मुली पण काही कमी नाहीत

मुली पण काही कमी नाहीत


©️जया पाटील 



" अभय , असा कसा विचार करू शकतात तुम्ही...? 

इतके सुशिक्षित असतानांही इतक्या खालच्या पातळीचा विचार करता आहात तुम्ही..

तुमच्याकडून अशी अपेक्षा कधीच नव्हती मला...

तुमच्या बद्दल माझ्या मनात खूप आदर होता.

पण तो सन्मान आज पूर्णपणे गमावला आहे तुम्ही..

तुम्हाला हवं तसं कधीच घडणार नाही.

मी तसे घडू देणार नाही.

आता आपल्यात जो दुरावा निर्माण झाला आहे.

तो कधीच दूर होणार नाही.

मी आजच तुम्हाला आपल्या नात्यातून मुक्त करते आहे.

यानंतर मी तुमच्या आयुष्यात कधीच नसणार.

त्यामुळे माझ्या आयुष्यात कोण असणार आणि कोण नाही. 

याच्या सोबत तुम्हाला काहीच देणंघेणं नसावं.

बाय ..." 

नेहा चिडून अभयला बोलून रागारागात निघून गेली.

इतक्या मोठ्या शहरात इतक्या रात्री कुठे जाणार होती ती..

तिने तिची मैत्रीण मयुरीला फोन केला.

घडलेला सगळा प्रकार सांगितला.

मयुरीने तिला ताबडतोब तिच्या घरी निघून येण्यासाठी सांगितले.

वाटेत जाणाऱ्या रिक्षाला थांबवून नेहा मयुरी कडे जाण्यास निघाली.

रिक्षा सोबत नेहाचा प्रवास सुरु झाला.

त्याचबरोबर तिच्या मनाचा प्रवास देखील सुरु झाला.

ती तिच्या भूतकाळात हरवली.

सहा वर्षांपूर्वी एका नातेवाईकांच्या लग्नात नेहाला विभाताईंनी पाहिले.

पहिल्याच नजरेत त्यांनी तिला सून म्हणून पसंत केली. 

नातेवाईकांकडून नेहाची सगळी माहिती घेऊन,

विभाताई आणि त्यांचे पती दोघांनीही नेहाला त्यांच्या मुलासाठी ,

अर्थातच अभयसाठी मागणी घातली.

रीतसर कांदेपोह्यांचा कार्यक्रम पार पडला. 

अभय आणि नेहाची नजरानजर झाली. 

अभयला पाहून पहिल्या नजरेतच नेहा त्याच्या प्रेमात पडली. 

अभयची अवस्था देखील वेगळी नव्हती. 

नेहा अगदी सुंदर सजून हातात चहाचा ट्रे घेऊन जेव्हा बाहेर आली,

तेव्हा अभय तिच्याकडे पाहतच राहिला.

जणू स्वर्गातून अप्सरा पृथ्वीवर उतरून समोर उभी आहे असा भास अभयला झाला.

नेहा तिच्या गोर्या कांतीवर सुंदर निळ्या रंगाची साडी , 

त्यावर सुंदर मखमली लाल रंगाचे ब्लॉउज ,

गळ्यात एक नाजूकशी मोत्याची सिंगलसरी लड ,

हातात मोत्यांचे तोडे , 

गुलाबीसर हातात एक नाजूक नक्षीची अंगठी , 

कपाळावर नाजूक टिकली , 

लांबसडक केसांची दोन पुडी घातलेली सैलसर वेणी ,  

हा सगळा पेहराव लेवून जेव्हा बाहेर आली तेव्हा अभय पाहताक्षणीच तिच्यावर लट्टू झाला . 

हा सगळा सौंदर्यसाज नेहावर खूपच शोभून दिसत होता.

मुळातच तो गोरा रंग आणि त्यावर चढलेला दागिन्यांचा साज.... ! 

विलक्षण सौंदर्य ते ..

नक्षत्रासारखे अनुपम ... 

कोणालाही भुरळ पाडेल असे...!

अभय आणि नेहा दोघांनीही एकमेकांना आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकारायचे ठरवले. 

दोघांचाही विवाह संपूर्ण परिवार आणि नातेवाईकांच्या साक्षीने मोठ्या थाटामाटात पार पडला. 

नेहा आता अभयच्या घराची गृहमंत्री झाली होती.

अभय आणि नेहाचे दोघांचेही लग्नानंतरचे मोरपंखी स्वप्नांनी सजलेले,

आनंदाने मोहरलेले दिवस अगदी सुखात जात होते. 

एका वर्षात नेहाने आनंदाची बातमी दिली. 

त्यांच्या संसाराच्या वेलीवर आता नवीन फुल बहरणार होते.

नऊ महिने पूर्ण झाले. 

नेहाचे डोहाळेजेवण देखील थाटात पार पडले

पहिला मुलगाच होणार अशी विभाताईंची अपेक्षा होती.

त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांची अपेक्षा अभय आणि नेहाला बोलून देखील दाखवली होती.

सगळ्यात प्रथम नातवाचं तोंड पाहायला मिळावं म्हणून विभाताईंनी नेहाला माहेरी बाळंतपणासाठी देखील पाठवलं नाही.

कितीही सुशिक्षित असलो तरीही मुलांवर आईवडिलांच्या विचारांचा पगडा मुलांवर असतोच.

तसेच अभयच्या बाबतीत देखील होते.

अभयला देखील पहिला मुलगाच व्हावा अशी अपेक्षा होती.

मुलगी होईल की मुलगा या भीतीने नेहा आता खुप शांत राहू लागली. 

त्या मानसिक ताणामुळे तिला ब्लडप्रेशरचा त्रास सुरु झाला. 

नेहाला बाळंतकळा सुरु झाल्या.

तिने एका गोड परीला जन्म दिला.

नेहाला खूप आनंद झाला पण विभाताईंना काय वाटेल या विचाराने ती खूप अस्वस्थ होती.

पहिलीच वेळ असल्यामुळे नाराजीने का असेना विभाताईंनी बाळाला मांडीवर घेतले.

त्याचा गोड पापा घेतला.

अभय देखील आनंदी होता पण मुलगा असता तर खूप जास्त आनंद झाला असता अशी अवस्था होती त्याच्या मनाची.

असो नाराजीने का असेना ..

छोट्याश्या परीला तिच्या परिवाराने स्वीकारले होते.

तिचे नाव ठेवले नित्या.

छोट्या नित्याच्या बाललीला पाहून सगळेच खुश होते.

हळूहळू दिवस पुढे सरकत होते.

नित्या दोन वर्षाची झाली.

नेहाला पुन्हा एकदा दिवस गेले

यावेळेस मात्र मुलगाच व्हावा अशी विभाताई , अभय आणि त्याच्या बाबांची देखील इच्छा होती.

पुन्हा दुसरी मुलगी नको म्हणूनच त्यांनी गर्भलिंग निदान चाचणी करायची ठरवली.

अभय नेहाला सांगु लागला ...

" नेहा , आता या वेळेला दुसरी मुलगी नको.

त्यामुळे आपण गर्भलिंग चाचणी करून घेऊ. 

त्यानंतर जो काही निर्णय असेल.

तो घेण्यास आपल्याला सोपं होईल."

नेहाची ही चाचणी करायची इच्छा नव्हती.

पण घरच्यांच्या दबावात ती चाचणी करून घेण्यास तयार झाली.

नेहाला घेऊन जाऊन अभयने तिची गर्भलिंग निदान चाचणी करून घेतली.

त्याचे रिपोर्ट आले त्यात समजलं की ...

जन्माला येणारे बाळ हे 'मुलगी' आहे.

पुन्हा एकदा मुलीचा गर्भ असल्यामुळे अभय , विभाताई सगळेच नाराज झाले. 

अभयने नेहाचा गर्भपात करून घेण्याचा निर्णय घेतला.

नेहाची गर्भपात करण्याची अजिबात मानसिक तयारी नव्हती. 

पण अभय , विभाताईंच्या दबावामुळे नेहाने गर्भपाताला होकार दिला.

खरं तर ही गोष्ट पचवणं खूप अवघड होतं पण तिचा नाईलाज होता.

गर्भपात झाल्यावर नेहा घरी आली.

त्यावेळी विभाताई तिच्या बेडरूम मध्ये आल्या.

आणि बोलू लागल्या.

"हा गर्भ पाडणे शक्य झालं पण असं नेहमीच होणार नाही नेहा ..

त्यामुळे मुलगा होण्यासाठी ट्रीटमेंट घ्या किंवा इतर काहीतरी उपाय करा.

पण यावेळी मात्र मला नातवाच तोंड पाहायचं आहे. " 

इतके बोलून विभाताई निघून गेल्या.

त्यांचे हे बोलणं जवळच उभी असलेल्या नित्याने देखील ऐकलं.

त्यानंतर दोन दिवसांनी नित्या खेळत असतांना जोरात पडली.

" आई ....आई .." 

म्हणून ती विव्हळू लागली.

नेहा धावतच तिच्याजवळ गेली.

तिने नित्याला उचलून बेडवर झोपवलं.

तिच्या खरचटलेल्या पायाला मलम लावलं.

" खूप दुखतंय का ..नित्या ..? " 

" आता बरं वाटेल हा... 

हळूहळू पळायचं ना नित्या .." 

नेहा नित्याला प्रेमाने कुरवाळत म्हणाली.

" सॉरी मम्मा , मी हळूच पळत होती तरी पडली.

आणि मला इतकं लागलं.

आजी सांगत होती तेव्हा मी ऐकलं ..

" तू पण तुझ्या पोटातल्या बाळाला पाडलेस ना ..?

किती लागलं असेल ना ग त्याला ...?" 

नित्याने निरागसपणे नेहाला प्रश्न विचारला.

तिच्या त्या प्रश्नावर नेहा अनुत्तरित होती. 

नेहाला अश्रू अनावर झाले.

तिला तिच्या चुकीचा पश्चताप झाला.

तिला स्वतःचाच राग येत होता.

ती मनोमन विचार करत होती.

" कशी इतकी स्वार्थी झाले मी ..

माझ्याच लेकीची हत्या केली मी ..

घरच्यांच्या हट्टासाठी , 

त्यांच्या निरर्थक आनंदासाठी मी एका निष्पाप जीवाचा बळी दिला. 

हे सुंदर जग पाहण्याचा तिचा अधिकार मी हिसकावून घेतला.

कोणी अधिकार दिला होता मला ..

त्या अजाण जीवाची हत्या करण्याचा.

पण यानंतर मात्र मी असं कधीच होऊ देणार नाही. " 

असा नेहाने मनाशी ठाम निर्णय घेतला.

त्यातच एक वर्ष निघून गेले.

नेहा पहिल्या गर्भपातामुळे नाराज होती.

पण घरातील शांती खराब होऊ नये म्हणून ती अगदी नॉर्मल वागत होती.

नित्या आता तीन वर्षाची झाली होती.

त्यातच विभाताईंनी नेहाच्या मागे मुलासाठी तगादा लावणं सुरु केले.

नेहाला पुन्हा एकदा दिवस गेले.

मागच्याच वेळप्रमाणे नेहाला त्यांनी पुन्हा गर्भचाचणी करून घेण्यास मजबूर केले.

नेहाच्या पोटात पुन्हा एकदा मुलीचा गर्भ होता.

अभय आणि विभाताई खूप चिडल्या.

अभय आणि विभाताईंनी नेहाला पुन्हा एकदा गर्भपात करून घेण्यास सांगितले.

आता मात्र नेहाने स्पष्ट नकार दिला.

मागच्या गर्भपाताच्या झालेल्या अक्षम्य चुकीतून नेहा सावरली नव्हती. 

गर्भपातासाठी नेहाने दिलेला नकार ऐकून अभय आणि विभाताई खूप चिडल्या.

नेहाला नाही नाही ते बोलल्या.

अभयने नेहाला घरातून चालती होण्यास सांगितले.

नेहा त्यावेळी मनाने पूर्ण खंबीर झाली होती.

अभय आणि तिची खूप वादावादी झाली.

त्यावेळेस अभय नेहावर हात उगारण्यासाठी पुढे आला.

त्यावेळेस त्याचा हात अडवून नेहा बोलू लागली ...

" आता बास ...आजपर्यंत एक पत्नी म्हणून तुम्हाला सहन करत आली.

माझ्या लेकीची हत्या देखील सहन केली.

आता मात्र नाही.

आज तुमची पत्नी नाही तर माझ्या बाळाची आई तिच्यावर अन्याय होऊ देणार नाही.

एकदा गमावून देखील ती पुन्हा जन्म घेण्यासाठी माझ्या कुशीत आली आहे.

तिचा जीव घेण्याचा तुमचा प्रयत्न मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही.

जन्माआधीच तिचे पंख मी असे छाटू देणार नाही.

तिची आई तिला जगायला शिकवेल.

मीच तिची आईबाबा होऊन तिला सक्षम बनवेन." 

" ठीक आहे .

एकटी जगायची हाऊस आहे ना तूला ..

मग चालती हो माझ्या घरातून ...

नित्याला देखील सोबत ने ..

या घराचे दरवाजे तूला कायमचे बंद असतील. "

अभयच्या या बोलण्यामुळे नेहा नित्याला घेऊन निघाली.

ती त्याच शहरातील तिची मैत्रीण मयुरी कडे गेली.

मयुरीने गावाकडून नेहाच्या आईबाबांना बोलवून घेतलं.

नेहाच्या आईबाबांनी देखील अभय , त्याच्या कुटुंबियांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

नेहाच्या आईबाबांनी तिला त्यांच्यासोबत गावी चलण्याचा सल्ला दिला.

पण नेहाने मात्र गावी जाण्यास नकार दिला.

नेहाने शहरांत राहूनच स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं ठरवलं. 

दोन तीन महिने खूप प्रयत्न केल्यावर नेहाला नोकरी मिळाली.

गर्भावस्थेत देखील ती नोकरी आणि नित्याची जबाबदारी सांभाळत होती.

पूर्ण दिवस भरल्यावर तिने तिच्या दुसऱ्या मुलीला जन्म दिला.

मुलीचे नाव ठेवले प्रिशा ..

तिच्या या संकटात मयुरीने तिची खूप मदत केली.

हळूहळू प्रिशा आणि नित्या मोठ्या होत होत्या.

नित्या नऊ वर्षाची झाली.

छोटीशी प्रिशा देखील पाच वर्षाची झाली.

नोकरी करून नेहा आपल्या दोघीही मुलींचा सांभाळ करत होती.

अजूनही नेहा आणि अभय यांचा घटस्फोट मात्र झाला नव्हता.

अभयचं नेहावर खरंच खूप प्रेम होतं.

त्यामुळे विभाताईंनी सांगितल्यावर देखील त्याने तिला घटस्फोट देण्यासाठी कुठलीच नोटीस पाठवली नाही.

नेहा घर सोडून गेल्यावर तो नेहा आणि नित्या दोघांनाही खूप मिस करत होता.

एका शहरात असूनही नित्याला आणि प्रिशाला त्याने पाहिलं देखील नव्हतं.

त्याच्या मनातून त्याला ती खंत जाणवत होती.

पण आपली चुकी उघडपणे कबूल करण्याची मात्र त्याची तयारी नव्हती.

नित्याची त्या शहरात होणाऱ्या सगळ्यात मोठ्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये निवड झाली होती.

त्या कॉम्पिटिशनचे मोठे मोठे बॅनर शहरात लावले होते.

अभयच्या नजरेत देखील ते बॅनर आले.

नित्या अभय राणे हे नाव पाहून त्याचा उर अभिमानाने भरून आला.

नित्याला पाहता येईल म्हणूनच त्याने कार्यक्रमाला जायचं ठरवलं.

त्याने बॅनर वरून कार्यक्रमाचे ठिकाण , तारीख आणि वेळ याची नोंद केली.

कार्यक्रमाच्या ठिकाणी तो अगदी वेळेत पोहोचला.

नेहाला तो दिसणार नाही याची त्याने पुरेपूर  खबरदारी घेतली.

दुरूनच त्याने नेहाला पाहीलं.

तिच्यासोबत उभ्या असलेल्या प्रिशाला पाहून त्याचे डोळे भरून आले.

कार्यक्रमाला सुरुवात झाली.

नित्याने केलेला डान्स पाहून अभय खूप खुश होत होता. 

सगळे परफॉर्मन्स पार पडले.

आता वेळ होती निकालाची ...

परीक्षक थोड्याच वेळात निकाल जाहीर करतील अशी घोषणा करण्यात आली.

ठरल्याप्रमाणे परीक्षक स्टेजवर आले.

त्यांनी निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली.

तिसरा , दुसरा क्रमांक जाहीर झाला.

आणि प्रथम क्रमांक म्हणूनच त्यांनी नाव पुकारले ..

" नित्या अभय राणे " 

नित्याचे नाव ऐकताच अभयचा उर अभिमानाने भरून आला.

नित्या बक्षीस घेण्यासाठी स्टेज वर गेली.

स्टेजवरील अँकरने तिला प्रश्न विचारला ..

" अभिनंदन नित्या ...इतक्या मोठ्या स्पर्धेत तू प्रथम क्रमांक मिळविला.

तुझ्या यशाचे श्रेय तू कोणाला देशील..? 

तुला कोणी मोटीव्हेट केले ..? 

त्याबद्दल काहीतरी सांग.

तूला तुझ्या आईबाबांना काही सांगावं वाटतंय का ..? " 

प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी नित्याने माईक हातात घेतला. 

" थँक्यू यु मम्मा ...फॉर युअर सपोर्ट.

माझ्या प्रत्येक यशात माझ्या आईचा वाटा आहे.

कदाचित तिच्याशिवाय हे सगळे शक्यच नव्हते.

बाबांबद्दल सांगायचं तर ...

माझे बाबा आमच्यासोबत नाहीत , 

पण आज जर ते हा कार्यक्रम पाहत असतील तर ..

मला त्यांना हेच सांगावे वाटते की ..

बाबा , मी मुलगी असली तरीही आम्ही तुमचा अभिमान होऊ शकतो. 

तुमच्या आनंदासाठी , तुमच्या सन्मानासाठी एक मुलगी देखील खूप काही करू शकते.

त्यासाठी मुलगा म्हणूनच जन्माला येण्याची गरज नसते.

तुमच्याकडून मला फक्त हेच शब्द अपेक्षित  आहे ..

' आय एम प्राऊड ऑफ यु बेटा ' 

बाबा , तुमच्याकडून हे शब्द ऐकण्यासाठी हवे तितके कष्ट करण्याची तयारी आहे आमची...." 

हे बोलताना नित्याच्या डोळ्यातून अश्रू वाहवत होते.

तिला पाहून नेहाला देखील अश्रू अनावर झाले.

नित्याचे शब्द ऐकून अभयला त्याच्या चुकीची जाणीव झाली.

मागचा पुढचा कुठलाही विचार न करता तो स्टेज वर धावत गेला.

नित्याला छातीशी कवटाळून तो ओक्शाबोक्शी रडत होता.

अडखळत बोलताना त्याच्या तोंडात एकच शब्द होता ...

" मला माफ कर बाळा ...

आय एम रिअली व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यु..बेटा ..." 

नित्या आणि अभयला भेटलेले पाहून प्रिशा पण धावत अभयला जाऊन बिलगली.

बाप-लेकीचा हा मिलनसोहळा पाहून उपस्थित असलेल्या सगळ्याच प्रेक्षकांना अश्रू अनावर झाले होते.

समाप्त!

"ट्रीटमेंट केल्यानं मुलगा होतो" हा गैरसमज बऱ्याच वेळा बोलून दाखवला जातो. त्याच्याशी आम्ही सहमत नाही. सत्यकथा मांडताना काही काल्पनिक प्रसंग घेण्यात आले आहेत. कथेशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. 

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

फोटो साभार - Google & Pinterest 

✍©️ जया पाटील








Post a Comment

2 Comments

Please do not enter any spam link in the comment box