संमोहिनी भाग २

 


संमोहिनी भाग २

©️सपनारवि


बऱ्याच दिवसांनी बिपाशा आज बंगल्यावर आली होती.. कितीतरी आठवणी ह्या जागेशी जुळल्या होत्या.. आज मम्माला जाऊन चार वर्षे पूर्ण होत आलीत..

तिला दारात बघताच सुमन मावशी जवळ आल्या.. मूळच्या हैदराबादी  असलेल्या सुमन मावशी ह्या आज्जीबाईंच्या सून.. गेली पंधरा वर्षे त्या घर सांभाळत आहेत.. त्या आधी बिपाशाच्या जन्मापूर्वी पासून आज्जीबाई या घराशी जुळून होत्या.. जेंव्हा कधी मम्माला अगदीच वेळ द्यायला जमत नसेल तेंव्हा ह्या आजी सोबतीला असायच्या..फार जीव लावला त्यांनी..  

आता त्या थकल्यात तर त्यांच्या सून या बंगल्याची देखभाल करतात.. आजीबाईचा मुलगा किसनकाका पण बंगल्यावरच ड्रायव्हर म्हणून आहे.. त्या दोघाव्यतिरीक्त अजून तीन चार माणसं कामाला असतात.. या सगळ्यांची व्यवस्था सुमन मावशी बघते.. एकप्रकारे ती घरचीच माणसं आहेत आता..

" गुडीयाजी बहुत दिवसांनी आला तुमी.. मी कॉपी लाती.." 

बिपाशाने स्माईल दिली आणि तिच्या बेडरुमकडे वळली.. सुमन मावशीने बिपाशाला आवडते तशी गरम स्ट्रॉंग कॉफी घेऊन तिच्या बेडरूममध्ये आल्या तेंव्हा ती खिडकीतून लांब दिसणाऱ्या रस्त्याकडे बघत उभी होती.. 

" आज खाणे मे काय काय बनवू?? "  

सुमनच्या आवाजाने बिपाशा भानावर आली.. "काहीही बनवा.. तुमच्या हातचं मला काही चालेल.."  सुमन खुश झाली .. आणि काहीतरी बोलतच आनंदाने खाली पळाली.. सुमन मावशीची ही हिंदीसह मराठीची खिचडी बिपाशाला मजेदार वाटायची.

राघवनशी लग्न झाल्यानंतर बिपाशाने वेगळं राहायचा निर्णय घेतला तेंव्हा डॅडने तिला समजवायचा प्रयत्न केला पण ती आपल्या निर्णयावरती कायम होती.. असेही डॅड बरेचदा लॅबमध्ये असतात.. घर तसं रिकामं असते.. पण जेव्हा राघवन तिला इथेच राहण्याबाबत बोलला तर एक क्षण तिला आश्चर्य वाटलं..

तिला तिची राघवनशी झालेली पहिली भेट आठवली.. मम्माच्या एन जि ओच्या कामाच्या संदर्भात ती त्या दुर्गम भागात गेली होती.. तिची गाडी अचानकपणे बंद झाली असताना संस्थेकडून वेगळ्या गाडीची व्यवस्था करण्यात आली.. तेव्हा चुकीने ती राघवनला ड्रायव्हर समजून त्याच्या गाडीतून दिवसभरची काम आटोपली.. आणि जेव्हा  संध्याकाळी तिला कळले की राघवन तो ड्रायव्हर नव्हे तेव्हा खूप ओशाळली ती...

स्वतःची सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ओळख करून दिलेल्या अगदी दक्षिण भारतात अभिनेत्यासारख्या दिसणाऱ्या पण गोरापान अशा उमद्या राघवनकडे ती नकळतपणे अाकर्षिल्या गेली होतीच.. मात्र तिने तसे जाणवू दिले नाही .. पुढे या न त्या कारणाने तीच्या सतत त्याच्याशी भेटी व्हायला लागल्या.. ओळखीचं रूपांतर कधी मैत्रीत आणि पुढे प्रेमात झालं ते तिचं तिलाच कळलं पण नाही..

राघवन खूप मधाळ बोलायचा.. त्याचं एकूण व्यक्तिमत्त्वच आकर्षक होतं.. तो एक उत्तम कुक होता.. इतक्या सफाईतपणे तो घर सांभाळायचा की जणू वर्षानुवर्षे तो हीच कामे करतोय..  बिपाशाने नुकतच आईला गमावले होते.. वरवर कितीही स्वतःला स्ट्रॉंग दाखवत असेल तरीही ती आतून खूप एकटी पडली होती..तिला असल्या लाडिक वागण्याची सवय नव्हती.. नकळत ती राघवनकडे ओढली गेली..सहा महिने लिव्हिनमध्ये राहल्यानंतर तिने जेव्हा लग्नाचा विचार केला तेव्हा डॅडने नकार दिला नाही पण ते राघवनशी काही बाबतीत समाधानी नव्हते...

स्वतः सॉफ्टवेअर इंजिनिअर असून अजून तो जॉबलेस होता.. डॅडने त्याला काही कामाच्या ऑफर देऊन पण तो फारसा उत्सुक नव्हता.. शिवाय त्याच्या फॅमिलीबाबतही त्याची उत्तरे समाधानकारक नव्हती.. पण त्यांना बिपाशाच्या निर्णयावरती विश्वास होता.. तसे पाहिले तर केळकरांकडे पैशाची काही कमतरता नव्हती. वारसाहक्काने आलेली अब्जावधीची मालमत्ता शिवाय डॅडचे करोडोचे पेटंट.. तरीही माणसाचं काहीतरी ध्येय असावं.. असं निरर्थक जगणं त्यांना पटत नव्हतं..

तिला आठवलं जेव्हा राघवनने तिला प्रपोज केलं त्या संध्याकाळी ती नेहमीप्रमाणेच जीन्स आणि लॉंगनेक टी शर्टमध्ये त्याला भेटायला कॉफीशॉपमध्ये गेली होती.. बऱ्याच गप्पा झाल्यात. मग परतीच्या वेळेला राघवनने एक गिफ्ट तिच्या हातात दिलं.. 

"नाही आता नको खोलू.. बिशु ब्लु माझा फेवरेट.. श्रावणी सकाळला निळ्याची निळाई कशी भावते बघायचं मला.. जर तू ह्या  ड्रेसमध्ये उद्या मला भेटायला तयार झालीस तर मी तुझा माझ्या प्रेमाला दिलेला होकार समजेन..."

बिपाषाला याचं आश्चर्य वाटलं नाही कारण हे तिला अपेक्षित होतं..पण हे जरा लवकर होतंय असं वाटून गेलं.. 

"राघवन मला थोडा वेळ हवाय.." त्याच्या डोळ्यातील आर्जव पाहिलं तर या क्षणालाच आपण होकार भरू असं वाटून बिपाशा घाईत बॅग घेऊन तिच्या गाडीकडे वळली..

तिथून पुढे दोन दिवस तिने राघवनशी कुठलाच संपर्क केला नाही.. न फोन..न मेसेज.. खूप विचार करून तिने त्याला भेटायला बोलवायचं ठरवलं.. तिच्या कॉलच्या पहिल्याच रींगवरती पलीकडून अधिरपणे आवाज आला "हाय बिशु .. काय ठरवलं आहेस..???"

" अरे हो.. हो.. किती ती बेचैनी.. आज येत आहे तुला भेटायला.. कुठे येऊ ते सांग.." 

" ओह बिशु.. तू..स्वीकार..." थांब काही बोलू नकोस.. आधी भेटूया.."

निळ्या रंगाच्या किती त्या छटा...  किंचित गर्दशा आकाशी रंगाचा डाव्या खांद्यावर पिनअप  केलेला खोल गळ्याचा स्लीवलेस वनपीस.. उजव्या हातात त्याच रंगाचे सुंदर असे ब्रेसलेट.. डाव्या हातात वॉच..

हाय हिल सॅंडलमुळे हळुवार चालत येताना ती खूप जास्त आकर्षक दिसत होती.. तिच्या फक्त जवळपास असण्याने वातावरण सुगंधी झालेलं..  

रंगबिरंगी फुले.. मंद प्रकाश.. चांदणं सारं कसं स्वप्नवत वाटत होतं.. राघवनतर आधीच तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला.. बिपाशाच्या होकाराने तर ठार वेडा झाला..  

त्याने कधीही तिच्याशी तिच्या मनाविरुद्ध शारीरिक सलगी करण्याचा प्रयत्न केला नाही.. एक मर्यादा सांभाळूनच 

पण एकदा लग्न झालं तसतसा त्याच्या चेहऱ्यावरचा मुखवटा गळू लागला.. त्याचं वागणं बोलणं अगदी सुरुवातीपासूनच एक फुल प्रूफ प्लॅन होतं.. बिपाशा तिच्या मम्मा डॅडच्या अमाप संपत्तीची एकुलती एक वारस..  

तिच्याशी लग्न करून अगदी सहज हे सगळं मिळवता येईल अशा भ्रमात असलेल्या राघवनला जेव्हा कळलं की हे इतकं सोप्प नाही आहे .. तेव्हा त्याने परत गोडी गुलाबीने सगळे हाताळायला सुरवात केली..

बिपाशा आधीच एक थंड डोक्याने विचार करणारी मुलगी. उगा भावनेच्या भरात वाहवत जाणे तिच्या स्वभावातच नाही.. त्यामुळे राघवनची निवड करताना आपली चूक झालीय हे कळूनही ती शांत होती.. थोडा काळ का होईना ती त्याच्या प्रेमात होती..  

त्याच्याशी घालवलेले तिचे ते फुलपाखरी गुलाबी दिवसांची आठवण मनातून जात नव्हती.. फक्त पैसे म्हणजे सर्व काही नाही हे समजावून त्याच्यात जगण्याचं ध्येय निर्माण करू शकली तरी ती त्याच्याशी नातं पुढे नेण्याबद्दल पॉझिटिव्ह होती.. अन्यथा सामंजस्यपणे दोघे वेगळे होऊ शकू याचाही विचार तिने केलेला..

सुमन मावशीने डिनर तयार असल्याचा निरोप पाठवला आणि बिपाशा तिच्या विचारातून बाहेर आली..

काय होतंय आपल्याला..? आठ दिवसांपूर्वीचा तो अपघात..  तोही खरा की खोटा हा संभ्रम असताना झालेले भास.. त्यातून मन असं सैरभैर होणं.. काहीच कळत नव्हतं तिला.. डिनर साठी खाली जाताना ती तिचा मोबाईल फोन बेडरूममध्ये चार्जिंगला लावून गेली..

परत येऊन पहाते तो एका अननोन नंबर वरून तीन मिसकाल दिसले तिला.. काही महत्वाचे असेल म्हणून कॉल लावला साधारण एक बेलनंतर तिकडून पुरुषी आवाज आला "हॅलो.. केळकर मॅम??"  

" येस स्पिकिंग.." 

" थँक्स गॉड.. कॅन आय स्पीक इन मराठी..." 

" येस..."

"मॅम गेली आठ दिवस प्रयत्न करत आहोत. तर आज तुम्हाला फोन लागलाय.. मी चमोली येथून बोलत आहो.. एक इमर्जन्सी आहे.. मीनाक्षी मॅमने सांगून ठेवलंय की अगदीच गरज पडेल तेंव्हा तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं.. तुम्ही इथे येऊ शकाल?? फोनवर सांगण्यासारखं नाही आहे..

" ओके ठीक आहे.." 

"थँक्स मॅम..." 

आजचा पूर्ण दिवसच थकवणारा ठरला.. मन क्षणात भूतकाळात आणि क्षणात वर्तमानात फेर धरत होतं.. डॅडसोबतचा प्रत्येक क्षण बिपाशाला खास असतो.. तिला आठवत होतं.. की  तिच्या वयाच्या तिच्या मैत्रिणीपेक्षा आपली फॅमिली वेगळी आहे.. 

आपली मम्मा किटी पार्टीत रमत नाही.. ती नवनवी फॅशन करत नाही.. आपले डॅड तिच्या फ्रेंड्सच्या पप्पांसारखे रोज संध्याकाळी ऑफिसमधून घरी येत नाही..पण ते दोघे जे काम करतात त्याला समाजात मान आहे प्रतिष्ठा आहे..  

आजूबाजूचे लोकं त्यांचा आदर करतात.. हे खूप लहान असतानाच तिच्या लक्षात आलेलं.. आणि हे तिने स्वीकारले पण.. तिला आठवतं मम्मा तिला पुरेसे वेळ देत होती.. फक्त हॉस्पिटलमध्ये जर कधी इमर्जन्सी असेल तर तो अपवाद वगळता असे कधी झाले नाही की तिला गरज होती आणि जवळ कुणी नव्हतं..

जसजशी ती मोठी होत गेली तसतसा  मम्माने आपल्या कामाचा व्याप वाढविला.. मम्मा नेहमी म्हणायची की तू आपल्या पप्पा सारखी आहेस.. समंजस, लाघवी तरीही अलिप्त...

'आज राहून राहून मम्माची खूप आठवण येते आहे.. म्हणून तर मी इथे यायला टाळते..' बिपाशा स्वतःशीच बोलत होती.. खांद्यावर हात पडताच तिने दचकून मागे पाहिले..

"ओह डॅड!!कधी आलात??"  

"तेव्हाच जेव्हा तू स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होतीस.. मम्माची खूप आठवण येते नाही.." उत्तरादाखल ती काहीच बोलली नाही फक्त नजर खाली करून अश्रू लपविण्याचा प्रयत्न केला.. 

" बाळ.. मीनाक्षी आपल्यात नाही हे स्वीकार करायला खूप जड जातंय.. मी तुझ्या मम्माची जागा नाही घेऊ शकत.. पण एक बाप म्हणून जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न नक्की करीन.."

" डॅड तू ते करतोच आहेस.. " अत्यंत प्रभावी पणे तिने आपल्या भावनांवर ताबा मिळवला.. 

" आज मला एक फोन आला होता.. चमोलीवरून..."  बिपाशा. 

" हो.. आधी माझ्या ऑफिसमध्ये आलेला मीच तुझा नंबर दिला.. बिशु काय विचित्र योगायोग आहे.. मी गेली अनेक दिवस तुझ्याशी याबद्द्ल बोलायचे म्हणत होतो पण कधी योग जुळून आला नाही.. कदाचित आज ती योग्य वेळ असेल.."  

इतक्यात दारावर नॉक करण्याचा आवाज आला..

"येस.. पाटील आत या.. " तितक्यात पाटील म्हणून संबोधले गेलेले एक पन्नाशीच्या आसपासचे गृहस्थ आत आले.. त्यांच्या हातात एक लॅपटॉप आणि एक बटवासारखी वस्तू होती.. 

" इथे ठेवा.." मी. केळकरांनी टी पॉय कडे निर्देश केला.. 

" पाटील या तुम्ही.. काही गरज पडल्यास मी कॉल करतो.." ते गृहस्थ अदबीने होकारार्थी मान हलवून बाहेर गेले..

" डॅड काय आहे हे..??" 

" सांगतो.. बिशु किमान सहा वर्षे झालीत..  तू लंडनला होतीस.. एनजीओच्या कामानिमित्त मीनाक्षी अनेक दुर्गम, डोंगराळ भागास भेटी देत होती.. या दरम्यान नर्मदा खोऱ्यात अस्तंबा डोंगर दरीत काही दुर्मिळ अशा आदिवासी जमाती आहेत.. 

Pत्यांच्यापर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवण्याविषयी तिचे कार्य सुरू होते. तेव्हा तिचा संबंध तेथील काही विशिष्ट परिवारांशी आला.. खूप प्रभावित झाली ती.. तुला माहीत आहे.. आजच्या तंत्रज्ञानासोबतच पुरातन आयुर्वेद आणि चिकित्सापद्धतीवर मीनाक्षीचा खूप विश्वास होता.. आणि तोच तिच्या अभ्यासाचा विषयपण होता..  

ती सतत याबद्दल बोलायची.. तिच्या अपघाताच्यापूर्वी ती  संमोहन शास्त्र आणि आदिम जमाती याबद्दल बरेचदा बोलायची.. माझं व्यस्त शेड्युल.. मी फारसा वेळ देऊ शकलो नाही.. परंतु जितकं मला माहित आहे त्याबद्दल मी तुला सांगतो.. बाकी काही डाक्युमेंट्री आहेत ते तू लॅपटॉपमधून अभ्यासू शकशील.. "  

" डॅड मम्मा मला कधीच काही बोलली नाही याविषयी.. आणि माझा या सगळ्यांशी काय संबंध??" 

" मला पण राहून राहून याचंच आश्चर्य वाटते आहे.. थांब तुला अजून काही दाखवायचे आहे.." त्यांनी बटव्यातून एक माळ काढली.. 

एक विचित्र अशी दिसणारी ती माळ.. त्यातला मेरूमणी हा  मानवी डोळ्यासारखा दिसणारा.. काहीतरी विचित्र फिलिंग होत होती त्याला बघून..  

" ही माळ मीनाक्षीला त्या परिवाराकडून देण्यात आली.. आणि असंही सांगण्यात आलं की याचा मालक दुसरा कुणी असणार.. 

योग्य वेळ आली की हा ऐवज त्याच्या योग्य वारसदार पर्यंत पोहचेल.. आणि काल मला आलेल्या कॉलमध्ये या माळेचा उल्लेख केल्या गेला.."

" डॅड हे सारं खूपच विचित्र वाटते आहे.. तुला माहीत आहे अंधश्रद्धा म्हटले की माझा काकणभर विश्वास नाही आहे.. परंतु मम्माने जर मला कॉन्टॅक्ट करायला सांगून ठेवलं असेल तर नक्कीच तसं कारण असेल.. आणि आता जेव्हा ती आपल्यात नाही तर तिच्या शब्दाला वेगळा अर्थ उरतो.."

 "काय ठरवलं आहेस मग.." 

" मी जायचं म्हणते"

 "ओके व्हेरी गुड.. मी येतोय तुझ्यासोबत.." हे बिपाशाला आश्चर्याचा धक्का होता..

 "पण डॅड.." 

"माझं ठरलंय.. झोप आता.. उद्या निघुया. आणि हो लगेच कुठल्याही निष्कर्षाप्रति जाऊ नकोस..." बेडरुमचे दार ओढून घेत बाहेर जाताना मी.केळकर बोलले..

क्रमशः

भाग ३ 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2021/11/blog-post_31.html

कथा कशी  वाटली नक्की कळवा.. 

तुमचा अभिप्राय माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे.. 

शुद्धलेखनाच्या चुकांसाठी 🙏🙏.

©✍ सौ.सपना इंद्रवार (यवतमाळ)

कथेमध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत सर्वस्वी लेखकांचे आहेत.

सदर ही कथा लेखिका सपना इंद्रावार यांची असून सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. आम्ही त्यांच्या पुर्व परवानगीने ही कथा आमच्या वाचकांसाठी वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. सदर कथेवर आमचा कोणताही हक्क नाही.

आम्ही साहित्यचोरीचा निषेध करतो.

धन्यवाद..

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 Velvet Kavisha

Post a Comment

1 Comments

Please do not enter any spam link in the comment box