भीती आणि काळजी

 भीती आणि काळजी

 ©️उत्कर्षा नलावडे


मार्च नुकता कुठे सुरु झाला होता, तरी आता पासूनच उष्णतेचा ताप जाणवत होता. "आता बाहेर जाणे टाळले पाहिजे, अजून नीट दुपार पण झाली नाही आणि केवढा उकाडा", बाजारातून आलेली मानसी बोलत होती.  

घरात मोबाइलला नजर लावून बसलेला नवरा आणि एकीकडे कार्टून तर दुसरीकडे चित्रकला मांडून बसलेली मुलगी दोघांचाही तिच्याकडे लक्ष नव्हते. हे एक नेहमीचंच आपणच बोलायचं, आपणच ऐकायचं आधीच दमलेली मानसी अजून हिरमुसली.

थोडावेळ आराम करून मग जेवणाची तयारी करू अशा विचारात सोफावर बसली, "आई, जेवण कधी देणार?" आर्या मानसीची लेक लगेच विचारती झाली. तिला उत्तर द्यायला तोंड उघडणार तोच मोबाईल मध्ये अडकलेला संदीप मानसीचा नवरा "किती वाजले? भूक लागलीय खरी" असे म्हणत लेकीची री ओढू लागला.  

आधीच उन्हाने तापलेले डोकं अजून तापले, "आताशी अकरा वाजत आहेत, नाश्ता करून दोन तास झाले नाही, लगेच कशी भूक लागते तुम्हा लोकांना? इथे मी उन्हातून थकून आलेय साधं पाणी पण विचारत नाही कोणी आणि अकरा वाजता जेवण हवं ह्यांना".

पाण्याचा विषय निघताच तहानेने घसा कोरडा पडला आहे लक्षात आलं, पण एवढे बोलून सुद्धा दोघांपैकी एकही पाणी देईल अशी अपेक्षा करणे वर्थ्य होते. आर्या तर मानसीच्या त्राग्याचे (तिच्या भाषेत बोलायचं तर आईची नेहमीची कटकट) उत्तर म्हणून आपला टॅब घेऊन बेडरूम मध्ये चालती झाली.  

चित्रकलेचं सगळे सामान तिथेच टाकून. हे पण नेहमीचंच म्हणा, स्वतःशी विचार करत मानसी किचनमध्ये आली, थंड पाणी प्यायचा मोह आवरला नाही. फ्रीझ मधली थंड पाण्याची बाटली उचलली मात्र, तहानेने व्याकुळ झालेला जीव. मानसीचा धीर सुटला. उभ्या उभ्याच पाणी पिणार तोच आई आठवली "उभ्याने कधी पाणी पियू नये, मनू" मानसीची आई तिला नेहमी सांगत असे.

आई समोर नसेल तरी तिने सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत पाळणाऱ्या पिढीतली मानसी, चाळीशी आली तरी आई बाबा तर सोडा, कोणाचेही जो चांगलं सल्ला देतो त्यांचं ऐकावे हि तिची सवय. जमेल तेवढ्या वेगाने परत सोफ्यावर जाऊन बाटलीतुनच घटाघटा पाणी प्यायली, तृप्ती अनुभवता अनुभवातच पाणी कधीतरी तिच्या घशात नंतर छातीत जाऊन अडकले.  

छातीतून आलेल्या कळा, त्यानंतर समजलंच नाही. गिरक्या घेत गाढ झोपेतून उठतोय असा भास होत होता आणि संदीपचे शब्द कानावर पडत होते. "अगं! मानसी, उठ मानसी काय झालं? काय झालं? डोळे उघड!".

ग्लानी होती तरी आपली शुद्ध हरपली असावी अशी शंका आली तिला. संदीप आणि आर्या दोघेही तिला पूर्ण जाग करायचा प्रयंत्न करत होते. ती उठून बसली, थोडं पाणी प्यायली हुशारी आली.  

आता ठीक वाटत होतं तिला फक्त चक्कर येऊन पडताना तोंडावर पटल्याने दात दुखावले, ओठ फाटले आणि नाकावर फटका बसल्याने चेहरा रक्ताने माखला होता. संदीपच्या आधाराने बेसिन जवळ जाऊन चेहरा धुण्याचा प्रयत्न केला, पण सगळचं बधिर वाटत होतं आणि आता दुखूही लागले होतं. ती बेडवर जाऊन पडली, आता दुखरे अंग सोडलं तर बाकी ठीक वाटत होतं.

पण संदीप पुरता हादरला होता, एकतर त्याने पहिल्यांदाच कोणाला तरी समोर चक्कर येऊन पडताना पहिले होतं आणि त्यात चक्कर येण्याचे कारण काय असेल हा विचार त्याला सतावत होता. शेवटी हो नाही करत मानसी डॉक्टरकडे निघाली. एकतर रविवार आणि आता करोना काळात हॉस्पिटलमध्ये जायची भीती, पण तरीही इलाज नव्हता.  

रविवार असल्याने नेहमीची डॉक्टर आज भेटणार नव्हती पण जवळच असलेल्या खाजगी इस्पितळात जाऊन प्राथमिक तपासणी करावी असा विचार दोघांनीही केला. रक्तदाब वाढला होता. बाकी सगळे ठीक होतं, पेन किलर आणि आराम सुचवून सगळे घरी आले. औषध घेऊन बाहेरूनच आणलेला पुलाव कसाबसा खाल्ला कारण दात आणि जबडा दोन्ही सहकार करत नव्हते.

पहिल्यांदाच नवरा आणि लेक दोघेही त्यांना जमेल तशी तिची काळजी घ्यायचा प्रयत्न करत होते , तू आज फक्त आराम कर बजावत होते , वाईटातून चांगले ती मनाशीच विचार करत होती. नुसतं पडून राहण्याची क्वचित येणारी वेळ आज होती. एकातून दुसरा मग तिसरा असे विचार चालू असताना अचानक तिला वाटून गेले.  

खरंच का आली असेल मला चक्कर, थकावट कि काही भयानक आजार ...? ती मनातून चरकली. शी! आपण काय नको ते विचार घेऊन बसलोय छान आराम मिळतोय ते करायचा सोडून मानसी स्वतःला दोष देत होती. झोप लागत नव्हती, कितीही म्हटले तरी नको तेच विचार मनात फेर धरून नाचत होते. विचार करता करता झोपली.

 सकाळी उठून प्रथम तिने नेहमीच्या डॉक्टरचा दवाखाना गाठला. चक्कर येण्याचे नेमके कारण सांगता येत नसले, तरी उष्णतेचा त्रास झाला असावा किंवा पाणी श्वास नलिकेत अडकून असे झाले असावे असे डॉक्टरांना वाटत होते, पण तिचा काळजीचा स्वर पाहून काही नॉर्मल टेस्ट करून घाव्या असे सांगितलं. सुदैवाने सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या, काही काळजी करण्याचं कारणच नाही डॉक्टरांनी निर्वाळा दिला. "अतिश्रम करू नका, थोडा आराम घेत जा दोन कामात जमलं तर" डॉक्टर म्हणाले.

सगळे परत पाहिल्यासारखे झाले, अजून दुखरे अंग त्रास देत होते पण रिपोर्ट्स नॉर्मल आल्याने दोन दिवसासाठी बदलेले तिच्या मागे पुढे वावरणारे संदीप आणि आर्या परत स्वतःच्या जगात परतले होते आणि मानसी परत रोजच्या कामाला लागली. पण काही केल्या मनातून भीती जात नव्हती, आताशा एकटं कुठे जायची हिम्मत होत नव्हती. परत चक्कर आली तर ? कोणाशी बोलावे तर किती भित्री आहे हि असचं समोरच्याला वाटले नकोच. आपल्याला खरंच काही झालं तर आर्याच कसं होईल? फक्त नकारात्मक विचार ठाण मांडून बसले होते.

मानसी अशीच तंद्रीत बसली असताना तिच्या मैत्रिणीचा स्वातीचा फोन आला. "काय मनू, काय चाललंय?" स्वाती नेहमीप्रमाणे सुरु झाली. मानसीला खरंतर खूप बरं वाटले होते, तरी रोज सारखी खुलून बोलता येत नव्हतं. जवळची मैत्रिणी असलेल्या स्वातीला ते जाणवत होत.

"काय ग! बरी आहेस ना? खूप कामात आहेस का? नंतर करते मग कॉल". काही बोलावे की नाही ह्या व्दिधा मनस्थितीत मानसी अखेर बोललीच. 

"स्वाती अग काही दिवसांपूर्वी अचानक चक्कर येऊन पडले ग". "अरे बापरे! आता कशी आहेस?" स्वातीने काळजीने विचारले.

 "आता बरी आहे ग मी, पण......". "बोल.... काय नीट सांग पाहू". "तू हसशील मला सगळं बरं आहे आता, सर्व रिपोर्ट्स पण नॉर्मल आहेत तरी खूप भीती वाटते ग मला. काहीतरी विचित्र वाटत राहते दिवसभर". 

स्वाती थोडं हसूनच बोलली, "मग वेडाबाई असे होतच, मी का हसेन, आजारी पडलं की सगळेच घाबरतात, त्यात काय सहजच आहे ग ते, थोडे दिवस गेले कि आपोपाप विसरून जाशील बघ".  

"असं झाले तर देव पावला! कारण कळले नाही ना चक्कर येण्याचे, त्यामुळे थोडं अस्वथ वाटतं, कामाचा थकवा बोलशील तर आधी कधी असा काही त्रास जाणवला नाही असं अचानक काय झालं काय माहित".

"माझं नीट ऐकशील", स्वातीने समजवायला सुरुवात केली. "अचानक खरंतर काही होत नाही, हा अलार्म समज, जर रिपोर्ट्स नॉर्मल असूनही काही शारीरिक आजारपण येत असेल तर एकच गोष्ट असते ती म्हणजे आपण आपल्या शरीराची काळजी घेत नाही आहोत किंवा खूप जास्त त्रास देत आहोत".  

"विशी, तिशीची ताकत चाळीशी मध्ये नाही टिकत ग, पण आपण ते समजून घेत नाही, आपण तेवढाच किंवा अजून जास्त काम करतो पण शरीराची ताकद टिकवून ठेवण्यासाठी काही करत नाही, फक्त मरणाला, आजारपणाला घाबरतो, आणि खरं सांगू जे काही चांगले वाईट व्हायचे आहे ते होणारच पण आपल्या चुकीमुळे किंवा हरलगर्जीपणा मुळे आपलं नुकसान करून घेऊ नये, असं वाटत मला, बरोबर ना?".  

"हो खरं आहे, पण वेळ कुठे आहे ग". "नसेल वेळ तर काढ, सुरवातीला थोडं कठीण जाईल, पण जमेल." "आणि हो फेसबुक, व्हाटसअपवरची माहित वाचून काही करू नकोस, प्रत्येकाचं शरीर वेगळं, त्याची गुणदोषही वेगवेगळे असतात, त्यामुळे डॉक्टरकडे जाऊन सल्ला घे, ते तुला सर्वात जास्त व्यवस्थित सांगू शकतील." मानसीच्या काळजीने जमेल तेवढं तपशिलाने स्वाती समजावत होती.  

"तू बोलतेयस ते पटतंय मला, आणि खूप दिवसांनी खरंच खूप बरं वाटतंय आज" मानसी मनापासून बोलली. "करेन प्रयत्न नक्की" मानसी म्हणाली.

आज खूप दिवसांनी बरं वाटत होते मानसीला, खरंच का घाबरत होतो आपण. स्वाती बोलली ते खरंच आहे, की जेव्हा जे लिहलंय तेव्हा ते होणारच पण त्यासाठी कुंथत बसून, आहे त्या सोनेरी दिवसांची वाट का लावायची. आजपासून आतापासून स्वतःला पण महत्व द्यायचं.

 आर्याचे, माझ्या कुटुंबाचं चांगले भविष्य घडवणार मी, माझ्या मेहनतीने नक्की! पण तो सर्व आनंद उपभोगण्यासाठी, मी निरोगी राहिले पाहिजे. आणि त्यासाठी दुसऱ्या कुणाची वाट का पाहायची?  

आपणच आपला विचार करावा उद्याच डॉक्टरना भेटून व्यायाम, आहार सगळ्याविषयी सल्ला घेऊया, ते जे सांगतील ते नक्की करेन मी. "देवा! तू दिलेल्या मौलवान भेटीची माझ्या शरीराची काजळी घेईन वचन देते तुला."

©️उत्कर्षा नलावडे

आपले यावर काय मत आहे हे नक्की कळवा आणि खालील कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा. लेख आवडला तर नक्की नावासकट पुढे फॉरवर्ड करा.

धन्यवाद.

कथेमध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत सर्वस्वी लेखकांचे आहेत.

सदर कथा लेखिका उत्कर्षा नलावडे यांची असून सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. आम्ही त्यांच्या पुर्व परवानगीने ही कथा आमच्या वाचकांसाठी वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. सदर कथेवर आमचा कोणताही हक्क नाही.

आम्ही साहित्यचोरीचा निषेध करतो.

धन्यवाद..

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


 Velvet Kavisha



Post a Comment

1 Comments

  1. खूप छान पोस्ट...निसर्गाने दिलेल्या आपल्या शरीराची काळजी आपण स्वतःच घ्यायला हवी...👌👌👍👍🙏🙏😊😊❤❤

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box