मला साथ देशील ना भाग ९



मला साथ देशील ना भाग ९

© Velvet Kavisha

संकल्पना व कथाबीज ✍©️ जया पाटील

भाग आठ वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇

https://velvetkavisha.blogspot.com/2021/07/blog-post_14.html


पुण्यातून निघालेल्या दोन्ही कार मुंबईत पोचल्या. 

रागिणीच्या बिल्डिंग खाली कार थांबली. 

उतरण्याआधी रागिणीने मंगळसूत्र काढून मुठीत बंद करून घेतलं.

 बिल्डिंग मधलं कोणी भेटलंच तर पंचाईत नको. 

अनुराज, रागिणी आणि धीरज घरी आले.

 रागिणीने मंगळसूत्र घातले.

 दोघांनी महेशराव आणि आसावरीकाकुंच्या फोटोला नमस्कार केला. 

रागिणीने अनुराजकडे पाहिलं. 

तो तिच्याकडेच पाहत होता.  

" आपण काही चुकीचं तर नाही केले ना अनुराज ...?" अनुराजला विचारलं ..

"नाही. 

अजिबात नाही. 

आपण काहीच चुकीचं केलं नाहीये. 

मला आईबाबांना त्रास द्यायचा नाहीये. 

तसाच स्वतःलाही त्रास करून घ्यायचा नाहीय. 

आपण त्यांना समजवण्याचा नक्की प्रयत्न करू.

त्यांचे आशीर्वाद मिळाल्याशिवाय आपला संसार परिपूर्ण होणार नाही.

पण या सगळ्यात तू स्वतःला अपराधी समजू नकोस. 

आज आसावरी काकू आपल्या दोघांना सोबत पाहत असतील.

तेव्हा त्या तिथून आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतील.

त्यामुळे आता हस पाहू ..." 

अनुराजने रागिनीला समजावले.

रागिणीला तर समजावलं होतं पण मनातून मात्र तोच खूप टेन्शन मध्ये होता. 

यातून आपण नक्कीच मार्ग काढू याची त्याला खात्री वाटत होती.

----------------------------

दोघांचही रुटीन सुरू झालं. 

आईबाबांना रागिणीबद्दल कसे सांगावं हेच अनुराजला समजत नव्हते.

अशातच काही दिवस निघून गेले.

रागिणी खूप चिंतेत होती.

अनुराजची अवस्था देखील काही वेगळी नव्हती.

नेहमीप्रमाणे ऑफिसला जाणे सुरु होते.

रागिणी आणि अनुराज एकमेकांसोबत फक्त फोन कॉलवर बोलत होते.

 भेटायला कधीतरी कॉफी शॉप किंवा चौपाटीवर जाणं होत होतं. 

एकमेकांना भेटल्यावर जवळ येण्याचा मोह टाळता येणार नाही.

म्हणून प्रत्यक्षात भेटणं मात्र ते टाळत होते.

घरात अनुराजच्या आणि तन्वीच्या लग्नाचा विषय निघायचा. 

"तन्वीचं लग्न झाल्यावर मी लग्न करणार." 

असं सांगून अनुराजने वेळ मारून नेली. 

एखादी चांगली वेळ आणि बाबांचा मूड पाहून त्याने विषय काढायचं ठरवलं. 

तो संधी शोधत होता.

 घरात तन्वीच्या लग्नाचा विषय सुरू झाल्यामुळे बाबा आनंदात होते. 

तन्वीसाठी स्थळं शोधण्याचं कामं युध्दपातळीवर सुरू झालं. 

दर दोन रविवार सोडून एक स्थळ घरी येऊ लागले. 

चार पाच स्थळांनंतर एक स्थळ सर्वांना पसंत पडलं. 

आता पुढची बोलणी करण्यासाठीची बैठक ठरली आणि त्याच्या आदल्या दिवशीच तन्वी ऑफिसमधून घरी आलीच नाही. 

फोन स्वीच ऑफ. 

संपर्क होईना. 

सगळीकडे शोधाशोध सुरु झाली. 

रात्री नऊ वाजता एका अनोळखी नंबरवरून अनुराजला फोन आला. तन्वी बोलत होती. 

"दादा, माझ्या ऑफिसमध्ये असिस्टंट मॅनेजर असणाऱ्या सौरभ गावडेशी मी आज लग्न केलंय."

"तन्वी..." एवढंच अनुराज बोलला आणि बाबांनी त्याचा फोन घेतला.

फोनवर तन्वीकडून तिच्या लग्नाबद्दल ऐकलं आणि "आजपासून तुझा बाप तुझ्यासाठी मेला. 

तुझा आमचा काही संबंध नाही." सांगून फोन ठेवला. 

बाबा चांगलेच भडकले होते. 

खुप जोरजोरात बडबड करत होते.

अनुराजच्या आईला तिने लेकीकडे लक्ष दिलं नाही.

 लेकीने नाक कापलं आणि असं बरंच काही. 

अनुराजने समजूत काढण्याचा प्रयत्न करत राहिला.

 पण काही उपयोग होत नव्हता. 

बाबांचा बीपी वाढला. 

चक्कर आली. 

जवळच्या दवाखान्यात नेलं.

फॅमिली डॉक्टर ओळखीचे होते. 

बाबांचे मित्रत्वाचे संबंध होते. 

त्यांनी स्वतःकडची काही मेडिसीन दिली. 

 बाबांच्या त्रासाचं कारण ऐकून घेत बाबांचं थोडं ब्रेन वॉश केलं. 

"आजकाल हे असं चालतं. 

आताची पिढी हुशार आणि चाणाक्ष आहे. 

त्यांचं बरंवाईट त्यांना कळतं. 

आपण जुळवून घेणे गरजेचे आहे." 

डॉक्टर स्वतः कोल्हापूर कडचे होते आणि त्यांच्या मुलीने वीस वर्षांपुर्वी ख्रिश्चन मुलाशी लग्न करून परदेशात स्थायिक झाली होती. 

खुप लोकांनी डॉक्टरांना बोल लावले. 

पण डॉक्टर साहेब "आपण आपल्या माणसाला बोललो की, लोकही तोंडसुख घेतात. 

त्यामुळे आपण आपल्या माणसाच्या पाठीशी ठाम उभं राहिलं पाहिजे."

 या स्वतःच्या मतांवर ठाम होते. 

मुलांच्या आनंदात तर आपला आनंद मानला की सगळं नीट होतं. 

मनस्ताप होत नाही." 

असं आणि बरंच काही डॉक्टर बोलत राहिले. 

बाबा थोडे शांत होऊन घरी आले.

घरचं वातावरण बिघडूनच गेलं होतं. तन्वीला दोष देण्यात काहीच अर्थ नव्हता. 

त्या दिवशी रात्रभर अनुराज तळमळत राहिला. 

दुसऱ्या दिवशी उशिरा जाग आली. 

बाबांचं चहापाणी, औषधं सगळं झालं. 

मी जरा येतो ऑफिसला जाऊन म्हणत त्याने तन्वीचं ऑफिस गाठलं. 

सौरभ गावडेची माहिती काढली. 

मुलगा चांगला होता. 

ऑफिसमधून त्याचा पत्ता घेऊन अनुराज त्यांच्या घरी पोचला. 

बिल्डींग एकदम उच्चभ्रु लोकांची होती. 

दरवाजा एका मध्यम वयाच्या काकुंनी उघडला. 

सेफ्टी डोअरच्या पट्टीमधून त्या अनुराज कडे पाहत होत्या.

"सौरभ गावडेंचं घर आहे का हे..??" अनुराजने बाहेरूनच विचारलं. 

"हो.... " 

"मी अनुराज, तन्वीचा भाऊ..." 

"आत या ना..!!" म्हणत काकुंनी सेफ्टी डोअर उघडून अनुराजला आत घेतलं. 

बाहेर वाकून अजून कोणी नाही ना याचा अंदाज घेतला. 

अनुराज आत येऊन बसला.

 अख्ख्या घरावर नजर फिरवली. 

श्रीमंतीच्या एकुण एक खुणा उठून दिसत होत्या. 

घरातल्या एका मदतनीस बाईंनी पाणी आणून दिलं. 

पाणी पिऊन झालं तरी कोणीच काही बोलत नव्हतं. 

एक वेगळीच शांतता पसरली होती. 

तेवढ्यात मघाचीच मदतनीस बाई चहा घेऊन आली.

 चहा पिऊन झाला आणि अनुराजने बोलायला सुरुवात केली

"सौरभ गावडे तुमचे चिरंजीव का..??"

"हो."

"तन्वीने त्यांच्याशी लग्न केलंय म्हणाली." अनुराज.

"हो." 

"कुठे आहे ती.. मला भेटायचं आहे तिला??" अनुराज.

"इथेच गेलेत जवळपास.. येतील इतक्यात." गावडे काकू

"सौरभरावांनी तरी मला भेटून सांगायला हवं होतं.."

खरंतर हे वाक्य तो मोठा भाऊ या नात्याने बोलून गेला. 

पण त्यानेही स्वतःच्या लग्नाबद्दल तन्वीला सांगितले नव्हतंच.

"बाबांना मोठा धक्का बसला. 

खुप त्रास करून घेतला त्यांनी." अनुराज पुढे बोलला.

"आम्ही सगळे सांगत होतो तन्वीला की एकदा तरी आम्ही तुझ्या घरी येतो. 

असं परस्पर लग्न नको करायला." गावडे काकुंनी सांगितलं.

"पण ती ऐकायलाच तयार नव्हती. 

ती म्हणाली, बाबांना माझ्या प्रेमाबद्दल कळलं तर ते माझं लग्न दुसऱ्या कोणाशी लावून देतील. 

त्यासाठी emotional blackmail करतील. 

त्यापेक्षा आधी लग्न करू मग बाबांना सांगू म्हणजे त्यांच्यासमोर दुसरा पर्याय उरणार नाही. 

लग्नानंतर त्यांची माफी मागू. 

माफ करणार.

अनुराजला काय बोलावं सुचत नव्हतं. 

काय बोलणार होता तो..?? 

तन्वीनेही त्याच्यासारखाच विचार केला होता. बाबांच्या हेकेखोरपणामुळे म्हणा किंवा लव्ह मॅरेजच्या दुस्वासामुळे आज त्यांचीच मुलं त्यांच्याशी अशी वागत होती. 

 जुन्या विचारांचा पीळ तो काही केल्या सुटत नव्हता. 

अनुराजला बाबांसाठी खुप वाईट वाटत होतं. 

अनुराज स्वतःच्याच विचारात हरवला होता.

गावडे काकुंनी बोलायला सुरुवात केली.

"सौरभ आणि स्वाती अशी दोन मुलं मला. 

सौरभचे बाबा स्टेट बॅंकेत मॅनेजर होते. 

पाच वर्षांपूर्वी हार्ट ॲटॅकने वारले. 

घरची आर्थिक स्थिती चांगली आहे आमची. 

कशाची कमी नाही. 

सौरभनेही त्यात भरच टाकलीय. 

दोन वर्षांपूर्वी स्वातीचं लग्न झालं.

 ती तिच्या संसारात सुखी आहे. 

सौरभच्या लग्नाचं पाहत होतो तेंव्हा तन्वीबद्दल कळलं. 

पण तुमच्या बाबांचा प्रेमविवाहाला असणारा विरोध पाहता तुमच्या घरी येण्याचं धाडस झालं नाही. 

आम्ही पांढरपेशी माणसं.

 जर तन्वीचं दुसरीकडे लग्न ठरवलं असतं तर ते मोडून तिला आमच्या घरी आणणं जमलं नसतं. 

म्हणून तुमची मुलगी असूनही तुम्हाला अंधारात ठेवलं. 

आम्हांला काही नको तुमच्याकडून. 

तुमची मुलगी आमच्या घरची सून झाली यातच सगळं आलं. 

फक्त जमलं तर पोरांना माफ करा आणि पोटाशी घ्या. 

मला ही माफ करा. 

पोराच्या सुखासाठी त्यांच्या हो ला हो मिळवला. " 

काकुंनी डोळ्यात पाणी आणून हात जोडले. 

"काकू हात नका जोडू. 

तुम्ही फक्त तन्वीला सांभाळा.  

तिचं माहेर तुटल्यातच जमा आहे. 

बाबांना न सांगता आज भेटायला आलो. 

भविष्यात तिला तिचं माहेर मिळावं म्हणून नक्की प्रयत्न करेन. 

तोवर मात्र तिला आईच्या मायेने जपा. 

एवढीच विनंती करतो." अनुराजने हात जोडले आणि जाण्यासाठी उठला. 

"तन्वीला सांगा मी येऊन गेलो. 

माझे आशीर्वाद आहेत तिच्या पाठीशी. 

बाबा कधी मान्य करतील माहिती नाही. 

तरीही आई बाबांचे आशिर्वाद तिला मिळावेत म्हणून मी प्रयत्न करेन." 

अनुराजने खाली वाकून काकुंना नमस्कार केला.

सोबत आणलेलं खाऊ आणि तन्वीच्या आवडीचे कंदी पेढे काकुंकडे दिले आणि तो निघाला.

------------------

डोकं बधीर झालं होतं.

 चूक कोणाचीच नव्हती. 

प्रत्येक जण आपापल्या जागी बरोबर होता. 

तन्वीने जी हिंमत दाखवली ती दाखवणं त्याला जमलं नव्हतं. 

उलटसुलट विचार करून त्याचं डोकं भणभणत होतं. 

तन्वीच्या लग्नानंतर आपण बाबांना रागिणीबद्दल सांगणार होतो. 

पण आता अजूनच बिघडलं सगळं. 

काय करावं..?? कसं करावं काहीच कळत नव्हतं. 

सिद्धिविनायकाच्या पायावर नतमस्तक झाल्याशिवाय पुढचं काही सुचणार नाही. 

विचारांच्या तंद्रीतच तो दादरहून प्रभादेवीला जायला निघाला. 

 रस्त्याने चालत होता. 

तेवढ्यात समोरून येणाऱ्या एका व्यक्तीने त्याला हाताला धरून थांबवलं. 

"अरे लक्ष कुठेय तुझं...??" 

"अहो साने सर तुम्ही इकडे कुठे...??" 

"फुल मार्केटला आलेलो. 

परवा सत्यनारायण आहे घरी. 

त्यासाठी लागणारी फुलं घ्यायला आलोय." साने सरांनी सांगितलं. 

हे साने सर म्हणजे अनुराज रागिणीच्या ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य. 

आणि अनुराजच्या दशरथ काकांचे खास मित्र. 

"तु कुठे चाललास..??" सरांनी विचारलं.

"मी जरा सिद्धिविनायक मंदिरात जातोय ‌ खुप दिवस झाले. 

आज जाऊ उद्या जाऊ करत राहूनच गेलं." अनुराजने बोलता बोलता सरांच्या हातातली फुलांची पिशवी घेतली. 

"सर सिद्धिविनायकाला आज इथूनच नमस्कार करतो. 

तुमची पिशवी खुप जड आहे. 

कशी न्याल ट्रेनमधून. 

त्यामुळे मी तुम्हांला घरी सोडायला येतो. 

आज आचार्य देवो भव.." म्हणत अनुराज सरांसोबत चालू लागला. 

दोघांनी गप्पा मारत मारत मामा काणेंच्या हॉटेलमध्ये चहा घेतला.

 काय करतोस? 

कुठे असतोस? 

दशरथ कुठे आहे.? 

बाबा कसे आहेत..?

 लग्न केलंस का..??  अशी बरीचशी माहिती विचारल्यावर सरांना एकदम रागिणीची आठवण झाली. 

"अरे ती तुझी मैत्रीण नाही का..?? 

तुमच्याच एरियात राहायची. 

खुप हुशार होती बघ. 

पंधरा दिवस काॅलेजला आली नाही म्हणून तू तिच्या घरी जाऊन चौकशी करून आलास.. 

काय रे नाव तिचं..??"

"रागिणी..!!"

"हां हां रागिणी.. 

कुठे असते ती आता..?? 

काय करते..?? 

तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे का अजून..??"

सरांनी एकामागे एक प्रश्न विचारले. 

अनुराजने लग्न सोडून रागिणीबद्दल सगळं सांगितलं. 

"तिला सांग मी विचारलं म्हणून आणि कधीतरी भेटून जायला सांग." 

" हो सर"

"आणि बाबांना ही सांग येईन एखाद्या दिवशी भेटायला. 

अगदी वेळ काढून. दशरथ इथे होता तेव्हा वरचेवर येणं होतं असे. 

मस्त गप्पांचे फड रंगत. आता सगळंच miss करतोय."

"नक्की या सर. वाट बघतोय." म्हणत सरांना बिल्डींगपाशी सोडून अनुराज माघारी फिरला. 

पुन्हा प्रभादेवीला जाऊन सिद्धिविनायकाच्या मंदिरात पोचला.

 गणपतीला साकडं घातलं. 

सगळ्या परिस्थितीतून तूच बाहेर काढ म्हणाला. 

सरांच्या भेटीमुळे बरं वाटलं होतं पण बाप्पाला नमस्कार करून ओझं उतरल्यासारखं झालं. 

त्याने घड्याळात पाहिलं. 

रागिणी यायला थोडा वेळ आहे. 

तोवर आपण तिच्या घरी जाऊन थांबू. 

Assignment आहे सांगितलं म्हणून बिचारीने फोन ही केला नाही. 

फक्त मेसेजेस करत राहिलोय दोघं. आता भेटूनच तन्वीबद्दल, साने सरांच्या भेटीबद्दल बोलू. 

तो रागिणीच्या गल्लीत पोचला आणि पावसाची जोरात सर आली.

 आडोसा मिळेपर्यंत चांगलंच चोपलं पावसाने. 

पाऊस थांबेल असं वाटतं नव्हतं. 

त्याने पळतच रागिणीचं घर गाठलं. 

त्याने खिशातून चावी काढली. 

पाहिलं तर दरवाजाला कुलुप नव्हतं. त्याने बेल वाजवली. 

रागिणीने दरवाजा उघडला. ती पण नुकतीच आली होती. 

"अरे तू..?? एवढ्या लवकर कसा काय..?? आणि किती भिजलास...??"

"तु आज लवकर आलीस का..??"

"हो. काम आवरलं मग निघाले." 

अनुराज चांगलाच कुडकुडत होता. ति

ने पाहिलं. 

"मी चहा ठेवते तोवर तू कपडे बदलून घे. 

कपाटात धीरजचे कपडे असतील बघ." रागिणी.

अनुराज बेडरुममध्ये गेला. 

कपाटातून कपडे काढून बेडवर ठेवले. 

टॉवेल घेऊन बाथरुममध्ये गेला. 

भिजलेला शर्ट, पँट, बनियान काढून बादलीत टाकली.

 इनरवेअर तशीच ठेवून टॉवेल गुंडाळून बेडरुममध्ये आला. 

इतक्यात रागिणी चहा घेऊन आली. 

टॉवेल गुंडाळलेल्या पाठमोऱ्या अनुराजकडे पाहिलं आणि हृदयात वाजे समथिंग झालं. 

टेबलवर चहाचा ट्रे ठेवून तिने अनुराजला पाठीमागून मिठी मारली. 

पावसाने थंडावलेल्या शरीराला रागिणाचा उबदार स्पर्श सुखावून गेला. 

शरीरावर शहारा आला.

 काखेतून छातीवर आलेल्या तिच्या हातांवर त्याने हात ठेवले अन दंड हलकेच काखेत दाबले.

"अनुराज ऽऽऽ " म्हणत ती त्याला घट्ट बिलगली...

.

.

.

क्रमशः

पुढील भागात

वाचकहो, कथेच्या लेखिका जया पाटील यांना डेंग्यू झाल्यामुळे त्या ही कथा पुर्ण करु शकणार नाहीत. संकल्पना व कथा जया पाटील यांचीच असून आजपासून या कथेचे पुढील भाग आमच्या  लेखिका वर्षा ठुकरुल लिहिणार आहेत...

प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो.  सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 


फोटो साभार - Google  

संकल्पना व कथाबीज ✍©️ जया पाटील

© Velvet Kavisha


Post a Comment

0 Comments