तुझी सून पण कुणाची तरी लेकचं आहे ना!
©️जया पाटील
" पाहिलंस का शुभम, इतक्या वेळा सांगून पण अर्चनाने गवती चहा घालूनच चहा केला. तिला कितीतरी वेळा सांगून झालं आहे की मला आलं घालून केलेलाच चहा आवडतो तरीही मला नेहमी गवती चहा घालूनच चहा देते ती ..."
" एखादी चूक झाली तर समजून घेईल ना मी, पण प्रत्येक काम करतांना चूक करते तुझी बायको. स्वयंपाक करतांना पण शंभर चुका करते ती. कधी भाजीत मीठ जास्त तर कधी कमी , कधी वरण पातळ तर कधी अगदीच घट्ट."
" नवीन होती तेव्हा ठीक आहे पण आता तर लग्नाला वर्ष पूर्ण होईल तरी पण अजूनही चुकाच होत आहे. त्यातल्या त्यात तू आणि तुझ्या बाबांनी डोक्यावर बसवून ठेवलं आहे तिला. सगळं किती छान करते म्हणून कायम कौतुक करत असतात. आता मी बोलते आहे त्यावर काही बोलणार आहेस की नाही ? की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसशील...? "
प्रमिलाताई नेहमीप्रमाणे नाश्ता करतांना डायनिंग टेबलवर त्यांच्या मुलाची अर्थातच निलेशची त्याची बायको अर्चनावरून खबरदारी घेत होत्या. किचन मध्ये काम करणारी अर्चना पण त्यांचं सगळं बोलणं ऐकत होती. त्याच्या आईच्या बोलण्याचा निलेशला खूप राग येत होता पण अर्चनाने त्याला आईला काहीच बोलू नकोस म्हणून डोळ्यांनी खुणावले आणि तो गप्प बसला.
" आई, अर्चनाला आपल्या घरातल्या पद्धती तू शिकव आणि मला तुमच्या बायकांच्या भानगडीत ओढू नकोस. तुमचे प्रॉब्लेम तुमचे तुम्हीच सॉल्व करा. चल निघतो मी. ऑफिसला जायला उशीर होतो आहे मला .." एवढं बोलून निलेश तिथून उठला.
" अरे निलेश , तुझं तु पाहून घे असं कसं म्हणतोस तु..? अरे निलेश ऐक तर खरं..."
" सॉरी आई , बाय नंतर बोलूया आपण ..." इतकं बोलून प्रमिलाताईंचं काही एक न ऐकता निलेश ऑफिसला निघून गेला.
अर्चना यशवंतरावांची एकुलती एक लेक.
अर्चनाचा जन्म झाला तेव्हा लक्ष्मीच्या पाउलांनी आपली लेक आपल्या घरी आली म्हणून यशवंतरावांना आणि त्यांची पत्नी वंदनाला खूप आनंद झाला. अगदी लाडाने त्यांनी तिचे संगोपन करायला सुरुवात केली. सगळं छान सुरु असताना काळाने घाव घातला. वंदनाताईंचा एक रोड ऍक्सीडेन्ट झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आठ वर्षाची अर्चना आईविना पोरकी झाली.
आपल्या लेकीच्या वाट्याला सावत्रपणा येऊ नये म्हणून यशवंतरावांनी दुसरा विवाह केला नाही. त्यांनीच अर्चनाचा आई आणि बाप बनून तिचा सांभाळ केला. तिला आईचं प्रेम आणि संस्कार देण्याचा अगदी शंभर टक्के प्रयत्न केला.
अर्चना मोठी झाली तशी तीच यशवंतरावांची आई झाली. त्यांची अगदी आईप्रमाणे काळजी घेऊ लागली. सगळ्या बाबांप्रमाणे यशवंतरावांनाही वाटलं खरंच आपली लेक किती लवकर मोठी झाली.
अर्चना आता घरचं सगळं सांभाळून कॉलेजला जाऊ लागली. तिथे कॉलेजच्या कामानिमित्त तिचे अनेक मित्रमैत्रिणी तयार झाल्या. कॉलेजच्या प्रोजेक्ट मध्ये तिला कोणीच पार्टनर नसल्यामुळे तिला लास्ट ऍडमिशन असलेल्या निलेशसोबत प्रोजेक्ट तयार करावा लागणार होता त्यामुळे तिची भेट निलेश सोबत झाली.
सदाशिव आणि प्रमिला साने यांचा मुलगा निलेश. निलेश , बहिण पूर्वी आणि त्याचे आईबाबा असा त्यांचा सुखी चौकोनी परिवार. निलेश खूप हुशार आणि गुणी मुलगा होता. प्रमिलाताईंनी त्याला खूप शिस्तीत मोठं केलं होतं.
प्रोजेक्टच्या कामानिमित्त अर्चना आणि निलेश जेव्हा एकमेकांना पहिल्यांदा भेटले तेव्हा निलेशला पहिल्याच भेटीत अर्चना खूप आवडली. त्यानंतर प्रोजेक्टच्या कामानिमित्त अर्चना आणि निलेश बऱ्याचवेळा भेटू लागले. अर्चनाचं वागणं बोलणं सगळंच त्याला खूप मनापासून आवडू लागलं होतं.
त्यांची मैत्री वाढीस लागली. त्यांच्यातील मैत्रीचं नातं कधी प्रेमात बदललं दोघांनाही समजलं नाही. अर्चनाला पण निलेश मनापासून आवडत होता पण तिलाही त्याला हे सगळं काही सांगायची हिम्मत होत नव्हती. निलेशला देखील आपल्या मनातील भावना अर्चनाला सांगायच्या होत्या पण त्यामुळे अर्चना आपल्यापासून दूर जाईल अशी चिंता त्याला सतावत असे. आग दोनो तरफ बराबर लगी थी...। अशी त्यांची दोघांचीही अवस्था होती.
कॉलेजचे शेवटचं वर्ष सुरु झालं. फायनल एक्झाम झाल्या. कॉलेजच्या कॅम्पस प्लेसमेंट सुरु झाल्या. निलेश त्यात सिलेक्ट झाला. चांगल्या कंपनीत त्याची निवड झाली. एक महिन्यात त्याने नवीन नोकरी जॉईन केली. आता तो आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी झाला.
त्यामुळे त्याने अर्चना सोबत बोलायचं ठरवलं. पुन्हा अर्चनाला हे सगळं आवडेल की नाही असा विचार त्याच्या डोक्यात आला मात्र आता आर किंवा पार होऊन जाऊ दे ,काहीही झालं तरी अर्चनाला आपल्या मनातल्या भावना सांगायच्या असं त्याने ठरवलं.
निलेशने एक दिवस अर्चनाला कॉफी पिण्यासाठी इन्व्हाईट केलं.
ठरलेल्या वेळेवर अर्चना निलेशने मेसेज केलेल्या पत्त्यावर पोहोचली. एक सुंदर शामियाना गार्डनच्या कोपऱ्यात उभारला होता. त्याला खूपच सुंदर सजवलं होतं. चहूकडे सुरु असलेली लायटिंग , चहूकडे पसरलेले रंगीबेरंगी फुगे , मंद आवाजात सुरु असलेले संगीत , टेबलवर सजवून ठेवलेला केक हे सगळं मनमोहक वातावरण पाहून अर्चना खूपच आनंदी झाली.
तितक्यात तिच्या मागुन आवाज आला ....
" I Love u , अर्चना ...
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर .. !
I Love u so much .....! "
तिने मागे वळून पाहिले तर मागे निलेश उभा होता. त्याला पाहून अर्चनाला खूपच आनंद झाला. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
ज्या क्षणाची ती मनापासून वाट पाहत होती तो प्रत्यक्षात उतरल्यामुळे तिला आभाळ ठेंगणं झालं होतं. निलेशने देऊ केलेलं गुलाबाचं फुल तिने स्वीकारलं. दोघांनीही आपल्या नात्याबद्दल घरी सांगायचं ठरवलं. अर्चनाने यशवंतरावांना निलेशबद्दल सांगितलं. यशवंतराव निलेशला भेटले. त्यांना तो पहिल्याच भेटीत खूप आवडला. त्यांच्यासाठी अर्चनाचा आनंद सगळ्यात जास्त महत्वाचा होता त्यामुळे त्यांनी अर्चनाच्या पसंतीला मनापासून स्वीकारलं.
निलेशने देखील अर्चनाबद्दल आपल्या घरी सांगितलं. प्रमिलाताईंना मात्र हे अजिबात आवडलं नाही. प्रमिलाताईंना त्यांच्या चुलतभावाची मुलगी अस्मिताला सून करून त्यांच्या घरात आणायचं होतं त्यामुळे निलेश आणि अर्चनाच्या नात्याबद्दल त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली परंतु सदाशिवरावांनी बाजू सांभाळून घेतली.
" शेवटी संसार निलेशला करायचा आहे अर्चना सोबत. शेवटी राजाने केली आणि राणी झाली हे खरं आहे. त्या दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे तर एकदा भेटूया अर्चनाच्या बाबांना. "
सदाशिवरावांनी समजवल्यामुळे आणि निलेशच्या हट्टापुढे काहीच न चालल्यामुळे नाखुशीनेच प्रमिलाताईंनी होकार दिला.
दोघी कुटुंबांच्या सहमतीने अर्चना आणि निलेशचा विवाह अगदी साधेपणाने पार पडला. माप ओलांडून अर्चना आता सानेंच्या घराची गृहलक्ष्मी झाली. प्रमिलाताई मात्र अर्चनाचा दुस्वास करू लागल्या.
लग्नानंतर काही दिवसात निलेशने अर्चनाला आईच्या नाराजीबद्दल सांगितलं...
" अर्चू , सॉरी ग पण आईला माझ्या चुलत मामाची मुलगी सून म्हणून घरी आणायची होती. तिने मामाला तसा शब्द ही दिला होता पण मी आपल्या नात्याबद्दल घरी सांगितलं, आणि आपलं लग्न झालं. त्यामुळे आई थोडी नाराज आहे. स्वभावाने थोडी रागीट आहे ती पण मनातून मात्र प्रेमळ आहे. प्लीज तिला सांभाळून घे."
अर्चनाने देखील निलेशला होकार दिला. प्रमिलाताई मात्र प्रत्येक गोष्टीत अर्चनाच्या चुका काढू लागल्या. निलेश त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असे पण तो अर्चनाच्या बाजूने वादामध्ये पडल्यामुळे प्रमिलाताईंना आणखीन जास्त राग येत असे. तेव्हा अर्चनाने निलेशला समजावलं.....
" निलेश , आधीच लग्न करतांना तू आईंची पसंत न विचारात घेता लग्न केलं आहेस मग आता आणखीन त्यांच्यासमोर माझी बाजू घेऊन त्यांचं मन दुखवू नकोस.
त्यांची नाराजी नक्की दूर होईल. लवकरच त्या मला त्यांची लेक म्हणून स्वीकारतील याची मला खात्री आहे फक्त तू त्यांना आणखी दुखवू नकोस. त्या एक आई आहे आणि कोणतीच आई आपल्या मुलांवर जास्त दिवस नाराज राहू शकत नाही. "
अर्चनाच बोलणं निलेशला पटलं आणि त्याने त्यादिवसानंतर अर्चना आणि आईच्या मध्ये पडणं सोडून दिलं. काही दिवसांनी प्रमिलाताईंना टायफॉईड झाला आणि त्यात त्यांच्या पेशी देखील खूप कमी झाल्या त्यामुळे प्रमिलाताई खूपच वीक झाल्या.
त्यावेळी अर्चना त्यांची या आजारी अवस्थेत अगदी प्रेमाने काळजी घेत होती. त्यांना अंघोळीला सोबत नेण्यापासून , त्यांना खाऊपिऊ घालण्यापर्यंत सगळंच ती अगदी प्रेमाने करत होती.
प्रमिलाताईंना त्यावेळेस अर्चनातला चांगुलपणा जाणवला पण त्यांचं मन मात्र ते कबूल करायला तयार नव्हतं. त्यानंतर काही दिवसात पूर्वीचं शिक्षण पूर्ण झालं. सदाशिवरावांनी आणि प्रमिलाताईंनी तिच्यासाठी वरसंशोधन सुरु केलं. तिच्यासाठी त्यांनी सुयोग्य अश्या लोकेशची निवड केली.
लोकेश आणि पूर्वीचा विवाह देखील अगदी थाटामाटात पार पडला. अर्चनाने पूर्वीच्या लग्नात देखील सगळ्यांची अगदी भरभरून काळजी घेतली. अर्चना स्वतःचे कर्तव्य कमी करण्यात कुठेही कमी पडली नाही. लग्नाची सगळी कामं आणि इतर जबाबदाऱ्या देखील तिने अगदी व्यवस्थित पार पाडल्या. सगळ्यांचा मानपान देखील अर्चनाने अगदी योग्य रीतीने केला.
पूर्वीच्या सासरच्यांनी प्रमिलाताईंजवळ अर्चनाचं भरभरून कौतुक केलं. त्यामुळे प्रमिलाताई मनोमन खूप आनंदी झाल्या. अर्चनाने तिच्या प्रेमळ वागण्यामुळे प्रमिलाताईंना देखील आपलंसं केलं. प्रमिलाताईंना आता अर्चना आवडू लागली होती पण त्यांच्यातला अहंकार मात्र हे कबूल करायला तयार नव्हता. मानवी स्वभावच असा आहे की आपण वाईट गोष्टी अगदी पटकन स्वीकारतो पण चांगल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी मात्र आपलं मन तयार होत नाही. प्रमिलाताईंचं देखील तेच झालं होतं.
पूर्वीच्या लग्नानंतर काही दिवसांनी अर्चनाने गोड बातमी दिली. तिला दिवस गेले. पण तिचे डोहाळे खूप कडक असल्यामुळे तिला पाणीपण पचत नव्हतं. निलेश ,सदाशिवराव तिची खूप काळजी घेत होते. प्रमिलाताई देखील मनापासून नाही पण कर्तव्य म्हणून आपली जबाबदारी पार पाडत होत्या.
एक दिवस अर्चना हॉल मध्ये बसली होती. प्रमिलाताई आत होत्या. दरवाज्याची बेल वाजली.
अर्चनाने दरवाजा उघडला. समोर पूर्वी होती. सहजचं सगळ्यांना भेटायला पूर्वी माहेरी आली होती. अर्चनाने तिचं स्वागत केलं. तितक्याच तिला उलटी आल्यामुळे ती लगेचच बेडरूम मध्ये पळाली. पूर्वी किचन मध्ये पाणी घेण्यासाठी गेली आणि प्रमिलाताई तिथे आल्या. पूर्वीला पाहून त्यांना खूपच आनंद झाला. त्या पूर्वीला म्हणाल्या..
" पूर्वी, बाळा कधी आलीस ग..? किती दिवसात पाहतेय माझ्या लेकीला. किती वाळलिस ग बाळा. खूप काम असेल ना सासरी..?
अग पण तू आलीस मला समजलं कसं नाही. दरवाज्याची बेल पण वाजली नाही. "
" अग आई आताच आली. मी बेल वाजवली पण वहिनी हॉलमध्येच होती त्यामुळे बेल पूर्ण वाजायच्या आतचं तिने लगेच दरवाजा उघडला त्यामुळे तुला बेलचा आवाज नाही आला. " पूर्वीने उत्तर दिलं.
" अग मग दरवाजा उघडून अर्चना कुठे गेली...? थकलेल्या माझ्या लेकीला साधं पाणी आणता आलं नाही तिला.." प्रमिलाताईंना मात्र अर्चनाला बोलायचं एक कारणचं मिळालं.
घडलेला सारा प्रकार निलेश पाहत होता. प्रमिला ताईंनी अर्चनाला बोलावून तिच्यावर ओरडायला सुरुवात केली. पूर्वीने त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या मात्र काही एक ऐकायच्या मनःस्थितीत नव्हत्या.
" अर्चना , लग्नानंतर इतक्या दिवसांनी पहिल्यांदा तुझी नणंद घरी तिच्या माहेरी आली आणि तू तिला साधं पाणी आणलं नाही. आपण आलेल्या परक्या पाहुण्यांचं सुद्धा पाणी आणून आगत स्वागत करतो आणि तू ? तू या घरच्या लेकीचा इतका अपमान केला. इतके साधे संस्कार दिले नाही का तुला तुझ्या बाबांनी..? "
प्रमिलाताईंनी अर्चनाच्या बाबांचं नाव घेतल्यामुळे अर्चनाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले मग मात्र निलेशचा संताप अनावर झाला. तो प्रमिलाताईंना अडवत म्हणाला ...
" आई, बास झालं...! अर्चनाची चुकी नसतांना तिच्यावर ओरडणं बंद कर.
"
निलेशचा आवाज पाहून प्रमिलाताईंना खूप राग आला पण त्याचा तो रुद्रावतार पाहून त्या नरमल्या. अर्चना निलेशला अडवू लागली.
त्यावेळी निलेश म्हणाला...
" अर्चना, मला अडविण्याचा प्रयत्न करू नकोस. आज मला बोलण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. आजपर्यंत मी तुझं ऐकून गप्प राहिलो. खरं तर तेच चुकलं माझं. मी तेव्हाच बोलायला हवं होतं. आई तुझा कधीतरी दुस्वास करणं बंद करेल असं वाटत होतं मला. पण नाही ,आईच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. "
इतकं बोलून निलेश प्रमिलाताईंना उद्देशून बोलू लागला ..
" आई , आजपर्यंत अर्चनाने तुझं बोलणं , तिला अपमानास्पद वागवणं सगळं सहन केलं का..? तर तू कधीतरी तिला समजून घेशील पण नाही. तुला फक्त तिच्या चुका काढण्यात इंटरेस्ट आहे. पूर्वी आली तेव्हा हसून अर्चनाने तिचं स्वागत केलं पण त्याचवेळेस तिला उलटी आली आणि ती बाथरूम कडे पळाली. त्यावरून तू तिला इतकं बोललीस. एकदा तुझ्या लेकीला पाणी दिलं नाही म्हणून तुला इतका अपमान वाटला. तू तर नेहमीचं अर्चनाचा अपमान करत आलीस. तिलाही तर वाईट वाटत असेलच ना ...? "
"आई , तुझ्याविरुद्ध जाऊन लग्न तर मी पण केलं आहे पण त्याची शिक्षा फक्त अर्चनालाच का ? यात मी पण तितकाच दोषी आहे मग माझ्या चुकीची शिक्षा मला पण मिळायला हवी ना...? पण तू मला काहीच बोलत नाहीस. का तर मी तुझा मुलगा आहे ना. "
" लहानपणापासून अर्चनाला आईचं प्रेम मिळालं नाही आई. ती जेव्हा या घरात आली त्यावेळेस मी आणि पूर्वी जेव्हा तुला आई आई करून लाड करवून घ्यायचो त्यावेळेस तिच्या डोळ्यात पाणी असायचं.
आपलं पण असंच कोणीतरी लाड करणारं असावं अशी तिची अपेक्षा असायची पण तिची हीच इच्छा तू कधीच पूर्ण केली नाही. तिच्या डोळ्यातील पाणी तुला कधी दिसलंच नाही. "
" तू एक आई आहेस. आईचं प्रेम मिळालं नाही की काय अवस्था होते हे तुझ्यापेक्षा जास्त कोणीच समजूत शकत नाही. मग का कमी पडलीस ग आई अर्चनाला तुझी गरज आहे हे समजून घेण्यात..? आज अर्चना स्वतः आई होणार आहे.
तिला मातृत्वाच्या या उबंरठ्यावर आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त तुझी एका आईची गरज आहे. आई पूर्वी सासरहून आली तर तिचा थकवा तुला जाणवतो पण समोर असलेल्या अर्चनाच्या मनातील मातृप्रेमाची आस तू का ओळखू शकत नाहीस."
" अर्चना तुझी सून असली तरीही ती सुद्धा कोणाची तरी लेकच आहे ना ..! हे तू का समजून घेत नाही आई ? की तूला समजून घ्यायचंच नाहीये..?
तू माझी आणि पूर्वीची आई आहेस ना मग अर्चनाची आई होण्याचा प्रयत्न का करत नाहीस ? एका आईला असं वागणं नाही शोभत...."
इतकं बोलून निलेश रागात निघून गेला. पाठोपाठ प्रमिलाताईंवर एक रागाचा कटाक्ष टाकून काही एक न बोलता सदाशिवराव निघून गेले. न बोलताही त्यांच्या भावना प्रमिलाताईंपर्यंत अचूक पोहोचल्या. प्रमिलाताईंना आपल्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला. त्यांच्या अहंकारावर त्यांच्यातील चांगुलपणाने आज विजय मिळवला होता.
त्या अर्चनाच्या जवळ गेल्या. रडणाऱ्या अर्चनाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवून त्या म्हणाल्या ...
" अर्चू , मी चुकली ग बाळा, खरं तर तुझी माफी मागण्याला देखील मी लायक नाही पण तरीही मला माफ करशील ना ..? तुझ्या या आईला माफ करशील ना ..? "
त्यांच्या या बोलण्यावर अर्चना त्यांना घट्ट बिलगली. " आई ... आई ...आई ...आई..... " या शब्दांव्यतिरिक्त ती पुढे काही बोलूच शकली नाही. आई आणि लेकीचा हा प्रेमळ आनंद सोहळा निलेश दरवाज्याच्या मागुन पाहत होता. त्याच्या डोळ्यातील आनंद अश्रूंच्या रूपात ओसंडून वाहत होता.
समाप्त...!
✍©️ जया पाटील
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात,त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box