घास... भाग 1
©️®️नियती जगताप
एका गाव वजा शहरात अनिल आणि सुनिल ही दोघं भावंडं,
आपली आई, शांता हिच्यासोबत राहत होती.
बाप दारूच्या व्यसनापाई पहिल्यांदा पैसा अडका,
आणि नंतर जीव गमावून बसलेला.
शांता चार घरची धुणीभांडी करून कसंबसं तिघांचं पोट भरत होती.
इस्टेटीच्या नावावर गावात नदीकाठी एक पडकी खोली होती.
शिक्षणाचा खर्च परवडणारा नाही ,
या सबबीखाली दोघांनीपण आठवी-नववी मध्ये शाळेला राम राम ठोकला.
मोठा सुनिल बापाच्या पाऊलांवर पाऊल ठेवत ,
दारूच्या अड्ड्यापर्यंत पोहोचला होता,
लहान अनिलचं मन मात्र एका गॅरेजमध्ये रमलेलं.
दोघं वयाच्या विशीत होते
आणि अल्लडपणा किंवा वात्रपणा अंगात भिनलेला.
रोज सकाळी सात वाजता ऊठून आवरणं,
शांता आणि अनिल ने कामाला तर,
सुनिल ने पत्ते खेळायला आणि दारू प्यायला जाणं.
संध्याकाळी पाच साडेपाच पर्यंत सगळ्यांनी घरी परत येणं,
थोड्या वेळाने शांता ने दुर्गा मातेच्या मंदिरात जाणं,
तिथं सेवा करणं
आणि सुनिल अनिल ने परत बाहेर ऊनाडक्या करायला जाणं
ते थेट रात्री एक वाजता परत येणं हाच त्यांचा दिनक्रम होता.
शांता नेहमी त्यांना ओरडतं असे
पण ते ऐकून न ऐकल्यासारखं करत.
एक दिवस नेहमी प्रमाणे दोघं रात्रीचे बाहेर फिरून नदीकाठच्या पायवाटेने परत घराकडं येत होते.
त्यांना तिथं कोणीतरी लपून चाललेलं दिसलं.
नीट पाहिल्यावर त्यांना एक माणूस बाईक वरून जाताना दिसला.
ते परत नदीकिनारी आले.
तिथे त्यांना एका पत्रावळीवर मटणाचं जेवण वाढलेलं दिसलं.
एखादी पुरी जरी मिळाली तरी तो दिवस त्यांना दिवाळी वाटायचा
आणि इथं तर मटण ते पण एवढं की दोघांचंही पोट भरेल.
सुनिल ने ते मटण खायची इच्छा व्यक्त केली.
गरीबीमुळे एका भाकरीवर,
ती पण कधी कधी भाजीशिवाय भूक भागवावी लागायची ,
म्हणून अनिल पण तयार झाला.
पण अनिल ने शंका काढली की जर हा कोणासाठी तरी नैवेद्य असला ,
आणि त्याचा आपल्यावर कोप झाला तर?
सुनिल ने असं काही नसतं म्हणून ती शंका झुगारून लावली.
असं काही असलं तरीसुद्धा मी मानत नाही,
असं म्हणून त्या पानाला लाथ मारली आणि हसून अनिल ला म्हणाला
" घे, पळवून लावलं तुझ्या भूताला."
अनिल त्या पत्रावळीच्या पाया पडला
आणि दोघं तिथेच जेवायला बसले.
दोघं जणं घरी परत आले आणि झोपून गेले.
दुसरा दिवस नेहमी सारखा न्हवता.
सकाळी मुलं उठली नाहीत म्हणून शांता त्यांना उठवायला गेली.
ती अनिलला हात लावला
आणि लगेच हात बाजूला घेतला.
दोघांचं अंग तापलं होतं,
एवढं की त्यांचा चटका लागत होता.
शांता लगेच धावत जाऊन डाॅक्टरांना घेऊन आली.
डाॅक्टरांना पण तपासणी करताना चटका बसला
तसे ते शाॅक झाले.
त्यांनी अशी केस अत्तापर्यंत कधीच पाहिली न्हवती.
त्यांनी शांताला त्यांच्याकडच्या काही गोळ्या दिल्या,
तिन्ही जेवणांनंतर दोघांना द्यायला सांगून ते निघून गेले.
शांता ने निरोप पाठवून काही दिवस कामावर सुट्टी घेतली.
तिने दोन भाकर्या थापल्या,
भाजी बनवली,
दोन ताटं वाढून ती परत सुनिल अनिल च्या जवळ आली.
दोघांना उठवून तीने त्यांना खायला दिलं.
दोघं ही कसेबसे उठले पण घास हातात घेताच तो दोघांनी नकळत फेकून दिला,
पुढ्यात वाढलेलं ताट पण भिरकावून लावलं.
शांता ला काहीच कळत न्हवतं,
ती पुढे येऊन त्यांना ओरडणार तेवढ्यात दोघं जोरजोरात किंचाळायला लागले.
"माझ्या त्वांडचा घास पळिवला,
मी उपाशी र्हायले,
आता तुमी बी उपाशी मरणार".
दोघं जण विव्हळत होते मध्येच ओरडत होते.
त्यांची अवस्था बघून शांता खूप घाबरली,
जोरात रडू लागली.
ज्या कोणी तिच्या मुलांना पकडलं होतं त्याला शिव्या देऊ लागली.
आवाज ऐकून शेजारी पाजारी तिच्या घरात येत होते
आणि त्या दोघांना असं बघून घाबरून पळून जात होते.
पूर्ण दिवस हेच चालू होतं.
शांता आक्रोश करण्याशिवाय अजून काहीही करू शकत न्हवती.
संध्याकाळी दिवसभर अन्नाचा कण पोटात न गेल्यामुळे
आणि तापामुळे शेवटी सुनिल अनिल दोघेही बेशुद्ध पडले.
एवढा वेळ घाबरून गेलेली शांता आता थोडी शांत झाली.
देवाकडं तिच्या मुलांना वाचवण्याची विनंती करू लागली,
अचानक तिला काहीतरी आठवलं,
तिने दोन्ही मुलांकडं बघितलं
आणि ती लगेच घराबाहेर पडली.
ती थेट रोज जायची त्या देवळात गेली.
देवीचं दर्शन घेतलं
आणि पुजार्याकडे गेली.
पुजार्याला सकाळ पासून जे काही घडलं ते सगळं सांगितलं
आणि देवीचा अंगारा घेऊन आली.
घरात येताच सुनिल अनिल परत जागे झाले,
मोठमोठ्याने ओरडायला लागले
"तू काहीही कर,
मी यांसनी सोडायची न्हाय.
माझ्या त्वांडचा घास पळिवला,
ह्ये बी उपाशी मरणार "
दोघं जण परत विव्हळायला लागले.
शांता ने लांबूनच दोघांच्या अंगावर तो अंगारा फुकला,
तसे जोरात ओरडून दोघं परत बेशुद्ध झाले.
तशी शांता दोघांच्या जवळ गेली
आणि तिने दोघांना अंगारा लावला.
दोघंही थोडे शुद्धीवर आले.
तिने लगेच दोघांना जेवण चारलं
आणि डाॅक्टरांनी दिलेल्या गोळ्या दिल्या.
गोळ्यां खाल्यामुळे आणि अशक्तपणामुळे त्यांना लगेच झोप लागली.
बराच वेळ झोपून दोघं जण उठले,
आता त्यांना थोडं बर वाटत होतं.
रात्री जेवून पुन्हा गोळ्या घेवून ते झोपले.
आता त्यांना काही त्रास पण होत न्हवता
म्हणून शांता पण निर्धास्त झाली.
दुसर्या दिवशी दोघं अंघोळीला गेले.
पाण्याने अंगारा वाहून गेला तसे दोघं परत जोरात ओरडायला
आणि विव्हळायला लागले.
शांता धावत त्यांच्याकडं गेली,
ते दोघं खाली कोसळले होते,
जमीनीवर लोळत होते.
शांता ने परत त्यांच्यावर अंगारा फुकला.
ते शांत झाले तसं शांता त्यांना घरात घेऊन आली.
थोड्या वेळाने हवेने अंगारा उडून गेला
आणि परत तोच त्रास सुरू झाला.
शांता ने पुन्हा त्यांना अंगारा लावला.
आणि तीने तडक देऊळ गाठलं,
पुजार्याला सगळं सांगितलं.
अंगारा त्या आत्म्याला दोघांपासून लांब ठेवतो
त्यामुळे त्या दोघांना कायम अंगारा लावला लागले एवढं सांगून पुजारी तिथून निघून गेले.
आता सुनिल अनिल न चुकता रोज अंगारा लावत होते.
झाल्या प्रसंगामुळे सुनिल ने दारू सोडली
आणि अनिल बरोबर तो पण गॅरेजमध्ये काम करू लागला.
दोघांनी संध्याकाळी बाहेर फिरणं पण सोडून दिलं.
संध्याकाळी शांता, सुनिल आणि अनिल असे तिघंही मंदिरात जाऊ लागले.
पण काम करताना घाम आल्यामुळे अंगारा निघून जायचा
आणि दोघांना परत त्रास सुरू व्हायचा.
कोणीतरी मग शांता ला निरोप देत असत
आणि ती अंगारा घेऊन येत असे.
तिघंही आता या त्रासला कंटाळले होते त्यात नवरात्र सुरू झाली.
**** क्रमशः ****
©️®️नियती जगताप
घास..भाग एक आणि दोन ही कथा लेखिका नियती जगताप यांची असून सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. आम्ही त्यांच्या पुर्व परवानगीने ही कथा आमच्या वाचकांसाठी वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. सदर कथेवर आमचा कोणताही हक्क नाही.
धन्यवाद..
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Velvet Kavisha
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box