निखाऱ्यावरचं पाऊल भाग एक

निखाऱ्यावरचं पाऊल भाग एक 

©️ जया पाटील 

" अग स्नेहा , लक्ष कुठे आहे तुझं ..? चहात साखरे ऐवजी मीठ टाकते आहेस तू...?"

" any problem ...? काही घोळ झाला आहे का ऑफिसमध्ये ...? मला सांगशील ...? "

" मी कितीतरी दिवसापासून पाहतोय तू सतत कुठल्या तरी विचारात गढलेली असतेस. तुझे माझ्याकडे , निलय कडे पण फारसे लक्ष नसते सध्या ..." 

" काही टेन्शन असेल तर सांग. आपण दोघेही मिळून सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. " 

" अशी नाराज स्नेहा पाहायची सवय नाहीये ग मला .... चल स्माईल कर पाहू ..तुझी नेहमीसारखी ...मला खुश करणारी..! "

विशाल त्याच्या बायकोला अर्थातच स्नेहाला समजावणीच्या सुरात सांगत होता.

" अरे नाही विशाल , ऑफिस मध्ये काही टेन्शन नाहीये. पण उगाचच थकल्यासारखे वाटतंय सध्या. " 

" थकव्यामुळे कामामध्ये पण लक्ष लागत नाही माझे. "

"तुझ्यासारखा इतकी काळजी करणारा नवरा असताना काय टेन्शन असणार आहे मला.! " स्नेहा 

स्नेहाने काहीतरी बोलून वेळ मारून नेली. विशालला देखील ते लक्षात आले परंतु स्नेहाला आणखीन त्रास नको म्हणून त्याने तिला फारसे प्रश्न विचारले नाही आणि तो पुन्हा तिला सांगू लागला...

" स्नेहा , किती धावपळ करतेस ग तू ...स्वतःच्या तब्येतीची अजिबात काळजी घेत नाहीस. " 

" आता पस्तिशीच्या उंबरठ्यावर आहेस तू ...हॉर्मोनल चेंजेस मुळे होतं असं कधीतरी .."

" तू नेहमीच तुझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतेस पण आता मी तुझं काही एक ऐकणार नाहीये. या शनिवारी तू ऑफिसला सुट्टी घे. आपण दोघेही जाऊन तुझे सगळे रुटीन चेकअप करून घेऊ. " 

तेवढे बोलून विशाल तिथून निघून गेला पण स्नेहाच्या डोक्यात वेगळेच टेंशन सुरु होते.

विशाल स्नेहाला रविवारी रुटीन चेकअपसाठी त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेला. सगळे रिपोर्ट नॉर्मल आले परंतु डॉक्टरांनी स्नेहाला बाहेर पाठवून विशालला एकट्यालाच केबिन मध्ये आत बोलवून घेतले आणि डॉक्टर विशाल सोबत बोलू लागल्या ...

" विशाल , स्नेहा आणि तुझ्यामध्ये काही तणाव आहे का ..? आय मिन काही वाद ,क्लॅशेष आहेत का ..? " डॉक्टर 

" नाही डॉक्टर ..तसे काहीच नाही. सगळे काही अगदी व्यवस्थित चालू आहे. हा पण काही दिवसांपासून ती खूप नाराज नाराज दिसतेय.." विशाल 

" ओके ,  स्नेहाचे फिझिकल रिपोर्ट तर नॉर्मल आहेत पण तिच्यावर मनावर कसला तरी ताण आहे. तुमच्या दोघांमध्ये काही वाद नाही म्हणजेच तणावाचे कारण काही दुसरे असले पाहिजे. "

" तू स्नेहाच्या या टेन्शन मागचे कारण लवकरात लवकर शोधून काढ. नाहीतर मानसिक तणाव खूप मोठ्या आजाराला निमंत्रण देऊ शकतात. " डॉक्टर 

" ठिक आहे डॉक्टर , मी स्नेहाचे टेन्शन दुर करण्याचा प्रयत्न करेल. येतो मी ...." विशाल 

" ओके , take care ..." डॉक्टर

विशाल आणि स्नेहा डॉक्टरकडून घरी येण्यास निघाले त्यावेळेस विशालच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट सुरु होती की ..

" काय चालूय स्नेहाच्या मनात ..? का अशी गुमसुम आहे. ..? ऑफिसचा तर काही ताण नसेल ना ...? "  

" घरात तर काहीच प्रॉब्लेम नाही. पैसे , घरदार , निलयसारखा गोड मुलगा सगळे काही उत्तम आहे मग काय प्रॉब्लेम आहे स्नेहाला ..? "

" स्नेहाचा प्रॉब्लेम मी ....??? माझ्याकडून तर काही चुकी झाली नाही ना ..? मी तर तिचे मन नाही दुखावलं ना ..? " 

असे एक ना अनेक प्रश्न विशालला पडत होते आणि स्नेहाचे टेन्शन दुर करून तिला आनंदी करायचेच असा त्याने मनाशी निश्चय केला.

स्नेहा आणि विशाल दोघांचाही दहा वर्षापूर्वी घरच्यांच्या पसंतीने कांदेपोह्यांचा कार्यक्रम आणि इतर सगळ्या रितिरिवाजांसहित सगळ्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह पार पडला. कांदेपोह्यांच्या कार्यक्रमात पहिल्यांदा पाहताच विशाल तिच्या प्रेमात पडला.

स्नेहा तिच्या गोर्या कांतीवर सुंदर मोरपंखी रंगाची साडी , त्यावर सुंदर मखमली मोरपंखी काठ आणि जरी वर्क असलेले ब्लॉउज , गळ्यात एक नाजूकशी मोत्याची सिंगलसरी लड , हातात मोत्यांचे तोडे , गुलाबीसर हातात एक नाजूक नक्षीची अंगठी , कपाळावर नाजूक टिकली , संपूर्ण केस मोकळे सोडून वरती पुढचे केस पिन मध्ये पॅक केलेले हा सगळा पेहराव लेवून जेव्हा बाहेर आली तेव्हा विशाल पाहताक्षणीच तिच्यावर लट्टू झाला. 

हा सगळा सौंदर्यसाज स्नेहावर खूपच शोभून दिसत होता. मुळातच तो गोरा रंग आणि त्यावर चढलेला दागिन्यांचा साज.... ! विलक्षण सौंदर्य ते ...नक्षत्रासारखे अनुपम ... कोणालाही भुरळ पाडेल असे...!

स्नेहा तशी अगदी शांत , सुलक्षणी आणि गृहकृतदक्ष होती त्यामुळे विशालच्या घरच्यांच्या मनात स्थान निर्माण करायला तिला फारसा वेळ लागला नाही. स्नेहाने तिच्या आपुलकीने आणि वागणुकीने विशालच्या परिवाराला आपलेसे करून घेतले. 

विशाल आणि स्नेहाचे दोघांचेही लग्नानंतरचे 
मोरपंखी स्वप्नांनी सजलेले , आनंदाने मोहरलेले दिवस अगदी सुखात जात होते. स्नेहाने आनंदाची बातमी दिली. त्यांच्या संसाराच्या वेलीवर आता नवीन फुल बहरणार होते. नऊ महिने पूर्ण झाले. विभावरीने एका गोंडस मुलाला जन्म दिला.बाळाचे नाव ठेवले ' निलय ' ...!

सगळा परिवार निलयच्या बाललीलांमध्ये हरवला. आपल्या लाडक्या नातवाच्या लीला पाहून विशालचे आईबाबा देखील खूप खुश होते. काही काळानंतर विशालचे आईबाबा हवापालट म्हणून गावाकडे रहायला निघून गेले. 

निलय देखील सात वर्षाचा झाला होता. त्यामुळे स्नेहाकडे खूप मोकळा वेळ होता. विशालला देखील त्याच्या ऑफिस मध्ये प्रोमोशन मिळाले होते. त्यामुळे त्याच्यावर कामाची जबाबदारी देखील वाढली होती. आठवड्यातील चार ते पाच दिवस तर तो बाहेरगावी टूर वरच असत असे. 

इकडे स्नेहाला मात्र खूप एकटं एकटं वाटू लागले होतं. त्यामुळे तुझा वेळ जावा म्हणून तू देखील नोकरी कर असा विशालने स्नेहाला सल्ला दिला. विशालचा सल्ला तिला देखील पटला. ती सायन्स मध्ये पोस्ट ग्रॅजुएट होती त्यामुळे एका स्मॉल स्केल कंपनीत तिला नोकरी मिळाली. आता तिचाही वेळ मस्त जाऊ लागला होता.

नवीन नोकरी मिळाल्यावर स्नेहा पहिले काही दिवस खूप उत्साहात होती पण नंतर मात्र नोकरी , घर , निलय हे सगळे पाहताना स्नेहाची खूप ओढाताण होऊ लागली. विशालला देखील कामाचा वाढलेला व्याप उसंत मिळू देत नव्हता. 

त्या दोघांनाही त्यांचे आयुष्यातील आनंदाचे , एकांताचे क्षण मिळणे मात्र आता कमी झालं होतं. दोघांच्याही जबाबदाऱ्यांमुळे ते आयुष्यातल्या या मोरपंखी क्षणांना दुरावत चालले होते. या सगळ्यात विशाल आणि स्नेहा मधला दुरावा मात्र वाढू लागला होता.

विशालचा वेळ मिळत नाही म्हणून स्नेहा सतत अस्वस्थ असे. त्यामुळे तिने मोबाईल , मैत्रिणी ,ऑफिस , किटी पार्टीज अश्या गोष्टींमध्ये मन रमवून घेतले होते. फेसबुक , व्हाट्सअप चाट , इंस्टाग्राम अश्या वेगवेगळ्या सोशल साईट वर स्नेहाने नव्यानेच अकाउंट काढले आणि ती त्यात पूर्णपणे गुंतून गेली. 

एक दिवस अमेय नावाच्या एका मुलाची फेसबुकला फ्रेंडरिक्वेस्ट आली. अनोळखी असल्यामुळे तिने स्वीकारली नाही. मग नंतर मेसेज येणे सुरु झाले. ' तुम्ही खूप छान दिसतात. सोज्वळ आहात. ' 

सुरुवातीचे काही दिवस स्नेहाने सगळे मेसेज इग्नोर केले पण समोरून मेसेज येणे सुरूच राहिले. ' कृपया गैरसमज करू नका पण मी एक साधारण व्यक्ती आहे त्यामुळे माझ्या मुळे तुम्हाला काहीच त्रास होणार नाही पण तुम्हाला पाहुन एक पॉसिटीव्ह फील आला म्हणून तुमच्यासोबत बोलतोय. खूप स्त्रीया पाहिल्या मी पण तुमच्या इतकी सोज्वळ नाही. '  अश्या एका मेसेजने काम केले.

स्नेहाला अमेय खूप साधा आणि सोज्वळ मुलगा वाटला आणि तिने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. दोघांचेही बोलणे वाढले. त्यातून एकमेकांची बरीच वयक्तिक माहितीची देवाणघेवाण झाली.

अमेय तिच्या कामाचे कौतुक करू लागला. स्नेहाला देखील ते सगळे छान वाटू लागलं. एकमेकांचे फोन नंबर शेयर झाले. कधी चाट तर कधीतरी फोनकॉल यातून बोलणे वाढीस लागले. स्नेहाचा त्याच्यावर इतका विश्वास बसला किती तिने त्याच्यासोबत फोटो देखील शेयर केले.
हे सगळे करत असताना एकदाही स्नेहाला अमेयवर संशय आला नाही हे विशेष. 

दिवसेंदिवस स्नेहा आणि अमेयची मैत्री वाढत होती. एकमेकांसोबत बोलणे वाढले होते. या सगळ्यात स्नेहाचे घराकडे आणि पर्यायाने विशालकडे देखील दुर्लक्ष होऊ लागले होते. ऑफिसमध्ये देखील ती बराच वेळ फोनवरच असायची.

एक दिवस तिची सहकारी दिशा खूप टेन्शन मध्ये होती. बरेच दिवसांची सुट्टी संपवून ती कामावर पुन्हा रुजू झाली होती. दिशाचा उदास चेहरा स्नेहापासून लपला नाही आणि लंच ब्रेकच्या वेळेस स्नेहा दिशाला भेटली. तिने तिची विचारपूस केली.

" काय ग दिशा , आज दिवसभर तुला पाहतेय तू खूप नाराज दिसते आहेस. काही प्रॉब्लेम आहे का ..? माझ्यासोबत शेयर कर कदाचित मी तुझी काही मदत करू शकेल.." स्नेहा 

"नाही ग स्नेहा , काही विशेष नाही. " दिशा 

" पण तुझा चेहरा मात्र वेगळेच काही सांगतोय दिशा .. तुला सांगायचं नसेल तर हरकत नाही. मी निघते .." 

इतके बोलून तिथून स्नेहा उठून जाणार तेवढ्यात दिशा खूप जोरात रडू लागली. स्नेहा तिला सावरण्याचा प्रयत्न करू लागली.

" दिशा , शांत हो. आधी रडणे थांबव आणि मग नीट सांग नेमका काय प्रॉब्लेम झालाय ..? " स्नेहा 

" माझी खूप मोठी फसवणूक झालीय ग स्नेहा.!"      दिशा 

" कसली फसवणूक..? कोणी केली..?" स्नेहा 

" अग एक महिन्यापूर्वी माझी फेसबुकवर लोकेश नावाच्या एका मुलासोबत ओळख झाली. सुरुवातीला मी त्याच्या मेसेजेसला इग्नोर केले परंतु त्याचे मेसेज येत राहिले."

" त्याच्या मेसेज वरून मला तो खूप साधा आणि चांगला मुलगा आहे असे वाटले म्हणून मी त्याची फ्रेंडरिक्वेस्ट एकसेप्ट केली. आमचे बोलणे खूप वाढले. मी त्याच्यासोबत पर्सनल गोष्टी पण शेयर केल्या. " 

" आता आठ दिवसापूर्वी त्याने माझ्याकडून घरात अडचण आहे असे सांगून काही पैसे मागितले परंतु माझ्या अकाउंटचा सगळा व्यवहार माझे बाबा बघतात त्यामुळे त्यांना विचारल्याशिवाय मी तुला पैसे नाही देऊ शकत असे मी त्याला सांगितले. "

" माझ्या या उत्तरावर मात्र तो खूप चिडला आणि जर मी त्याला पंधरा दिवसांच्या आत पैसे दिले नाही तर तो माझे फोटोज व्हायरल करेल अशी धमकी दिलीय ग त्याने मला .." 

" बाबा , नेहमीच सांगायचे अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवायचा नाही पण मी त्यांचे ऐकले नाही. आता कुठल्या तोंडाने सांगू त्यांना हे लोकेश प्रकरण ...? " 

एवढे बोलून दिशा पुन्हा ओक्सबोक्शी रडू लागली.

दिशा , शांत हो. आपण लवकरात लवकर या गोष्टीचा तपास लावूया. हवं तर पोलिसात जाऊ. तू शांत हो. " स्नेहा 

" मला पोलिसात जायची भीती वाटते ग स्नेहा , त्यामुळे बाबांना सगळे कळेल. मला तर जीव द्यावासा वाटतो आहे. " दिशा 

" रडू नको दिशा , आपण यातून काहीतरी मार्ग नक्की काढू आणि तुला काहीही वाटले तरी मला लगेच फोन कर. बाबा समोर असतील ते मेसेजेस कर. फक्त जीव द्यायचा विचार चुकून पण करायचा नाही. " स्नेहा 
 
स्नेहा दिशाला शांत करण्याचा प्रयत्न करत होती परंतु आता तिलाही अमेय प्रकरणाचे टेन्शन आले होते. लंचब्रेक नंतर डेस्कवर आल्यावर देखील स्नेहाच्या मनात अमेय बद्दलचे विचार चालू होते.

" अमेय देखील फसवा तर नसेल ना ..? त्याच्याकडे देखील माझी बरीच माहिती आहे. " 

" अमेय खरंच चीटर असेल तर ...? आणि हे सगळे विशालला माहित पडले तर काय होईल? "

या सगळ्या विचारांनी स्नेहाला वेड लागण्याची पाळी आली होती. ऑफिसमधून घरी आली त्यावेळेस ही तोच विचार तिच्या डोक्यात होता.
तितक्याच अमेयचा मेसेज आला. त्याला एकदम टाळायला नको म्हणून स्नेहाने देखील रिप्लाय दिला. 

क्रमश:

अमेय देखील स्नेहाला फसवणार का ..? ती या प्रकरणात गुंतली तर स्वतःची सुटका कशी करणार ..? विशालला स्नेहा आणि अमेयच्या मैत्रीबद्दल समजले तर त्याची प्रतिक्रिया काय असेल..? स्नेहा हा गुंता सोडवू शकेल का ..? 

हे सगळे जाणून घेण्याची तुमची ही इच्छा असेल ना ..मग या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी " निखाऱ्यावरच पाऊल भाग अंतिम " वाचायला मात्र विसरू नका.

भाग दोन वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇
👉  निखाऱ्यावरचं पाऊल भाग अंतिम

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

फोटो साभार - Google & instagram

✍©️ जया पाटील

Post a Comment

0 Comments