थोरली सून वाईटच

 


थोरली सून वाईटच

© Velvet Kavisha


संगीताचं लग्न झालं. माप ओलांडून घरात आली. नव्याची नवलाई संपली. घरची थोरली सून म्हणून हळूहळू सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावर टाकल्या गेल्या. बहिण, धाकटा भाऊ यांचं करून गावी राहणाऱ्या आईवडीलांचं करण्यात महेशचा पगार संपू लागला.


संगीता काटकसरीने पण नेटाने संसार करत होती. जशी आपली लहान भावंडं तशी त्याची. जसे आपल्या आईवडिलांना दादा वहिनी सांभाळतात तसं महेशच्या आई-बाबांना सांभाळणं आपलं कर्तव्य आहे. महेश नाही पाहणार तर कोण पाहणार त्यांना?? म्हणून सगळं करत होती.


पहिली मुलगी झाली तशी संगिताने नोकरी सोडली.  अचानक उद्भवलेल्या मेडिकल इमर्जन्सीमुळे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सासुबाईंचं गर्भपिशवीचं ऑपरेशन करावं लागलं. दोन महिने तान्ह्या मुलीचं आणि सासुबाईंचं करून संगिता अक्षरशः घायकुतीला आली होती. पण पर्याय नव्हता. सासुबाई बऱ्या होऊन गावी गेल्या.  


MBA in HR करून दिराला नुकतीच नोकरी लागली. तो थोडे पैसे घरखर्चाला देऊ लागला. सहा महिने छान नोकरी केल्यानंतर कंपनीने त्याला तीन वर्षांसाठी हॉंगकॉंग ऑफिसला पाठवलं. राहण्या-खाण्याची, येण्या-जाण्याची सगळी सोय कंपनीची. पगार सगळा बॅलन्स.  

एकदा संगिताची मुलगी आजारी पडली. ॲडमिट करावं लागलं. पैसे नव्हतेच. हॉंगकॉंगला भावाच्या ऑफिसमध्ये ISD कॉल केला. थोडे पैसे मागितले. महेशला वाटलं. त्याचं शिक्षण, ते होईपर्यंतचा सगळा खर्च आपणच तर केलाय आता  गरज आहे तर मदत घेऊ त्याची असा विचार केला महेशने.  


"आता तो काही तुमच्यासोबत राहत नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्याकडून काही पैसे घेऊ नका."  संगिताच्या सासुबाईंनी सांगितलं.

"तसेही आता तुम्हीच आमच्या रुममध्ये राहताय तर आमच्या खर्चासाठी तुम्हीच पैसे पाठवत जा.." सासऱ्यांनी संगिताला सांगितलं.  


नर्सिंग पुर्ण केलेली नणंद नोकरीला लागली. दोन्ही भावांनी जमेल तसा खर्च करून लग्न करून दिलं. तरीही धाकट्यापेक्षा महेशचाच खर्च जास्त झाला. बहिणीच्या मायेपोटी ते ही जमवलं कसं तरी. लग्नानंतरचे सगळे रितीरीवाज मानपान महेशनेच पाहिले.  


वर्षभराने बाळंतपणाला आलेल्या नणंदेचं संगिताने सगळं केलं. सातव्या महिन्यात आलेली नणंद बाळं सहा महिन्यांचं झाल्यावरच सासरी गेली. 


धाकट्याच्या लग्नाची शोधमोहीम सुरू झाली आणि सासुसासरे गावाहून इकडेच येऊन बसले.  


"रूम वन प्लस वन करून घे. म्हणजे नव्या जोडप्याला वर ऊठबस करायला बरं. नवीन सून नोकरीवालीच बघू. संगिता घरातच असते ना, मग सगळ्यांनी घरात बसून काय करायचं आहे. " सासऱ्यांनी महेशला सांगितलं.


यावेळी मात्र महेशला राग आला. "एवढी वर्षे मी आणि माझी बायको मरमर मरतोय. आमचं लग्न झालं तेव्हा अख्खं घर भरलेलं होतं माणसांनी. हनिमूनला जाऊन आलो तेवढाच काय तो एकांत. आणि आता धाकट्याचं लग्न ठरलं ही नाही तोवर त्यांच्या प्रायव्हसीची चिंता यांना.  जाऊ दे आई-वडील आहेत म्हणून विचार केला तर यांना काही पडलेलंच नाही. मला गरज असतानाही कोणी मदत करत नाही. जो तो आपलं सांभाळून आहे. आता यापुढे गुंतायचं नाही. संगीता आणि श्रावणीचेही हाल नको आपल्यामुळे. लग्नात घातलेल्या मंगळसूत्राशिवाय एक दागिना नाही घेऊ शकलो आजवर बायकोला. डोक्यावर पाच लाखांचं पर्सनल लोन आहे. आताही आई बाबांना वाटत की, संगितानेच सगळ्यांचं करावं. उद्या धाकट्याला मुलं झाली की ती सांभाळायची जबाबदारी पण संगितावरच पडेल. आई-बाबा पण किती स्वार्थी विचार करताहेत.."  

"महेश, काय म्हणतात रे बाबा..?? रुम वन प्लस वन करून घे म्हणताहेत." आईने विचारलं तसा महेश विचारातून बाहेर आला. 


"आई-बाबा, मला वाटतं ही रुम वन प्लस वन करून घेण्यापेक्षा मी भाड्याने राहतो दुसरीकडे. तुम्ही धाकट्याचं लग्न करून द्या. त्याच्या जेवणाखाण्याची सोय होईल. आणि माझे ही काही लाख वाचतील. आधीच माझ्या डोक्यावर पाच लाखांचं कर्ज आहे. त्यात अजून एक दोन लाखांचं कर्ज मिळेल असं वाटत नाही. धाकट्याने आजवर कोणताच खर्च उचललेला नाही. त्याला खोलीचं काम करून घेऊ देत आणि राहू देत इथे. तुम्ही गावाहून आलात की इथेच येऊन रहा. तेव्हा आम्ही ही येऊ चार दिवस इथे रहायला.." महेशने आई बाबांना स्पष्टपणे सांगितलं.


यावेळी त्याने आईबाबांची परवानगी न मागता आपला निर्णय ऐकवला होता. अर्थात दोघांना तो अनपेक्षितच होता. 

ते काही बोलण्याआधी, "मी तुम्हांला खर्चासाठी लागणारे पैसे दर महिन्याला पाठवत जाईन. पण या महिन्यापासून अर्धेच. कारण आता मला घराचं भाडं ही भरावं लागणार आहे." महेशने आपली बाजू मांडली.

"आणि धाकट्या, तू अर्धे पैसे पाठवत जा आई-बाबांना या महिन्यापासून.." धाकट्याकडे पाहत महेश म्हणाला. 


खरं तर आईबाबांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती महेशचं हे बोलणं ऐकून. पण महेश इतका ठामपणे बोलत होता की, पुढे बोलायची दोघांची हिंमत झाली नाही.


ठरल्याप्रमाणे महेशने पुढच्याच महिन्यात विरारला भाड्याने फ्लॅट घेतला. संगीताने सगळं हौसेने घर सजवलं.  संगीता घर सांभाळून पतपेढीत पार्ट टाईम जॉब करू लागली. डे केअरमध्ये चार तासांसाठी श्रावणीची छान सोय झाली.  


धाकट्याचं लग्न ठरलं. महेश हॉल वगैरे पाहण्यासाठी, पाहुण्यांकडे बोलणी करण्यासाठी गेला होता. लग्न ठरलं आणि झालं ही. महेश आणि संगिता हळदीच्या दिवशी जाऊन तीन दिवस राहिले. नव्या नवरीचं आगतस्वागत करून पुन्हा आपल्या घरी आले.


धाकट्याला मुलीकडच्यांनी गोड बोलून चांगलंच लुटलं होतं. महेश शांत होता. जे होतंय ते होऊ दे. प्रत्येक जण सुज्ञ आहे. ज्याचे निर्णय त्यालाच घेऊ दे म्हणत बाजूला झाला.  

विरारला गेल्यानंतर संगिता प्रेग्नंट राहिली. नवव्या महिन्यापर्यंत नोकरी केली. तिची आई बाळंतपणासाठी आली तिच्याकडे. मुलगा झाला. महेशचं चौकोनी कुटुंब पुर्ण झालं. 

मुलाला दोन वर्षे झाली तशी त्यालाही डे केअरमध्ये ठेवून संगिता पुर्णवेळ नोकरी करू लागली.  


सहा वर्षे भाड्याच्या घरात राहिल्यानंतर महेशने विरारमध्येच घर घेतलं. लोन काढावंच लागलं. पण निदान स्वतःच घर झालं. 


धाकट्याने आता घर एकदम टकाटक बनवून घेतलंय. वन प्लस वन करून घेतलं. त्यालाही एकामागे एक अशी दोन मुलं झाली. मोठा मुलगा आणि दुसरी मुलगी.  


संगिताच्या बाळंतपणाच्या वेळेस कणभर ही मदत न करणारी तिची सासू इथेच येऊन राहिलीय. धाकट्याची लेकरं सांभाळतेय. धाकटा आणि त्याची बायको नोकरी करतात. 


वाढदिवस, सण समारंभ आले की महेश आणि संगिता धाकट्याकडे जाऊन, दोन चार दिवस राहून येतात. संगिता गेली की, आजुबाजुचे सगळे भेटायला येतात. आपुलकीने चौकशी करतात.  


महेश, संगिता विरारला गेले की, सासुबाई शेजाऱ्यांपाजाऱ्यांना सांगते, "माझा थोरला मुलगा चांगला आहे. कधी आमचा शब्द टाळत नव्हता. पण थोरली सून लबाड आहे. फारच हुशार निघाली. ती शिकवते त्याला.   आमचं घर तोडलं. आमच्या मुलाला आमच्यापासून दूर केलं.." 


शेजारी तरी काय बोलणार?? सगळे निर्णय यांच्या मुलाने घेतले. थोरल्या सूनेने यांचं इतकं केलं, तरीही या म्हणतात, "थोरली सून वाईटच.."  


समाप्त

© Velvet Kavisha ✍️

सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव.





Post a Comment

6 Comments

  1. माझी कहाणी आणि यातील बरेच प्रसंग अन् पात्र सारखेच आहेत.

    ReplyDelete
  2. मला माझीच कथा वाटतेय.

    ReplyDelete
  3. अगदी बरोबर... मला अनुभव आहे

    ReplyDelete
  4. Palthya ghdyavr pani .. he Asch hot aalay

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box