#शपथ_मला_आहे..
©️जया पाटील
अस्मिता , झाला का डबा बनवून , लवकर आटोप नाहीतर माझी बस सुटेल. आठवडाभर पुरतील इतक्या सगळ्या वस्तू ठेवल्या आहेत ना बॅग मध्ये...? नाहीतर उगाचच शोधाशोध होते माझी.... "
" या आठवड्यात घरी लवकर नाही येता येणार ग... यावेळी दहा-पंधरा दिवस लागतील. काम खूप आहे."
" काय हो , अख्खा आठवडाभर तुम्हाला सोडून राहतो ते काय कमी आहे का ..? पूर्ण महिन्यात फक्त चारच दिवस तुमच्या सोबतीचे असतात आणि यावेळी तर ते पण नाही. प्लीज काही अडजस्टमेन्ट करता आली तर पहा ना ...प्लीज .... "
"अस्मिता ...सॉरी तुला खूप राग येत असेल ना माझा ...पण काय करू ग ..नाईलाज आहे माझा ...! "
" आहो , राग नाही येत पण काय करणार तुमच्या पासून इतक्या दिवस दूर राहणे खूप जड जाते हो मला. सगळ्या आघाड्यांवर एकटीला झटावे लागते. त्यामुळे प्रत्येक क्षणी तुम्ही सोबत असावे असंच वाटत राहते मला ..."
" ते सगळे मान्य आहे ग अस्मिता मला , तुझ्यापासून , ध्रुव , आईबाबांपासून दूर राहणे मला पण अस्वस्थ करतेय ग, पण पैसा कमवणे ही गरज आहे जगण्याची आणि तुला माहिती आहे फक्त इथे स्थायिक होऊन एवढा पगार मिळू शकणार नाही. "
" इथल्या तुटपुंज्या पगारात घर चालवणे शक्य नाही त्यामुळे प्लीज थोडे दिवस हा दुरावा सहन कर. एकदा सगळे सेटल झाले की फक्त तुमच्याजवळच असणार आहे मी ...! "
" चल.. जातो मी काळजी घे सगळ्यांची आणि स्वतःची देखील ..."
" आहो , जातो नाही येतो म्हणावं .... किती वेळा सांगितलं आहे तुम्हाला. जीवाला घोर लावतात माझ्या ..."
" ओह सॉरी , बर बाई येतो मी .....काळजी घे ..."
आनंद अस्मिताचा निरोप घेऊन ऑफिसच्या टूर वर निघाला होता.
आनंद कळंबकर एक छोट्याश्या कंपनीत मार्केटिंगचे काम करणारा साधारण गृहस्थ. सुलक्षणी , काटकसरी , गृहकृतदक्ष पत्नी अस्मिता , तीन वर्षाचा गोड मुलगा ध्रुव आणि आनंदचे आईबाबा असा त्यांचा सुखी परिवार. पैसे कमी असतील ही पण घरातल्या प्रत्येक सदस्यांचे एकमेकांवर निकोप प्रेम.
एकमेकांच्या सोबतीने , सल्ला मसलत करूनच घरातील प्रत्येक निर्णय घेतले जात असत. प्रत्येक सुखाच्या आणि दुःखाच्या क्षणी एकमेकांची साथ होती. या पेक्षा वेगळे सुख म्हणजेच नेमकं काय असते ..? घरातील सदस्यांचे प्रेम , आपुलकी , माया हाच खरा स्वर्ग ...!
सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना आपण कुठेही कमी पडू नये असे आनंदला वाटत असे म्हणून जास्त पैसा कमविण्यासाठी त्याने बाहेर फिरस्तीचा मार्केटिंगचा जॉब पकडला होता.
आठवडाभर घराबाहेर राहून जेव्हा तो एक दिवसासाठी घरी येत असे तेव्हा घरातल्या सगळ्यांची कळी खुलत असे.
आनंद आणि अस्मिता आठवड्यातल्या त्या एक निवांत दिवसाची संपूर्ण आठवडाभर वाट पाहत असतं. कधी रात्र होईल आणि आपण दोघेही एकमेकांच्या मिठीत विरघळू अशी अवस्था दोघांचीही असे. अस्मिता आणि आनंद दोघेही त्यांचे दोघांचे हे खाजगी क्षण सुंदर करण्यासाठी नेहमीच उत्सुक असत.
ध्रुवला आजी-आजोबांजवळ झोपवून सुंदरसा नाईटगाऊन घालून अस्मिता जेव्हा तयार होऊन येत असे तेव्हा अस्मिता पुढे त्याला स्वर्गातील अप्सरा सुद्धा फिक्या वाटत असत.
"किती सुंदर दिसतेस ग... अजूनही ... अगदी आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री होती तितकीच प्रफुल्लित , तितकीच उल्हासित ... अगदी मोगऱ्याचा फुलाप्रमाणे कायम सुगंध देणारी ...! "
" ध्रुव सारखे इतके गोड फुल देऊनही अगदीच नव्याने पालवी फुटलेल्या फांदीसारखी टवटवीत ...! "
अश्या शब्दात आनंद अस्मिताचे कौतुक करत असे आणि त्याच्या या शब्दांमुळे अस्मिता लाजून चूर होत असे.
ती लाजल्यावर " लाजताना आजही अगदी नववधूप्रमाणे सुंदर दिसतेस तू अस्मि...." असे बोलून आनंद तिला हळूच जवळ घेत असे.
एकमेकांचा सहवास , एकत्र झालेले श्वास , ओठांचा ओठांना मिळालेला सहवास , एकरूप झालेली शरीरं ह्या सगळ्या अमूल्य आठवणी आनंद आणि अस्मिताचा आठवड्याभराचा थकवा कमी करत असत.
या एका रात्रीच्या आठवणीवर ती दोघेही पुढचे सहा दिवस एकमेकांचा विरह सहन करत असत.
असेच दिवस हळूहळू पुढे सरकत होते. आनंदची जबाबदारी आणखीन जास्त वाढली. त्यानिमित्ताने त्याची फिरस्ती देखील खूप जास्त वाढली होती.
आठवड्यात एकदा घरी येणारा आनंद आता पंधरा दिवसातून एकदा घरी येत होता. अस्मिता आणि आनंद दोघांनाही एकमेकांचा विरह सहन होत नव्हता पण आलेल्या परिस्थितीपुढे ते दोघेही मजबुर होते.
एक दिवस अस्मिता घराच्या टेरेसवर फिरत होती आणि आकाशात ढग गडगडू लागले, पावसाच्या सरी बरसू लागल्या..
त्यावेळी तिला रोटी कपडा और मकान या चित्रपटातील गीत आठवले आणि तिच्यातली सुप्त झीनत अमान जागृत झाली.
तिने लगेचच आनंदला विडिओ कॉल केला आणि गाणे गाऊ लागली ...
" हाय हाय ये मजबुरी ....
ये मौसम और ये दुरी ....
मुझे पल पल है तड़पाये ....
तेरी दो टकिया दी नौकरी ....
ते मेरा लाखों का सावन जाए ....
हाय हाय ये मजबूरी ....
ये मौसम और ये दूरी ...."
आनंद देखील अस्मिताचे गाणं विडिओकॉल वर एन्जॉय करत होता आणि गाणं म्हणतानाच अस्मिता मधेच थांबली आणि रडायला लागली.
तिचा अश्रूंचा बांध फुटला. अस्मिताला रडतांना पाहून आनंदला अश्रू थांबवता आले नाही. रडत रडत अस्मिता बोलू लागली ..
" आहो , सोडून द्या ती नोकरी. नको मला असा पैसा जो तुमच्यापासून मला दूर करतोय. आईबाबा , ध्रुव आणि मी आम्हाला सगळ्यांनाच तुम्हाला सोडून राहणे खूप जड जातेय. "
" प्लीज , तुम्ही नवीन नोकरी पहा. हवं तर तुम्हाला मदत म्हणून मी देखील एखादी नोकरी शोधते. मी दोन तीन ठिकाणी अर्ज देखील दिला आहे."
" अग अस्मिता घरचे सगळे , ध्रुव आणि आईबाबांची जबाबदारी सगळे करून नोकरी करणे म्हणजे तुझ्यासाठी तारेवरची कसरत असेल. कसे मॅनेज करशील हे सगळे ..." आनंद
" करेल हो , तुम्ही सोबत असणार तर मला कुठलीच गोष्ट कठीण नाही ...तुमची साथच माझी ताकद आहे. "
हे सगळे बोलतानाच अस्मिता खूप भावनावश झाली होती.
" हो ग अस्मिता , तू रडू नकोस. सगळ्यात आधी रडणं बंद कर पाहू. तू अशी रडली की मलाही रडू येते. तू माझी ताकद आहे अस्मिता , पण प्लीज कमजोरी होऊ नकोस माझी .."
" मी लवकरच दुसरी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करेन. जिथे इतके जास्त दिवस फिरस्तीचे काम नसेन. "
" तुला नोकरी करायची तर तू नक्कीच कर. तुला काही नवीन करायचे असेल तर नक्कीच कर पण तुझी काळजी घेऊन. त्यात तुझ्या तब्येतीची हेळसांड मात्र व्हायला नको इतकेच... " आनंद
आनंदने होकार दिला आणि अस्मिताने मोठया जिद्दीने नोकरी शोधायला सुरुवात केली. तिला एका छोट्याश्या फर्मवर नोकरी मिळाली देखील.
पगार फार काही नव्हता पण अस्मिताने स्वतःच्या विश्वासावर काही तरी अचिव्ह केले होते यामुळे ती जास्तच आनंदी होती आणि तिच्या या यशामुळे आनंद देखील तितकाच खुश होता.
अस्मिताने ऑफिस जॉईन केले. घरातील सगळे मॅनेज करून ती नोकरी देखील करत होती. त्याचदरम्यान आनंदच्या बाबांना हृदयविकाराचा झटका आला.
आनंद तर बाहेरगावी होता पण अस्मिताने ताबडतोब त्यांना हॉस्पिटलला हलवले. आनंदला हे कळल्यावर आनंद देखील लवकरच हॉस्पिटलला पोहोचला.
अस्मिताने वेळेवर बाबांना हॉस्पिटलला दाखल केल्यामुळे त्यांच्या जीवावरचा धोका टळला होता परंतु हॉस्पिटलमधील उपचारांच्या खर्चामुळे आनंदवर बरेच कर्ज झाले होते.
मदतीला अस्मिता देखील होतीच. एक शब्दाचीही तक्रार न करता ती सगळे काही मॅनेज करत होती. नोकरी , घर , ध्रुव हे सगळे पाहताना तिची ओढाताण होत होती पण सगळ्या कर्जाचा भार आनंदवर नको पडायला म्हणून ती सगळा त्रास सहन करत होती. त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे , एकांतात क्षण मिळणे मात्र आता कमी झालं होतं.
दोघांचीही एकमेकांना सोबत, श्वासात श्वासांचे गुंतणे , एकमेकांच्या मिठीत विरघळणे , एकमेकांमध्ये एकरूप होणे या सगळ्या गोष्टींचा आनंद मिळणे आता अस्मिता आणि आनंद दोघांनाही कमी झाले होते.
दोघांच्याही जबाबदाऱ्यांमुळे ते आयुष्यातल्या या मोरपंखी क्षणांना दुरावत चालले होते. अर्थातच दोघांनाही याची खंत होतीच...
तासनतास एकमेकांच्या मिठीत घालवणारे अस्मिता आणि आनंद आज या सोनेरी आठवणींना मुकत होते त्यांची मनापासून इच्छा असूनही ...!
कितीही काम असलं तरी एक दिवस मात्र ते कधीच विसरत नसतं तो म्हणजेच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस... या लग्नाच्या वाढदिवसाला देखील एकमेकांनी एकमेकांसाठी सरप्राईझ प्लॅन केले होतं.
अस्मिताने लग्नाचा सातवा वाढदिवस म्हणून त्याला सरप्राइज द्यायचे ठरवलं होतं. ठरल्याप्रमाणे तिने त्याच्या आवडीचा सगळा बेत अगदी प्रेमाने बनवला , जसे की वरणभात त्यावर तुपाची धार , चपाती , पनीरची भाजी , शेंगदाणे चटणी , कुरकुरीत बटाटा भजी , कांदा भजी , गोड शेवया... आणि त्याच्या सगळ्यात आवडती बालुशाही आणि कलाकंद...!
अस्मिताचे हे सरप्राईझ पाहून आनंदला खुप आनंद झाला होता.
आनंदने देखील आज महत्वाचं काम रद्द करून घरीच राहायचे ठरवलं होते. आनंद आजच्या दिवशी सोबत असणार हे पाहून अस्मिता देखील खूपच खुश होती.
लग्नाची आठवणी म्हणजेच आयुष्यातील सगळ्यात आनंदी क्षण , आपले हक्काचं माणूस आपल्या आयुष्यात कायमचे येण्याचा क्षण.
अस्मिता सारखी बायको जीवनसाथी म्हणून मिळाली हे खरं तर माझे नशीब असे आनंदला नेहमीच वाटायचं. त्यामुळे एनिवर्सरीला अस्मिताला आनंदी ठेवण्यासाठी आनंदने सगळ्या टूर रद्द केल्या होत्या.
आजचा संपूर्ण दिवस-रात्र त्याला अस्मिता सोबत जगायच्या होत्या. त्या दोघांचेही हे अमूल्य क्षण , त्या क्षणांचा गारवा , त्यातील तृप्ती त्याला पुन्हा पूर्वीसारखीच अनुभवयाची होती.
आनंदला ते अनमोल क्षण मनाच्या एका कोपऱ्यात अलगद साठवून ठेवायचे होते.. अगदी एखाद्या अत्तराच्या सुगंधी कुपीप्रमाणे ..! जी कुपी तर एकच ठिकाणी असेल पण तिचा सुगंध मात्र सगळे आयुष्य सुगंधित करणारा असेल.
आनंदच्या मनात काय चालूय हे अस्मिताची अनुभवी नजर ओळखून होती. आज पुन्हा एकदा ते पुर्वीसारखेच सोबत असणार ही कल्पनाच सुखावणारी होती तिला....!
आज अस्मिताने देखील सुट्टी घेतली होती. इतके पदार्थ , इतका स्वयंपाक हे सगळे आवरताना चांगलीच दमछाक झाली होती तिची. सगळे आवरून कधी एकदा रूम मध्ये जाते असे झालं होतं तिला... !
सगळे आवरून झाले आणि रूम मध्ये जाणार तितक्याच फोन फोन वाजला. अस्मिताच्या बॉसचा फोन होता. त्याला काही प्रोजेक्ट रिपोर्ट अर्जेन्ट तयार करून हवे होते.
अस्मिताने उद्या हे रिपोर्ट बनवून देते म्हणून बॉसला समजवण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. ती आज सुट्टीवर असल्याचे देखील सांगितले पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही.
मनावर दगड ठेवून अस्मिताने काम पूर्ण करायला सुरुवात केली. मनात विचार वेगळेच पण , बुद्धी , हात मात्र लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी धडपडत होते.
रात्र झाली. जेवणं आटोपली. नेहमीप्रमाणे ध्रुवला घेऊन आजीआजोबा झोपायला गेले पण अस्मिताचे काम मात्र संपले नव्हते. एखाद्या मशीनप्रमाणे ती तिचे काम पूर्ण करण्यासाठी धडपडत होती.
इकडे आनंदला देखील तिची विवंचना समजत होती पण आज मन ऐकायला तयार नव्हते. रात्रीचे दोन वाजले.
अस्मिताचे काम संपले. तिला आठवलं आनंद आज मुडमध्ये होता. त्याच्या नजरेत चमक दिसत होती. खुप उशीर झाला तरी ती आनंदला आवडते तशी तयार होऊन रूम मध्ये आली.
तिचे ते अंगावर रोमांच उभे करणार सौंदर्य पाहून आनंद क्लिन बोल्ड झाला. ती खरंच खूप सुंदर दिसत होती. ती बेडवर जाऊन बसली. आनंद तिच्याजवळ सरकला. कधीपासून तो तिची वाट पाहत होता.
तिच्या कपाळावर ओठ टेकवत तो हळू हळू ओठापर्यंत आला. तिच्या मलूल ओठांनी त्याच्या ओठांना साथ देत एकरूप होण्याचा प्रयत्न केला. त्याच्या श्वासांची गती वाढली ...
आणि....
अचानक त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर विसावली. खोलीतल्या मंद प्रकाशात शरीराचा थकवा तिच्यावर चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता.
"किती थकलीय ही..!! अंगात त्राण ही नाही. तरीही आपल्याला आनंदी करण्यासाठी, साथ देण्यासाठी ती तयार झालीय. खरंतर संसारासाठी ती ही झटतेय. कदाचित आपल्यापेक्षा जास्तच."
तिचा थकलेला चेहरा पाहून त्याला कसंसच झालं. तिचं त्याच्याजवळ येणं हे फक्त यंत्रवत होतं. आज त्यात तृप्ती नव्हती.
खरा आनंद नव्हता कारण तो आनंद स्वतः जगण्यासाठी आणि आनंदला देण्यासाठी अस्मितात त्राणच उरलेलं नव्हतं.
आपली इच्छा तिच्यावर लादून तिला अजून त्रास नको द्यायला. आनंदच्या हे लक्षात आले आणि तो अस्मितापासून दूर झाला. त्याच्या असे अचानक दूर जाण्याने अस्मिता गोंधळली.
"अस्मिता, चल खूप उशीर झालाय. झोपूया आपण .. तू देखील खूप थकलीय." आनंद
" खरंच थकलेय मी, पण प्लीज तुम्ही असे रागावू नका ना.. मला ही हे क्षण तुमच्यासोबत जगायचे होते. पण आज या ऑफिसच्या कामाने ते जमूच दिले नाही..."
"प्लीज , तुम्ही नाराज होऊ नका ना .... तुम्हाला आनंदी पाहून माझा थकवा कुठेच पळून जाईल हो ..."
"ऐका ना माझे, नका असे चिडून झोपू ना ... नका झिडकारू मला ...प्लीज ..माफ करा ना मला ... मी माझ्या परीने प्रयत्न केलाय...! "
हे सगळे बोलताना अस्मिताच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पाहून आनंद व्यथित झाला. खरे तर त्याला हे सगळे हवे होते पण अस्मिताला त्रास देऊन नाही.
शारिरीक थकव्यामुळे आज तिच्या कडून ही अपेक्षा करणे चुकीचं आहे हे त्याला जाणवत होतं.
अस्मिताचा मात्र गैरसमज झाला होता.
आनंद उठून बसला. तिचा चेहरा हातात घेतला.
"अस्मिता, शरीरसुख हे क्षणिक असते. एकदा मिळालं म्हणजे तृप्त होत नाही आपण. पुन्हा पुन्हा ओढ लागते त्या सुखाची. "
"माझं प्रेम तितकंच मर्यादित नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो मनापासून. मनाने मनावर केलेलं प्रेम शरीराने शरीरावर केलेल्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ असतं."
" मिलन हे तेव्हाच परिपूर्ण होईल ना..?? जेव्हा दोघेही खुश असू. लादलेले क्षण कर्तव्यपुर्ती करतात फक्त. समाधान देत नाहीत. "
" आज तु खुप थकलेली आहेस. तुला आरामाची गरज आहे. तु माझीच आहेस. मी तुझा आहे. "
"हं.." म्हणत ती त्याच्या कुशीत शिरली.
" वेडा बाई, ही रात्र आयुष्यातली शेवटची रात्र नाही काही. आणि मी तुझा पार्टनर आहे मालक नाही...कळलं..?? "
म्हणत त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले.
"चल झोप शांत... ऐसी सालगिराह तो मौका मिलते ही मनायेंगे... लव यु डिअर.." म्हणत तिला हलक्या हाताने थोपटत राहिला.
वासना विरहित प्रेम तिलाही कळलं होतं. तिच्या नजरेत त्याचं स्थान उंचावलं. लवकरच आपण हे सुख त्याला समरसून बहाल करु.. देवा..!! तो दिवस लवकर येऊ देत. त्याच्या छातीवर डोकं ठेवून ती निश्चिंत झोपली होती.
त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. लहान मुलासारखी ती त्याच्यावर विसंबून झोपली होती.
" किती वेडी आहेस गं तू..!! रागवेन कसा तुझ्यावर त्या एका सुखासाठी... तुझ्या प्रेमाची शपथ आहे मी स्वतःला घालून घेतलेली. शपथ आहे मला तुझ्या एकनिष्ठतेची.. शपथ आहे मला त्या सात वचनांची..!!"
थोडयाच वेळात थकव्यामुळे अस्मिताला गाढ झोप लागली.तिच्या त्या निश्चिन्त झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहून तिच्या डोक्यावर हळूच प्रेमाचा हात फिरवून आनंद मनोमन गुणगुणत होता ....
" शपथ मला आहे या दिल्याघेतल्या वचनांची....
साथ असावी जन्मोजन्मी आपुल्या दोघांची....
शपथ मला आहे या दिल्या घेतल्या वचनांची..!"
समाप्त !
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels
✍©️ जया पाटील
1 Comments
छान लिहिता तुम्ही..
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box