घरच्यांना धोपटावंसं वाटतंय
© Velvet Kavisha
परवा एका मैत्रिणीने फोन केला.
म्हणाली," वर्षा तुला असं होतं का..??"
मनात म्हटलं देवा!!!! मला तर नेहमीच कसं ना कसं होतंच असतं. आता कसंतरीच होतंय म्हटलं की नवरा विचारतो "नेमकं काय होतं ते सांग नाहीतर लिहून पाठवा" 🤦♀️🙆♀️🙆♀️🤭🤭
मैत्रिणीच्या फोनमुळे मी कन्फ्युजले.
"नेमकं कसं ते इस्कटून सांग"
"मला ना हल्ली असं वाटतं की, एक काठी घ्यावी आणि घरच्यांना बदडून काढावं!!" ती म्हणाली.
बापरे!! असं का बरं वाटतं असेल हिला..?? मला टेन्शन आलं.
" बाई ग्गं, कालपर्यंत बरी होतीस आज एकदम मारझोड करण्यावर का बरं उतरलीस..??" मी थोडं प्रेमानेच विचारलं. कारण मला धोपटून काढण्यासाठी बऱ्याच मैत्रिणी नंबर लावून बसल्या आहेत. त्यात हिची आणि भर नको.
"अगं काय सांगू..??"
"जे जमेल ते सांग गं.." मी जरा धीराने घेत म्हटलं.
तिने सुरुवात केली.
"नवरा, सासू, सासरे आणि दोन मुलं असं षटकोनी कुटुंब. प्रत्येकाचे वेगळे नखरे. याला ही भाजी आवडते त्याला ती नाही. सासऱ्यांना मऊ गोळा भात लागतो तर बाकीच्यांना फडफडीत. सासुबाईंना दहा वेळा गोड चहा, मिठाई चालते पण डायबिटीस आहे म्हणून तांदुळाची भाकरी चालत नाही. सासऱ्यांना पचत नाही म्हणून रोज पालेभाज्या तर मुलांना कडधान्यांची उसळ... नवऱ्याला टिफीनमध्ये सुकी भाजी. मेरी जिंदगी झंड बन गयी है रे..!! वाटतं एक काठी घ्यावी आणि सगळ्यांना बदडून काढावं." तिने एका दमात सांगितलं.
अशावेळी मला काही सल्ला देता येत नाही. "काढ तू बदडून म्हणावं आणि हिने रागाबरोबर खरंच बदडलं तर" असंही वाटून गेलं.
"बघ तुला कसं जमतंय ते..!!" असं म्हणून फोन ठेवला.
--------------------
फोन ठेवला आणि वाटलं, हे असं वाटणारी ही एकटीच नसणार...
लगेच मैत्रिणींच्या व्हॉट्स ॲप गृपवर गेले आणि मेसेज टाकला.
"तुम्हांला कधी घरच्यांना धोपटून काढावंस वाटतं का???"
" मला तर एका लाईनीत सगळ्यांना उभं करून चाबकाने फोडायला मन् करतं... " एक सखी.
"काय सांगू, परवा गणेश चतुर्थी होती. आम्ही मालवणी. आमच्याकडे गावी गणपती असतात. तरीही आम्ही जिथे राहू तिथे पुर्ण नैवेद्य बनवून म्हणजे वरण भात पाच भाज्या, अळुवडी, लोणचं पापड आणि मोदक असा नैवेद्य देवाला दाखवतो. सगळं आवरेपर्यंत दोन वाजले. हरतालिकेचा उपवास सोडायचा होता. ताटात नैवेद्य दाखवून झाला. आता ताट घेते सगळ्यांची म्हणत वाढायला घेतलं तर नवरा म्हणे एखादी चपाती नाहीतर भाकरी नाही का ताटात. एवढ्या भाज्या काय भाताबरोबर खायच्या का?? कशीतरी एक भाकरी भाजून वाढली ताटात. सणासुदीला भांडण नको म्हणून काही बोलले नाही. नाहीतर धोपटून काढावसंच वाटलं होतं..." दुसरी वैतागलेली सखी.
"हो ना. सणासुदीला जरा ॲडजस्ट नको का करायला..?? आमच्याकडे पण सेम. सासुबाईंना शुगर आहे. तुम्ही घरात काहीही बनवा पण चपाती हवीच. एक दिवस चालवून घेत नाहीत. काय तर म्हणे, डायबिटीसला भात चालत नाही. एरवी दिवसातून पाच सहा वेळा चहा ढोसतात. मिठाई, केक सफाचट करून टाकतात. तेव्हा कुठे जाते शुगर?? नवरा पण त्यांचीच बाजू घेतो. तेव्हा वाटतं एकेकाला धरुन बुकलून काढावं." तिसरी अगदीच पिसाटलेली.
"अगं खुप छान तयार व्हावं आणि नवऱ्याला विचारावं की "सांग बरं मी कशी दिसतेय..?" आणि त्याने मोबाईल मधून मान वर न काढताच,"तु नेहमीच सुंदर दिसतेस की. पहायचं काय त्यात??" असं म्हणाला की वाटतं ह्याच्या दोन मुस्काटात का हाणू नयेत." ही लव्ह मॅरेज केलेली सखी.
"माझा नवऱ्याच्या तब्बेतीच्या कुरबुरी सुरू आहेत. माईल्ड ॲटॅक पण येऊन गेलाय त्याला. घरात नुसता सुतकी चेहरा करून बसलेला असतो. जसा काय जगात हा एकटाच आजारी आहे. मी कोणाशी हसून बोलून राहिले तरी "तुला बरं खिदळायला होतं, इथे मला काय काय होतं असतं.." असं म्हणत राहतो. त्याचं पथ्यपाणी सांभाळून सगळं करावं तर दोन पोरं दोन तऱ्हेची. एक ऑफिसला जातो तर उपकारच करतो. मागच्या वर्षी बेंगलोरला होता तर बरोबर स्वतःच्या हाताने करत होता. इथे आलाय तर सकाळी पाच वाजल्यापासून उठून सगळं हातात द्यावं लागतं. धाकटी कार्टी तर त्याच्या वरताण. पोरगी आहे म्हणून काही मदतीची आशा करायला नको. मी मरेन तेव्हाच सुटेन या सगळ्यांतून. कधी कधी वाटतं एक पोकळ बांबू घ्यावा आणि एकेकाची चामडी लोळवावी.." पंचावन्नची मैत्रीण.
"अगं माझं तर डोकं फिरलंय. सासु सासरे गावी होते. सासुबाईंना बरं नाही म्हणून इकडे बोलावलं. आल्या आल्या चांगल्या एमडी डॉक्टरकडे नेलं. खुप टेस्ट करून झाल्या. काहींचे रिपोर्ट आले तर काहींचे यायचे होते दुसऱ्या दिवशी. आणि रात्रीचं सासुबाईंना उलटी होऊन बेशुद्ध पडल्या. कपड्यातच शी सू झाली त्यांना. मोठा दीर आणि माझा नवरा भोकाड पसरुन रडायला लागले आईकडे बघून. जाऊबाईंनी माझ्या एक वर्षाच्या मुलाला आणि त्यांच्या मुलीला घेतलं आणि बाजूला झाली. सासऱ्यांना काही सूचेना. ते बाहेर जाऊन बसले. मी कसंबसं शेजारच्या वहिनींना बोलावून सासुचे कपडे बदलले. शेजाऱ्यांनी ॲम्ब्युलन्स बोलावली आणि हॉस्पिटलमध्ये पोचलो. देवाशप्पथ खरं सांगते असं वाटलं ना, की एक कोवळा पोकळ बांबू घ्यावा आणि एकेकाला धोपटून काढावं. " बांबूचं नाव वाचून एक जॉईंट फॅमिलीत राहणारी मैत्रीण उसकली.
त्याखाली सगळ्यांचे मेसेज आले.
होय
होय
होय
असे बरेच.
म्हणजे संसारात पडलेल्या प्रत्येकीला कधी ना कधी आपल्या घरच्या लोकांना बदडून काढावंस वाटलेलं आहे. म्हणजे हे वाटणं काही साधंसुधं नाही. तर Universal आहे.
पण या मैत्रिणी एवढ्या का बरं वैतागून गेल्या असतील?? खरं तर घर हे त्या घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं असतं. त्यातल्या प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्याला समजून, जाणून घ्यायला हवं. कधी कधी घरच्या बाईकडे सुपरवुमन म्हणून पाहिलं जातं. तिला ही काही त्रास होत असेल, ती ही दमत असेल असं कोणी समजूनच घेत नाही. ती घरात असते म्हणजे तिने सगळं केलं पाहिजे हा अट्टाहास असतो. आपल्या मुलांना अजिबात कामाची सवय न लावणं यामुळे स्त्रिया स्वतःहून कामं ओढवून घेतात. मुलं जरी नोकरी करत असली तरी त्यांनी स्वतःची कामं स्वतः करावीत एवढी शिस्त तर आपण लावूच शकतो ना..??
मोबाईल बंद करून ठेवला आणि जाग्यावरून उठले. ज्याच्या नावाची पट्टी दारावर लावलीय तो, घराचा मालक तंगड्यांवर तंगड्या टाकून सोफ्यावर बसला होता. तोंडासमोर टीव्ही चालू आणि डोकं मोबाईलमध्ये. खाली लादीवर पोरं काळ्या निळ्या ऑईलपेस्टल क्रेयॉनने चौकोन आखून hopscotch खेळायच्या तयारीत होती. सगळे soft toys प्रेक्षक बनून बसले होते.
जाऊ दे. अशावेळी आपण नेहमीसारखा विचार करू," आपल्याला काय करायचंय..!!"
कधीं कधीं लक्ष देण्यात काहीच पॉईंट नसतो. दुर्लक्ष करायला शिकायला हवं नाहीतर या मैत्रिणींसारखं आपल्याला कधी नव्हे ते वाटू शकतं, "एखाद्या दिवशी धोपटून काढावं असं..!!"🙆♀️🙆♀️
© Velvet Kavisha
सदर लेखाचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
2 Comments
झक्कास 👍🏻
ReplyDeleteखूपच सुंदर
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box