मी नव्हतं सांगितलं मला एकटं ठेवा

 


मी नव्हतं सांगितलं मला एकटं ठेवा

© Velvet Kavisha ✍️


Winex Computers Academy च्या गेटवर कार थांबली. आर्या खाली उतरली. Entrance मधून आत आली. सोबत आज ड्रायव्हर पण होता. पाव किलो कंदी पेढ्याचे तेरा आणि एक किलोचा एक असे चौदा बॉक्स घेऊन तिचा ड्रायव्हर क्लासमध्ये आला. आठ दिवसांनी आली होती. फक्त फोनवर कळवलं होतं की, आठ दिवस येणार नाही म्हणून. आणि आता आली तर डायरेक्ट पेढे घेऊनच.
"अरे, दहावीचा रिझल्ट लागला ही इतक्या लवकर??" रिसेप्शनीस्टने विचारलं.

दहावीच्या परीक्षेनंतर आर्याने या इथे कॉम्प्युटर क्लासमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. आई-वडील दोघेही उच्चपदस्थ बॅंक अधिकारी. उच्च मध्यमवर्गीय कुटुंब. हाय क्लास सोसायटीत घर. पोरगी मात्र एकदम down to earth... एकदम मिळून मिसळून राहणारी. बडेजाव नाही. श्रीमंतीचा माज नाही. सर्वांशी आदराने बोलणं. सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी.‌
"दहावीचा रिझल्ट नाही मॅम.. इकडे या सांगते.." म्हणत ती क्लासरुममध्ये गेली.

तिने सगळे बॉक्स एका डेस्कवर ठेवले. एक किलोचा एक बॉक्स खोलून सगळ्यां विद्यार्थ्यांना दोन दोन पेढे दिले. एक एक करत सर्व टिचर्सना पेढ्यांचे बॉक्स वाटून झाले. एक बॉक्स रिसेप्शनिस्टकडे दिला मेन सरांना द्यायला...
"आर्या, दहावीचा रिझल्ट लागला नाही तर मग पेढे कसले आहेत??"

"मॅडम, मला भाऊ झाला. मी ताई झाले. I am happy today....and I would like to celebrate it with all of you.."  आर्या खुप खुश होती. तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.
सगळ्यांनी तेवढ्याच उत्साहात तिचं अभिनंदन केलं. तरीही सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह होतं. "की ही आर्या सोळा वर्षांची आणि आता एवढ्या वर्षांनंतर भाऊ झालाय... दोन मुलांमध्ये इतकं अंतर?? कसं काय..??"
सगळ्यांनी पुन्हा एकदा मनापासून तिचं अभिनंदन करून सगळे आपापल्या जागेवर गेले. आर्या आपल्या कॉम्प्युटरसमोर बसली. तिला शिकवणाऱ्या मिस् तिच्या बाजूला आल्या.

"आर्या, किती आनंदात आहेस गं. पण हा आनंद खुप वर्षांनी आला ना तुझ्या आयुष्यात..??" मिस ने हळूच विषय काढला.
"देर आये दुरुस्त आये मॅम..." आर्या.
"म्हणजे..??"
"मॅम, आईबाबांचं लग्न झालं आणि एक वर्षात माझा जन्म झाला. Maternity leave संपवून आईने मला आजीसोबत ठेवून ऑफिस जॉईन केलं. आजी छान होती. सोबतीला एक मावशी पण होत्या. दोघी मस्त सांभाळायच्या मला. आई ऑफिस सांभाळून मला वेळ द्यायची. आजी असेपर्यंत मला काही वाटलं नाही. पण मी आठवीत गेले आणि एका सकाळी आजी गेली. हार्ट ॲटॅकने. मी मोठी झाले होते. माझं माझं मी करत होते. सोबत मावशी असायच्या. पण आजीची उणीव भासत होती. एकटं वाटायचं. मैत्रिणींमध्ये रमू लागले. आमचा पाच मैत्रिणींचा छान गृप होता. कधी कधी त्यांच्या घरी जायचे. मॅडम... तुम्हांला सांगते, मी सोडून चौघींनाही एक भावंडं होतं. कोणाचं लहान तर कोणाचं मोठं. खुप छान वाटायचं त्यां भावंडांना बघून. म्हणजे मला आत्ते मामे भावंडं आहेत. पण सख्खं कोणी नव्हतं. लहान होते तोवर वाटायचं, बाप्पाने आपल्याला एकटच ठेवलंय पण नंतर कळू लागलं की "नाही. असं नाहीय. आई बाबा दोघेही नोकरदार म्हणून मी एकटी. जवळजवळ सहा महिने असेच गेले. नववीत गेले. रक्षाबंधनच्या दिवशी संध्याकाळी आत्या आली रक्षाबंधनला. मी आत्याच्या सोहमला दरवर्षी प्रमाणे राखी बांधली. पण तो आधीच त्याच्या दिदीकडून राखी बांधून आला होता. मग मला वाटून गेलं की, मला भाऊ किंवा बहिण कोणीही असतं तर सगळ्यात आधी मीच बांधली असती ना राखी?? एक हात माझा हक्काचा असला असता ना?? हे विचार डोक्यातून जाईनात. दोन दिवस राहून आत्या घरी गेली. त्या रात्री जेवायला बसलो तेव्हा मी आई बाबांना सांगितले, मला माझं स्वतःचं भावंडं हवंय. बहिण भाऊ काहीही चालेल पण मला हवंच आहे. आधी आठवडाभर त्यांनी काही लक्ष दिलं नाही. मग मात्र मी तगादाच लावला. "मला भावंडं हवंच म्हणून" त्यांनी त्यांच्यापरीने समजावलं. की कशी एकटी असल्यामुळे ते मला चांगली लाईफस्टाईल देऊ शकले वगैरे वगैरे.
मला सांगा मॅडम, मी मागितली होती का अशी लाईफस्टाईल त्यांच्याकडे?? त्यांना दोघांना नोकरी करायची म्हणून मला का एकटं ठेवलं?? मी किती miss केलंय भावंडं नसणं. मी सांगितलं होतं का मला एकटं राहायचंय?? मी सांगितलं होतं का मला इंटरनॅशनल स्कुलमध्ये घाला म्हणून?? आणि हेच मी त्यांना विचारलं. त्यांना सांगितलं, मला तुमचं काहीच नको फक्त एक भावंडं द्या मला. दोन दिवस अबोला धरला. थोडसंच जेवले. मग आई मला घेऊन गायनॅककडे गेली. त्यांनी समजवायचा प्रयत्न केला. मी अजिबात कोणाचं काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.  शेवटी आईबाबांनी निर्णय घेतला. आईचं वय चाळीस. डॉक्टरांनी व्यवस्थित ट्रिटमेंट दिली. आईला बेडरेस्ट सांगितली होती. कधी कधी वाटायचं की, आपल्यामुळे आईला त्रास होतोय. हे सहन करावं लागतंय. म्हणून पुर्ण नऊ महिने मी माझा अभ्यास सांभाळून आईची काळजी घेतली. आठ दिवसांपूर्वी मला माझं भावंडं मिळालंय. भाऊ झाला. बहीण झाली असती तरी मला चालणार होतं. मला फक्त माझं हक्काचं भावंडं हवं होतं बास्स...."
"आईला नोकरी सोडावी लागेल ना आता??" मिस ने विचारलं.
"कदाचित नाही सोडावी लागणार. आणि सोडली नोकरी तरी काही फरक पडणार नाही. बाबाला पगार आहे चांगला. त्यात भागेल आमचं. माझी एक मैत्रीण आहे. तिची आई पण घरीच असते. तिचा बाबा एकटाच नोकरी करतो तरीही त्यांचं होतं ना सगळं?? तसाही मी माझा खर्च खुप कमी केलाय. त्यामुळे आईने नोकरी नाही केली तरी चालणार आहे. शेवटी तो तिचा प्रश्न आहे. मी आता मावशींच्या मदतीने बाळाला सांभाळू शकते. सध्या तर मी घरीच आहे नंतर काय  कॉलेजमधून लवकर येईन." आर्या एकदम ठामपणे बोलत होती.
मिस ने पुन्हा एकदा तिचं अभिनंदन करून तिला assignment समजावून सांगितली.

"आर्याचं काही चुकलं असं वाटतं नाही. आपल्या करीअरसाठी आपल्या मुलांचं भावंडांचं सुख हिरावून घेण्याचा अधिकार आपल्याला अजिबात नाही. कौस्तुभ पण कधीचा म्हणतोय मला एक बहीण हवी. पण दुसरा मुलगाच झाला तर काय करावं म्हणून आपण त्याचं ऐकत नाही काही. पण उद्या तो आर्यासारखा वागला तर?? त्यापेक्षा आताच दुसरा चान्स घ्यावा. त्याआधी कौस्तुभशी बोलून सगळं नीट सांगायला हवं. बहिणच येईल हे काही सांगता येत नाही पण तुला एक भावंडं आणण्यासाठी प्रयत्न नक्की करू शकतो" खुर्चीत बसल्या बसल्या मिस विचार करत होती.

"मिस... हे पुढे काय करायचं..??" आर्या विचारत होती.
आणि आता आपण पुढे काय करायचं?? मिस विचारात होत्या...

समाप्त..
"सत्यघटनेवर आधारित..."
लेखिका म्हणून मी यावर काहीच मत मांडणार नाही. मात्र तुमच्या मतांचा आदरच असेल.
© Velvet Kavisha ✍️

Post a Comment

0 Comments