नावडत्या सूनेनेच सांभाळलं शेवटी
© Velvet Kavisha ✍️
महेश आणि संगिताचं सगळं नीट सुरू होतं. मुंबईत होते तोवर आई-वडील कधीतरी सुट्टीत एक दोन दिवस विरारला येऊन राहून जायचे. संगिताला जेवढं जमेल तेवढं करायची. सासु सासऱ्यांना डॉक्टर उपचार, चपला, इतर वस्तू, कपडे घेऊन द्यायची. दोन दिवस सुट्टी घेऊन सगळं करायची.
सासुबाई मात्र नावं ठेवायला कमी करत नव्हत्या. त्यांचा रागच होता ना तिच्यावर. दोन दिवसांच्या वास्तव्यात महेशला काही ना काही सांगत बसायच्या. त्याला माहिती होतं. "बोलतो तिच्याशी" म्हणून तो शांत रहायचा.
धाकट्याची लेकरं चार पाच वर्षांची झाली तशी सासू सासरे पुन्हा गावी जाऊन राहिले. मे महिन्याच्या सुट्टीत सगळी नातवंडं गावी जात होती. तर सासु सासरे अधूनमधून आठ पंधरा दिवस मुंबईत येऊन राहून जायचे.
सगळं सुरळीत सुरू होतं. धाकट्याच्या लग्नाला दहा वर्षे झाली. त्याने घरात सत्यनारायणाची पूजा केली. सासू सासरे गावाहून आलेले. तब्बेतीच्या कुरबुरी असणाऱ्या सासुबाई पूजेच्या दुसऱ्या दिवशी चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या.
धावपळ करत ॲम्ब्युलन्स बोलावून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. पॅरॅलिसीसचा ॲटॅक होता तो. चार दिवस औषध उपचार झाले. सासुबाईंची डावी बाजू थोडी बधीर होऊन गेली. हात पाय जड झाले. नीट चालता येईना.
सातव्या दिवशी संध्याकाळी डिस्चार्ज मिळणार होता.
धाकटा म्हणाला, " माझ्याकडे आईचं कोण करेल?? आम्ही दोघेही वर्किंग. आईला गावी पाठवू आणि शेजारच्या काकूंना पहायला सांगू. थोडेफार पैसे देऊ त्यांना."
धाकट्याचं बोलणं ऐकून सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या काही न बोलता गप्प राहिल्या.
"अरे नको गावी. आई माझ्याकडे राहिलं. मी करेन तिचं सगळं. तू काळजी नको करूस.." महेशने सांगितलं. धाकटा निघून गेला.
तो गेल्यावर सासुबाईंनी महेशला विचारलं, "संगिता काय म्हणेल?? मी कधीच तिच्यासाठी काही केलं नाही. उलट तिला त्रास दिला."
"आई, लहानपणापासून पाहत आलोय. तुमचं झुकतं माप नेहमी धाकट्याच्या बाजूने. त्याला तुम्ही कधी त्रास होऊ दिला नाही. मी मात्र मोठा म्हणून माझ्याकडून वारेमाप अपेक्षा. मी ही मोठा समजून करत आलो. धाकटा नोकरीला लागेपर्यंत काही वाटलं नाही. पण तो नोकरीला लागला. माझ्यापेक्षा जास्त पगार घेत होता तरीही तुम्हांला त्याच्याकडून खर्चाला पैसे घ्यायचे नव्हते. त्याचं लग्न होण्याआधी पासून तुम्ही न पाहिलेल्या, न ठरलेल्या सूनेचं कौतुक करत होतात. संगिताला मात्र ती गरीबा घरची म्हणून हिणवत राहिलात. मला कधी कधी मी सावत्र असल्याचा फील यायचा. घरातून बाहेर पडून वेगळं राहण्याचा निर्णय माझा होता. खुप राग आला होता तुमचा. खुप ऐकवलं असतं तुम्हांला पण तेव्हा संगिताने अडवलं. म्हणाली,"आई-वडिलांना बोलून दाखवू नये. पोटच्या लेकराचं बोलणं खोलवर लागतं जीवाला." म्हणून गप्प राहिलो.
धाकट्याकडे यायचो तेव्हा शेजारीपाजारी सगळं सांगायचे. घरातलं, मुलांचं सगळं तूच करतेस. वहिनी संध्याकाळी फक्त चपात्या करतात. थकतेस, दमतेस. गुडघे दुखतात, डोकं दुखतं. कधी कधी चक्कर येते तुला. पण तू मात्र सगळं वहिनीच करतात मला काही करावं लागत नाही असं सांगायचीस. खरं माहिती असूनही खोटं ऐकून गप्प रहायचो. काही बोललो तर तुला आणि बाबांना वाईट वाटलं असतं.
मला मात्र सारखा विचार यायचा मनात. आम्ही दोघेही तुमचीच मुलं होतो तरी तुम्ही इतका दुजाभाव का करत असाल. संगिता म्हणायची, अहो, आई आहेत त्या. तुम्ही पुढे होऊन धडाडीने कोणतंही काम करता. पण धाकट्याचं तसं नाही. गोड बोलून त्याला कोणीही फसवेल म्हणून आई वडिलांचा जास्त ओढा भाऊजींकडे आहे.
"आताही धाकट्याचा आणि त्याच्या बायकोचा स्वभाव पाहता तो तुम्हांला सांभाळेल याची अजिबात खात्री नव्हती. त्यामुळे तुला ॲडमिट केलं तेव्हा डिस्चार्ज नंतर आईंना विरारला घेऊन या सांगितलं. त्यामुळे ती काही म्हणणार नाही आई. तू विरारला चल. संगिताने सध्या महिनाभर रजा टाकलीय. तू पुर्ण बरी झालीस, तुझ्या हाताने सगळं करू लागलीस की, ती जाईल कामाला." महेशने समजावून सांगितलं.
टॅक्सी करून विरारला पोचले. धाकट्याने बिल भरायचं कर्तव्य केलं होतं. आईला नीट चालता येत नव्हतं. खुर्चीत बसवूनच घरात आणलं. आल्या आल्या संगिताने गरमागरम चहा आणि पोहे दिले. थोड्या वेळाने स्वच्छ आंघोळ घातली. केसांना तेल लावून त्यांतले गुंते सोडवले. छानशी वेणी घालून पाठीवर सोडली. दोन दिवसांपूर्वी आणलेले नवीन गाऊन घातले. पायात सॉक्स घातले आणि बेडरूममध्ये बेडवर झोपवलं. सासरे सगळं पाहत होते.
रात्री जेवणं झाली. गोळ्या औषधे दिली. संगिता सुंठ घालून तयार केलेलं तेल घेऊन आली. सासुबाईंच्या बधीर झालेल्या हातापायाला लावलं. दोन गरम शाल घेऊन हातापायाला गुंडाळून झोपवलं.
"काही लागलं तर आवाज द्या." म्हणत सासूबाईंच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला.
कोनात ठेवलेल्या दोन गाद्या उचलून हॉलमध्ये टाकल्या. सासुबाईंना बेडरूम देऊन स्वतः मुलांना घेऊन हॉलमध्ये झोपली. महेश हॉल मधल्या दिवाणावर विसावला.
सासुबाईंना महिनाभर फिजिओथेरपी, त्यांचं डाएट, गोळ्या औषधे, स्वतः केलेलं तेल मालीश, टॉयलेट बाथरुममध्ये नेणं आणणं, आंघोळ, केस विंचरणं.... सगळं सगळं संगिता करत होती.
महिन्याभरात सासुबाई थोड्या सावरल्या तरी अजूनही परावलंबी होत्या. संगिताने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडून सासुबाईंना सांभाळत होती.
एकदा सासुबाईंना भेटायला त्यांची बहीण आली.
"तुझं सगळं केलंय थोरल्या सूनेने. किती वाईट वागलीस तिच्याशी?? नातेवाईक, शेजाऱ्यांपाजाऱ्यांत तिच्याबद्दल नाही नाही ते सांगितलं. धाकटा पहिल्यापासून स्वार्थी आहे. मुलं लहान होती तोवर तुला ठेवून घेतलं आणि गरज संपली तशी दिली गावी पाठवून. संगिताच्या जागी दुसरी कोणी असती तर पाहिलं ही नसतं तुला. आता तरी शहाणी हो." मावशींनी सांगितलं.
"हो गं. हल्ली तब्बेत बिघडायची तेव्हा धाकट्याला फोन केला की, वयोमानानुसार होतं गं ते सांगायचा. यावेळी आले तेव्हा ठरवून आलेले, महेश आणि संगिताला सांगून मोठ्या डॉक्टरांना दाखवून घेऊ. पण हे असं अचानक झालं. संगिताने, महेशने पॉट देण्यापासून सगळं केलंय.
आता नाही मी अन्याय करणार त्यांच्यावर. संगिताने नोकरी ही सोडलीय. दोन मुले शिक्षण घेताहेत. घराचं कर्ज आहे त्याच्या डोक्यावर. आता आम्हांला घेऊन आलाय. एकट्याच्या पगारात कसं होईल??" सासुबाई मनापासून बोलत होत्या आणि मनाशी काही ठरवत होत्या.
रविवारी धाकटा आईला भेटायला विरारला आला. सासूबाईंनी विषय काढला.
"हे बघ. तू राहतोस ती रुम आमची आहे. तुला जागा पुरावी म्हणून दादा वेगळा झाला. त्याच्या डोक्यावर कर्ज आहे. त्यामुळे मी आणि बाबांनी ती रुम विकायचं ठरवलंय. ती रुम विकून आलेल्या पैशात चार हिस्से होतील. तीन तुम्हां मुलांचे आणि एक आमचा.
बाजारभावाप्रमाणे आज त्या खोलीची किंमत पन्नास लाख होईल. ती खोली तुला हवी असेल तर दादा, ताई आणि बाबा साडेबारा लाख रुपये प्रत्येकी देऊन टाक. आम्ही एनओसी देतो. नाहीतर विकून टाकू आणि आलेले पैसे समान चार हिश्यात वाटून घेऊ."
चार महिन्यांत खोली विकली गेली. महेशने मिळालेल्या पैशातून कर्ज फेडले. उरलेले पैसे एफ डी करून ठेवले. आईबाबांच्या हिश्याला त्याने हात न लावता त्यांना सांभाळलं.
संगिता ही आधीसारखंच सगळं मनापासून करत होती. सासुबाईंना भेटायला आलेल्या संगिताच्या भावाशी बोलताना सासुबाई म्हणाल्या. "तुमच्या बहिणीला खुप छळलं मी. नावडती सून होती माझी ती पण या आजारपणात तिनेच सांभाळलं मला. मरेपर्यंत मी काय इथून जात नाही. "
समाप्त
© Velvet Kavisha ✍️
सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव
फोटो गुगलवरुन साभार.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box