#माझ्या_जगण्याला_पंख_फुटले_भाग_३_अंतिम
©️जया पाटील
भाग एक वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇
https://velvetkavisha.blogspot.com/2021/08/blog-post_18.html
भाग दोन वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇
https://velvetkavisha.blogspot.com/2021/08/blog-post_19.html
मागील भागात आपण पाहिलं की ,
आर्याने तिच्या बाबांना निकेत सोबतचं नातं सांगितल्यावर ,
त्यांनी निकेतच्या आईबाबांना भेटायचं ठरवलं.
निकेतच्या आईबाबांना भेटल्यावर साखरपुड्याचा मुहूर्त ठरवण्यात आला.
आर्या आणि निकेतचा साखरपुडा पार पडला.
निकेतच्या आईबाबांना त्याच्या मामाची मुलगी सून म्हणून पसंत होती.
परंतु निकेतच्या हट्टापुढे त्यांनी आर्याला सून करण्याचं मान्य केलं.
मात्र निकेतच्या आईबाबांनी आर्याच्या बाबांपुढे मानपान म्हणून बऱ्याच मागण्या केल्या.
आर्याच्या बाबांना ह्या मागण्या आर्थिक दृष्ट्या डोईजड होत्या.
आर्याने सगळ्या गोष्टी निकेतला सांगून त्याला त्याच्या आईबाबांना समजविण्याची विनंती केली.
निकेतने त्याच्या आईबाबांना समजवण्याचा प्रयत्न पण केला.
निकेतचे आईबाबा मात्र काहीच समजुन घेण्याच्या मनःस्थिती मध्ये नव्हते.
या सगळ्यात वाद वाढत गेला.
निकेतच्या आईबाबांनी त्याला ते आणि आर्या दोघांपैकी एकाची निवड करायला सांगितली.
शेवटी नाईलाजाने त्याने त्याच्या आईबाबांची निवड केली.
आर्या आणि निकेतचा साखरपुडा तुटला.
आता पुढे....
-------------------
हा सगळा घटनाक्रम सांगत असतांना आर्या खूप हळवी झाली.
तिने आर्या आणि निकेतचा प्रवास पुन्हा स्नेहाला सांगायची विनंती केली.
स्नेहा बोलू लागली.
आईबाबांच्या हट्टापुढे हार मानून निकेतने आर्या आणि त्यांच्यात आईबाबांची निवड केली.
जाता जाता तो आर्याला सांगून गेला.
"तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस आर्या.
मी तुझ्याशी नातं तोडत असलो तरी ,
एक मात्र खरं आहे..
मी हे नातं पुन्हा कोणासोबतही जोडू शकणार नाही.
मी तुझ्यासोबत लग्न करू शकलो नाही ना ...
तर दुसऱ्या कोणासोबतही मी लग्न करू शकणार नाही. "
हे सांगून पाणावलेल्या डोळ्यांनी तो तिथून निघून गेला.
सगळेच निशब्द होते.
----------------
निकेत तिथून निघून गेल्यावर आर्या तिच्या आईबाबांजवळ गेली.
बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून ती ओक्शाबोशी रडू लागली.
" बाबा , मी खरंच खूप वाईट मुलगी आहे ना ..
मी निकेतवर प्रेम करायलाच नको होतं.
तुम्ही माझ्यासाठी जे केलं असतं ते योग्यच केलं असतं.
तुम्ही नेहमीच म्हणायचे ना ...
लग्न म्हणजे फक्त दोन लोकांचा संसार नसतो,
तर दोन परिवारांचं जुळणं असतं.
मी फक्त माझा आणि निकेतचा विचार केला.
मी खरंच चुकली बाबा ..
मला माफ करा.
आता माझं आणि निकेतचं लग्न होऊ शकणार नाही.
हे माहित आहे मला..
त्यामुळे तुम्ही माझ्या भविष्यासाठी जो निर्णय घेणार तो मला मान्य असेल.
तुम्ही ज्या मुलासोबत सांगणार त्या मुलासोबत लग्न करायला मी तयार आहे.
मला माफ करा बाबा ...."
-----------------
आर्याची अवस्था तिच्या बाबांकडून पाहवली जात नव्हती.
ते तिला जवळ घेत म्हणाले ...
" तू नाही चुकलीस बाळा ..
विधात्याला कदाचित हेच मान्य होतं.
मी तुझ्यासाठी दुसरा मुलगा शोधेलही..
पण तू खुश राहू शकशील त्याच्यासोबत?
तू तुमच्या दोघांच्या नात्याला न्याय देऊ शकशील?
तुझ्या मनात निकेत असतांनाही ..?
मनात एक व्यक्ती असतांना दुसऱ्या व्यक्तीला आपलं मानणं म्हणजे निखार्यावरुन चालणं आहे.
होऊ शकेल तुझ्याकडून हे ..?
जमेल का तूला हे ..? "
-------------------
" हो बाबा ...
आयुष्यातल्या काही वाईट गोष्टी मागे सोडून भविष्यात पुढे तर जावंचं लागतं.
मी देखील पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मान्य आहे मला ,
हे सगळं इतकं सोपं नाही पण फारसं कठीण देखील नाही.
मी प्रत्येक नात्याला संपूर्ण न्याय देण्याचा मनापासून प्रयत्न करेन. "
आर्या तिच्या बाबांना खंबीरपणे सांगत होती.
खरं तर हा निर्णय तिच्यासाठी खूप कठीण होता.
तिला तिच्या बाबांना अजून जास्त दुखवायचे नव्हतं ,
म्हणूनच तिने निकेतचा विचार सोडून आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता.
------------------
हळूहळू दिवस पुढे सरकत होते.
आर्या आणि निकेतचा साखरपुडा तुटून दोन महिने झाले होते.
आर्याच्या बाबांनी आर्यासाठी अमितच्या बाबांना भेटायचं ठरवलं.
आर्याचे बाबा विलासराव सानेंच्या घरी गेले.
त्यांनी अमित आणि त्याच्या बाबांना आर्याला पाहायला येण्याची विनंती केली.
निकेत आणि आर्याचा साखरपुडा तुटल्याची गोष्ट आर्याच्या बाबांनी सानेंपासून लपवली नाही.
साने देखील खूप चांगल्या विचारांचे होते.
त्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी माहिती पडल्यावर सुद्धा आर्याला पाहायला यायला होकार दिला.
आर्याच्या आईबाबांना खूप आनंद झाला.
आर्याची आई खूप उत्साहाने कामाला लागली.
आपल्या लेकीच्या संसाराची घडी पुन्हा बसणार म्हणून त्या खूप खुश होत्या.
वधुपरिक्षेसाठी पाहूणे येणार हे माहित पडल्यावर आर्याच्या आईची तयारी सुरु झाली होती.
घरातील चादरी , पडदे कोणत्या रंगाचे असावेत ,
इथपासून ते कुठल्या कपात कुठल्या ट्रेमध्ये पाहुण्यांना चहा द्यायचा ,
इथपर्यंत सर्व ठरवले जात होतं.
मुलाकडचे पाहूणे येणार म्हणून नवीन बेडशीट , चादर ,
वर्षानुवर्षे कपाटात ठेवलेली क्रोकरी ,
नवीन शो पिसेस सगळ्यांनी आज दिवाणखान्यात मोकळा श्वास घेतला होता.
आर्याच्या आईची येणाऱ्या पाहुण्यांना करायच्या पाहुणचाराची वर्दळ सुरु होती.
हे सगळे करत असतानाच त्यांची आर्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु होती.
" आर्या , आलेल्या पाहुण्यांसाठी स्वतःच्या हाताने पोहे बनवशिल का ..?
कुठली साडी घालणार आहेस ...?
फार जास्त मेकअप करू नकोस.
बऱ्याच लोकांना आवडत नाही ग इतका नट्टा पट्टा.
आपण आपले साधचं राहिलेले बरे ... "
" मुलासोबत त्याच्या घरची मोठी माणसं पण असणार आहेत,
त्यामुळे पदर व्यवस्थित खांद्यावर सांभाळून ठेव.
तुम्हा आजकालच्या मुलींना तरी खूप मोकळीक मिळाली आहे.
नाहीतर आमच्यावेळेस तर एक क्षण सुद्धा डोक्यावरून पदर पडलेला चालत नसे.
" जरा फ्रेश हो जा.
पटकन आटोप म्हणजे पाहूणे आल्यावर धावपळ होणार नाही.
कंटाळली आहेस का ...माझे इतके प्रश्न ऐकून ..? "
आर्याची आई तिचा उतरलेला चेहरा पाहुन तिला म्हणाली.
----------------------
" नाही ग आई.
मी कशाला कंटाळेल ..."
मनावर दगड ठेवून आर्या तिच्या आईला म्हणाली.
कितीही झालं तरी निकेतला विसरणं.
तिच्या हृदयातील त्याची जागा दुसर्या कुणाला देणं आर्यासाठी खूप कठीण होतं.
कांदेपोह्याच्या कार्यक्रमाची सगळी तयारी झाली.
विलासराव साने , त्यांचा मुलगा अमित , मुलगी अंकिता आणि त्यांची पत्नी ममता आर्याला पाहण्यासाठी आले.
आर्याच्या आईने तिला साडी आणि दागिने आणून दिले.
मनातून इच्छा नसतानाही आईच्या इच्छेसाठी आर्या खूप छान तयार झाली.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.
-----------‐--------
आर्याला पुढे दिवाणखाण्यात बोलवण्यात आले.
आर्या अगदी सुंदर सजून हातात चहाचा ट्रे घेऊन जेव्हा बाहेर आली,
तेव्हा अमित तिच्याकडे पाहतच राहिला.
जणू स्वर्गातून अप्सरा पृथ्वीवर उतरून समोर उभी आहे असा भास अमितला झाला.
आर्या तिच्या गोर्या कांतीवर सुंदर निळ्या रंगाची साडी ,
त्यावर सुंदर मखमली लाल रंगाचे ब्लॉउज ,
गळ्यात एक नाजूकशी मोत्याची सिंगलसरी लड ,
हातात मोत्यांचे तोडे ,
गुलाबीसर हातात एक नाजूक नक्षीची अंगठी ,
कपाळावर नाजूक टिकली ,
बनाना क्लीपने केस वरती बांधलेले ,
हा सगळा पेहराव लेवून जेव्हा बाहेर आली ,
तेव्हा अमित पाहताक्षणीच तिच्यावर लट्टू झाला .
हा सगळा सौंदर्यसाज आर्यावर खूपच शोभून दिसत होता.
मुळातच तो गोरा रंग आणि त्यावर चढलेला दागिन्यांचा साज.... !
विलक्षण सौंदर्य ते ...
नक्षत्रासारखे अनुपम ...
कोणालाही भुरळ पाडेल असे...!
अमित पाहताक्षणीच आर्याच्या प्रेमात पडला.
अमितच्या कुटुंबियांना देखील आर्या पसंत पडली.
त्यांनी अमित आणि आर्याच्या लग्नाला होकार दिला.
थोड्याच दिवसात अमित आणि आर्याचा साखरपुडा पार पडला.
-------------------
आर्यासाठी ही खूप मोठी परीक्षा होती.
अमित आर्याला भेटण्यासाठी येऊ लागला.
जेव्हाही आर्या अमित सोबत बाहेर फिरायला जायची.
त्यावेळी फक्त आणि फक्त अमितचं बोलत असे.
अमितलाही आर्याची नाराजी लक्षात आली होती.
एकदा असंच अमित आणि आर्या भेटले.
अमित आर्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता.
आर्या फक्त अमितच्या प्रश्नाला उत्तर देत होती.
स्वतःहून मात्र त्याच्यासोबत एक शब्द सुद्धा बोलत नव्हती.
अमित आर्याला म्हणाला...
" आर्या ,मला माहिती आहे.
निकेत आणि तुझं नातं आजही तुझ्या मनात आहे.
पण आता आपल्या नात्याची सुरुवात होणार आहे.
आपण बोलणार नाही तर कसं होणार..?
मी तूला पहिल्यांदा पाहिलं त्याचवेळी मी तुझ्या प्रेमात पडलो.
मला तूला खूप सुखी ठेवायचं आहे ग ..!
त्यात मला तुझीच साथ हवी आहे.
मला निकेतबद्दल थोडं सांगशील.
म्हणजे मी थोडासा त्याचासारखा होण्याचा प्रयत्न करेन.
तूला आनंदी ठेऊ शकेल. "
अमितच्या या बोलण्यावर आर्याची कळी खुलली.
ती खूप आनंदी झाली.
निकेत बद्दल ती भरभरून बोलली.
त्याच्याबद्दल बोलताना आर्याचे निकेतबद्दलचं प्रेम तिच्या डोळ्यात दिसत होतं.
अमितच्या ते लक्षात आले.
आर्याने आपल्यासोबत फक्त अडजस्टमेन्ट केली आहे.
हे देखील अमितने अचूक हेरलं.
बऱ्याच गप्पा झाल्यावर आर्या घरी जाण्यास निघाली.
आर्याला ड्रॉप करून तो पुढे निघाला.
-------------------
बाईक वरून जात असतांना एक मुलगा अचानक मधे आला.
अमितने जोरात ब्रेक दाबला.
तो मुलगा अडखळून खाली पडला.
" दिसत नाही का ...?
आंधळा आहेस का ..? "
असं ओरडून त्या मुलाजवळ जात अमित म्हणाला.
तो मुलगा पूर्णपणे दारू पिलेला होता.
अर्धवट शुद्धीत होता.
अमित त्याच्या जवळ गेला आणि पुन्हा म्हणाला .
" दिसत नाही का ..?
आता गाडीखाली येऊन मेला असतास मग ..? " "
-------------------
त्यावर अडखळत तो मुलगा बोलू लागला..
" नाही दिसत मला ..
मेलो असतो तर बरं झालं असतं.
आईबाबांना माझं आर्यावरचं प्रेम दिसत नाही.
कोणालाच माझी चिंता नाही.
आर्याने पण त्या अमित सोबत साखरपुडा केला.
माझा विचार केलाच नाही. "
त्याच्या बोलण्यावरून तो मुलगा निकेतचं असल्याचं अमितच्या लक्षात आलं.
अमितने त्याला त्याच्या घरचा पत्ता विचारला.
अर्धवट शुद्धीत निकेतने घराचा पत्ता अमितला सांगितला.
अमित निकेतला घेऊन त्याच्या घरी आला.
निकेतची अवस्था पाहून निकेतचे बाबा चिंतेत पडले.
निकेतला सुखरूप घरी आणल्याबद्दल त्यांनी अमितचे आभार मानले.
--------------------
निकेतची अवस्था पाहून त्याच्या आईचा जीव कासावीस झाला.
निकेतची अवस्था पाहून त्याच्या आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
त्या बडबडू लागल्या..
" त्या आर्याचीच नजर लागली माझ्या मुलाला.
कुठून दुर्बुद्धी सुचली त्या मुलीच्या प्रेमात पडण्याची.
ती स्वतः दुसरा साखरपुडा करून बोहल्यावर चढते आहे.
इथे मात्र निकेत आयुष्यभर लग्न न करण्याची प्रतिज्ञा घेऊन बसला आहे.
काय मिळाले त्या आर्याला माझ्या मुलाचे आयुष्य खराब करून? "
---------------
त्यांचे बोलणे मधेच तोडत अमित म्हणाला.
" तुमच्या मुलाचं आयुष्य आर्याने नाही खराब केलं.
ते तर तुम्ही स्वतःच खराब केलं.
तुमचा अहंकार कारणीभूत आहे त्याच्या अश्या अवस्थेला.
निकेत अर्धवट शुद्धीत जे बोलत होता त्यातून मला सगळं काही समजलं आहे.
निकेतचं आर्यावर जीवापाड प्रेम आहे.
हे माहिती असूनही तिच्यात आणि तुमच्यात एकाची निवड करण्याची अट घातली त्याला.
तुम्हाला सोडून त्याने आर्याची निवड केली असती ,
तर जन्मदेत्या आईबापाला डावलून त्याच्यासाठी काल आलेली मुलगी महत्वाची होती.
असा आरोप लावून तुम्हीच त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असतं.
आज तो माझ्या गाडी खाली आला.
नशीब बलवत्तर म्हणून काही अनिष्ट घडलं नाही.
नाहीतर कुठं जाणार होतात तुम्ही..?
त्याच्या मृत्यूला ही तुम्हीच जबाबदार ठरले असते.
राहता राहिली आर्याची गोष्ट.
ती पण अमित सोबत लग्न करतांना खुश नाहीये.
फक्त आपल्या आईबाबांच्या समाधानासाठी ती स्वतःच्या आनंदाचा बळी द्यायला निघाली आहे."
------------
आर्याचा विषय निघाल्यावर मधेच अमितला थांबवत निकेतची आई म्हणाली.
" तुम्हाला आर्याबद्दल कसं काय माहिती ..?
कोण आहात तुम्ही..? "
" आर्या ज्याच्यासोबत बोहल्यावर चढायला निघाली तोच मुलगा आहे मी .
अमित....! "
अमितचं बोलणं ऐकून निकेतच्या आईबाबांना धक्का बसला.
---------------------
" काका काकू ..
तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात.
खरं तर मला तुम्हाला काहीच बोलण्याचा अधिकार नाही.
पण निकेतचं सुख आर्या आहे.
तुम्हाला न सांगताच निकेत आणि आर्या एकमेकांसोबत पळून गेले असते
तर काय केलं असतं तुम्ही..?
तुमच्या मुलांनी तुमच्यासाठी स्वतःच्या प्रेमाचा त्याग केला,
या पेक्षा अजून कुठले मोठेपण हवं आहे तुम्हाला..?
अजून कुठल्या मानाची अपेक्षा आहे तुम्हाला ..?
या सगळ्या ओढाताणीत निकेतचं काही बरंवाईट झालं तर कोणासाठी आयुष्य जगणार तुम्ही..?
तुमच्या मुलाचे तेच तुमचं सुख आहे ना ..
मग निकेतचं सुख आर्या सोबत आहे.
त्याला त्याचं सुख परत द्या. "
इतकं बोलून अमित तिथून निघून गेला.
------------------
अमितचे बोलणं ऐकून निकेतच्या आईबाबांना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप झाला.
त्यांनी दुसऱ्याच दिवशी निकेतला घेऊन आर्याच्या घरी जायचं ठरवलं.
सकाळी निकेतला शुद्ध आल्यावर त्याच्या आईबाबांनी त्याची माफी मागितली.
निकेतला घेऊन त्याचे आईबाबा आर्याच्या घरी आले.
निकेत आणि त्याच्या आईबाबांना पाहून आर्याच्या बाबांना धक्का बसला.
त्यांनी आर्याच्या आईबाबांची माफी मागितली.
मुलांच्या सुखासाठी पुन्हा हीच सोयरीक जुळवा असंही सांगितलं.
पण आर्याच्या बाबांनी साफ नकार दिला.
------------------------
"अमितसोबत आर्याचा साखरपुडा झाला आहे.
त्याने आर्यासोबत सुखी संसाराची स्वप्न रंगवली आहेत.
आता आम्ही त्याला नकार देऊ शकत नाही. "
आर्याचे बाबा म्हणाले.
------------------------
त्यांचे बोलणं सुरु असतांनाच अमित तिथे आला.
" आर्या , माझ्यासोबत पण कधीच खुश राहणार नाही बाबा.
आर्याचे खरं सुख निकेत सोबतचं आहे.
फक्त निकेतसोबत लग्न तुटल्यावर तुमच्या आनंदासाठी तिने माझ्यासोबत लग्न करायला होकार दिला.
आर्या जेव्हाही माझ्यासोबत असायची तेव्हा ती फक्त शरीरानेच माझ्यासोबत असायची.
तिचं मन मात्र निकेतलाच शोधत असायचं.
मला माझ्या सोबतचं नातं तिच्यावर जबरदस्ती लादायचं नाहीये. "
-----------------
अमित आर्याजवळ जाऊन म्हणाला...
" आर्या , पहिल्यांदा जेव्हा मी तूला पाहिलं त्याच क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो.
पण तुझ्या नजरेत माझ्यासाठी ते प्रेम कधी दिसलंच नाही.
दिसली ती फक्त तडजोड.
त्यामुळे मी तूला या बंधनातून मुक्त करतोय.
माझा विचार करून निकेतला नाही म्हणू नकोस. "
-----------------
अमितचे बोलणं ऐकून आर्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले.
" अमित ...
आय एम सॉरी ..
मी खूप मन दुखावलं आहे तुझं.
स्वतः आयुष्यभर दुःखात राहून फक्त माझ्यासुखासाठी ,
इतका मोठा त्याग करायला निघाला आहेस तू ..?
खूप उपकार आहेत रे तुझे माझ्यावर.
एक गोष्ट अजून करशील माझ्यासाठी ..? "
आर्यने रडत रडत अमितला विचारलं.
-------------------
अमितलाही अश्रू अनावर झाले होते.
" हो... करेन की ..
सांग ना ...
Anything for you. "
अमित आर्याला म्हणाला.
--------------------
आर्या अमितचा हात हातात घेऊन म्हणाली...
"अमित खूप उपकार आहेत रे तुझे माझ्यावर...
मी आयुष्यभर विसरणार नाही तूला...
तू माझ्या आयुष्याचा जोडीदार तर होऊ शकला नाही.
पण एक चांगला मित्र म्हणून माझ्यासोबत राहशील ना..? "
---------------
" उपकाराची भाषा करशील तर कधीच बोलणार नाही हं....
मी तुझ्यासोबत.
मी नेहमीच तुझ्यासोबत असेल.
प्रत्येक क्षणी तुझ्या सुखाची प्रार्थना करत असेन."
एवढं बोलून अमितने आर्याचा स्वतःच्या हातातील हात निकेतच्या हातात दिला.
" खूप खूप सुखी राहा.
ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर..!"
इतकं बोलून तिथून निघून गेला.
-------------------
" अशी होती आर्याची प्रेमकथा...
happy ending lovestory ..!
कशी वाटली लावण्या...? "
स्नेहा म्हणाली.
" कसली भारी होती आर्या ..
तुझी लव्ह स्टोरी.
अगदी एखाद्या फिल्मच्या स्टोरीसारखी.
एखादी फिल्म बनायलाच हवी..
तुमच्या लव्हस्टोरी वर..
पण खरं सांगु ..
मला अमित साठी खूप वाईट वाटलं.
अमित भेटला का ग ..आर्या ..?
त्यानंतर कधी ..
निकेतला पुन्हा भेटल्यावर कसे वाटलं तूला आर्या ..
सांग ना .."
लावण्या आर्याला म्हणाली.
-------------------
" अमित माझा हात निकेतच्या हातात देऊन निघून गेला.
त्यावेळेस निकेतला सोबत पाहून माझ्या मनातील भावना फक्त हेच सांगत होत्या....
काळजाचं सूप झालं
आरशाला रूप आलं....
जगण्याला पंख फुटले
ये माझ्या… जगण्याला पंख फुटले...!
रान सारं गाणं झालं
मेणावानी मन झालं....
जगण्याला पंख फुटले
ये माझ्या… जगण्याला पंख फुटले....!
पाखरांशी बोलताना
वाऱ्यावरी चालताना....!
जगण्याला पंख फुटले
ये माझ्या… जगण्याला पंख फुटले...!
-----------------
आज निकेत आणि माझा खूप सुखाचा संसार आहे.
पण हे सगळं अमितच देणं आहे.
तो नसता तर हे सगळं कधीच शक्य नव्हतं.
अमित माझ्या आयुष्याला इंद्रधनुषी रंगानी रंगवणारा चित्रकार होता.
त्या दिवसानंतर मी त्याला किती मेसेज केले.
फोन केले.
पण त्याच्यासोबत कुठलाच कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही.
काही दिवसांनी तो हे शहर सोडून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाला.
मला आणि निकेतला भेटायचं आहे ग त्याला ..
रोज उठून देवाकडे मी अमितसाठीच प्रार्थना करत असते.
माझ्या आयुष्यात तो एक देवदूत म्हणून आला.
अंगावर मोरपीस फिरवून माझ्या आयुष्याला सुखाची झालर देऊन ...
नाहीसा झाला ...
तेही कायमचाच....!
समाप्त !
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.
तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात.
त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे.
साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा
अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Google & Pinterest
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box