हिमोफिलिया ‘ए’ आणि ‘बी’, हे दोन आजार मुलांना होतात. पुरुषांकडे एक्स आणि वाय असे दोन क्रोमोझोम्स असतात. तर स्त्रियांकडे दोन्हीही एक्स क्रोमोझोम्स असतात आणि एकावेळी दोन्हीही खराब असण्याची शक्यता खूपच कमी असते. हा जनुकीय दोष असून, तो एक्स या क्रोमोझोम्समध्ये असतो. त्यामुळे सहसा हा आजार स्त्रियांना होत नाही. त्या या आजाराच्या वाहक असतात. परंतु तुझी केस याला अपवाद म्हणावी लागेल श्वेता ... !"  


कधी कधी असे अभ्यासात आले आहेस कि हा आजार जन्मतःच नसतो. पण काही आजारांमध्ये असे घटक निर्माण होतात की ते रक्तातील फॅक्टर ८ आणि ९ नष्ट करतात. त्यामुळे हा आजार नव्याने होऊ शकतो. त्याची उपचार पद्धतीही वेगळी असते. तुझ्याबाबतीत देखील असेच काही कॉम्प्लिकेशन झाले असल्यामुळे रक्तातील ' क्लॉटिंग फॅक्टर' कमी होत आहेत "  


" हिमोफिलियाच्या प्रत्येक प्रकारामध्येही प्रत्येकी सौम्य, मध्यम आणि तीव्र असे ३ उपप्रकार असतात. एखाद्या सामान्य व्यक्तीचे १ मिलीलीटर रक्त घेतले, तर त्यामध्ये एखाद्या प्रथिनाचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत असते. टी २०० टक्क्यांपर्यंतही असू शकते. जर ते प्रमाण ५ ते ५० टक्के असेल, तर त्या व्यक्तीला सौम्य हिमोफिलिया ‘ए’ आहे, असे समजले जाते. १ ते ५ टक्के असेल, तर तो मध्यम प्रकारचा हिमोफिलिया ‘ए’ असतो आणि जर हे प्रमाण १ टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर तो मात्र तीव्र हिमोफिलिया ‘ए’ असतो. "  


" तुझ्या केस स्टडी वरून मला एक लक्षात येतेय सुरुवातीला सौम्य असणारा त्रास आता मात्र तुझ्या शरीरात तीव्र रूप धारण करतोय त्यामुळेच तुला होणारा त्रास हळूहळू वाढत चालला आहे. "


"आता या आजाराच्या उपायांबद्दल बोलायचे तर रक्तातील नसलेला फॅक्टर सतत रक्तामध्ये देत राहणे, त्याचे रक्तातील प्रमाण सतत कायम राखणे, हा एक उपाय आहे. त्यासाठी बाहेरून इंजेक्शन द्यावी लागतात. पूर्वी जेंव्हा रक्तस्त्राव होईल, तेंव्हाच हा उपचार दिला जायचा. म्हणजे मागणीनुसार दिला जायचा. पण त्यामुळे शरीरावर होणारा दुष्परिणाम न टाळण्यासारखा होतो."   


"या आजारामध्ये सांध्यांवर खूप परिणाम होतो. गुडघ्यावर जास्त परिणाम होतो. ज्याला तीव्र स्वरूपाचा आजार असतो, त्याला वर्षातून २० ते २५ वेळा रक्तस्त्राव होतो. पोटात, मेंदूमध्येसुद्धा होतो. तो जास्त सांध्यांमध्ये होतो. सांधे आणि मेंदूमध्ये रक्तस्त्राव होण्याचे प्रमाण जास्त आहे." 


" जखम झाल्यावर पुढे जास्त रक्तस्त्राव होऊच नये, यासाठी आधीच उपचार केले जातात. यामध्ये सतत फॅक्टर देत राहायचा आणि रक्तातील त्याचे प्रमाण कायम राखायचे. यासाठी दर दोन दिवसांनी हे फॅक्टर देत राहावे लागते. त्यामुळे आपोआप रक्तस्त्राव होत नाही. याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणतात. आयुष्यभर हे उपचार घ्यावे लागतात."  


" तुला देखील या उपचारांना आता सुरुवात करावी लागणार आहेस श्वेता  आणि हो तु समजदार आहेस , त्यामुळे तुला काही महत्वाच्या गोष्टी अजून सांगाव्याश्या वाटतात ज्या तुझ्या खाजगी जीवनाविषयी आणि भविष्यातील वैवाहिक आयुष्याविषयी आहेत. " 


" ह्या आजारामुळे भविष्यात तुला आई होता येईल कि नाही हे देखील सांगता येणार नाही. जो सर्वपरीने तुला समजुन घेईल असाच जोडीदार तुला याबाबतीत आयुष्यभर साथ देऊ शकेल. "  


" ह्या सगळ्या गोष्टी सांगून मला तुला घाबरवायचे नाही परंतु तुला तुझ्या आजाराविषयी आणि त्याच्या परिणामांची कल्पना असावी म्हणून तुला मी हे सगळे सांगितले. उद्यापासूनच आपण तुझ्या उपचारांना सुरुवात करूया. आपण आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करूया ..शेवटी god is great ...त्याच्यावर विश्वास ठेऊन मोकळे होऊया ...be brave .."  


श्वेताच्या आजाराबद्दल ऐकून श्वेताच्या आईबाबांच्या पायाखालची जमीन हादरली. श्वेताचे भविष्य कसे असणार या विचाराने हे हैराण झाले. श्वेताला देखील खूप टेन्शन होते परंतु आपल्याकडे पाहून आईबाबा जास्तच टेन्शन घेतील त्यामुळेच ती अगदीच संयमाने वागत होती. 


श्वेताच्या उपचारांना सुरुवात झाली. तिला खूपच त्रास होत होता. परंतु धीराने लढायचं असे तिने मनापासून ठरवले होते. तिचा आत्मविश्वास तिला कामी येत होता. तिच्यावरील ट्रीटमेंट मुळे तिला कॉलेज अटेंड करणे शक्य नसल्यामुळे तिला तिचे इंजिनीरिंगचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. ती मनाने खूप खचली. श्वेताचे शिक्षण तर अर्धवट राहिले पण तिच्या लग्नाचे काय ..? ही एकच चिंता तिच्या आईबाबांना लागून राहिली होती. तिच्या आजारामुळे ती जर आई होऊ शकली नाही तर कोण तिच्या सोबत लग्न करणार ...?  


श्वेता तिच्यावर होणाऱ्या उपचारांना योग्य साथ देत होती. श्वेताच्या आईबाबांनी त्यावेळेस तिच्यासाठी वरसंशोधनाला सुरुवात केली. श्वेताने  देखील लग्नासाठी तिच्या आईबाबांना होकार दिला , या सगळ्यात मात्र श्वेताची एक अट होती. ती म्हणजे तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तिच्या आजाराबद्दल संपूर्ण कल्पना असावी. त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम देखील त्याला माहिती असावे. कारण कोणाचीही फसवणूक करून श्वेताला लग्न करायचे नव्हते. तिच्या आजाराबद्दल माहिती झाल्यावर मात्र सगळीच मुलं तिला नकार देत होती.  



" असेच सुरु राहिले तर तुझे लग्न कधीच होणार नाही . तुझ्या आजाराबद्दल आधीच माहिती दिल्यावर तुला नकारच येईल. आमचे ऐक , आपण या सगळ्या गोष्टी लग्न झाल्यावर देखील सांगू शकतो... " 


श्वेताचे आईबाबा तिला समजावणीच्या सुरात सांगत होते. 


" आईबाबा  , हा अविश्वास असेल ना ... कदाचित काहीही न सांगता माझे लग्न झाले जरी तरीही ते टिकेलच कशावरून ...? ते लग्न तेव्हा देखील तुटेलच त्यामुळेच मला सगळे काही सांगितल्याशिवाय कोणासोबत लग्न करायचे नाही आणि मी या निर्णयावर ठाम आहे. " 


श्वेताने तिच्या आईबाबांना सांगितले.


श्वेतावर उपचार सुरूच होते पण तिचे शरीर मात्र खूपच थकले होते.तरी देखील ती आत्मविश्वासाने उभी होती. तिने डिस्टंन्स लर्निंगच्या माध्यमातून स्वतःचे शिक्षण पुन्हा सुरु केले. विज्ञान शाखेत प्रॅक्टिकलवर भर असल्यामुळे तिला प्रॅक्टिकलला उपस्थित राहणे शक्य नव्हते. त्यामुळेच तिने आर्टस् च्या क्षेत्रात प्रवेश घेतला. इतिहास या विषयात मास्टर डिग्री करण्याची तिची इच्छा होती. तिने अभ्यास सुरु केला. शरीर थकलेले असले तरीही ती मनाने मात्र खंबीर होती. खूप प्रयत्नांती तिने इतिहास या विषयात ग्रॅजुएशन पूर्ण केले.


श्वेताने पोस्टग्रॅजुएशनचा अभ्यास सुरु केला आता मात्र तिला खूपच साऱ्या पुस्तकांची गरज भासे. त्यामुळे तिने लायब्ररीत जाऊन अभ्यास करायचे ठरवले. तिच्या तब्येतीला खरंतर ते मानवणार नव्हतं , पण तिची जिद्द तिला प्रत्येक कठीण वळणावर साथ देत होती. एक दिवस श्वेता लायब्ररी मध्ये पुस्तक शोधत असताना तिला चक्कर आली आणि वेळीच येऊन बाजूला उभ्या असलेल्या निखिलने तिला सावरले.


निखिल इंजिनीरिंगचा विद्यार्थी पण त्याच्या बहिणीचे पुस्तकं परत करण्यासाठी तो लायब्ररी मध्ये आला होता. श्वेताला सावरून त्याने एका बाकावर बसवले आणि तिच्या तब्येतीची विचारपूस केली.


लायब्ररीमधला तो दिवस तिच्यासाठी खूपच अविस्मरणीय ठरला कारण त्याच दिवशी तिच्या आयुष्यात निखिल आला .....


क्रमश:


श्वेताच्या आजारामुळे तिचे भविष्य कसे असेल ..? तिचे पोस्ट ग्रॅजुएशन करण्याचे स्वप्न पूर्ण होईल का ..? निखिल तिच्या आयुष्यात येण्यामुळे काय बदल होईल ..? तिचे वैवाहिक आयुष्य कसे असेल.. ?  हे सगळे जाणून घेण्यासाठी पुढचा अंतिम भाग वाचायला विसरू नका.


तळटीप - हिमोफेलियाची संपूर्ण माहिती गूगलवरून साभार .🙏 सदर कथा ही सत्यघटनेवर आधारित असून फक्त कथाचित्रण करण्यासाठी काही गोष्टीत बदल करण्यात आला आहे.

भाग दोन वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇

👉  सारथी .. भाग अंतिम

कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.


धन्यवाद !🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 


फोटो साभार - pixels & google 


✍©️ जया पाटील


Post a Comment

0 Comments