मला साथ देशील ना भाग ८
©️ जया पाटील
भाग सात वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇
https://velvetkavisha.blogspot.com/2021/07/blog-post_13.html
रागिणीने आपल्यावर भरभरून प्रेम करावं.
हे अनुराजचं स्वप्न होतं.
ज्या क्षणांची त्याने रोज स्वप्नं सजवली होती.
ती आज प्रत्यक्षात उतरली होती,
जेव्हा रागिणीने तिच्या प्रेमाची कबुली दिली.
खरं तर त्याच्या स्वप्नपूर्तीचे क्षण होते ते,
पण तरीही तो ते क्षण जगू शकला नाही.
आयुष्यभर त्रास देणारी खंत होती ती ...!
अनुराज आणि रागिणी दोघांनीही मनाची कवाडं घट्ट मिटून घेतली होती.
समुद्रकिनाऱ्यावरच्या त्या भेटीनंतर ,
रागिणीने परत फिरून कधीच लग्नाचा विषय काढला नव्हता.
ते पुन्हा एकमेकांसोबत मित्र मैत्रिणीच्या रूपात वागण्याचा प्रयत्न करत होते.
पण खरंच ते शक्य होते का ..?
तर अजिबात नाही.
पण तरीही दोघांकडूनही प्रयत्न सुरु झाला.
त्यातच इंजिनीरिंगचे शेवटचे वर्ष असल्यामुळे दोघांवरही अभ्यासाचा ताण वाढला होता.
फर्स्ट सेमिस्टरची परीक्षा झाली.
कॉलेज मध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू सुरु झाले.
रागिणी पहिल्याच वेळेस मुंबई मधल्या चांगल्या कंपनीत सिलेक्ट झाली.
तिला उत्तम पॅकेज देखील मिळाले.
अनुराजचं देखील इंटरव्ह्यू देणं सुरु होतं.
दोन तिन राऊंड झाल्यानंतर त्याला देखील मुंबई मधल्याच एका चांगल्या कंपनीत प्लेसमेंट मिळाली.
चांगले पॅकेज देखील मिळाले.
शेवटच्या वर्षाची परीक्षा संपली.
दोघांनीही कंपनी वर्क जॉईन केले.
ट्रेनिंग पिरियड सुरु होता.
तसं पहायला गेलं तर वर वर सगळं ठीक वाटत होतं. दोघांनाही मात्र स्वतःच्या भावना दाबून ठेवताना कष्ट पडत होते...
अनुराजला बऱ्याचदा वाटलं की, "झुगारून टाकावी ही बंधने.
सरळ लग्न करावं आणि बाबांच्या समोर जाऊन उभं राहावं.
म्हणावं त्यांना,
"प्रेमविवाह म्हणजे पाप नाही.
त्यात वाईट काहीच नाही.
तुम्ही माहेर नाकारलात त्याचं दुःख असलं तरी कमळा आत्या सुखात आहे."
पण दुसरीकडे कासावीस झालेला बाबांचा चेहरा डोळ्यासमोर आला की सगळं अवसान गळून पडायचं.
--------------------------------
अशातच एक दिवस रागिणीला ऑफिस मध्ये धीरजचा फोन आला.
आईला हार्टअटॅक आल्यामुळे तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे.
असे धीरजने सांगितलं.
रागिनी खूप घाबरली.
तिला काही सुचत नव्हतं.
तिने अनुराजला फोन केला.
त्याने तिला धीर देत हॉस्पिटलला पोहचण्यास सांगितले.
अनुराजने अर्ध्या दिवसाची लिव्ह घेतली.
त्याच्या काही महत्वाच्या मीटिंग्स त्याच्या सहकाऱ्याला अटेंड करायला सांगून ,
तो हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाला.
त्याच्या आधीच रागिणी आणि धीरज हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते.
हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर रागिणीने त्याला पाहिले.
आणि तिने त्याला मिठी मारून रडू लागली.
"अनुराज , हे काय होऊन बसलं रे..?
आईला बरं वाटायला हवं लवकर..
किती विव्हळतेय ती.
पाहवत नाही तिच्याकडे. " रागिणी भावनाविवश होत रडत होती.
रागिणीच्या आईची हालत गंभीर होती.
अँजिओग्राफी झाली.
बऱ्याच टेस्ट झाल्या.
हृदय फक्त ३०% कामं करत होतं.
बायपास सर्जरीसोबत खराब झालेला वॉल्व चेंज करण्याचं आव्हान ही पेलायचं डॉक्टरांनी ठरवलं.
रागिणी आणि धीरजसमोर हो म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
सर्जरी व्यवस्थित पार पडली.
अवेळी बाबा जाण्याचे दुःख पचवलं होत रागिनीने.
आईला लवकरात लवकर बरं वाटावं म्हणून ती देवाला साकडं घालत होती.
आईच्या सुखी आयुष्यासाठी सतत देवाचा मनोमन जप करत होती.
सुट्टी घेऊन ऑफिस घर ऑफिस असं सुरु होतं.
अनुराज कंपनीतून लवकर निघून आसावरीताईंना पाहण्यासाठी रोज हॉस्पिटलला जात होता.
कामावरच उशीर होतो म्हणून त्याने घरी सांगून ठेवलं होतं.
"काकू , लवकरच बऱ्याच होऊन घरी येतील.
तुम्ही काळजी करू नका. "
अनुराज रागिणीला धीर देता देता धीरजचे देखील मनोधैर्य वाढवत होता.
दोन दिवस छान गेले आणि after procedure complications वाढले.
आसावरीताईंची तब्बेत खालावू लागली.
सर्जरीनंतर तिसऱ्या दिवशी झालेली complications डॉक्टर आपल्या बुध्दीच्या बळावर बऱ्या करू पाहत होते.
दोन दिवस वेगवेगळ्या औषधांच्या भडीमारात गेले.
आज सर्जरीचा पाचवा दिवस.
काकुंच्या तब्बेतीत सुधारणा नव्हतीच.
आता मात्र अनुराजने सुट्टी टाकली आणि दिवसभर आयसीयु बाहेर बसून राहिला.
काकुंना तपासून डॉक्टर बाहेर आले.
"तुमच्यापैकी अनुराज कोण आहे. पेशंटला त्यांच्याशी बोलायचं आहे."
"सर, मी अनुराज आहे." अनुराज उठून उभा राहत म्हणाला.
"हे बघा अनुराज, तुमच्या पेशंटची कंडीशन क्रिटीकल आहे.
तेव्हा त्यांच्यावर जास्त ताण येईल इतकं बोलू नका त्यांच्याशी." डॉक्टरांनी सांगितले.
"शुअर सर.. थॅंक्यु.." म्हणत अनुराजने हात जोडले.
अनुराज आसावरी काकुंना भेटण्यासाठी आयसीयू मध्ये गेला.
त्याला पाहून इतक्या त्रासात देखील आसावरी काकू हसल्या.
त्यांच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या.
अनुराज जवळ जाऊन उभा राहिला.
काकुंनी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला.
आवाज खुपचं क्षीण झाला होता.
अनुराजने खाली वाकून आपला कान काकुंच्या तोंडासमोर नेला.
"अनुराज, माझ्याकडे आता खुप वेळ नाही."
"काकूं तुम्ही शांत पडून रहा.
आता उगाचचं स्ट्रेस नको. "
अनुराजने काकुंचा हात हातात घेत सांगितले.
काकुंच्या डोळ्यात खुप भावना दिसत होत्या.
त्यांना खुप बोलायचं होतं.
पण त्यांना बोलता येत नव्हतं.
मग अनुराजने त्यांना बोलू दिलं आणि शांत बसून राहिला.
आता फक्त काकू जे बोलतील त्याला प्रतिप्रश्न न करता हो हो करायचं ठरवलं.
"माझ्या दोन्ही लेकरांना सांभाळ"
काकूंनी ताकद एकवटत सांगितलं.
"हो काकू" अनुराज.
काकूंना आता बरीच धाप लागली होती.
पण त्या बोलायचा प्रयत्न करत राहिल्या.
"त्यांच्या पाठीशी कायम उभा रहा."
"हो. नक्की काकू.." अनुराज.
"माऽझ्या राऽगिऽणीऽशी लऽग्न कऽर.." काकू अडखळत म्हणाल्या.
"हो काकू..
पण तुम्ही आता शांत रहा पाहू.
किती त्रास होतोय तुम्हांला..
मी सगळं करेन.
विश्वास ठेवा माझ्यावर.
आणि लवकर बऱ्या व्हा आधी."
अनुराजने काकुंच्या डोक्यावर थोपटत म्हटलं.
काकु बोलायच्या थांबल्या.
मॉनिटर जोरात कुं कुं करायला लागला.
आयसीयुचे डॉक्टर पळतच काकुंपाशी आले.
अनुराजला बाहेर जायला सांगितलं...
अनुराजच्या डोळ्यासमोरून काकुंचा चेहरा काही केल्या जात नव्हता.
आयसीयुमध्ये धावपळ सुरू झाली.
काकू बेशुद्ध पडल्या होत्या.
बीपी अचानक ड्रॉप झाला होता.
त्यानंतर काकू पुर्ण एक दिवस बेशुद्धावस्थेतच होत्या.
सगळेच काळजीत होते.
सातव्या दिवशी मात्र डॉक्टरांनी अनुराज, रागिणी आणि धीरजला आत बोलावून काकुंच्या तब्बेतीबद्दल कल्पना दिली.
नातेवाईकांना भेटायला बोलवायचं असल्यास बोलावून घ्या म्हणाले.
त्याच संध्याकाळी काकुंची प्राणज्योत मालवली.
"आई..... ! " म्हणत धीरज आणि रागिनीने जोरात टाहो फोडला.
रडणाऱ्या रागिणी आणि धीरजला सांभाळण्याचा अनुराज प्रयत्न करू लागला.
रागिणी आणि धीरज अनुराजला बिलगून रडत होते.
"अनुराज , काय रे हे असं..??
का माझ्यासोबतचं असं होतं...?
इतकी कमनशीबी का आहे मी ..?
माझ्या आयुष्यातील प्रत्येक जवळची माणसं माझ्यापासून दूर जातात.
कशी जगेन मी त्यांना सोडून ..?
प्रत्येक वेळी मी स्वतःला कशी तरी सावरते
आणि लगेच नवीन दुःख ,
माझी परीक्षा घेण्यासाठी माझ्या पुढ्यात येऊन ठेपते. "
रागिनी ओक्साबोक्शी रडत होती.
अनुराजला देखील तिच्याबद्दल वाईट वाटत होते.
कारण तिला आपल्यापासून दूर करणाऱ्यांमध्ये
अनुराज देखील होताच की...
धीरजला काहीच समजत नव्हतं तो फक्त रडत होता.
त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हता.
दवाखान्यातील तो प्रसंग सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता.
हळूहळू एक एक करत नातेवाईक गोळा होऊ लागले.
अनुराजने आसावरीकाकूंच्या अंतयात्रेची तयारी करण्यासाठी मदत केली.
विधीपूर्वक धीरजच्या हाताने काकुंना चिताग्नी दिला गेला.
एक एक दिवस जात होता.
एकीकडे तो रागिणी आणि धीरजला धीर देत होता.
तर दुसरीकडे काकुंच्या प्रत्येक वाक्याला "हो हो " म्हटलेलं आठवत होतं.
ज्या व्यक्तीशी आसावरी काकू शेवटच्या बोलल्या होत्या तो अनुराजच होता.
आसावरीकाकूंचे श्राद्ध आणि इतर विधी पार पडले.
त्या रात्री तो घरी गेला.
रागिनी खूप कोमेजली होती.
तिची अवस्था अनुराज कडून पाहवली जात नव्हती.
त्याच्या डोक्यात आसावरीकाकूंना "हो" म्हटलेलं काही केल्या जात नव्हतं.
बाकी सगळं ठीक होतं पण रागिणीशी लग्न कसं करावं.. ??
बाबांना काय सांगावं..??
बाबा मान्य करतील का..??
नाहीच करणार..!! नकोच विचारायला.
पण मग ज्या एका "हो" वर काकू निर्धास्त झाल्या तो "हो" कसा पुर्ण करावा.
ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळणं सुरु होतं.
अस्वस्थतेमुळे त्याला रात्रभर झोप आली नाही.
शेवटी एका निर्णयाशी ठाम झाल्यावर त्याला शांत झोप लागली.
-------------------
काकुंना जाऊन तीन महिने होत आले.
एका सकाळी अनुराज नेहमीपेक्षा थोडा लवकरच ऑफिससाठी घराबाहेर पडला.
रागिणीच्या घरी गेला. धीरज आणि ती ऑफिसला जायच्याच तयारीत होती.
तिथे जाऊन त्याने धीरज आणि रागिणीला समोर बसवले.
तो बोलू लागला.
"धीरज आणि रागिणी मला तुमच्याशी बोलायचं आहे.
हॉस्पिटलमध्ये काकु जेव्हा शेवटचं माझ्याशी बोलल्या तेव्हा त्यांनी रागिणीशी लग्न कर सांगितलं आणि मी हो म्हटलं.
त्यामुळे मी आता रागिणीशी लग्न करण्याचा विचार करतोय."
"हे काय बोलतोय अनुराज तू ...?
तूला तुझे तरी कळतंय का ..?
याचे परिणाम काय असतील याचा तरी विचार कर.
आईला ही सगळी सिच्युएशन माहित नव्हती.
तुझ्या अडचणी तिला माहिती नव्हत्या.
त्यामुळे तिने तुला हे सांगितलं असेल. कारण तु मला आवडतोस हे तिला माहिती होतं.
पण मला तर सत्य परिस्थिती माहिती आहे.
मी तर अनाथ झालीच आहे.
पण तूला मात्र पोरका झालेला नाही पाहायचं मला.
माझ्या सुखासाठी असं काही वागून ,
मला तुझ्या बाबांचा जीव धोक्यात घालायचा नाही.
या लग्नामुळे जर त्यांना काही झालं,
तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही."
रागिणी भराभर बोलत होती.
तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून अनुराज बोलू लागला...
"हे बघ रागिणी, काकुंना "हो" म्हणणं हे फक्त एक निमित्त झालं.
काल रात्रभर विचार केल्यानंतर मला लक्षात आलं की,
माझं प्रेम आहे तुझ्यावर.
तुझं ही तितकंच प्रेम माझ्यावर आहे.
आपण दोघेही आपल्या प्रेमाची आहुती देऊन दुसरी कोणीतरी व्यक्ती आयुष्यात स्विकारु.
पण खरंच संसार करु शकू का गं..??
तु तूझ्या नवऱ्यात अनुराज शोधशील आणि मी माझ्या पत्नीत रागिणी.
आपण दोघे अनोळखी व्यक्तींमध्ये कसे सापडणार गं एकमेकांना..
पुढे पुढे भ्रमनिरास होत राहील आणि माझ्यामुळे चार आयुष्य उद्ध्वस्त होतील.
नेमकं मला हे नकोय."
"तुझे बाबा स्विकरतील मला??
त्यांना आपल्या या निर्णयामुळे त्रास नाही का होणार..?" रागिणीने न राहवून विचारलं.
"काकुंना जाऊन तीन महिने होत आलेत.
आता आपण लग्न केलं नाही तर पुढे वर्षभर लग्न करता येणार नाही.
त्यामुळे सध्या आपण कोर्ट मॅरेज करु.
माझ्या मित्राचे भावोजी पुण्यात वकील आहेत.
त्यांच्याशी बोललोय.
येत्या शनिवारी सगळे पेपर्स घेऊन पुण्यात जाऊन एक महिन्याची नोटीस देऊ.
नंतर एक महिन्यांनी लग्न करू.
लग्नानंतर तु काही दिवस इथेच रहा.
मी बाबांचा मुड पाहून त्यांना convince करण्याचा प्रयत्न करतो."
अनुराजने आपला प्लॅन सांगितला.
"पुण्यात का?? बांद्रा कोर्टात का नाही. रागिणी.
"अगं, मुंबईत कोणी ना कोणी ओळखीचं भेटलं तर..??
म्हणून पुणे. तिथे फारसे कोणी नातेवाईक नाहीत." अनुराज.
"बरं पण बाबा तयार होतील का..??" रागिणीने विचारलं.
"तुला सांगतो रागिणी,
गेले तीन महिने मी खुप विचार केला.
कोणाच्या तरी दबावामुळे आपण आपल्या आयुष्यासोबत असे खेळू शकत नाही.
कमळा आत्या भेटली तेव्हा तिने हेच सांगितलं आणि मला ते पटलंही.
आईबाबा ,मुले ही नाती आयुष्यात फक्त काही काळ सोबत असतात.
पण जोडीदार हा आयुष्यभर ..
अगदीच मरत्या क्षणापर्यंत साथ देतो.
मी खुप काळ बाबांचा विचार केला पण जेव्हा एका क्षणापुरता स्वतःचा विचार केला तेव्हा कळलं की तुझ्याशिवाय मी अपुर्णच. "
अनुराज खुप विचारांती बोलत होता.
"मी जर आता लगेचच तुझे आणि माझे नाते घरी सांगितलं तर ,बाबा ते कधीही मान्य करणार नाहीत.
आणि ब्लॅकमेल करून माझं लग्न दुसऱ्या कोणासोबत लावतील.
त्यामुळे आपण आधीच लग्न करूया.
म्हणजे त्यांच्यासमोर दुसरा कुठला पर्याय उरणार नाही." अनुराज खुप ठामपणे बोलत होता.
यावेळी रागिणी मान हलवत शांतपणे ऐकत होती.
आजवर बरेचसे निर्णय घेण्यात अनुराजने तिची मदत केली होती.
त्यामुळे त्याची निर्णय क्षमता तिला माहिती होती.
अनुराजचा शब्द न शब्द तिला पटत होता.
अनुराजशिवाय दुसऱ्या कोणाची होऊन ती कधीच सुखी झाली नसती.
"आणि त्यांनी हे लग्नच स्वीकारले नाही तर ...? " एक प्रश्न बाकी होताच. तो धीरजने विचारला.
" तर धीरज आम्ही आमच्या मार्गाने चालू.
पण सध्या तो विचार नको करायला.
सध्या फक्त एक महिन्याची नोटीस आणि त्यानंतर लग्न हा एकच विचार आहे डोक्यात.
एकदा लग्न होऊ दे. मग बघू पुढंच पुढे. " अनुराजने दिर्घ श्वास घेतला.
दोघांना बाय म्हणत निघाला.
------
एक महिन्याच्या नोटिस पिरियडनंतर लग्नाचा दिवस आला.
अनुराजचे दोन मित्र, धीरज आणि त्याचा एक मित्र साक्षीदार म्हणून सही करणार होते.
मंगळवार होता.
सकाळीच रागिणी लवकर तयार झाली.
भाड्याची कार गेटबाहेर उभी होती.
घरातून निघण्यापूर्वी तिने देवाजवळ दिवाबत्ती केली.
आईबाबांच्या फोटोसमोरच उभे राहून तिने त्या दोघांचाही आशीर्वाद मागितला.
मनोमन प्रार्थना केली.
"आई , किती प्रेम करतेस ग माझ्यावर ...
मरतेक्षणी देखील फक्त माझ्या सुखाचं मागणं मागून गेलीस.
तु ज्याला जादुगार म्हणायचीस तो बघ.
किती रिस्क घेत आज लग्न करतोय.
आई, जिथे असशील तिथून एकच प्रार्थना कर देवाजवळ की,
जो अनुराज माझ्यासाठी, माझ्या प्रेमासाठी हे पाऊल उचलतोय
त्यात त्याचे आईबाबा त्याच्यापासून दुरावू नयेत.
त्यांच्या दुराव्याचे कारण मी ठरू नये इतकेच.
तुझा आशीर्वाद सदैव पाठीशी असू दे. "
धीरज आणि रागिनी गेटबाहेर आले.
दोघेही कारमध्ये बसले.
कार आणि
रागिणीच्या वैवाहिक आयुष्याचा प्रवास सुरु एकत्रच झाला.
सकाळीच अकरा वाजता ते दोघेही रजिस्टर ऑफिसला पोहोचले.
अनुराज तिथे आधीच पोहोचला होता.
रागिनी कारमधून उतरली.
खूप सुंदर दिसत होती.
चिंतामणी रंगाची सेमी पैठणी ,
त्यावर त्याच कलरचे मग्गम वर्क केलेलं ब्लॉउज ,
हातात मॅचिंग बांगड्या ,
गळ्यात तिच्या आईचा राणीहार ,
कानात मोत्याचे कानातले ,
नाकात नाजुकशी नथ ,
केस पिनअप करून अर्धे मोकळे सोडलेले ,
पायात कोल्हापुरी चप्पल.
हा सगळा साज लेवून ती खूप सुंदर दिसत होती.
तिच्या या रुपाकडे अनुराज काही क्षण फक्त पाहत राहिला.
ठरलेल्या वेळेवर विवाह नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांना आता बोलावले.
धीरज आणि अनुराजच्या मित्रांच्या साक्षीने रागिणी आणि अनुराजचा विवाह पार पडला.
चतुःश्रृंगी देवीच्या मंदिरात ते दोघेही आशीर्वाद घेण्यासाठी गेले.
तिथल्याच देवीच्या तबकातील कुंकू अनुराजने रागिणीच्या कपाळावर लावलं.
"आजपासून तु माझी कायद्याने पत्नी झालीस.
बाबांची मान्यता मिळवून आपण लग्नाचा सोहळा ही करु या."
अनुराजने सांगितलं.
रागिणी निश्चिंत झाली. हाॅटेलमध्ये जेवण करून सगळे मुंबईच्या दिशेने निघाले.
-------------------
अनुराज लवकरात लवकर बाबांना मनवण्याचा प्रयत्न करणार होता.
कारण त्यांच्या आशिर्वादा शिवाय हे लग्न अपूर्ण होते.
एक वर्ष पुन्हा ते मित्रमैत्रीण म्हणूनच राहणार होते कुठलीही शारीरिक जवळीक न साधता...
इतका कठोर निर्णय त्यांनी घेतला होता खरा..
पण तो निभावणं त्यांना जमणार होते की नाही ...
देवालाच ठाऊक...!
------
परतीच्या प्रवासात रागिणीच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.
ती मनोमन देवाला प्रार्थना करत होती.
आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होते आहे.
अनुराजच्या आईबाबांना मनविण्याचा मार्ग लवकरच सापडू दे.
माझे नाही पण त्याचे तरी आईबाबा मला आमच्या आयुष्यात हवे आहेत.
त्यांच्या आशिर्वादा शिवाय सगळे अपूर्ण आहे.
जोवर त्यांची मान्यता मिळणार नाही तोवर आम्ही आमच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करणार नाही.
देवा आता तूच मार्ग दाखव. "
.
.
.
लग्न तर झालं पण अनुराज आणि रागिनीचे हे लग्न अनुराजचे बाबा स्वीकारतील का...?
अनुराज त्याच्या बाबांना समजवण्यासाठी कोणते प्रयत्न करेल ...?
काय असेल दोघांच्याही नात्याचे भविष्य ...?
मोरपंखी आठवणी
की
नवीन संकटाची चाहूल ..?
वाचू पुढच्या भागात.
.
.
.
.
क्रमश:
प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो. सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
फोटो साभार - Google
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box