रडू नका हो??

 #रडू_नका_हो??


© Velvet Kavisha





एक काका होते... खुप प्यायचे. प्यायची हुक्की आली की कोणाचीही शप्पथ घेणार, कधी नातू, नात , बायको कोणालाही आजारी पाडून धाय मोकलून रडायचे... मदत म्हणून पैसे मागायचे आणि त्याची दारू प्यायचे.. कसं बरं जमत असेल...


एक मैत्रीण आहे. एकदम हळवी.  " ए हिच्या पुढ्यात  असं काही बोलू नका गं.... रडेल ती" असं कोणी म्हटलं की संपला विषय.. नोबिताचे डोळे हिलाच लावलेत जणू... नळ चालू केल्यासारखी धो धो रडते... आपल्यावर "जा मुली जा" म्हणायची पाळी...


आता परवा सगळयांनी भारी भारी शुभेच्छा दिल्या... एकदम मन, अंतःकरण, चित्त सगळंच भरून आलं.. अगदी गदगदून आलं... पापण्यांनीच सावरून घेतलं म्हणा ना... कारण आमच्या घरी दुःखाचे राहू द्या बाजूला,,,, आनंदाने ही मी रडू नाही शकणार... 


असं काय करता राव..... स्टोरी आहे त्याला..


साधारण पाच वर्षांपूर्वी आई अचानक सिरीयस झाली. मी माझ्या लेकीला घेऊन गेले बघायला. आईला पाहिलं आणि सुचलंच नाही काही. सरळ ताईच्या गळ्यात पडून रडरड रडले. घरी आले. सासुबाईंनी विचारले आईबद्दल आणि मी पुन्हा आईंच्या गळ्यात पडून रडले..  


आता माझ्या दोन्ही लेकी एकदम मनसोक्त रडतात... अगदी रेकून रेकून.. आम्ही कोणी थांबवत नाही पण कधीतरी फोन आला किंवा कोणी आलं तर वांदे होतात... आपण म्हणावं "अग कशाला रडतेस.. बास्स की आता.." त्यावर त्या रडण्याच्या टोनमधेच.." तु कशी एकदा ताईमावशीच्या आणि आईच्या गळ्यात पडून रडलेलीस... ते चालतं... मी काहीच नाही बोलले तेव्हा तुला "  हँ हँ हँ हँ...🙆🏻‍♀️🙆🏻‍♀️


"अग पण मी एकदाच रडले ना.. तु रोज रोज रडतेस.." मी


" तु मोठी आहेस तरी इतकी रडलीस.. सगळेच छोटे रडतात.. मी रडले तर काय झालं...हँ हँ हँ हँ" "  विषय संपला आणि माझं उघड उघड रडणंही...

 

कसं सांगाव हिला.... बेटा मोठी माणसंही रडतात ग सुखदुःखात.. त्यांनाही वाईट वाटतं, त्यांनाही दुःखाश्रू - आनंदाश्रू येतात.. कितीतरी वेळेस रडू खोलवर कुलूपबंद केलेलं असतं त्यांनी...  कधी कधी मन आक्रंदून येतं तरी व्यक्त करता येत नाही. कधी अपमानामुळे, कधी रागामुळे डोळे पाणावतात... प्रत्येक वेळी कचरा कसा जाईल डोळ्यात... कितीतरी वेळेस आपल्या जवळच्या व्यक्तीचे खांदे ओले झालेले असतात... अगदी रात्र रात्रभर सुध्दा... 


वय लहान आहे तिचं..... तिला सुखदुःख, बरंवाईट कशाला समजावून सांगू..?  'छोड देतीं हुॅं समय पर"..!!!


तसे रडण्याचे बरेच प्रकार आहेत... जो तो आपल्यापरीने रडतोच आहे...


लहान असताना एक दोनदा दिवाळीच्या सुट्टीत मुंबईत आले. ताईसोबत, काकीसोबत कधी लांबच्या जवळच्या नातेवाईकांकडे जाणं व्हायचं.. जाऊन बसलो की आमची, गावची खुशाली विचारताना त्यांच स्वतःचच सुरु... "पैसा पुरत नाही, पोरांचं शिक्षण, आजारपण, मुंबईत महागाई आणि बरंच काही..."  

मला मात्र "भेटायला आलोय हो आम्ही. भीक मागायला नाही. " असा फील यायचा... पण सोबतची मंडळी गप्पांमध्ये गुंग... मग काय मी पण बसून. 

जायला निघालो की, "ये बाय, घर बघ आमचा... ह्यो फ्रीज गेल्या महिन्यात घेतलाव, ह्या "अमुक" तमुक दिवशी घेतलं, हे बघ कानातले केलेत, साखळीची डिझाईन बघ." ... असं आणि बरंच काही... मला आतासारखे तेव्हा ही प्रश्न पडायचेच.. परमेश्वराने दिलयं ना पुरेसं..मग रडगाणं कशाला आणि कोणासाठी..🤔🤔 (अशा लिस्टवाल्यांनी आता बोलवलं तरी जावंस नाही वाटतं..)


एक मैत्रीण त्या दिवशी बऱ्याच वर्षांनी भेटली. इकडचं तिकडंच बोलणं झालं. म्हणाली, "तुझ़ आपलं बरंय. भाऊ कामाला. तू पण काही ना काही करून हातभार लावतेस. भाऊंना असेल ना पगार सत्तर अंशी हजार ?? तुझे पण दहा वीस येत असतील. आमचं बघ कसं ते. पैसाच नाही..."  


" का गं भावोजी कामाला नाहीत का..?? आणि आमच्या यांना एवढा पगार नाही काही. पण परमेश्वर कृपेने सगळं होतं." मी स्पष्टीकरण दिलं. 


तुम्हांला सांगते. ही मैत्रीण एका ऑफिसमध्ये कामाला. नवरा आयटीमध्ये. सासरा एका कंपनीत. रिटायरमेंट जवळ आलीय. सासुबाई घरगुती जेवणाचे डबे पोचवतात. दोन मुले. मोठा इंजिनिअरिंगच्या डिग्रीचं शेवटचं  वर्ष. म्हणजे पुढच्या नोकरी लागेल. दुसरा बारावीत. माहेरून बरचसं धान्य येतयं. इतकं सगळं आहे तरीही म्हणते पैसे नाहीत. दुसऱ्याच्या इन्कमचा हिशोब घालायचा आणि स्वतः इतकं कमवून पण पैसे नाहीत म्हणायचं..🙆🏻‍♀️🙆🏻‍♀️ 

कसं काय जमतं यांना.!! काय बोलायचं या रडण्याला... 


माझी आई म्हणायची, "पाकिटात शेवटचा एक रुपया असेपर्यंत पैसे नाहीत म्हणू नये. लक्ष्मीला राग येतो." 


कधीं कधीं पर्स घेऊन निघते पण त्यात पैसे घ्यायचे राहून गेलेले असतात. हल्ली डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, gpay मुळे काही फरक पडत नाही... 


बाब्बो...!! तुम्ही असं करू नका. पैसे असले तरी नाहीत म्हणू नका. कारण अशा रडणाऱ्यांचे पैसे असे जातात की त्यांनाच कळत नाही... 

जाऊ दे... मनाची श्रीमंती हिच खरी श्रीमंती. पण अन्न खायला पैसा लागतो म्हणून कमवायचा. हाय काय नाय काय...


© Velvet Kavisha

Post a Comment

0 Comments