दुनिया झुकेगी क्या...???
गोष्ट २००३ सालातली...
श्वेता २००२ पासून चर्नीरोडला एका एक्स्पोर्ट कंपनीत अकाउंट असिस्टंटची नोकरी करत होती. एका ओळखीतून नोकरी लागलेली. TY ला दोन विषयात केटी. म्हणजे नापासच...!!
आता नोकरी करून शिकायचं आणि स्वतःच समजेल तसा अभ्यास करायचा म्हणजे अभ्यासाचे सहज सहज बारा वाजणारच ना...!!!
इंटरव्ह्यूमध्ये विचारलं " तुम्ही नापास आहात... मग तुम्ही मागता तेवढा पगार कसा देणार..?? "
" सर मी नापास आहे म्हणजे शिकलेच नाही असं नाही.. ज्याअर्थी मी नापास आहे, त्याअर्थी मी परीक्षा दिलीयं. आणि साधारणपणे परीक्षा द्यायच्याच आहेत हे माहिती असलेला माणूस अभ्यास करतोच. माझा थोडा अभ्यास कमी पडला इतकचं...".. श्वेताने समजावून सांगितले..
" आम्ही आधी काम बघू आणि मग पगार ठरवू..." मॅनेजरने सांगितलं.
He was Manager not a damager... श्वेताला बरं वाटलं.
"ठीक आहे. दोन दिवस मी काम करीन. ते बघा आणि सांगा मला." श्वेताने सांगितलं तसं "उद्यापासून या." म्हणत मॅनेजरने विषय संपवला.
दोन दिवसांची वेळ दिली ते बरं झालं. नाहीतर काम बघायच्या नावाखाली चांगलं महिनाभर काम करवून घेतात आणि मग "नाही" सांगतात. मैत्रिणींचे अनुभव माहिती होते तिला. पगार देतात हो महिन्याचा. पण एक महिन्यानंतर पुन्हा बेरोजगारी. म्हणून ही खबरदारी.
ती काम इमानदारीने करते एकदम. कामाचा अनुभव ही होता. त्यांना काम आवडलं आणि ४०००/- रुपये पगार + ट्रेनचा पास असं ठरलं. रोजचा कांजुरमार्ग ते चर्नीरोड असा प्रवास सुरु झाला...
ट्रेन आणि train related problems तेव्हाही तसेच जसे आता आहेत. नेहमीच्या धावतपळीत स्टेशन गाठलं. खुप गर्दी. चार पाच ट्रेन सोडल्या. श्वेता तशी रिस्क घेत नाही. सिर सलामत रखने का. जियेंगे तो और भी लडेंगे. यावर जबरदस्त विश्वास. पाऊण तास झाला तरी चढता येईना. एका ट्रेनला गर्दी थोडी कमी वाटली आणि ती चढली नेहमीप्रमाणे. पण आत काही जाता येईना. तिचा अंदाज चुकलेला. एक पाय फुटबोर्डवर. एका हाताने दांडा पकडलेला. ट्रेन सुरु. शरीर पुर्ण बाहेर. पहिल्यांदाच असं झालेलं. "माझे मरण मी पाहिले डोळा" फील. आता विक्रोळीत तरी आत जायला मिळायला हवं. विक्रोळी स्टेशन आलं. छे! निभाव लागलाच नाही. पटरीत उडी मारावी अशा विचारात असतानाच ट्रेन सुरु झाली. गोदरेजच्या पुढे एक खांबा यायचा. तो चुकला तर ठीक. नाहीतर सरळ डोकं त्यावर आपटून होतयं आज आपलं धिना धीन् धा... श्वेताच्या डोक्यात विचारचक्र सुरुच.
गोदरेज पास होतानाच एका बाईने कमरेत हात घालून तिला आत ओढून धरलं. खांबा चुकला होता. घाटकोपर आलं आणि आत उभं राहायला जागा झाली... आज वाचलो बुवा...!!
दहाचं ऑफिस. पंधरा मिनिटे लेट पोचलेलं चालायचं. पण आज चक्क दीड तास उशीर झालेला. सकाळी एक एक्स्पोर्ट काढायचं होतं. त्यालाही लेट झालेला. ऑफिसला पोचली. आरशात पाहिलं तर अगदीच अवतार झालेला दिसला. पटकन आवरून डेस्क पकडला..
"चहा दे बाबा..." शर्माला (pantry boy) सांगितलं.
डायमंड असोर्टिंग, बॉयलिंग करणारे काका आले. म्हणाले. " शेठ जाम उखडलाय. आज तुझं काही खरं नाही..."
शेठ म्हणजे डायरेक्टरचे वडील. वय ६९ वर्षे.
गुजराती लोकांचं एक बरं असतं. त्यांच्याकडे तिसरी पिढी कर्तबगार झाली तरी पहिल्या पिढीला विसरत नाही. वेड्यात काढत नाहीत आपल्यासारखे. त्यांना ही तितकाच मान. उलट त्याच पिढीमुळे आपली पिढी इथे आहे ही कृतज्ञता.
हे मोठे शेठ म्हणजे एकदम खडूस. बरं बोलायला लागले की थांबणार नाही. त्यांना सगळेच टरकून राहायचे... "आज आपलं काही खरं नाही बुवा. बडबडून कान पिकवणार आजोबा." श्वेताला वाटून गेलं
तेवढ्यात इंटरकाँम वाजला...
"मॅडम को अंदर भेजो.."
"सांग बाई त्यांना, चहा पिऊन येते.." श्वेता.
रिसेप्शनिस्टने काही सांगितले नाही.
"हां ठीक हैं" म्हणत फोन ठेवला...
एका जाणकार काकांना अंदाज आला. श्वेताला समजावलं. म्हणाले- " बघ जा. शेठ काय म्हणतोय ते. नाही तर अजून उखडेल. आपल्याला कामाची गरज असते. आपण नोकर माणसं. ऐकून घ्यायचं. गप्प राहायचं. जखमा थोडीच होतात आपल्याला. उगाच उलटसुलट काही बोलू नकोस. नोकरीवरून काढलं तर काय करशील?? मावशीकडे राहतेस तिला कुठून पैसे देशील?? गावी काय पाठवशील?? त्यापेक्षा गप्प राहून निघून ये."
आता यांना कोण सांगणार. गरीब आहोत. लाचार नाही. मनाला होतात हो यातना. श्वेता मनाशी म्हणाली. पण काकांनी दाखवलेल्या आपुलकीने बरं वाटलं.
"सर, आपने बुलाया...?? " कॅबिनच्या दरवाजातून डोकावत श्वेताने विचारलं.
"एक तो आप लेट आयी हो...! तो रिपोर्ट करना चाहिए ना?? आपको बुलाया तो तुरंत आना चाहिए तो आप महारानी अभी आ रहीं हो...!! आज एक्स्पोर्ट जानेवाला था, आपको पता था ना?? अगर आज एक्स्पोर्ट नहीं गया तो कंपनी को नुकसान हो सकता हैं.. आपको पता है?? फिर भी आप लेट आयें..??" शेठजींचा ताड् तडातड् तडतड बाजा...
"सर, वो आज ट्रेन का problem था... तो लेट हो गया.." श्वेता.
"अरे तुम लोगों का रोज का नाटक है यें... घर से जल्दी निकलोगे नहीं और ट्रेन का नाम बता दोगे... पगार लेते हो तो काम करने का सीधे ढंग से... हम लोग काम का पैसा देते है आपको...." शेठजी तापलेले.
याला आता काय काय सांगू?? सकाळी साडेपाचला उठायचं. मग अशा ठिकाणी हातात बादली घेऊन जायचं. बादली नंबरात लावून "मेरा नंबर कब आयेगा??" म्हणत उभं राहायचं. आपण इथे कशासाठी आलो आहोत हे ही विसरायला व्हावं. त्यात अर्धा पाऊण तास खर्ची व्हायचा. नंतर सगळं आवरून, टिफीन बनवून साडेआठला निघायचं.
आदल्या दिवशी ट्रेनमुळे उशीर झाला म्हणून दुसऱ्या दिवशी लवकर निघालात की त्या दिवशी ट्रेन एकदम वेळेत. तुम्ही इतक्या लवकर पोचणार की ऑफिसही उघडलेलं नसतं. अस्सा सगळा गोंधळ आणि हे शेठजी म्हणतात "घर से जल्दी निकलते नहीं हो..."🤦♀️🤦♀️ काय सांगावं यांना आणि कळणार तरी काय हे.. ?? श्वेता पुन्हा विचारात.
"क्या पुछ रहे है हम?? आपको जो सॅलरी दी जाती है वो काम करने की..!! लेट आने की नहीं." शेठजींनी श्वेताची तंद्री भंग केली.
आता मात्र तिचं टाळकं सटकलंच. तिने शेठजींच्या समोरची खुर्ची मागे ओढून त्यात बसली.
"सर जी, आप काम करने की सॅलरी दे रहे हैं तो मैं काम कर रही हुॅं..। मुझे लेट होता है तो खाने की सुट्टी मैं काम में लगा देती हुॅं..। पाच मिनट में खाना खा के काम पें लग जाती हुॅं..। शाम को भी आप लेट छोडते हो..।"
"वो तो सभी ऑफिस में होता है..।" शेठजी
"सर, आपका बिझनेस और ऑफिस के लिये आप सुबह दस बजे निकलते हो घर सें और मैं आपके ऑफिस के लिये साडे आठ बजे निकलती हुॅं...। वो भी चंद पैसों के लिये..। कभी ट्रेन से ट्रॅवल कर के देखिए..। जान खतरें में डाल के ऑफिस पहुॅंच जाते है। आप लोग बहोत दयालुं होते है। मक्खी तक को भी आप मारते नहीं हो पर हमारें जैसे आपके एम्प्लॉयी का आप खून चुसते हो। शायद आपके भगवान को ये अच्छा लग रहा होगा। मैं टाईम पर पहुॅंच ने की कोशिश करती हुॅं पर कभी कबार लेट हो जाता हैं तो आपको चलता नहीं। शायद आपको कद्र ही नहीं लोगों की। मुझें आप जैसे लोगों के साथ काम ही नहीं करना है।" श्वेता रागाने उठून तिथून निघून आली. येऊन डेस्क वर येऊन बसली.
बऱ्यापैकी आवाज चढला होता तिचा ही. खरंतर तिला कुठेही जॉब मिळाला असता. कामात शार्प होती ती. आज तर अगदी मरण जवळून पाहिलं होतं तिने. काही झालं असतं म्हणजे?? आई-वडील बिचारे पोरगी मुंबईत नोकरीला म्हणून खुश. मागची तीन भावंडं शिकत होती.
एवढं सगळं होतं तरी स्वाभिमान नावाची काही गोष्ट असते की नाही?? तो कसा सोडायचा??
मॅनेजर मार्फत सगळा प्रकार डायरेक्टरला कळला. त्यांना जाण होती. संध्याकाळी ऑफिसला आल्यावर त्यांनी बोलावून घेतलं तिला कॅबिनमध्ये.
"मॅडम, बडे शेठ कुछ बोले है वो मन में नहीं रखना। आपके दादाजी होते और ऐसे बोलते तो क्या आप उन्हें छोड़ के चली जाती?? जब आप बाहर के डेस्कवाले लोग काम संभालते हो तो अंदर का ऑफिस चलता है, आगे जाता हैं। आप लोग कंपनी के लिये उतने ही महत्वपूर्ण है जितने की हम हैं। पापा जो कुछ बोले उसके लिये मै आपको सॉरी बोलता हुॅं। उन्हें भी समझा देता हुॅं।" डायरेक्टर अगदीच मनापासून बोलले.
"ओके सर.... ॲंड थॅंक्यु सो मच" म्हणून ती बाहेर आली.
केबिन बाहेर उभ्या असलेल्या शर्माने बाकीच्या स्टाफला खबर पोचवली.
"झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए..।" मेहुलभाई बोलले.
त्यानंतर जवळपास दहा वर्षे श्वेताने तिथे नोकरी केली. तिच्या लग्नात ऑफिसचे सगळे आलेच होते. पण शेठजी स्वतः मॅनेजरसोबत आले होते. नंतर मुलं झाली तशी श्वेताने नोकरी सोडली पण आज ही ऑफिसमध्ये तिच्या नावानिशी ती लक्षात आहे सगळ्यांच्या.
समाप्त.
© Velvet Kavisha ✍️
सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box