कालाय तस्मै नमः भाग १

#कालाय_तस्मै_नमः_भाग_१

©️जया पाटील 


"अगं मुलींनो , एकमेकांना सोडून तुमचं पान हलत नाही. लग्न करून तर दोघीही वेगवेगळ्या घरी जाणार , मग कसं होईल गं तुमचं? मयुरी आणि नीलिमा तुमचे दोघांचेही बाबा जसे एकमेकांना जीवापाड जपतात. त्यांच्याच पायावर पाऊल ठेवत तुम्ही दोघी सुद्धा एकमेकांच्या जीवाला जीव देतात. खरंच तुमची हीच मैत्री आदर्श आहे सगळ्यांसाठी. लग्नानंतर नेहमी वेगवेगळ्या गावात असणार तर नेहमीच भेटू शकणार नाही तुम्ही तेव्हा कसं होईल तुमच्या दोघींचं?"  

लीला आजी मयुरी आणि नीलिमाला चिडवत होत्या. त्यावर मयुरी आणि नीलिमा दोघींचं उत्तर तयार होतं. 

" तुझी चिंता बरोबर आहे लीला आजी , पण आम्ही पण कमी नाहीत हं अजिबात. दोन सख्खे भाऊ असतील ना त्यांच्या सोबतचं आम्ही लग्न करू म्हणजे एकाच घरात आम्ही दोन्ही मैत्रिणी जावा- जावा , मग काय नुसती धम्माल असेल आमची.. ! "

चंद्रकांत आणि सुरेश दोघंही एकमेकांचे सख्खे शेजारी. कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्यातीरी वसलेल्या एका छोट्याश्या गावात त्यांचा जन्म झाला. तेव्हापासूनच त्या दोघांनाही एकमेकांची सोबत लाभली. एकमेकांना भरवत , एकमेकांच्या अडचणी सोडवत दोघंही मोठे झाले. 

सुरेशचा जन्म झाला आणि दोन महिन्यातच एका आजाराच्या निम्मिताने त्याची आई देवाघरी गेली. चंद्रकांतच्या आईने मात्र त्याला आईची कमी कधीच भासू दिली नाही. चंद्रकांत आणि त्याच्या कुटुंबाच्या सोबतीने वडिलांच्या छत्रछायेखाली तो मोठा झाला.

दोघांच्याही घरची परिस्थिती तशी बेताचीच. त्यामुळे बारावीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं आणि जवळच्या तालुक्याच्या ठिकाणच्या एका छोट्या फॅक्टरीत दोघंही कामाला लागले. आयुष्यात खूप अडचणी आल्या पण एकमेकांची साथ मात्र कायम होती. दोघांचीही लग्नं झाली. संसार सुरु झाला. 

दोघांच्याही संसारवेलीवर फुलं उमलली. दोघांनाही कन्यारत्नांची प्राप्ती झाली. चंद्रकांतची लेक मयुरी आणि सुरेशची लेक नीलिमा. दोघी मुली आता वडिलांच्या मैत्रीचा वारसा पुढे चालवू लागल्या. त्यांची मैत्री ही सगळ्यांसाठी आदर्श बनली.  

प्रत्येक गोष्ट घेतांना एकमेकांच्या आवडीची घेणं , छोट्यामोठ्या अडचणीत एकमेकांना साथ देणं पासून सगळ्या गोष्टींत त्यांना एकमेकांची सोबत गरजेची वाटत असे. वेगवेगळ्या आयांच्या पोटी जन्म घेतलेल्या त्या मनाने मात्र अगदी सख्ख्या बहिणी होत्या. वेळ पुढे जात होता परंतु त्यांची मैत्री आणखीन घट्ट होत होती. एकमेकांच्या सोबतीने आता त्या मोठ्या होत होत्या.  

तीन वर्षांनी मयुरी आणि नीलिमा दोघांनाही भावंडांची सोबत लाभली. चंद्रकांत आणि सुरेश दोघांचेही कुटुंब पूर्ण झाले. दोघांचाही संसार सुखात सुरु होता. खूप श्रीमंती नसली तरीही खाऊन पिऊन ते सुखी होते. दोन घास सुखाचे खायला मिळणं आणि कुटुंबातील सदस्यांचं एकमेकांना प्रेम मिळणं यापेक्षा कुठलं दुसरं सुख अपेक्षित असतं एका सामान्य माणसाला..?  

दिवसामागून दिवस सरत होते. सगळं काही छान चालू होतं पण सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे निसर्गाचे चक्र सुरूच असतं. तसाच दुःखाचा फेरा सुरेशच्या आयुष्यात आला. सुरेशचे बाबा एक दिवस शेतात गेले आणि त्यांना भोवळ आली. ते खाली पडले. डोक्याला जबर मार लागला. चंद्रकांत आणि सुरेश दोघांनी मिळून त्यांना लगेचच तालुक्याच्या गावातल्या दवाखान्यात हलवले.  

खूप औषधंपाणी केले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दहा दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली पण शेवटी ते अपयशी ठरले आणि वैकुंठधामाच्या प्रवासाला निघून गेले. बाबांच्या अश्या अचानक जाण्याने सुरेश पूर्णपणे पोरका झाला. त्याची आयुष्याची जमापुंजी त्याने बाबांच्या उपचारासाठी खर्च केली पण हाती काहीच मिळालं नाही. सुरेश समोर आर्थिक अडचण उभी राहिली. चंद्रकांत शक्य होईल तितकी मदत सुरेशला करत होता. त्याला मानसिक धीर देत होता पण शेवटी चंद्रकांतलाही त्याचा संसार चालवायचा होता.

नीलिमा आणि मयुरी आठवीत गेल्या. सुरेशची आर्थिक परिस्थिती त्याच्या सासरची मंडळीही जाणून होती. त्यामुळेच सुरेशच्या सासऱ्यांनी त्याला तालुक्याच्या गावात नोकरी करायला बोलवलं. फॅक्टरीच्या तुटपुंज्या पगारात भागत नाही म्हणून त्यांनी तालुक्याला त्यांच्या ओळखीने सुरेशसाठी नोकरी शोधली. सुरेशने मात्र चंद्रकांतला एकट्याला गावाकडं सोडून शहरात जाण्यासाठी नकार दिला. चंद्रकांतला याबद्दल माहिती झालं तेव्हा तो सुरेशला समजावू लागला...

"सुरेश , मामंजींनी तुला इतकी चांगली नोकरी शोधून आणली आणि तू का नकार देतो आहेस.? अरे फॅक्टरीच्या तुटपुंज्या पगारात आपलं खरंच भागत नाही. तुला पुढे जायची संधी मिळते आहे आणि तू नकार देतो आहेस....का ...? अरे अशी संधी पुन्हा चालून यायची नाही. आलेल्या संधीचं सोनं कर. तिला अशी लाथाडु नकोस. "  

" मला माहिती आहे चंद्या ..., पण तुला सोडून मला कुठं बी जायचं नाही. अरे लहानपणा पासून एकत्र वाढलो. सोबत राहिलो. प्रत्येक सुखदुःखात एकमेकांना सांभाळून घेतलं, बाबा गेल्यावर तर फक्त तुझ्या आधाराने जगतो आहे मी. क्षणोक्षणी मोठ्या भावासारखा पाठीशी उभा राहिलास तू आणि एक संधी चालून आली म्हणून लगेचच तुला सोडून निघून जाऊ नाही रे पटत मला.  " 

सुरेश चंद्रकांतला काकुळतीच्या स्वराने म्हणाला.

सुरेश चंद्रकांतला सोडून जाईल म्हणून त्यालाही वाईट वाटतं होतं पण त्यामुळे सुरेशच्या भविष्याला नवीन दिशा मिळणार होती. त्यामुळे चंद्रकांत सुरेशला पुन्हा समजावणीच्या सुरात म्हणाला...

" तू सोडून जाण्याचा त्रास मला पण तर होईलच पण त्यात तुझ्या मुलांचे भविष्य सुधारणार असेल तर शहरात जायला काय हरकत आहे. नीलिमा आणि जय मोठा होतो आहे. त्यांच्या भविष्यासाठी तरी तुला हे पाऊल उचलायलाचं हवं. तुझी प्रगती तिच माझी प्रगती आहे सुऱ्या....आता आणखीन नकारघंटा वाजवू नकोस. जा शहरात जा. नवीन नोकरीचा स्वीकार कर आणि खूप प्रगती कर. "  

चंद्रकांतने घातलेल्या समजुतीमुळे सुरेश पुढे काहीच बोलू शकला नाही. शेवटी नाराजीच्या सुरात तो चंद्रकांतला म्हणाला..

" मला तर समजावलं रे चंद्या.. पण नीलिमा आणि मयुरी दोघींचं काय ..? त्यांना कसं समजावशील ..? एकमेकांपासून दूर जाण्याचा विचार सुद्धा सहन करू शकत नाही त्या दोघी. त्या तरी कश्या राहतील रे एकमेकांना सोडून. तू म्हणतो शहरात जा. तिथे फक्त नोकरी मिळेल रे , पण घरभाडे आणि बाकी भांडवलाची व्यवस्था पण तर करावी लागेल ना. तुला तर माहित आहे बाबांच्या आजारात सगळी जमापुंजी संपली रे माझी. तिथे कसा निभाव लागेल रे माझा ..? "

" सुऱ्या , तू मयुरी आणि नीलिमाची चिंता नकोस करू. समजावेन मी त्या दोघींनाही. आणि हो तुझा नोकरीत जम बसेपर्यंत तिथे निभाव लागण्यासाठी पैशाची व्यवस्था करू आपण. त्याची चिंता तू करू नकोस. "  

चंद्रकांतच्या समजावण्यामुळे सुरेश तालुक्याच्या ठिकाणी नोकरीला जाण्यासाठी तयार झाला. ही बातमी जेव्हा मयुरी आणि नीलिमाला समजली तेव्हा मात्र त्या दोघींनी रडून रडून गोंधळ घातला. एकमेकांपासून दूर जाण्याची कल्पना सुद्धा त्यांना सहन होत नव्हती.

" नीलिमा तालुक्याच्या गावी जाणार तर आपण पण जाऊया ना बाबा. तुम्ही पण तिकडेच नोकरी पहा ना बाबा. मी नीलिमा पासून इतक्या दूर नाही राहणार. आपण सगळे पण जाऊया ना शहरात. ऐका ना बाबा ..." 

मयुरी रडतच चंद्रकांतला मनवायचा प्रयत्न करत होती. तितक्याच तिथे नीलिमा आली आणि मागोमाग सुरेश देखील तिथे आला. नीलिमा पण मयुरीच्या स्वरात स्वर मिळवत चंद्रकांतचं मन वळवण्याचा प्रयत्न करू लागली.

"चंदू काका ... तुम्हाला तर माहिती आहे ना मयुरीला सोडून माझं पान पण हलत नाही आणि माझ्या बाबांना पण तुम्ही सोबत नसलात की काहीच सुचत नाही. तुम्ही आमचे कुटुंब आहात. आमचा आधार आहात. तुम्ही पण या ना आमच्यासोबत शहरात. नाहीतर मग आम्ही पण इथेच राहतो गावाकडे. " 

हे बोलतांना नीलिमाच्या पण अश्रूंचा बांध फुटला आणि तिलाही रडू कोसळले. नीलिमा आणि मयुरीला जवळ घेत चंद्रकांत त्यांना समजावत म्हणाला...

" मला माहिती आहे बाळांनो , आपण सगळे एकमेकांसोबत एका अनोख्या बंधनात बांधलो गेलो आहोत की आपल्याला एकमेकांना सोडून राहणं अशक्य आहे पण निलू बाळा ,अग आजच्या घडीला तुझ्या बाबांसमोर एक उत्तम भविष्याची संधी चालून आली आहे. ती अशी दवडून कशी चालेल. "

" सुरेशने प्रगती केली तर तिच माझी प्रगती असेल. तुझा बाबा एकदा शहरातील नोकरीत सेटल झाला की तो माझ्यासाठी पण नोकरी पाहिल त्यावेळेस आम्ही येऊच ना शहरात , पण सध्या नको. आणि हो राहता राहिला मयुरीचा प्रश्न तर तिला तुझ्यासोबत शहरात राहायला मी लवकरच पाठवेल."

"तुझा बाबा त्यासाठी नाही थोडीच म्हणणार आहे. फक्त आधी तुम्ही शहरात जा आणि मग तिथे तुम्ही रुळले की मी देखील तिथे येण्याचा प्रयत्न नक्की करेल. आता मात्र तुझ्या या काकाचं ऐक आणि अगदी आनंदाने शहरात जा. तुझ्या सुंदर भविष्याची सुरुवात कर." 

नीलिमाला समजावून चंद्रकांत मयुरीला सांगू लागला..

"मयुरी बाळा , तू नीलिमाला तुझी लहान बहीण मानते ना ? मग तुझ्या बहिणीच्या चांगल्या भविष्याचा विचार करायला हवा. रडून आणि तिला अडवून तिला मागे खेचू नकोस बाळा. माझ्या शहाण्या लेकी आहात ना तुम्ही , मग या बापाचं इतकं म्हणणं ऐका. माझी आणखीन परीक्षा पाहू नका. "  

असं बोलून चंद्रकांतने मयुरी , नीलिमा आणि सुरेश समोर हात जोडले आणि तो हळवा झाला. सुरेश ,नीलिमा आणि मयुरी तिघंही त्याला घट्ट बिलगले. बराच वेळ त्यांच्या अश्रूंच्या धारा वाहवत होत्या.  

सुरेशने शहरातील नोकरी स्वीकारली. त्याचा छोटासा संसार घेऊन शहराकडे निघाला. जायच्या दिवशी सुरेश चंद्रकांतला भेटायला आला. चंद्रकांतच्या पत्नीने सुरेश आणि त्याच्या कुटुंबियांचं औक्षण केलं. सगळ्यांच्या हातावर दहीसाखर ठेवली. जातांना सुरेशला बाजूला घेऊन चंद्रकांतने त्याच्या हातात एक पाकीट दिलं. 

आणि त्याला म्हणाला...

"शहरात गेल्यावर लगेचच तुला पैशाची गरज भासेल म्हणून काही पैशाची व्यवस्था केली आहे. अजूनही काही गरज लागली तर कळव." 

सुरेशने पाकीट उघडून पाहिलं तर त्यात पंचेचाळीस हजार रुपये होते. इतके पैसे पाहून तो आश्चर्यचकित झाला...

" चंदू ,अरे इतके पैसे कुठून आणलेस तू ..? इतके पैसे कोणी दिले तुला...?"  

" अरे सुरेश , त्याची चिंता तू नको करूस. मी केली व्यवस्था बरोबर. तू फक्त तुझ्या कामाकडे लक्ष दे. " 

" नाही चंदू , मला खरं सांग इतके पैसे तू कुठून आणले , त्याशिवाय मी इथून जाणार नाही. "  

" अरे मयुरीच्या लग्नासाठी एक एक दागिना घडवावा म्हणून मी हे पैसे जमा करत होतो पण आता दागिन्यांपेक्षा ह्या पैश्याची जास्त गरज तुला आहे भावा. आता नाही म्हणू नकोस. लवकर जा. जितका जास्त वेळा थांबशील तितके जाण अवघड होईल तुझं. "  

चंद्रकांतचे बोलणं ऐकून सुरेशला अश्रू रोखता आले नाही. त्याच्या आपुलकीने तो भारावला होता. दोन्ही मित्रांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. मयुरी आणि नीलिमा पण एकमेकांना निरोप देतांना भावनावश झाल्या. मोठ्या जड अंतःकरणाने त्यांनी सगळ्यांनीच एकमेकांना निरोप दिला. शहरात येऊन सुरेश नवीन नोकरीवर रुजू झाला.  

सुरेश शहरात आला पण चंद्रकांतचं काय..? सुरेशच्या पाठोपाठ चंद्रकांत देखील शहरात येईल का ..? नीलिमा आणि मयुरी एकमेकांना सोडून राहू शकतील का ..? सुरेश आणि त्याच्या कुटुंबियांचे शहरातील भविष्य नेमकं काय असेल..? हे सगळं जाणून घ्यायचं आहे ना..? मग याच कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका. 

क्रमश :

भाग दोन वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇👇https://velvetkavisha.blogspot.com/2021/12/blog-post_43.html

भाग तीन वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇👇https://velvetkavisha.blogspot.com/2021/12/blog-post_25.html

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात,त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

फोटो साभार - Google

✍©️ जया पाटील







Post a Comment

0 Comments