दुसऱ्याचं घेऊन किती दिवस पुरणार



दुसऱ्याचं घेऊन किती दिवस पुरणार??

© Velvet Kavisha ✍️

मीना शेतकरी कुटुंबातील. तीन भावंडे. आई-वडील आजी आजोबा अशा सात माणसांचं कुटुंब. मीना थोरली लेक. बारावीनंतर शिक्षण संपलं. ग्रामपंचायतीत तलाठ्याच्या हाताखाली पार्ट टाइम नोकरी. चार तास रोज काम आणि पाचशे रुपये पगार. उरलेल्या वेळेत शेतात आई वडिलांना मदत करणं आलंच.  


विसावं लागलं तसं सदाशिवने मीनासाठी वरसंशोधन सुरू केलं. चार लोकांना सांगून ठेवलं. पाहुण्यासोयऱ्यात निरोप पाठवले. "आमच्या परिस्थितीनुसार स्थळ बघा." उगाच नाकापेक्षा मोती जड नको व्हायला. 


करता करता पाच सहा स्थळांची चाचपणी झाली. एक स्थळ स्वतःहून आलं. मुलाच्या आई-वडिलांनी आठ दिवसांपूर्वी मीनाला एका लग्नात पाहिलेलं. गुणी मीना आवडून गेली त्यांना. बऱ्यापैकी स्थिरस्थावर कुटुंब होतं.   मधुकरराव जिल्हापरिषदेच्या शाळेत शिपाई होते. 


त्यांचा एकुलता एक मुलगा नितीन. त्याला अभ्यासात गोडी नव्हती. जास्त शिकला नाही. पाचवीत दोन वेळा नापास झाला आणि शाळा सोडून बसला. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू रिपेअर करायला शिकला. लाईट फिटिंगची कामं, वायरिंगची कामं छानपैकी करायचा. नोकरीत मिळणार नाही इतकं कमावून आणत होता. घरासमोर मारुती ८०० उभी राहून आर्थिक स्थैर्य दाखवत होती. नितीन प्रामाणिक आणि निर्व्यसनी. काळा सावळा आणि मितभाषी. स्वतःहून बोलत नसे कोणाशी. एका शब्दात उत्तर दिलं की झालं.‌


मधुकररावांना त्याची काळजी वाटायची. कसं होईल या मुलाचं?? याला बायको चांगली आणि समजून घेणारी हवी. तशीच मुलगी सून म्हणून शोधत होते.  खुप स्थळं पाहून झाली होती, पण मनाला पटली नाहीत. मीनाला पाहिलं आणि मनाने कौल दिला. तेव्हापासून तिची चौकशी करून आज ते सदाशिवच्या घरी पोचले.  


त्यांनी इकडचं तिकडंच न बोलता सरळ मुद्याला सुरुवात केली. मीनाला मागणी घातली. "चालणार असेल तर उद्या नितीन आणि त्याच्या आईला घेऊन येतो मुलगी पहायला." म्हणाले.


सदाशिव गडबडला. एवढं मोठं स्थळ. आपल्याला झेपेल का?? परिस्थिती अशी बेताची. मजुरीला जावं लागतं कधी कधी. लेकीच्या सुखासाठी काही करु शकतो. पण पैशाचं सोंग कसं आणता येईल.


"काय म्हणता तुम्ही..??" सदाशिवला विचारात पडलेला पाहून मधुकररावांनी पुन्हा विचारलं.


" काही नाही. तुमच्या तोलामोलाचं स्थळ नाही आमचं. आंघोळीला घेतलेल्या बादलीभर पाण्यात वाहून नको जायला आम्ही. नाक, कान, माळेवरची साडी आणि दारात लग्न लावून देईन इतकीच ऐपत आहे. पाहुण्यांची उठबस, आगतस्वागत नीट करेन. पण बाकी काही... " सदाशिव बोलता बोलता थांबला.

"बाकी काही उसनवार करता येईल पण पैशाचं सोंग कुठून आणू??" सदाशिवने मनातला विचार बोलून दाखवला.


"आम्हांला काही नको. देवदयेने नोकरी, शेती सगळं आहे. तुम्ही फक्त एक नारळ देऊन मुलगी पाटावर उभी करा. एकुलता एक मुलगा आहे. तुमची मुलगी योग्य वाटते त्याच्यासाठी. म्हणून एवढ्या लांब आलोय. तुमच्याकडून काही घेऊन आम्हांला काय आयुष्यभर पुरणार आहे का..??" मधुकररावांनी सांगितलं.


सदाशिवने मान डोलावली तसे मधुकरराव निघाले. दोन दिवसांनी बायको आणि मुलाला घेऊन मीनाला पहायला आले. मुलाकडून होकार आला.

सगळी बोलणी झाली. बैठका झाल्या. यथावकाश साखरपुडा झाला. मुद्दाम दुपारी तीनची वेळ ठरवली मधुकररावांनी. म्हणजे दुपारी मंडळी घरून जेऊन जातील आणि येऊन जेवतील. सदाशिवला उगाच सोयऱ्यांच्या जेवणाचा लोड नको. सरबत आणि लाडू फरसाणावर भागलं.  


साखरपुड्यानंतर एकदा सदाशिव बाजारात गेला होता. घाईघाईत सगळी खरेदी केली आणि दोन हातात पिशव्या घेऊन एस टी स्टँडवर पोचला. थोडासा उशीर झाला पोचायला. बाराची एसटी निघून गेली. रिक्षावाले साठ रुपये घेतील. कसं परवडणार.🙆‍♀️🙆‍♀️ तीनच्या एसटीपर्यंत तीन तास जातील. हळूहळू चालत गेलो तर दीड तासात पोचायला होईल. रस्त्यात कोणी गाडीवाला, सायकलवाला भेटला तर तेवढंच लवकर पोचेन.  


तो विचारातच पिशव्या घेऊन चालू लागला. स्टॅंडमधून बाहेर पडला. वडापावच्या गाडीवर वडापाव घेऊन खाल्ला. दोन हातात पिशव्या घेऊन चालत तिठ्यावर आला. रस्ता क्रॉस करून पुढे जाणार एवढ्यात "बाबा, बाबा" अशी हाक ऐकू आली. पण आपल्याला कोण बाबा म्हणणार??? दुसऱ्या कोणाला कोणी आवाज देत असेल म्हणत त्याने झपाझप पावले टाकायला सुरुवात केली.


वीस पंचवीस पावले चालल्यावर "बाबा, बाबा" हाका मारत धापा टाकत नितीन येताना दिसला. 

"अरे जावईबापू..?? तुम्ही इकडे कुठे??" सदाशिवने पायाला पिशव्या टेकवून उभं राहतं विचारलं.

"अहो त्या समोरच्या गॅरेजवाल्याकडे पंक्चर काढायला म्हणून थांबलो होतो. झालंच आता. तुम्ही थांबा मी गाडी घेऊन येतो.  तुम्हांला सोडतो घरी. एवढ्या लांब चालत कसे जाणार इतकं सामान घेऊन." म्हणत पुन्हा धावत मागे गॅरेजकडे गेला.  


सदाशिवला थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. नितीन आपली स्काय ब्लू कलरची बजाज चेतक घेऊन आला. सदाशिवची एक पिशवी पायाशी ठेवून घेतली.  

एक पिशवी घेऊन सदाशिव गाडीवर बसला. जावयाच्या गाडीवर बसलेल्या सदाशिवची छाती अभिमानाने भरून आली. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्याला तो हात दाखवत होता.  


सासुरवाडीला चहा पाणी घेऊन नितीन निघाला. निघताना वाकून सदाशिवला नमस्कार केला. थोडं थांबून आत डोकावून पाहिलं.  

"मीने, जरा जावईबापुंना आखाड्यापर्यंत सोडून ये  जा." म्हणत सदाशिव अंगणातल्या पायऱ्या उतरून खाली आला. 


पाठमोऱ्या लेकीला आपल्या भावी जावयासोबत चालताना बघून सदाशिव आनंदाने सुखावला. "जोडी  अगदी लक्ष्मी नारायणासारखं दिसते." म्हणत देवाला हात जोडले.   


मधुकररावांनी पत्रिका छापल्या. दोन्हीकडच्या पत्रिका त्यांनीच छापून दिल्या. सदाशिवला थोड्या स्वस्तात पडल्या. चार पैसे वाचले.  मधुकररावांकडून जवळपास पाचसातशे पत्रावळी उठतील असा अंदाज होता. सदाशिवची मंडळी पाहता, दोन्हीकडची मिळून बाराशेच्या आसपास मंडळी होत होती. 


मधुकररावांनी सुवर्णमध्य काढला. "तुम्ही नवरी आणि तुमचं वऱ्हाड घेऊन आमच्या गावी या."  


ट्रकमधून वऱ्हाड मधुकररावांच्या गावी पोचलं. त्यांच्या घरापासून चार घरं सोडून असणाऱ्या घरात नवरीची आणि वऱ्हाडाची सोय केली. मांडव, पताका, पाण्याची पिंप. सगळी सोय होती.


मुहुर्तावर लग्न लागलं. नवऱ्याकडून साखरेच्या पुड्या आणि लाडू वाटले गेले. नवरीकडून बाराशे लाडू वाटून झाले आणि थोडे कमी पडले. आयत्यावेळी लाडू कुठून तरी आणायला हवेत.   सदाशिव "इथे जवळपास दुकान आहे का एखादं??" कोणाला तरी विचारत होता. मधुकररावांना कळलं. त्यांनी एका पिशवीत लाडूच्या सहा पिशव्या टाकल्या आणि त्या घेऊन ते सदाशिव पर्यंत पोचले. हातातली पिशवी त्यांच्याकडे देत "हे घ्या लाडू" म्हणाले.


सदाशिवला कळेना, काय करावं. 

"घ्या. संकोच करू नका. मनात काही आणू नका. तुमच्या नाही माझ्याच लेकीचं लग्न आहे असं समजा." म्हणत मधुकररावांनी सदाशिवच्या खांद्यावर हात ठेवला.  

त्यांचा हात हातात घेत सदाशिवने आभार मानले. मधुकररावांनी व्याहींना आलिंगन देत आपुलकी दाखवली. 

" माणसं फक्त पैशांनीच मोठी नाहीत तर मनाने ही श्रीमंत आहेत. लेकीने नशीब काढलं." पाठमोऱ्या मधुकररावांकडे पाहत सदाशिव पुटपुटला. आपली लेक चांगल्या घरी चांगल्या लोकांमध्ये पडली याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर पसरलं.


मधुकररावांसारखी माणसं असतील तर मुलीच्या बापाला लाचार व्हायची गरजच पडणार नाही. काय वाटतं तुम्हांला...??  

समाप्त.

© Velvet Kavisha ✍️

सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव. 


Post a Comment

1 Comments

Please do not enter any spam link in the comment box