#सून_घरात_येण्या_आधीची_पूर्वतयारी..
©️जया पाटील
"काय मग मिसेस कळंबकर तुमच्या आदित्यचे लग्न ठरलं म्हणे....! शेजारच्या माने वहिनी सांगत होत्या. आदित्यची बायको म्हणजे तुमची होणारी सून चांगल्या मोठ्या घरची आहे ना.सॉफ्टवेअर कंपनीत सिनिअर मॅनेजर आहे ना. तुमची तर लॉटरीच लागली म्हणायची.
चला अभिनंदन हा....! नवीन सून येणार आहे घरात आनंदच आहे म्हणा , पण आजकालच्या मुली त्यांना काही म्हणून पद्धत नाही. कधी कोणाचा वाकून नमस्कार करणार नाहीत , घरी कोणी आले तरीही त्यांना आदर सत्कार करण्याचे , स्वयंपाकाचे तर सोडाच पण साधं पाणी देण्याचे पण मॅनर्स नाही.
फक्त त्या आणि त्यांचा नवरा इतकंच काय विश्व असतं त्यांचं. आठवड्यात पाच दिवस नोकरी करायची आणि उरलेले दोन दिवस नवऱ्याला घेऊन हुंदडत बसायचं. दुसऱ्या कोणाचीही पर्वा करायची नाही. सासूसासर्यांना वेळ देणं नको की नातेवाईकांची पर्वा नको. हे प्रत्येक घरात सवयीच झालं आहे.
तुम्ही आपल्या आहेत म्हणून सावध करतेआहे आदित्यची आई तुम्हाला. सून आली की घरातली सत्ता सोडून द्यावी लागते आपल्या सारख्यांना. घरात शांतता नांदायला हवी असेल तर माघार घेण्याशिवाय पर्याय नाही हो. तुम्हीही आता सवय करून घ्या माघार घेण्याची."
शेजारच्या थोरात काकू मिसेस कळंबकरांचे त्यांचा मुलगा आदित्यचं लग्न ठरल्याबद्दल अभिनंदन करत होत्या. मात्र त्यात अभिनंदन कमी आणि टोमणेच जास्त होते. मिसेस कळंबकर आधीपासूनच थोड्या कडक स्वभावाच्या आणि शिस्तीच्या असल्यामुळे त्यांनी थोरात काकूंकडे फारसे लक्ष दिले नाही अन्यथा दुसऱ्या कुणाला तर मिसेस थोरातांचे बोलणं ऐकून आधीच हार्टअटॅक आला असता.
श्री अजित आणि सौ विभावरी कळंबकर एक मध्यमवर्गीय जोडपं. श्री अजित बँकेत काम करणारे सर्व साधारण कर्मचारी. एका शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करणारी त्यांची बायको सौ विभावरी कळंबक. त्यांना एक मुलगा आदित्य. खूप काही श्रीमंत नसले तरीही खाऊन - पिऊन सुखी असलेले कुटुंब .
काटकसरी , सोज्वळ बायको , गुणी , संस्कारी मुलगा आदित्य असा त्यांचा छोटासा त्रिकोणी परिवार. त्यामुळे त्यांचा संसार अगदी सुखात चालू होता. हळूहळू दिवस पुढे लोटत होते. अजितराव आणि विभावरीताईंनी काटकसरीने संसार केला. आदित्यचे शिक्षण केले. अजितराव आता निवृत्त झाले होते. विभावरीताईंची अजूनही सात वर्ष सेवा बाकी होती.
विभावरीताईंचा स्वभाव आधीपासूनच जरासा मितभाषी आणि कडक शिस्तीचा. त्यामुळे कॉलनीत पण त्यांना सगळेच शिष्ट म्हणून ओळखायचे. आदित्यचे देखील त्या कुठल्याच गोष्टीत फाजील लाड पुरवायच्या नाहीत. अजितरावांना देखील तसे करण्यास त्या अडवत असत. स्वतःची कामे स्वतः करावीत याबाबतीत त्या नेहमीच आग्रही असत. आदित्य त्यांचा एकुलता एक मुलगा असला तरीही घरातील भांडी घासणे , लादी पुसणे पासून तर बेसिक स्वयंपाक करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी आदित्यला शिकवल्या होत्या.
या सगळ्या गोष्टीमुळे आदित्यला फायदाच झाला. बारावी नंतर आदित्य इंजिनीरिंगच्या शिक्षणासाठी बाहेरगावी गेला त्यावेळेस इतर मुलांसारखे त्याचे हाल झाले नाही. स्वतःचे काम स्वतः करायची सवय असल्यामुळे आणि बेसिक स्वयंपाक येत असल्यामुळे हॉस्टेलवर देखील मेसचं जेवण आवडलं नाही तरीही आदित्यचा सहज निभाव झाला. त्यावेळी मात्र त्याला आईची कंटाळवाणी शिस्त सुखावणारी वाटली.
इंजिनीरिंग करून आदित्य एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर काम करू लागला. सगळं काही सेट झालं. विभावरी ताईंनी आदित्यसाठी वधू संशोधनाला जोरदार सुरुवात केली. अजितरावांना सांगून त्या लगेच वधुवर मंडळात गेल्या आणि त्यांना योग्य वाटलेल्या मुलींचे फोटो आणि पत्ते घेऊन घरी आल्या. आदित्य घरी आल्यावर त्या आदित्यला ते फोटोज दाखवणार होत्या.
आदित्य ऑफिस मधून घरी आल्यावर विभावरी ताईंनी त्याला वधुवर मंडळातून आणलेल्या मुलींचे फोटो दाखवले. मात्र फोटो न पाहताच तो म्हणाला ..
" आई बाबा , सॉरी पण मी एकदा गोष्ट लपवली आहे तुमच्यापासून. माझे सुप्रिया नावाच्या एका मुलीवर प्रेम आहे आणि गेली तीन वर्ष आम्ही ओळखतो एकमेकांना .."
हे सगळे ऐकून विभावरीताई थोड्या नाराज झाल्या. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली परंतु अजितरावांनी बाजू सांभाळून घेतली.
" शेवटी संसार आदित्यला करायचा आहे सुप्रिया सोबत. शेवटी राजाने केली आणि राणी झाली हे खरं आहे. त्या दोघांचेही एकमेकांवर प्रेम आहे तर एकदा भेटूया सुप्रिया आणि तिच्या आईबाबांना."
नाखुशीनेच विभावरीताईंनी होकार दिला. ठरल्याप्रमाणे आदित्य , अजितराव आणि विभावरीताई सुप्रियाच्या घरी गेले. सुप्रियाला पाहताच विभावरीताईंची नाराजी दूर झाली कारण कितीही झालं तरी एका आईला आपल्या लेकाच्या आनंदापेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नसतं. दोघीही परिवाराच्या भेटी झाल्यावर सुप्रिया आणि आदित्य दोघांच्याही आईबाबांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला.
काही दिवसातच आदित्य आणि सुप्रियाचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. आपल्या एकुलत्या एक लेकाचं लग्न म्हणून विभावरीताई खूप खुश होत्या. सुप्रियाच्या स्वागतासाठी आणि आदित्यच्या आनंदासाठी त्यांनी खूप तयारी करून ठेवली होती पण आज थोरात काकूंनी त्यांना सुप्रिया आणि त्यांच्या वाईट भविष्याची बाजू दाखवून विभावरीताईंच्या आनंदावर विरजण टाकले.
थोरात काकूंचे बोलणं अजितरावांना पण आवडलं नाही. तेव्हापासून विभावरीताई विचारात पडल्या आहेत हे देखील त्यांनी अचूक हेरलं. त्याचवेळेस आदित्य तिथे काही शर्ट्स घेऊन आला आणि विभावरीताईंना विचारू लागला..
"आई , आज ऑफिस मध्ये माझी महत्वाची मिटिंग आहे. खूप महत्वाचं प्रेझेंटेशन आहे. त्यामुळे कुठला शर्ट घालू ते जरा सजेस्ट कर ना . तुझं सजेशन नेहमी उपयोगी ठरतं मला. "
"अरे आदी , मोठा झालाय तू आता. किती दिवस असा आईच्या सल्ल्यावर अवलंबून राहणार आहेस.आता यापुढे सुप्रिया कडून सजेशन घेत जा. तिलाही छान वाटेल. "
आईचं बोलणं आदित्यसाठी अनपेक्षित होतं. त्याला विभावरीताईंच्या बोलण्याचं खूप वाईट वाटलं , त्याच्या चेहऱ्यावर तसे स्पष्ट दिसत होतं पण तरीही काहीच न बोलता तो तिथून निघून गेला. घडलेला सगळा प्रकार अजितराव पाहत होते. ते विभावरीताईंना समजावणीच्या सुरात म्हणाले.
"अग विभावरी , थोरात बाईंचे बोलणं इतकं काय मनावर घेतलं आहेस तू...? आदित्य तुझा मुलगा आहे. त्याच्या आयुष्यात तुझा हस्तक्षेप असणारच. त्याला तुझ्या सल्ल्याची मदतीची गरज असेलच. आज त्याला असा अचानक नकार दिलास तू. त्याला किती वाईट वाटलं असेल. अशी नात्यात वितुष्ट आणणारी खूप लोकं असतात. त्यांच्यासाठी तू आपल्या एकुलत्या एक लेकाला दुखावशील का ..? "
" अहो ,थोरात बाईंचे बोलणं नाही घेत हो मी मनावर. त्यांच्याही आधी हा विचार माझ्या डोक्यात आला होता. त्यांनी फक्त त्याची पुन्हा नव्याने उजळणी केली इतकंच..! "
"त्यांची सांगायची पद्धत चुकीची असेलही पण त्यांचं बोलणं मात्र मुळीच चुकीचं नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार आपण आदित्यच्या लग्नाआधीच करायला हवा. आदित्य आपला एकुलता एक मुलगा आहे. आपलं सगळं विश्व त्याच्या भोवतीच फिरत असतं. मुळात आपलं आयुष्यचं तो आहे , पण आता तो आणखीन कुणाचं तरी आयुष्य होणार आहे. "
"त्यामुळे त्याच्या आयुष्यातली ढवळाढवळ आपण आता थांबवायला हवी. आता त्याच्या पासून आपण थोडा अलिप्तपणा घ्यायला हवा. मला मान्य आहे हे सगळं करतांना आपल्याला खूप त्रास होईल पण हे सगळं त्याच्या आनंदासाठी आणि त्याच्या सुखी भविष्यासाठी असेल. आपल्या हृदयावर दगड ठेवून आपण सून घरी येण्याची पूर्वतयारी करायला हवीच. "
" मी आता माझ्या घरातल्या सगळ्या वस्तूंसोबत बोलायचं ठरवलं आहे. माझ्या स्वयंपाक घरातील सगळ्या भांड्याना मला एकदा मनापासून कुरवाळून घ्यायचं आहे कारण आता त्यांची नवीन मालकीण येणार आहे तेव्हा ती देखील त्यांना माझ्या इतकीच आपुलकीने जपेल की नाही , माहिती नाही. पण माझी त्यांच्यापासून अलिप्त होण्याची वेळ आली आहे.
"मला माहिती आहे प्रत्येक व्यक्ती वाईट कधीच नसते. सुप्रिया पण नाही , पण जेव्हा या घरातल्या सगळ्या गोष्टी मी सुप्रियाच्या हातात सोपवेल तेव्हाच तिला या सगळ्या वस्तूंचा सहवास लाभेल आणि सहवासानेच खरं प्रेम वाढतं. या घरातल्या सगळ्या वस्तू म्हणजे निर्जीव गोष्टी नसून आपले साथीदार आहे. त्यांच्याविषयी तीच आपुलकी सुप्रियाला असावी हीच माझी इच्छा आहे. त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल. "
"आपल्याला देवाने मुलगी दिली नाही पण सुप्रियाच्या रूपाने मुलगीच मिळते आहे आपल्याला. त्यामुळे या पुढे तुम्हाला सुप्रियाचे सासरे म्हणून नाही तर तिच्या वडिलांप्रमाणे वागायचं आहे. माझा राग मानू नका पण हे सगळे तुम्हाला सांगताना मी लहान तोंडी मोठा घास घेतेय , पण सुप्रिया काम करत असेल तर लगेच आपण दोघांनीही जाऊन तिची मदत करत करायला हवी जशी आपण आदित्यची मदत करतो. त्याची काळजी करतो तशी सुप्रियाची काळजी करायला हवी."
" घरातील छोटी कामं जसं दळण दळून आणणं ,भाजीपाला आणणं, ते स्वच्छ करून देणं अशी सगळी कामे आता आपण सुप्रियाला मदत म्हणून करत राहू पण किचनचा मुख्य कारभार मात्र तिच्याच हातात सोपवू. आता सुप्रियाला आपला त्रास नाही तर अगदी तिच्या आईबाबांप्रमाणे आपली ओढ वाटली पाहिजे असंच आपल्याला वागायचं आहे. तिचे आईबाबा होऊ शकलो नाही तर त्यांची सावली होण्याचा प्रयत्न नक्कीच करू आपण दोघंही..! "
" सुप्रिया आणि आदित्यने कुठेही बाहेर जायचा प्लॅन बनवला आणि त्यांनी आपल्याला सोबत येण्याचा कितीही आग्रह केला तरी आपल्याला त्यांना नाही म्हणायचं आहे. सुप्रियाने बनवलेल्या कुठल्याही वस्तूत माझी आणि तिची तुलना करून तिचं मन मोडायचं नाही."
"अगदीच शहाण्या लहान मुलांप्रमाणे आता आपल्याला वागायचं आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला आपल्या घराची , आपल्या मुलाची साथ लाभावी हीच माझी इच्छा आहे.
आपण स्वतःहून समजदारीने वागलो की जीवन खरंच खूप सोपं होऊन जातो हो..."
" सुप्रियाला एक रोपटं म्हणून आपण आपल्या घरात आपण आणणार आहोत त्यामुळे त्या रोपट्याला खुलवण्याची , जपण्याची , आपुलकीने वाढवण्याची जबाबदारी आपली आहे. जेव्हा मोठे म्हणून आपण तिच्याकडे प्रेमाचा हात पसरू तेव्हा तिच्याकडूनही तिच आपुलकी आणि प्रेम आपल्याला नक्कीच प्राप्त होईल याची मला खात्री आहे. "
विभावरीताईं खूप आपुलकीने अजितरावांसोबत बोलत होत्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. विभावरीताईंच्या बोलण्यामुळे अजितराव देखील भारावले आणि त्यांच्याही डोळ्यात पाणी तरळलं. विभावरीताईंचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन अजितराव बोलू लागले..
" विभा , किती पुढचा विचार केला आहेस ग. तुझ्या सारखी प्रत्येक सासू सून येण्यापूर्वी इतकी सुंदर पूर्वतयारी करेल तर सून येण्याऐवजी प्रत्येक घरात मुलीचाच गृहप्रवेश होईल. "
विभावरीताई आणि अजितरावांचं बोलणं पडद्याआड उभा असलेला आदित्य ऐकत होता. त्याच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा होत्या. आपल्या आईच्या कठोरतेच्या मुखवट्यामागे लपलेल्या ममतेची त्याला नव्याने जाणीव झाली होती.
समाप्त...!
✍©️ जया पाटील
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात,त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Google
1E
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box