आईच काळीज


 

#आईचं_काळीज

©Velvet Kavisha


आज मातृदिन. 

संध्याकाळी चार वाजता डॉ. सौरभ - प्रसिध्द बालरोग चिकित्सक यांचं "Smart Parenting Session" एका चॅनेलवर लाईव्ह होतं. 

त्याने आपल्या आईला फोनवरून आठवण करून दिली. 

डॉक्टर सौरभ "मम्माज् बॉय" म्हणूनच ओळखले जायचे. 

त्यांनी त्यांच्या क्षेत्रात खुप लहान वयातच नाव कमावलेलं.  

बऱ्याच आईंच्या विश्वासास पात्र ठरलेले डॉ.सौरभ मयुरी आनंद दळवी.


चार वाजता मयुरीने टीव्ही ऑन केला. 

समोर आपल्या मुलाला पाहून तिचा ऊर अभिमानाने भरून आला. 

समोरून बऱ्याच आया प्रश्न विचारत होत्या 

अन् मयुरीचा "गट्टू" सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होता.  

डॉक्टर सौरभला एका आईचा प्रश्न 

"बाळं दुध नीट घेत नाही.

 त्यामुळे छाती भरून राहते. 

कधी कधी दुध काढून फेकावं लागतं.काय करु..??  डॉ. सौरभने त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केली. 

त्या प्रश्नांसाठी टीव्ही समोर बसलेली मयुरी भुतकाळात गेली....


मयुरीच्या लग्नानंतर पाच वर्षांनी 

बाळाने सुखाची चाहूल दिली.  

डॉक्टरांच्या फेऱ्यांत आणि 

औषधांच्या माऱ्यांत पोटी वसलेल्या बाळाने नऊ महिन्यांची साथ छान निभावली. 

मयुरीने  हे नऊ महिने आनंदात जगून घेतले. 

प्रत्येक क्षणन् क्षण हृदयात जपून ठेवलेला. 

नऊ महिने झाले अन् 

एका पहाटे पोटात दुखू लागलं. 

मोठ्या हॉस्पिटलमध्ये नाव घातलेलं. 

टॅक्सी करून हॉस्पिटलमध्ये पोहोचले.  

चारपाच तासांनी डिलिव्हरी झाली. 

सिझरीयन केलं. 

सुरुवातीपासून शंभरात असणाऱ्या ठोक्यांनी धोक्याची पातळी गाठली. 

डॉक्टरांनी बाळाला आॅक्सिजन लावायला सांगितलं. 

ओटीच्या टेबलवरच बाळाला आॅक्सिजनचा मास्क लावण्यात आला. 

डॉक्टरांनी बाळाची नाळ कापताच 

फक्त एकदा टाहो फोडून बाळ शांत झालं. कायमसाठी.  

परमेश्वराने दिलेले मातृत्व क्षणांत हिरावून नेलं. सोबत खुप आठवणी आणि पोकळी देत. 


चार पाच तासांनी शुध्दीवर आलेल्या मयुरीला डॉक्टरांनी सगळं समजावून सांगितलं. 

रडून रडून ती हैराण झाली. 

बाळ नसलं तरी मयुरीला चार दिवस हॉस्पिटलमध्ये राहणं भागच होतं.  

"देवा, तु इतका का बरं निष्ठूर झालास?? 

इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुख पदरात घातलंस ते ही क्षणिक ठरलं. 

अजून थोडं उशिरा दिलं असतंस तरी चाललं असतं पण दिर्घायुष्य द्यायचं होतंस बाळाला. 

सांग, का बरं इतका क्रूर वागलास..?? 

एका आईशी असं वागताना कसंच काही वाटलं नाही का तुला..?? " 

विषण्ण मनाने मयुरी देवाला जाब विचारत होती.


चार दिवस अगदीच मरणप्राय अवस्थेत असलेली मयुरी घरी जायला निघाली. 

फुटलेला पान्हा सावरताना कसरत होत होती.  

चार नंबरच्या बेडजवळ आली तशी तिची पावलं थबकली. 

अवघ्या सहा दिवसांच्या रडणाऱ्या बाळाला त्याची आजी चमच्याने दुध पाजत होती. 

"पी पोरा पी. रडू नकोस. 

माझ्या लेकीच्या आत्म्याला शांती न्हाई मिळायची." 

ते बाळ एनआयसीयूत ठेवलं होतं.  

फक्त दूध पाजण्यापुरतंच आजीकडे दिलं जायचं. 

त्याची आई बाळाच्या जन्मानंतर काही तासांतच मुलाला पोरकं करून निघून गेली.


आता ही त्या बाळाची दूध पाजायची वेळ झाली 

म्हणून त्याला आजीकडे देण्यात आलं होतं. 

आजी डोळ्यातले अश्रू सांडत नातवाला दूध पाजत होती. 

मयुरी बेडच्या टोकावर बसली.  

तिने त्या तान्हुल्याला  उचलून छातीशी लावलं. 

त्याचं पोट भरलं तसं बाळं झोपी गेलं. 

तृप्तता दोघांनीही अनुभवली पहिल्या स्तनपानाची. 

आजीने मयुरीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. 

"भोग आणि नशीब काही कोणाला सुटलं न्हाई. 

त्या ईश्वराने भोगलं. आपण तर माणसं." 

म्हणत डोळ्यातलं पाणी पुसलं.


डॉक्टरांनी "छातीत दुध साठू देऊ नका 

नाहीतर गाठी होतील" सांगितलेलं. 

दूध पिळून ओतून टाकण्यापेक्षा 

ते अमृत कोणा बाळाला मिळालं तर ते त्याला किती लाभदायक ठरेल. 

गोळ्या घेऊन दूध बंद करणं किंवा पिळून ओतून टाकणं मयुरीला पटत नव्हतं. 

एक वेळ का होईना बाळाला अंगावर पाजलं होतं.  

तो अनुभव मोठा होता. 

नवऱ्याच्या मदतीने नेटवरून जवळपासचा एक अनाथाश्रम शोधून काढला.  

आणि अनाथाश्रमातील तान्ह्या मुलांची दुधआई व्हायचं ठरवलं. 

अनाथाश्रमातील वरीष्ठांना भेटून 

योग्य त्या परवानगी घेऊन 

तिचा नवरा तिला दिवसातून तीन वेळा अनाथाश्रमात घेऊन जावू लागला. 

मयुरी त्या अनाथ मुलांना दूध पाजून संतुष्ट होत असे. 

नवऱ्याची वीस दिवसांची रजा संपली तशी मयुरी एकटीच जाऊ लागली.  


ज्या मुलांना ती दूध पाजायची 

त्यात एक तीन महिन्याचं male baby ही होतं. 

गेले दोन महिने मयुरीशी त्याची छान ओळख झालेली. 

हाताच्या छोट्या छोट्या मुठी मारत, 

मध्येच हसत, मध्येच मस्ती करत तो दुध पिऊ लागलेला. 

एक वेगळंच समाधान मयुरीला मिळत होतं. 

त्या मुलाचा जरा जास्तच लळा लागला तिला.  

तिच्या नवऱ्याच्या लक्षात आलं. 

थोड्या अडचणींसहीत त्याने कायदेशीर बाबी पुर्ण करत त्याला घरी आणलं. 

त्याचं नाव "सौरभ". 


आता मयुरीने अनाथाश्रमात जाणं बंद केलं. 

पुर्णवेळ ती सौरभला देत होती. 

आता त्यांना स्वतःच मूलं नको होतं. 

सौरभ वर्षाचा झाला.  

आनंदने पुण्यात शिफ्ट व्हायचं ठरवलं. 

नोकरीसाठी प्रयत्न झाले आणि मुंबईतून तिघे पुण्यात आले. 

सौरभ जात्याच हुशार होता. 

आनंद मयुरीकडून सौरभला योग्य शिक्षण, संस्कार सारं काही मिळालं. 


सौरभने अठरा वर्षे पुर्ण केली आणि 

आनंदने तो दत्तक घेतलेला आहे हे सांगायचं ठरवलं. 

मयुरीला स्वतःच्या संगोपनावर विश्वास होता 

तरीही ती आतून धास्तावली.  

वाढत्या वयातलं मुलं आहे. 

चुकीचा विचार केला तर..?? 

खऱ्या आईचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर...?? 

आपल्याशी फटकून वागला तर..?? 

असे एक ना अनेक प्रश्न तिला  सतावत होते. 


एके रात्री जेवणं उरकल्यावर 

आनंदने सौरभला दत्तक पेपर दाखवून 

तो त्यांच्या घरात, त्यांच्या आयुष्यात कसा आला ते सांगितलं. 

सौरभ पाच मिनीटं शांत राहून बोलू लागला...


"तुम्ही दोघांनी 

मला तुमचा मुलगा म्हणून वाढवलंय ना..? 

मला त्या आईविषयी जाणूनच घ्यायचं नाहीयं 

जिने नऊ महिने मला तिच्या पोटात नाईलाजस्तव वाढवलं 

आणि जन्मतःच सोडून दिलं. 

माझ्यासाठी तर माझी मम्माच ग्रेट आहे. 

जिने मला स्वतःच दुध पाजलं. 

माझी आजारपणं काढली.  

माझ्यासाठी रात्र रात्र जागली. 

मला त्रास देणाऱ्यांशी पोटतिडकीने भांडली. 

दुसऱ्याच्या चुकीमुळे मला शिक्षा दिली गेली 

तेव्हा तिने आकाशपाताळ एक केलं. 

लहाणपणी किती वेळा तुम्हांला विचारलं की, 

मी एकटाच का...?? 

आता कळतयं. 

माझ्यावर अन्याय होऊ नये म्हणून तुम्ही दुसरं मुल होऊ दिलं नाही.  

आता माझी जन्मदात्री आई माझ्या पुढ्यात उभी राहिली तरी 

मी फक्त तिचे आभार मानेन. 

ते ही एवढ्यासाठीच की 

तिने मला नाईलाजास्तव का होईना जगात आणलं. 

परमेश्वराने तुमच्यापोटी जन्माला घातलं नाही 

तरीही मी तुमचाच मुलगा आहे. 

मम्माचा आणि माझा रक्तगट एक असणं 

ही सुध्दा मी तुमचा मुलगा असल्याचीच खुण मानतो.  

मी तुमचा मुलगा होतो, 

आहे आणि कायमच राहीन. 

काय नाही केलंत तुम्ही माझ्यासाठी. 

तुम्ही तुमच्या पोटच्या मुलाला सांभाळलं असतं तितक्याच प्रेमाने आणि आपुलकीने तुम्ही मला वाढवलंत. 

संस्कार दिलेत. 

आजही जन्माने नाही तर 

संस्काराने माणूस मोठा होतो.  

तुम्हांला जे सांगायचं होतं ते तुम्ही सांगितलंत. 

मला जे बोलायचं होतं ते मी बोललो. 

आता यापुढे हा विषय नको." 

सौरभने सांगितलं.


मयुरी आणि आनंदला अश्रू आवरेनात. 

अठरा वर्षांचं ओझं एका क्षणांत उतरलं होतं. सौरभने दोघांनाही जवळ घेऊन "I Love You both. U r proud feeling parents" 

म्हणत आश्वस्त केलं होतं.  

आज मयुरी फक्त दूध आई नसून सौरभची आई म्हणून भरून पावली होती. 


सौरभ हुशार होता. 

मेडिकलला गेला. 

MD DCH केलं. 

एवढा मोठा झालाय तरी त्याला सगळीकडे अजूनही आईच हवी असते. 

त्याच्या हॉस्पिटलमध्ये त्याला आईची एक तरी फेरी हवीच असते. 

एकत्र कॉफी घेतल्याशिवाय कामाचा ताण जात नाही त्याचा.  

त्याच्या हॉस्पिटलमध्ये "आईचा वॉर्ड" नावाचा चार बेडचा एक वॉर्ड आहे. 

अनाथाश्रम, खेड्यांतून आलेल्या गरीब पेशटंला तो विनामूल्य तपासतो. 

अॅडमीट करायची वेळ आलीच तर "आईचा वॉर्ड" सज्ज असतो.  

बाळाचे आई-वडील जाताना भरभरून आशीर्वाद देऊन जातात.  


सौरभ लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. होणाऱ्या बायकोला अट एकच.

"इकडचं जग तिकडे झालं तरी 

माझ्या आईवडिलांना दुखवायचं नाही." 


"तुझी आई काहीही बोलली, 

कशीही वागली तरी...??"  

संभाव्य पत्नीच्या प्रतिप्रश्नाला उत्तर देताना सौरभ म्हणतो, 

"जी बाई शरीरात आईचं काळीज घेऊन जगते. 

जी अनाथ मुलासाठी स्वतःचं मूल होऊ देत नाही. 

जी आपला पान्हा पोरक्या पोराला कोणत्याही दुस्वासाशिवाय पाजते. 

ती इतर कोणाच्या लेकराला दुखावणार नाही... स्वतःच्या मुलाइतकंच जी दुसऱ्याच्या लेकरावर माया करते तीचं काळीज आईचं.  

बाकीच्या फक्त बाईचं काळीज घेऊन फिरणाऱ्या." थोडं थांबून पुन्हा सौरभने बोलायला सुरुवात केली.


"माझं बोलणं पटलं नसेल तर सॉरी. 

पण कितीतरी सुना सासुसोबत येतात. 

नातवंडांचं आजारपण सांगताना सासवा सूनेच्या चूका सांगतात. 

तिचा हलगर्जीपणा दाखवायचा प्रयत्न करतात.  

अरे पण, ती ही नव्यानेच आई झालेली असते. 

किती तरी शारीरिक हानी झालेली असते. 

जुन्या पिढीपेक्षा येणारी नवीन पिढी ही २०% शारीरिक कमकुवतपणा झेलते. 

तो त्या पिढीचा दोष नाही तर 

जागतिकीकरणाचं बक्षीस आहे ते. 

आपण आई म्हणून जगलोय तर सूनेला मदत करु. असं सासूला वाटणं गरजेचं आहे.  

तर दुसरीकडे आपली सासू ही सगळ्यात आधी आई नंतर सासू आहे. 

तिच्याकडून मिळणारं मार्गदर्शन उपयुक्तच असेल असं सूनेने समजून घेणं गरजेचं आहे. 

'आमची मुलं आम्ही बघू काय करायचं ते.. 

तुमचे जुनाट विचार राहू देत तुमच्याकडे' असं मोठ्यांना सांगणाऱ्या नवोदित आई पाहिल्यात.

म्हणून म्हणतो स्त्रीकडे बाईंचं नाही आईचं काळीज लागतं. 

जे माझ्या मम्माकडे आहे."   


होणाऱ्या सूनेने मयुरीला तिच्या गट्टूचे बोल सांगितले 

तेव्हा मयुरीला "मातृदिन" म्हणून एकच दिवस साजरा का करतात असा प्रश्न पडला. 

आईपणाचा एकच दिवस नसतो कधी. 

अख्खं एक आयुष्य बाई आई म्हणून जगते.  

मयुरीचं आयुष्य सौरभने भरून टाकलंय. 

तिला मुक्तहस्ताने मातृत्व बहाल केलंय. 

तिची झोळी भरलेली आहे आणि भविष्यात भरलेली राहिलं. 


बाब्बो...!! भावुक झालात ना वाचून. 

आईचं काळीज हो ते भावुक करून जातं. बाकी काही नाही...!!


© Velvet Kavisha

Post a Comment

5 Comments

  1. गोड कथा... अप्रतिम 👍🏻😊

    ReplyDelete
  2. खुप छान

    ReplyDelete
  3. अत्यंत सुंदर

    ReplyDelete
  4. अत्यंत हृदयस्पर्शी !👌👌

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box