परिमार्जन
©️जया पाटील
" बाबा , i am so happy ...माझे indian foreign services मध्ये सिलेक्शन झाले आहे. आताच रिझल्ट आला आणि सगळ्यात पाहिले मला ही आनंदाची बातमी तुम्हालाच द्यायची होती कारण तुम्हीच माझे गाईड , फिलॉसॉफर आहात. त्यामुळे रिझल्ट घेऊन मी ताबडतोब घरीच यायला निघालो. I am really so happy ..."
" हे सगळे खरं तर तुमच्यामुळेच झाले. तुम्ही मला साथ दिली नसती. तुम्ही मला घडवले नसते तर मी माझ्या आयुष्यात इतका यशस्वी होऊच शकलो नसतो. थँक्यू सो मच , बाबा ..थँक्यू फॉर एव्हरीथिंग.
अर्थव त्याच्या यशाची आनंदाची बातमी त्याच्या बाबांना म्हणजेच अभयला सांगत होता.
" अरे अथर्व , साथ माझी असली तरीही मेहनत मात्र तूच केली आहे. त्यामुळे हे सगळे यश फक्त तुझेच आहे. मी फक्त त्यातला एक दुवा होतो."
" आपल्या मुलाला यशवंत होताना पाहण्याइतका मोठा आनंद नसतो कुठलाच नसतो एका बाबासाठी...! माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. नेहमीच असा यशस्वी हो."
" अथर्व ही आनंदाची बातमी तू सगळ्यांना कळवली की नाही. चला आजी , तुझे मित्र सगळ्यांना ही बातमी सांग आणि हो जाताना मंदिरात देवापुढे पेढे ठेवून सगळ्यांना पेढे देखील वाट. "
अभयचे बोलणे ऐकून अथर्व सगळ्यांना त्याच्या यशाची बातमी देण्यासाठी निघून गेला.त्यानंतर मनस्वीच्या फोटोसमोर उभा राहून अभय बोलू लागला.
" मनस्वी , पाहतेस ना ..आपला अथर्व किती यशस्वी झाला आहे ते ...तू असतीस तर किती आनंदी झाली असतीस त्याला इतकी यशस्वी पाहून ...पण ते शक्य झाले नाही. "
" मी तुझा अपराधी आहे. खरंच मी खूप त्रास दिला ना तुला पण मी केलेल्या पापाचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न करतोय ग मनस्वी , मला माफ करशील ना ...? "
" मला माहिती आहे की मी तुझा खूप मोठा गुन्हेगार आहे पण तरीही माझ्या चुकांचे प्रायश्चित करण्याचा प्रयत्न करतोय ग मनस्वी .मला माफ कर ..."
मनस्वीच्या फोटोसमोर हे सगळे बोलत असताना त्याच्या शब्दातली वेदना अभयच्या डोळ्यातून अश्रूंच्या रुपाने वाहवत होती.
त्याच्यासमोर त्याचा भूतकाळ तरळत होता. तो जुन्या आठवणीत हरवला होता. भूतकाळात घडलेले सगळे प्रसंग त्याला जसेच्या तसे आठवत होते.
मनस्वी आणि अभय दोघांचाही प्रेमविवाह. एकाच कंपनीत नोकरी करत असताना त्यांची मैत्री झाली. प्रोजेक्टच्या कामाच्या निमित्ताने भेटी वाढल्या. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
दोघेही समवयस्क , हुशार त्यामुळेच घरच्यांकडून देखील त्यांच्या लग्नासाठी लगेच होकार मिळाला. दोघांचेही लग्न थाटामाटात पार पडले.
माप ओलांडून मनस्वी अभयच्या घरची लक्ष्मी झाली. करियर करतानाच तिच्या संसारात देखील तितकीच रुळली.
मनस्वी आधीपासूनच अभ्यासात खूप हुशार आणि तेजस्वी होती. ती एक टॅलेंटेड , स्मार्ट , मॉडर्न , डॅशिंग , स्टायलिश मुलगी होती. एका आय टी कंपनीत सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होती.
करियर बाबतीत अतिशय फोकस्ड आणि करियर ओरिएंटेड असल्यामुळे प्रोमोशनच्या स्वरूपात ती तिच्या करियर मध्ये सतत यशस्वी होत होती.
मनस्वीचे स्वप्नच होते सतत पुढे जाण्याचे , यशाचे नवीन क्षितिज गाठण्याचे ...!
अभय आणि मनस्वीचा संसार अगदी सुखात सुरु होता. लग्नानंतरचे मोहरलेले दिवस आनंदात संपत होते. रात्र संपूच नये असे दोघांनाही वाटत होते.
तश्यातच मनस्वीने आनंदाची बातमी दिली. ती आई होणार होती. गर्भारपणाचे नऊ महिने पूर्ण झाले. मनस्वीचे डोहाळेजेवण अगदीच थाटामाटात पार पडले आणि तिने एका गोड मुलाला जन्म दिला.
गोविंद घ्या अन गोपाळ घ्या असे म्हणत सगळ्या सवाष्णींनी झोपाळा झुलवला. बाळाच्या आत्याने त्याच्या कानात "अथर्व " म्हटलं आणि हुर्रर्र ....असे करून त्याचे कान फुंकले.
अथर्वच्या येण्याने मनस्वीचा संसार पूर्ण झाला होता. अभय आणि मनस्वी दोघेही अथर्वच्या बाललीलांमध्ये हरवत असत. सारंकाही आलबेल होते.
लीलाताई देखील अर्थवच्या येण्याचे खूप आनंदी झाल्या होत्या. पण कधीतरी आपल्या सुखाला आपलीच दृष्ट लागते तसेच काहीसे अभय आणि मनस्वी सोबत देखील झाले.
अभयला वाईट मित्रांची संगत लागली. त्यामुळे त्याला दारूचे व्यसन लागले. मनस्वीने त्याला या व्यसनापासून परावृत्त करण्याचे खूप प्रयत्न केले परंतु तिचे सगळे प्रयत्न फसले.
अभयचे व्यसन दिवसेंदिवस वाढत चालले होते. दारूचे व्यसन होते तोवर ठिक होते परंतु आता अभयला बाई सोबत बाटलीचे देखील व्यसन लागले.
प्रत्येक स्त्री नवर्याच्या सगळ्या वाईट गोष्टी सहन करू शकते मात्र स्वतःचा नवरा दुसऱ्या स्त्रीसोबत पाहू शकत नाही. मनस्वीचे देखील तसेच झाले होते.
अभय आणि तिच्यातील वाद वाढीस लागले होते. मनस्वीने अभयला स्वतःला बदलण्यासाठी अनेक संधी दिल्या मात्र अभय यात फेल झाला.
लीलाताईंच्या साथीने मनस्वी अथर्वचा सांभाळ करत होती. अभयच्या अश्या वागण्यामुळे लीलाताई देखील खूप नाराज होत्या.
अभयचे बाबा असते तर त्याला कान पकडून धडा शिकवला असता असे सारखे लीलाताईंना मनोमन वाटत असे. त्या सतत स्वतःला अपराधी समजत होत्या. अभयने घरी परत यावे असे सतत त्यांना वाटत असे.
इकडे अभय रिया सोबत राहू लागला होता परंतु रियाचे वागणे त्याला आवडत नव्हते. रियाच्या खर्चामुळे त्याला पैसे पुरेनासे झाले होते. त्याची होती नव्हती ती सगळी सेविंग संपली होती.
हळूहळू त्याला घराची आणि अथर्वची ओढ लागली.
आपल्या आर्थिक अडचणी रिया सोबत राहून कधीच दूर होणार नाही त्यासाठी आपल्या पुन्हा मनस्वीकडे परतावे लागेल हे त्याच्या लक्षात आले. रियाला हे सगळे समजावून तो त्याच्या घरी परत आला.
मनस्वीसोबत तुलना केली तर अभय करियरच्या बाबतीत तिच्यापेक्षा नेहमीच मागे होता. तिच्या यशावर तो सतत जळत होता. त्याच्याजवळचे सगळे पैसे संपल्यामुळे खरं तर तो पुन्हा एकदा मनस्वीकडे परत आला.
घरी आल्यावर मात्र त्याने लिलाताईंसमोर पश्चातापाचे नाटक केले. मुलाच्या गोष्टी खऱ्या मानून त्या मनस्वीला अभयला माफ करण्यासाठी विनवू लागल्या. लीलाताईंनी मनस्वी ला समजावले...
" अगं मनस्वी बाळा , चुका ह्या माणसाकडूनच होतात. एकही चूक केली नाही तर माणूस कसला ...त्याला तर देवच म्हणायला हवा. "
" जर अभयने अशी चूक केली नसती तर परिस्थिती काहीतरी वेगळी असती हे मान्य आहे मला .."
" झाल्या गेल्या गोष्टींना जर-तरच्या चिंध्या लावत असलो तरी आपले मन मानत नाही.
" मान्य आहे अभयने चूक केली. चूक नाही म्हणता येणार खरं तर त्याला अपराध म्हणायला हवा कारण तुझ्यासारखी सुंदर , सोज्वळ बायको सोडून तो रिया सारख्या मुलीच्या प्रेमात पडला पण आता त्याला या गोष्टीचा पस्तावा येतो आहे ना .."
" खरं तर त्या रियाने त्याला स्वतःच्या मोहजालात फसवून भरीस पडले पण अभयला आता त्याची चूक उमगली आहे,मग माफ कर त्याला. "
"त्याने कितीदा तुझी माफी देखील मागितली आहे. मग आता तरी माफ गं पोरी त्याला .."
" हवं तर मी हात जोडून माफी मागते तुझी. मला तुझी सासू न समजता तुझी आई समजून विचार कर ..."
" तुला असे वाटत असेल की अभय माझा मुलगा आहे म्हणून मी त्याला पाठीशी घालते आहे पण तसे नाही. तुम्ही दोघेही माझी मुले आहात."
" तुमचा संसार तुटलेला नाही पाहायचा मला. तुम्हाला दोघांनाही सुखाने संसार करताना पाहायचं आहे मला. माझी हीच शेवटची इच्छा आहे ... ! "
लीलाताई आणि मनस्वीच्या आईबाबांनी सगळ्यांनी समजवल्यावर नाखुशीने मनस्वी पुन्हा एकदा अभय सोबत रहायला तयार झाली. तिने पुन्हा एकदा अभयला दुसरी संधी दिली.
अभय देखील पूर्वी सारखे वागण्याचे नाटक करू लागला. सगळे काही सुरळीत होते आहे आई मनस्वी-अभयचे नातं सुधारताना पाहून लीलाताई आणि मनस्वीचे आईबाबा खूप आनंदी होत होते. पण अभयच्या मनात मात्र काही तरी वेगळेच सुरु होते.
सत्य हे कितीही लपवून ठेवायचा प्रयत्न केला तरीही ते कधी ना कधी तरी बाहेर पडतेच. अभय मनस्वीसोबत खूप चांगला वागत होता पण रिया मात्र त्याची परत येण्याची वाट पाहून कंटाळली होती. एकदिवस अचानक ती अभयच्या घरी आली त्याला भेटण्यासाठी ..
रियाला तिथे पाहून अभय खूप गोंधळला. तो तिला तिथून जाण्यासाठी सांगू लागला परंतु रिया मात्र काही एक ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती. रिया बोलू लागली ..
" काही दिवस सांगून मनस्वी कडे गेलास आणि अजून परत आला नाही. मनस्वी माझी फिनान्शियल सपोर्टर आहे बाकी काही नाही हेच सांगून गेला होतास ना तू , मग का परत आला नाहीस ..? "
" माझ्या मेसेजेस आणि फोन कॉल्सला देखील उत्तर देणे बंद केलेस तू .. का ..? "
" रिया , सध्या तू इथून जा ...आपण हे सगळे नंतर बोलूया. "
अभय तिला माघारी जाण्यास सांगत होता परंतु रिया काहीएक ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती.
घडलेला सारा प्रकार लीलाताई आणि मनस्वी पाहत होती.
मनस्वीला पाहून रिया पुन्हा एकदा बोलू लागली ...
" हे पहा मनस्वी , गेले काही दिवस आम्ही एकत्र राहतो आहोत ते ही लग्नाशिवाय ...लोक काय म्हणतील याचा विचार न करता केवळ या आधारावर की अभयचे माझ्यावर प्रेम आहे. "
" अभय मला सांगून गेला होता की मनस्वी सोबत लवकरच डिवोर्स घेऊन तो माझ्या कडे येणार आहे परंतु इतके दिवस झाले आणि त्याचा काही पत्ताच नाही.
" मला अभय लवकरात लवकर परत आलेला हवा आहे. "
इतके बोलून रिया तिथून निघून गेली.
मुलाच्या अश्या वागण्यामुळे लीलाताई खूप खजील झाल्या. रिया खोटे बोलत आहे हे मनस्वीला समजावण्याचा अभय प्रयत्न करू लागला तो म्हणाला ..
" हे बघ मनस्वी , रिया खोटं बोलते आहे. मी संपवलं आहे सगळे ...मी परत आलोय आपल्या घरी ..
आणि त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच मनस्वी त्याला थांबवून म्हणाली...
" खूप झाले अभय , एकदा फसवणूक केली आहेस तू माझी ...पण आता पुन्हा नाही ..."
" मी अशी परपुरुषासोबत राहून परत घरी आले तर घेशील मला घरात ..? राहशील माझ्या सोबत ..? "
" तुम्ही पुरुष बायकांच्या चारित्र्याची चर्चा करता ना आणि मग तुम्हीच पुन्हा तसेच वागता मग आम्हा बायकांना तुम्हाला याबाबतीत प्रश्न विचारता येतो का ? नाही ना विचारता येत मग का असं वागलास तू ..? "
"एकदा चुक केली तेव्हा माफ केले मी तुला. पुन्हा एकदा मी ठरवलं होते मागचे सगळे काही विसरून पुन्हा एकदा नव्याने आयुष्य सुरु करायचे पण ते देखील करू दिले नाहीस तू ..."
"या पुढे मात्र मी तुझ्यासोबत नाही राहू शकत. I want divorce .."
इतके बोलून मनस्वी तिथून निघून गेली. कायदेशीर बाबी पूर्ण करून मनस्वी आणि अभय वेगळे झाले. मनस्वी अथर्वला घेऊन तिच्या आईबाबांसोबत राहू लागली.
मनस्वीच्या आईबाबांनी तिला दुसरे लग्न करण्यासाठी खूप समजावले परंतु मनस्वीचा लग्नांवरचा आणि प्रेमावरचा विश्वास उडाला होता. ती एकटेपणा सोबतीला घेऊन आयुष्य काढत होती.
अभय रियाकडे परत गेला. थोडे दिवस चांगले गेल्यावर मात्र रियासोबत देखील त्याचे खटके उडू लागले. अभयने रियाला सोडून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.
त्याला मनस्वीच्या प्रेमाची किंमत समजली होती परंतु मनस्वीकडे परत जाण्याची त्याची हिम्मत नव्हती. त्याचा अहंकार त्याला मनस्वीकडे परत जाण्यासाठी रोखत होता.
काही वर्षांनी वृद्धापकाळाने मनस्वीच्या बाबांचे निधन झाले आणि आईला आधार देत मनस्वी एकटीच तिचे आयुष्य व्यतीत करत होती.
तिला संसाराचे सुख तर मिळालेच नाही परंतु नशिबाचा दुष्ट फेरा बघा ...मनस्वीला गर्भाशयाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. मनस्वी कठीण उपचारांना सामोरी जात होती. त्या क्षणी तिला आधाराची गरज होती. आपले हक्काचं कोणी तरी असावे असे सतत वाटत होते.
मनस्वीला तिच्या आईबाबांचे शब्द सतत आठवत होते ..
" बाळ मनस्वी , एकटे आयुष्य काढणे इतके सोपं नाही. आपल्या सुखात दुःखात साथ देण्यासाठी कोणीतरी हवं असत. म्हणूनच तू दुसरे लग्न कर "
मनस्वीने मात्र ते ऐकले नाही आणि आता शेवटच्या क्षणात कोणीतरी असावे ह्या तिच्या भावना ती कोणासोबत बोलू शकत नव्हती.
तिची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. अभयची आठवण देखील तिला सतत छळत होती. अभयशिवाय तिने आयुष्यात कधीच कोणाचा विचार केला नव्हता कारण अभय हेच तिचे पहिले आणि शेवटचे प्रेम होते.
इकडे अभयला मनस्वीच्या अवस्थेबाबतीत समजले पण स्वतःच्या वागणुकीची त्याला लाज वाटत होती म्हणूनच तो तिच्या भेटीला गेला नाही. मनस्वी त्याला माफ करेल की नाही या संभ्रमात तो पडला होता.
शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला अभय एकदा तरी भेटावा या अव्यक्त भावना स्वतःसोबत घेऊन मनस्वी देवाघरी गेली आणि त्यावेळी अभय तिला भेटण्यासाठी परत आला पण आता काहीच उपयोग नव्हता कारण खूप उशीर झाला होता आणि कधीही न थांबणारे पश्चातापाचे अश्रू मनस्वी अभयला भेट देऊन गेली होती.
मनस्वीच्या आजारपणात तिची काळजी घेऊन , तिला प्रेमात देऊन स्वतःची चूक दुरुस्त करण्याची संधी अभयला मिळाली होती.
त्याच्या या छोट्याश्या पुढाकाराने मनस्वी मरतेक्षणी आनंदी होणार होती पण ते देखील अभयला जमले नाही आणि जेव्हा त्याने हे करायचे ठरवले त्यावेळेस मात्र वेळ निघून गेली आणि त्याला पश्चाताप करण्याशिवाय काहीच हाती पडले नाही कारण एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते मग कितीही पश्चाताप करून उपयोग नसतो. कुणीतरी लिहिले आहे की ..
" समय के पास इतना समय नही की वो आपको दोबारा समय दे ..! "
आपल्या चुकीचे प्रायश्चित करायचे म्हणून त्याने अथर्वला आपल्या सोबत नेण्याचे ठरवले. मनस्वीच्या आईची माफी मागुन अभयने अथर्वला आपल्या सोबत नेण्याची परवानगी घेतली.
मनस्वीच्या आठवणींसोबत अभयने अथर्वचा उत्तम सांभाळ केला. अर्थवला यशाच्या शिखरावर नेण्याच्या प्रवासात अभय त्याचा उत्तम सारथी झाला.
अर्थवचा उत्तम सांभाळ करून अभयने मनस्वी सोबत घडलेल्या अन्यायाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. अंशत: का असेना त्याने आपल्या पापांचे परिमार्जन केले.
आपण प्रत्येक जण आयुष्यात चूक करतोच पण वेळीच आपली चूक सावरायला हवी नाहीतर मनस्वी सारख्या व्यक्तीचे प्रेम गमावून अभयने फक्त पश्चाताप केला परंतु वेळ मात्र निघून गेली होती.
त्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तीला दुखावण्याची चूक कधीही करू नका. कधी चूक झाली तर स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून ती चूक सुधारा.
समाप्त !
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Google
✍©️ जया पाटील
1 Comments
खूप छान कथा...👌👌👍👍🙏🙏
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box