माझ्या जगण्याला पंख फुटले भाग २

 #माझ्या_जगण्याला_पंख_फुटले_भाग_२


©️जया पाटील 


भाग एक वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇

https://velvetkavisha.blogspot.com/2021/08/blog-post_18.html


मागील भागात आपण पाहिलं की ,

स्नेहा लावण्याला आर्या आणि निकेतची लव्हस्टोरी सांगत होती.

आर्या आणि निकेतची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली.

काही काळाने ते एकमेकांना भेटले.

सहवासाने मैत्री वाढली.

दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

निकेतने आर्याला प्रपोज केलं.

आर्याने देखील होकार दिला.

आर्याच्या बाबांनी संजयरावांनी मात्र त्यांच्या मित्राचा म्हणजेच विलासरावांचा मुलगा अमित आर्यासाठी पसंत केला होता.

आर्याचे शिक्षण संपलं की ,

आर्या आणि अमितच्या लग्नाचा विषय ते विलासरावांकडे काढणार होते. 

आर्याला मात्र याबाबतीत काहीच कल्पना नव्हती.

स्नेहाने हा आर्या आणि निकेतचा हा प्रेमप्रवास लावण्याला सांगितला.

त्यानंतर मात्र पुढचे सगळे घटनाक्रम आर्याने सांगावे अशी स्नेहाची इच्छा होती.

आर्याने देखील होकार दिला.

आता पुढे ..

--------------------------------------

आर्या पुढे बोलू लागली.

" निकेत ने मला प्रपोज केलं.

त्यादिवशी मी मनोमन खूप खुश होती.

मला आभाळ फक्त दोनच बोट राहिलं होतं.

मी घरी आली.

त्यावेळेस माझे बाबा पण खूप खुश होते.

त्यांना इतकं आनंदी पाहून मला पण खूप आनंद झाला.

त्यांनी मला जवळ बसवलं.

आणि बोलू लागले.

" मुली , खरंच किती लवकर मोठ्या होतात ना ..!

तुझा जन्म झाला त्यावेळी जेव्हा नर्सने तुला माझ्या हातात आणून दिली.

आताही तितकीच गोड आणि लहान वाटतेस तू मला.

पण वेळ भरभर पुढे गेली.

कॉलेजच्या शेवटच्या वर्षात गेली, 

ते तर माझ्या लक्षात पण आलं नाही.

बाळा , तुझं शिक्षण संपल्यावर तुला योग्य जोडीदार शोधण्याची जबाबदारी माझीच आहे.

मी त्यादृष्टीने तयारी देखील सुरु केली आहे.

माझ्या ऑफिस मध्ये असलेल्या विलासराव साने काकांना तू ओळ्खतेस का ..? 

आपण मागे एकदा एका लग्नात भेटलो होतो त्यांना ...

आठवतंय की नाही ..? " 

बाबा मला प्रश्न करत म्हणाले.

----------------

" हो , बाबा ..

आठवतंय ना ...

अमित आणि अंकिता अशी दोन मुलं पण होती त्यांच्यासोबत.

त्या साने काकू तर किती गपिष्ट होत्या.

मला खूप आवडला होता त्यांचा स्वभाव. "

मला पुढच्या गोष्टीची काहीच कल्पना नसल्याने मी बाबांना उत्साहात उत्तर दिलं.

-------------

माझ्या उत्तरावर खुश होऊन बाबा पुढे बोलू लागले ..

" त्यांचा तो मुलगा अमित नाही का ..?

आता इंजिनिअर झाला आहे.

दिसायला पण देखणा आहे.

एका चांगल्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरीला आहे.

सगळं कुटुंब स्वभावाने छान आहे.

मनमिळाऊ माणसं आहेत.

घरची परिस्थिती पण चांगली सधन आहे.

त्याच्यासोबतचं तुझं लग्न व्हावं.

अशी माझी इच्छा आहे. 

सगळ्या दृष्टीने हीच तुझ्यासाठी उत्तम सोयरीक आहे. 

आता तुझी शेवटच्या वर्षाची परीक्षा झाली की मी लगेचच सानेंना जाऊन भेटणार आहे.

आर्या बाळा , तूला काय वाटतं सांग ना ...

आवडेल ना तुला अमित सोबत लग्न करायला..? " 

-----------

बाबांचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच हादरली.

काय बोलावं काही सुचेनासं झालं.

मी कोणावर प्रेम करेल ,

आणि हे सगळं बाबांना सांगताना इतकं जड जाईल , 

याचा तर मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता.

पण मला बाबांना फसवायचं नव्हतं.

नंतर खूप जास्त त्रास होण्यापेक्षा आताच निकेत बद्दल बाबांना सांगायला हवं असं मी ठरवलं.

कारण अमित आणि माझ्या लग्नाचा विषय अजूनही फक्त आमच्याच घरातच होता.

पुढे जाऊन हा विषय वाढला तर मनस्ताप होईल.

म्हणून मी सगळं काही बाबांना सांगायचं ठरवलं.

----------------

" आय एम सॉरी बाबा ...

तुम्ही माझ्यासाठी जो पण विचार करणार तो योग्यच असेल. 

हे माहीत आहे मला.

मुलांच्या सुखापेक्षा दुसरं काय हवं असतं आईबाबांना ...

पण मी मात्र एक गोष्ट लपवली तुमच्यापासून.

माझं निकेत नावाच्या एका मुलावर प्रेम आहे.

हे सगळं मी तुम्हाला सांगणारच होती.

पण आता लगेच नाही." 

हे सगळं बाबांना सांगताना माझे हात थरथरत होते.

बाबा चिडणार तर नाही ना ..

अशी भीती होती मनातून ..

" आय एम सॉरी बाबा ,

हे सगळं मी तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं.

पण तुम्ही चिडणार रागावणार म्हणून हिम्मत नाही झाली.

निकेतचा फॅमिली बिझिनेस आहे.

तोच आता तो पूर्णपणे सांभाळतो.

त्यानंतर मी बाबांना माझी आणि निकेतची कशी ओळख झाली.

भेटी वाढत गेल्या. 

एकमेकांचा सहवास आम्हाला आवडू लागला.

निकेतने केलेला प्रपोज.

मी घरच्यांच्या परवानगीशिवाय अंगठी न घालण्याची त्याला घातलेली अट.

माझ्या अटीवर निकेत ने दिलेली सहमती.

हे सगळं काही सुरुवातीपासून बाबांना सांगितलं."

बाबा सगळं शांत पणे ऐकत होते.

आईने देखील माझं सगळं बोलणं ऐकलं.

बाबांच्या डोळ्यात पाणी होतं.

बाबांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पाहून मला खूपच अपराधी वाटू लागलं.

मला देखील अश्रू आवरले नाही.

मी देखील रडू लागली.

रडता रडता बाबांना म्हणाली ..

" मी खूप वाईट मुलगी आहे ना बाबा ..

मी तुमचं मन दुखावलं आहे.

तुम्हाला माझ्याकडून हे सगळं अपेक्षित नव्हतं ना ...

आय एम सॉरी बाबा ..." 

----------

मला जवळ घेऊन बाबा म्हणाले ..

" नाही आर्या ...

तु नाही चुकलीस.

तुझ्या मनातील भावना तु माझ्यासोबत शेयर केल्या.

हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे.

मला आनंद आहे की तू तुझ्यासाठी एक जोडीदार शोधला आहे. 

पुढच्याच आठवड्यात निकेत आणि त्याच्या आईबाबांना आपल्या घरी भेटायला बोलव.

मला देखील निकेतला भेटायची खूप इच्छा आहे."

असं बोलून बाबांनी मला जवळ घेतलं.

बाबांचे हे वागणं माझ्यासाठी खूप अनपेक्षित होतं.

बापलेकीची ही भेट पाहून माझ्या आईच्या डोळ्यातून देखील आनंदाश्रू वाहत होते.

--------------

निकेतला फोन करून मी हे सगळं सांगितलं.

त्यालाही खूप आनंद झाला.

त्यानेही त्याच्या घरी आमच्या नात्याबद्दल सांगितलं.

निकेतचे आईबाबा आणि बहिण सगळे आमच्या घरी आले.

पहिल्यांदा भेटल्यावरचं माझ्या बाबांना निकेत खूप आवडला.

निकेतच्या आईबाबांच्या चेहऱ्यावर मात्र फारसा आनंद दिसत नव्हता.

हे सगळं अचानक घडलं आहे.

म्हणून कदाचित हे शांत असतील.

थोडं अवघडल्यासारखं वाटत असेल.

असं मला वाटलं.

----------

" उगाचच खूप उशीर नको.

आपण साखरपुडा आटोपून घेऊ.

आर्याची परीक्षा झाली की लग्न आटोपता येईल." 

माझे बाबा निकेतच्या बाबांना म्हणाले.

निकेतच्या बाबांनी देखील होकार दिला.

पुढच्या महिन्यात साखरपुड्याचा मुहूर्त काढण्यात आला. 

साखरपुड्याच्या एक आठवडा आधी निकेतचे बाबा आमच्या घरी आले.

चहापाणी झाल्यावर ते हळूच बोलू लागले.

" व्याही , त्यादिवशी गडबडीत फक्त साखरपुड्याची तारीख ठरवली.

पुढची बोलणी ,

साखरपुड्याची तयारी ,

देणे घेणे या बद्दल काही बोलणंच झालं नाही.

त्यामुळे म्हटलं सगळं बोलणं आटोपून घ्यावं,

म्हणून एक आठवडा आधीच आलो. " 

निकेतचे बाबा म्हणाले.

---------

" बरं केलं ...

त्यादिवशी गडबडीत माझ्याही हे सगळं लक्षात आलं नाही.

असही मी तुमच्याघरी येऊन या सगळ्या विषयी बोलणारच होतो. " 

माझे बाबा निकेतच्या बाबांना म्हणाले.

------------

बाबांच्या होकारात होकार मिळवत निकेतचे बाबा बोलू लागले.

" व्याही , अहो आमची आर्याच आमची लक्ष्मी म्हणून देण्याघेण्याचा आम्हाला मोह नाही.

फक्त साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या आधी,

निकेतच्या आई , काकू , मावश्या आणि इतर काही कुटुंबीय आर्याला पाहण्यासाठी येतील.

त्यांचा तेवढा मानपान व्यवस्थित करा."

" साडी-चोळी , 

एखाद दुसरी चांदीची वस्तू , 

त्यांच्या जेवणाची अगदी चांगली व्यवस्था झाली म्हणजे झालं .." 

" बाकी आर्याच आमची गृहलक्ष्मी त्यामुळे आम्हाला मोह कसलाच नाही. 

हा बायकांचा पाहण्याचा कार्यक्रम झाला की साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून टाकूया. "

त्यांच्या सगळ्या मागण्या माझ्या बाबांनी लगेचच मान्य केल्या.

मी हे सगळं निकेतला सांगणार नाही. 

अशी मला सक्त ताकीद दिली.

सगळेच आईवडील आपल्या मुलीच्या आनंदासाठी हवं नको ते करायला तयार असतात.

माझे बाबा तरी त्याला अपवाद कसे असणार ..?

त्यांनी निकेतकडच्या सगळ्या स्त्रियांचे मानपान करण्याचं मान्य केलं. 

दोन दिवसांनी निकेतकडच्या पन्नास पाहुण्या मला पाहण्यासाठी आल्या. 

माझ्या आईबाबांनी , काकाकाकूंनी अर्थातच सगळ्या कुटुंबियांनी त्या सगळ्या पाहुणेमंडळीची अगदी चोख व्यवस्था ठेवली. 

आपल्या मुलीला भविष्यात टोमणे ऐकायला मिळू नये, 

म्हणून सगळ्या गोष्टी अगदी रीतीने पार पाडल्या.

आलेल्या प्रत्येक स्त्रीची छान अशा पैठणीसाडी सहित खणानारळाने ओटी भरली. 

प्रत्येकीला एक-एक चांदीचा कुंकवाचा करंडा भेट म्हणून दिला. 

आलेल्या स्त्रियांसोबतच्या प्रत्येक छोट्या मुलांना कपडे आणि खाऊ सोबत दिला. 

खूप थाटामाटात हा मानापानाचा कार्यक्रम पार पडला.

मानापानाचा कार्यक्रम तर पार पडला पण त्यात मी मात्र थोडीशी नाराज होती. 

माझ्या बाबांनी केलेला इतका जास्त खर्च मात्र मला आवडत नव्हता.

मानापानाचा कार्यक्रम पार पडला.

सगळी पाहूणे मंडळी निघून गेली.

मी मात्र माझ्या बाबांवर खूप रागावली.

---------------,

" मानपान करायला इतका खर्च करायची काय गरज होती बाबा ...? 

चांदीच्या वस्तू दिल्या , 

भारी साड्या घेतल्या म्हणजे मान असतो का ? "

" प्रेमाने केलेले आदरातिथ्य देखील मानपानच असतो ना ..?

मला नाही आवडले निकेतच्या बाबांचं हे सांगणं.

आज मानपान करायला सांगितला आहे.

उद्या अजून काही वेगळी मागणी करतील.

तुम्ही अडवलं होतं म्हणून मी निकेतला काही सांगितलं नाही.

पण आता मात्र नाही.

मी सांगू का निकेतला याबाबतीत सगळं...? 

तो समजावेल त्याच्या बाबांना याबद्दल.."

मी चिडून बाबांना सांगितलं.

------------

"आर्या बाळा , अगं प्रत्येक आईबाबांची आपल्या मुलबाळांच्या लग्नाची स्वप्नं असतात. 

निकेतच्या आईबाबांची देखील असणारच ना ...!

व्याह्यांनी आपल्या स्वतःसाठी तर काही मागितले नाही ना ...?  

त्यांच्या पाहूणेमंडळीचा मान तितका सांगितला.

तर त्यात काय हरकत आहे , बाळा.." 

" अग आर्या  , तु आमची एकुलती एक मुलगी आहेस. 

आमच्या लाडक्या लेकीच्या सुखासाठी आम्ही इतक्या छोट्या गोष्टी नाही करू शकत का ? "

" लग्न हा व्यवहार नसतो बाळा ..

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं नाही तर दोन परिवाराचं जुळणं असतं. 

त्यामुळे तू असा विचार करणं सोडून दे आर्या.

निकेतला याबाबतीत तु सांगितलं तर तो त्याच्या आईबाबांना याबाबतीत सांगेन.

तेव्हा त्यांचा स्वाभिमान दुखावेल.

तुझ्याविषयी त्यांचं मत खराब होईल.

मला ते नको आहे.

परिवार टिकविण्यासाठी बऱ्याच वेळा आपल्याला माघार घ्यावीच लागते." 

माझे बाबा मला समजावणीच्या सुरात म्हणाले.

साखरपुड्याचा कार्यक्रम जवळ आला.

निकेतच्या बाबांनी तो कार्यक्रम देखील माझ्या बाबांकडून मोठ्या थाटामाटात करवून घेतला.

आम्हाला काही नको म्हणता म्हणता त्यांनी या कार्यक्रमात देखील माझ्या बाबांना अमाप खर्च करायला भाग पाडलं. 

मला मनोमन हे सगळंच खटकत होतं पण ,

आईबाबा , काका काकू सगळ्यांना वाईट वाटेल म्हणून मी आपला राग गिळत होती. 

साखरपुड्याच्या दिवशी निकेत खूप खुश दिसत होता.

----------------

माझ्या चेहऱ्यावर असलेली नाराजी पाहून त्याने मला एकदा दोनदा विचारलं देखील...

" आर्या , अग आज तर तू खुश असायला हवं.

तुझ्या चेहऱ्यावर ही नाराजी कसली...? "(निकेत)

" नाही रे ..निकेत ..

थोडासा थकवा आहे.

बाकी काही नाही.

नेहमी इतका मेकअप करून राहायची सवय नाही  ना ...

त्यामुळेच तूला माझा चेहरा ओढल्यासारखा वाटत असेल. " 

तात्पुरते काही तरी बोलून मी वेळ मारून नेली.

साखरपुडा निर्विघ्न पार पडला.

मी आणि निकेत दोघंही एकमेकांसोबत वेळ घालवत होतो. 

आम्ही दोघंही भावी आयुष्याच्या स्वप्निल स्वप्नांनी मोहरून गेलो होतो.

काही दिवसानंतर निकेतचे आईबाबा लग्नाची बोलणी करण्यासाठी पुन्हा आमच्या घरी आले.

माझ्या आईबाबांनी त्यांचे खूप चांगल्या प्रकारे आदरातिथ्य केलं.

मग लग्नासाठी बुक करायच्या कार्यालय , बँड-बाजा आणि इतर गोष्टींची बोलणी सुरु झाली. 

मी खोलीच्या दरवाज्यातून सगळं बोलणं चोरून ऐकत होती. 

--------------

निकेतचे बाबा बोलू लागले....

"लग्नाबाबतीत आमच्या काही अपेक्षा आहेत , 

त्या तुम्ही पूर्ण कराव्या अशी आमची इच्छा आहे." 

" लग्नासाठी आम्हाला हायवेवरील टॉपलाईन रिसॉर्टच बुक करून हवं आहे. 

तिथे आमच्या येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल.

आमचे साधारणपणे पाचशे पाहुणे तरी आदल्या दिवसापासूनच , 

म्हणजे हळदीच्या कार्यक्रमापासून मुक्कामी असणार आहेत. 

दुसऱ्या दिवशी सकाळी वैदिक पद्धतीचं लग्न, 

आणि सायंकाळी गोरज मुहूर्तावर लग्न असायला हवं. 

लग्नात तिघीही कार्यक्रमात आम्ही सांगू तसेच डेकोरेशन आणि जेवणाचा मेनू असावा अशी आमची इच्छा आहे. "

" साखरपुड्याच्या कार्यक्रमात जसा मानपान करण्यात आला , 

तसाच लग्नात देखील केला जावा. 

निकेतच्या आई , बहीण , काकू आणि मावशी सगळ्यांना एक तरी सोन्याची वस्तू भेट देण्यात यावी. 

हे सगळं एकदा केलं , 

की त्यानंतर आम्हाला तुमच्याकडून पाच पैश्याची देखील अपेक्षा असणार नाही.

आम्ही टॉपलाईन रिसॉर्टची कॉस्टशीट आणि इतर बुकिंग डिटेल्स सगळं काही सोबत आणलं आहे,

तरी तुम्ही आताच आमच्या समक्ष बुकिंग करवून घ्या. "

निकेतच्या बाबांच्या मागण्या माझ्या बाबांना डोईजड होत्या ,

पण माझ्या सुखासाठी ते सगळ्या तडजोडी करायला तयार झाले. 

त्यांनी निकेतच्या बाबांच्या मागण्या मान्य केल्या.

आज नाही परंतु पुढील आठवड्यापर्यंत पैश्यांची जुळवाजुळव करून,

टॉपलाईन रिसॉर्ट बुक करण्याचं आश्वासन दिलं.

आता मात्र माझा संताप अनावर झाला.

---------------

मी ताबडतोब निकेतला फोन लावून घडलेला सगळा प्रकार सांगितला.

त्यालाही त्याच्या आईबाबांचं वागणं अजिबात आवडलं नाही.

"उद्या मी आईबाबांना सोबत घेऊन येतो.

त्यांना समजावेन मी ..

तु टेन्शन घेऊ नकोस."

असं सांगून निकेतने माझा फोन ठेवला.

निकेतचा फोन ठेवून मी माझ्या बाबांकडे गेली. 

--------------

"बाबा , तुम्ही निकेतच्या बाबांच्या मागण्या का मान्य केल्या ? 

मला माहिती आहे की इतका खर्च आपल्याला शक्य नाही, 

तरी देखील तुम्ही ह्या मागण्या मान्य केल्या ..?

का ...? 

मला तुम्हा सगळ्यांची खूप काळजी वाटते बाबा " 

" या घरात फक्त माझीच जबाबदारी नाहीये. 

माझा भाऊ अजून शिकायचा आहे.

तुमच्या पुढे तुमचं सगळं आयुष्य आहे.

म्हातारपण आहे.

माझ्या लग्नावर इतका पैसा खर्च करून तुम्ही स्वतःसोबत अन्याय करत आहात बाबा. " 

माझ्या बाबांनी मला जवळ घेतलं.

-------------

ते मला समजावणीच्या सुरात म्हणाले..

"पैश्यांपेक्षा नातं नेहमीच श्रेष्ठ असतं आर्या..

काही गोष्टी आयुष्यभरासाठी जीवाला घोर लावून जातात. 

आम्हाला निकेतच्या बाबांचा अपमान करायचा नाहीये. 

त्यामुळे तु काळजी करू नकोस. 

मी करेन पैश्यांची व्यवस्था . 

त्याचे टेन्शन तु मात्र घेऊ नकोस." 

" तु होणारी नवीन नवरी आहेस ,

 त्यामुळे असल्या गोष्टींचं टेन्शन तु नाही घ्यायचे.

मस्त आनंदी राहा. 

असं पण मी जे काही कमवलं आहे ते सगळं तुमच्यासाठीच आहे ना." 

" चल हस पाहू एकदा ....

 smile ...🙂🙂🙂

माझ्या आर्याचे गोड हसू पाहून माझे टेन्शन कुठल्या कुठे पळून जाते. "

बाबांचे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रु येऊ लागले.

मी बाबांना घट्ट मिठी मारली.

त्यांच्या मिठीतच मला रडू कोसळले. 

बाबांनी मला शांत केलं.

--------------

दुसऱ्या दिवशी निकेत आणि त्याचे आईबाबा आमच्या घरी आले.

चहापाणी झालं.

सांगितलेल्या कार्यालयाचे बुकिंग झाले की नाही.

असा प्रश्न निकेतच्या बाबांनी विचारला.

-----------

त्यांचे बोलणं मधेच तोडत निकेत बोलू लागला..

" मला इतक्या मोठ्या रिसॉर्ट मध्ये लग्न करायचं नाही आईबाबा ...

आधीच आर्याच्या बाबांचा साखरपुड्यात पण खूप खर्च झाला.

त्यांनी बोलून दाखवलं नाही.

आणि आपणही त्यांना समजुन घेण्याचा प्रयत्न केला नाही.

काल मला आर्याचा फोन आला.

तेव्हा तिने सांगितलं की इतका पैसा उभा करणं खूप कठीण आहे.

तिचं बोलणं मला देखील पटलं. " 

----------------

" अरे वा , म्हणजे आग या मुलीने लावली आहे वाटतं...? 

आजपर्यंत आमच्या अडचणी लक्षात आल्या नाही तुझ्या.

आणि जी मुलगी तुझ्या आयुष्यात आली देखील नाही.

तिच्या बाबांची बरीच चिंता आहे तूला.

आपण देखील आशूच्या लग्नासाठी इतका खर्च केला आहे.

प्रत्येक आईवडील आपल्या मुलीसाठी हे करतात.

आर्याचे बाबा काहीही जगावेगळं करत नाही." 

निकेतची आई निकेतचं बोलणं मधेच तोडत म्हणाली.

-----------------

" आई , तु चुकीचा अर्थ घेऊ नकोस. 

मला माहिती आहे.

माझ्यासाठी ,

आशुताईसाठी तुम्ही खूप अडचण सहन केली आहे.

पण म्हणून तसाच त्रास आपण दुसऱ्याला द्यायचा  हे बरोबर नाही ना आई .

प्लीज ..तु गैरसमज करू नकोस. 

बाबा , तुम्ही तरी समजवा ना ..आईला " 

निकेत आईला समजावणीच्या सुरात म्हणाला.

-----------------

" तुझी आई बरोबर बोलते आहे निकेत.

तिला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करू नकोस. "

निकेतचे बाबाही त्याच्या आईच्या होकारात होकार मिळवत म्हणाले.

-----------

" खरंतर मला ही आर्या आधीपासूनच पसंत नव्हती.

मला मिलींद मामाची मुलगीच सून म्हणून आणायची होती माझ्या घरात.

तो आपला सगळा मानपान करायला सुद्धा तयार होता.

पण तू हिच्या प्रेमात पडला.

आणि सगळंच बिघडलं.

तुझं मन मोडायचे नाही म्हणून आम्ही या लग्नाला होकार दिला.

आता मनासारखी सून मिळाली नाही ,

पण मनासारखा मानपान तर मिळायलाच हवा. 

आम्ही आमच्या मागण्या मागे घेणार नाही. " 

निकेतच्या आईने त्याला निक्षून सांगितलं.

--------------

" ठिक आहे आई ..

मग मीच आपलं घर सोडून जातो.

मग आर्या सोबत लग्न करतो.

काहीही झालं तरीही मी आर्या सोबतचं लग्न करणार.

आणि एका रुपया सुद्धा न घेता. " 

निकेत चिडून म्हणाला.

---------

निकेतच्या या बोलण्यावर मात्र निकेतच्या आईने आणि बाबांनी खूप जास्त हंगामा केला.

" निकेत , या मुलीसाठी जर तू आम्हाला सोडून जाशील ..

तर तु आमचं मेलेलं तोंड पाहशील.

मी इथेच विष पिऊन आत्महत्या करेल.

याला तू पोकळ धमकी समजू नकोस.

तू आर्या किंवा आम्ही , 

दोघांपैकी फक्त एकाची निवड कर. "

निकेतच्या आईने निकेतला चेतावणी दिली.

-----------

माझ्याकडे येऊन त्या म्हणाल्या..

" आमच्यापासून दुर नेऊन जर तू निकेत सोबत लग्न केलंस.

तर आमच्या मृत्यूला फक्त तू जबाबदार असशील. " 

या सगळ्या प्रकारामुळे मी खूप घाबरली.

निकेत तर एका जागी सुन्न उभा होता.

--------------

मी निकेतजवळ जाऊन त्याला सांगितलं..

" निकेत , माझ्यामुळे तू तुझ्या आईबाबांपासून दुर व्हावं. 

असं मला स्वप्नात पण वाटणार नाही.

आपल्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत.

हे सत्य आपण स्वीकारायला हवं.

स्वीकारशील ना ...

मोठ्या मनाने हे सगळं.." 

----------------

" हो , आर्या ...

तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस.

आईबाबांनी मला तुझ्यात आणि त्यांच्यात एकाची निवड करायला सांगितली आहे ना ...

ठिक आहे.

आर्या , राग मानू नकोस.

पण मग मी त्यांचीच निवड करतोय.

तूला देखील हे पटेल एवढं नक्कीच माहिती आहे मला ...

एक मात्र खरं ..

मी तुझ्यासोबत लग्न करू शकलो नाही ना ...

ठीक आहे.

पण दुसऱ्या कोणासोबतही मी लग्न करू शकणार नाही. "

इतकं बोलून पाणावलेल्या डोळ्यांनी निकेत तिथून निघून गेला.

त्याचे आईबाबा पण निघून गेले.

--------------

माझे आईबाबा निशब्द माझ्यासमोर उभे होते.

मी रडतच माझ्याबाबांसमोर गेली.

" मला माफ करा बाबा ..

निकेत सोबत लग्न हा निर्णयचं चुकीचा होता.

आता मात्र नाही.

आमचं लग्न कधीच होऊ शकणार नाही.

तुम्ही सांगणार त्या मुलासोबत लग्न करायला मी तयार आहे बाबा ..." 

ही सगळी घटना सांगत असतांना आर्याच्या डोळ्यात अश्रू आले .

बोलता बोलता ती हळवी झाली .

बाजूला असलेल्या स्नेहा आणि लावण्याने तिला सावरलं.

------------

आर्या स्नेहाला म्हणाली ..

" स्नेहा , आता नाही जमणार ग अजून काही सांगणं.

तूच सांग आता पुढची हकीकत लावण्याला ." 

" ठिक आहे. "

स्नेहाने होकार दिला.

.

.

.

.

काय असेल आता आर्या आणि निकेतच्या नात्याचं भविष्य..? 

आर्या तिच्या बाबांच्या पसंतीच्या मुलासोबत लग्न करेल की नाही ..? 

कोण असेल आर्याचा जोडीदार ..? 

हे सगळं जाणून घ्यायला आवडेल ना ...? 

मग या कथेचा उद्याचा अंतिम भाग वाचायला विसरू नका.

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. 

तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात.

त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. 

साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा 

अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

फोटो साभार - Google & pinterest 

✍©️ जया पाटील 



Post a Comment

0 Comments