#विश्वासाची_दोरी_नात्याला_उद्धारी_भाग_१
©️जया पाटील
लख्ख प्रकाशणाऱ्या दिव्यांनी उजळणारी खोली , सगळीकडे खोलीला सजविण्यासाठी लावलेल्या फुलांच्या माळा, बाजूच्या टेबलवर एका काचेच्या भांड्यात सजवलेल्या फुलांच्या पाकळ्या, त्यात पाण्यावर तरंगत ठेवलेले दिवे, मधोमध गुलाबांच्या पाकळ्यांनी सजवलेला पलंग , गुलाबीसर चादरीवर लाल गुलाबांच्या पाकळ्यांनी रेखाटलेला बदामाचा आकार खूपच खुलून दिसत होता. गॅलरीतून येणारी हवेची झुळूक सुखावणारी होती. तिथे सजलेल्या हिरव्या झाडांच्या कुंड्या मन प्रसन्न करत होत्या. तितक्याच तिथे हसत गंम्मत करत शारदाच्या नणंदा तिला रूमकडे घेऊन आल्या आणि बोलू लागल्या...
" आज सगळं काही ऐक हं आमच्या दादाचं, उगाचचं त्याला त्रास देऊ नकोस. आम्ही सकाळी येऊन विचारू त्याला ... "
तितक्याच दुसरी नणंद म्हणाली ..
" ऐ..चला ग पटकन, विवेक दादा खोळंबला असेल खाली. आपण इथे त्याच्या बायकोला अडवून बसलोय त्यामुळे त्याला वरती रूम मध्ये पण येता येत नाही. एकतर आधीच शारदा वहिनी माहेरी अडकल्यामुळे दोन दिवस उशीर झाला आहे त्यांच्या मिलनाला. त्यात आता आपल्यामुळे आणखीन उशीर नको. "
विवेकच्या बहिणींच्या बोलण्यामुळे शारदा लाजून चूर झाली आणि चिवचिवाट करणाऱ्या चिमण्यांप्रमाणे त्यांचा घोळका खाली निघून गेला. शारदा रूम मध्ये आली. सजवलेल्या खोलीकडे पाहून शारदाच्या मनात एकच अनामिक हुरहूर दाटून आली.
'नववधू प्रिया मी बावरते. लाजते पुढे सरते ,फिरते....' अशी प्रत्येक नववधूप्रमाणे शारदाच्या मनाची अवस्था होती. आज शारदा आणि विवेकच्या सहवासाची पहिली रात्र त्यामुळे दोघांच्याही मनातील धडधड वाढलेली.
शारदा हळूच पलंगावर जाऊन बसली. तितक्यात खालून विवेक देखील रूम मध्ये आला. दरवाज्याची कडी आतून त्याने हळूच बंद केली तशी शारदाच्या हृदयाची धडधड अजूनच वाढली.
लाल रंगाची साडी, त्यावर साडीच्या काठाला मॅच असणारं निळ्या रंगाचं ब्लॉउज, गळ्यात नाजुकसं मंगळसूत्र, मेंदीच्या हातांवर त्यांचं सौंदर्य खुलवणारे नाजूक कडे , गुलाबीसर हातात नाजूकशी एंगेजमेंट रिंग, वरती पिनअप करून खाली मोकळे सोडलेले केस, ओठावर लावलेली ग्लॉसी लिपस्टिक, डोळ्यातले काजळ आणि स्मोकी आयलायनर हा सगळा साज शारदाचं सौंदर्य आणखीनच खुलवत होता.
शारदाला विवेक आज पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहत होता. तिच्या या भाळून टाकणाऱ्या सौंदर्याकडे पाहून विवेक पूरता घायाळ झाला. शारदा आणि त्यांचं लग्न या सगळ्या गोष्टी विवेकच्या डोळ्यासमोरून सरकू लागल्या.
एक महिन्यापूर्वी विवेकच्या आई नंदाताईंनी एका नातेवाईकांच्या लग्नात शारदाला पाहिलं आणि पहिल्याच नजरेत त्यांनी तिला सून म्हणून पसंत केली. नातेवाईकांकडून शारदाची सगळी माहिती घेऊन नंदाताई आणि त्यांचे पती रमाकांतराव दोघांनीही शारदाला त्यांच्या मुलासाठी अर्थातच विवेकसाठी मागणी घातली.
रीतसर कांदेपोह्यांचा कार्यक्रम पार पडला. विवेक आणि शारदाची नजरानजर झाली. विवेकला पाहून पहिल्या नजरेतच शारदा त्याच्या प्रेमात पडली. विवेकला देखील शारदाचा साधेपणा, तिचा सोज्वळपणा भावला. विवेकने आईवडिलांच्या पसंतीचा सन्मान करत शारदासोबत लग्न करण्यासाठी होकार दिला. पुढे लवकर मुहूर्त नसल्यामुळे एक महिन्याच्या आतच विवेक आणि शारदाचा लग्नसोहळा पार पडला. माप ओलांडून शारदा विवेकच्या घराची गृहलक्ष्मी झाली.
लग्न झालं. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा पार पडली. मांडव परतणी साठी शारदा माहेरी गेली आणि तिच्या बाबांची तब्येत थोडी खराब झाली. त्यामुळे दोन दिवस ती माहेरीच थांबली. सगळ्या गडबडीत विवेक आणि शारदाला एकमेकांना जाणून घ्यायला, समजून घ्यायला वेळच मिळाला नाही. लग्नानंतरच्या दोन दिवसात तर ते एकमेकांच्या समोर सुद्धा आले नाही. आजच्या रात्री खऱ्या अर्थाने ते एकमेकांना जाणून घेणार होते. शब्दाविना त्यांच्या मनातल्या भावना खूप काही सांगत होत्या.
विवेक हळूच पुढे येऊन शारदाच्या समोर येऊन उभा राहिला. शारदाने डोळ्यांनीच त्याला पलंगावर बसण्यासाठी खुणावलं. विवेक शारदाच्या जवळ येऊन बसला. दोघांच्याही मनात खूप गोंधळ सुरु होता. क्षणात मन अलीकडे आणि पलीकडे जाऊन परतून येत होतं.
थोडीशी उत्सुकता, थोडीशी हुरहूर, थोडी चलबिचल अशा एका ना अनेक संमिश्र भावना मनात काहूर माजवत होत्या. विवेक शारदाजवळ बसला, हळूच तिचा हात त्याने स्वतःच्या हातात घेतला. शारदाच्या हृदयाची धडधड आणखीनच वाढली. तिच्या हातावर हात हलकेच थोपटत तो बोलू लागला ...
" शारदा , आपल्या दोघांचंही लग्न खूप घाईघाईत झालं, त्यामुळे एकमेकांना जाणून घ्यायला, समजून घ्यायला आपल्याला वेळच मिळाला नाही पण एकमेकांना स्वतःला समर्पितही करण्याआधी आपण एकमेकांना समजून घ्यायला हवं. कुठलंही नातं हे विश्वासावर टिकून असतं. आपल्यात जेव्हा विश्वास असेल तेव्हाच आपलं नातं भक्कमपणे टिकून राहिल. "
" तुझ्यासाठी हे घर, ही माणसं सगळंच नवीन आहे. अगदी ह्या घरातील वस्तूही नवीन आहे. त्यात फक्त तू माझ्यावर विश्वास टाकून या घरात आली आहेस. त्यामुळे माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनांची तू साक्षीदार असावी ही माझी इच्छा आहे.
" एकमेकांचे जोडीदार होण्याच्या आधी आपण एकमेकांचे मित्र मैत्रीण होण्याचा प्रयत्न करूया कारण आपण आपल्या मित्रमैत्रिणींजवळ खूप मोकळेपणाने बोलू शकतो तसंच नातं मला आपल्या दोघांमध्ये निर्माण व्हायला हवंय. त्याची सुरुवात आपण आजपासूनच करूया."
" प्रत्येकाच्या आयुष्यात एक भूतकाळ असतो. तुझ्या माझ्या प्रत्येकाच्याच. पण हाच भूतकाळ आपल्या भविष्यात वादळ बनून येऊ नये म्हणून मला काही गोष्टी तूला सांगायच्या आहेत. तुलाही तुझ्या भूतकाळाबद्दल मला सांगायचं असेल तर नक्की सांगू शकते एक मित्र म्हणून अगदी निशंकपणे. त्याचा असा अर्थ घेऊ नकोस की मी तुझ्या भूतकाळाबद्दल जाणून घेऊन तूला भविष्यात त्रास देईल. हवं तर सुरुवात माझ्यापासून करू. "
" भूतकाळातील त्या सगळ्या गोष्टी आता माझ्या आयुष्यात महत्वपूर्ण नाहीत पण तू माझी अर्धांगिनी आहे. त्यामुळे माझा भूतकाळ ,वर्तमान आणि भविष्य तुला माहित असावं अशी माझी इच्छा आहे. मी तुला जे काही सांगेन त्यानंतर तुला कदाचित माझा राग येईल किंवा नाही येणार पण त्यामुळे माझ्या मनावरचा ताण कमी होईल. प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस." विवेक अगदी प्रेमाने शारदाला म्हणाला.
" तुम्ही तुमच्या आयुष्यात आल्यावर मला इतका आदर दिला आहे. यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाही माझ्यासाठी आणि हो ..तुम्ही सांगितलेल्या घटनेवर आपण ठरवूया मला राग येतो की नाही. अगदी निश्चित होऊन तुम्ही तुमचं मन मोकळं करा." शारदाने वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला.
" थँक्यू शारदा ...किती समंजस आहेस तू. मी जेव्हा कॉलेजला ऍडमिशन घेतलं तेव्हा प्रत्येक मुलाकडून मी हेच ऐकलं होतं की कॉलेज लाईफ फक्त मज्जा करण्यासाठी आणि मुली पटवण्यासाठी असतं. प्रेम वगैरे सगळं खोटं असतं. पण माझा हा गैरसमज अगदी चुकीचा ठरला जेव्हा माझ्या आयुष्यात पल्लवी आली. मला आजही आठवतं कॉलेजचा तो पहिला दिवस जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं...."
" मस्त नेव्ही ब्लू कलरचा कुर्ता, त्यावर त्याच रंगाची प्रिंटेड चुडीदार पॅन्ट, साईडने घेतलेली लालकलरची ओढणी, डाव्या हातात काळ्या बेल्टचं घड्याळ, उजव्या हातात नाजुकसं ब्रेसलेट, केस बनाना क्लिपने बांधलेले , खूप छान दिसत होती ती. "
" पल्लवी होतीच मुळात सुंदर पण काळेभोर केस, गोर्या गालांवर रेंगाळणारी कुरळ्या केसांची बट तिचं सौंदर्य आणखीनच खुलवत असे. मोहक डोळे, चाफेकळी नाक, गुलाबी ओठ जशी काय स्वर्गातील अप्सराच जणू.....! पण ती मात्र सहसा कोणासोबतच बोलत नसे."
" तिच्या मैत्रिणी आणि आमच्यात काही कॉमन फ्रेंड्स होते त्यामुळे त्यांच्या कडून आम्हाला समजलं की तिला सहसा मुलांसोबत बोलायला आवडत नाही. का तर ..? मुलांसोबतची मैत्री प्रेमात बदलली तर ....? मग त्यामुळे पुढे येणाऱ्या अडचणी .....? त्यामुळे मुलांसोबत मैत्री आणि प्रेम वगैरे या भानगडीत कधीच पडायचं नाही असं तिने ठरवूनच टाकलं होतं. पण ठरवून करता आलं असतं तर ते प्रेम कसलं ....? कोणावरही प्रेम करणं हे आपल्या हातात असतं तर सगळ्याच गोष्टी किती सोप्या झाल्या असत्या ना शारदा..."
" त्यावर्षी आमचा एक विषय समजायला जरा कठीण होता पण दादाने त्यातच स्पेशलायझेशन केल्यामुळे सुट्यांमध्येच त्याने मला तो विषय अगदी सखोलपणे समजवला होता. लगेचच मी त्याच्या नोट्स पण काढून ठेवल्या. कॉलेजटेस्ट मध्ये मला त्या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले. सगळी मुलं माझ्याकडे नोट्स साठी तगादा लावू लागले. मग काय मी पण फॉर्म मध्ये आलो. "
" सेमिस्टर एक्झाम जवळ आली होती. पल्लवीला पण तो विषय खूप अवघड जात होता. तिच्या लाजऱ्या स्वभावामुळे ती फारशी कोणासोबत बोलत नसे पण आता प्रश्न पास-नापास होण्याचा होता त्यामुळे ती घाबरत घाबरत माझ्याकडे आली आणि तिने माझ्याकडे नोट्स मागितल्या. मलाही हेच हवं होतं की तिने माझ्यासोबत बोलावं. मनातून मला खूप आनंद झाला."
" साधी- भोळी, घाबरणारी, लाजरी-बुजरी जणू लावण्यवतीच ती ....! अशी पल्लवी मला पहिल्या नजरेतच खूप आवडली. पाहताक्षणी प्रेमात पडणं काय असतं या गोष्टीचा अनुभव मी पल्लवीला पाहताच घेतला. पहिल्या नजरेतच मी तिच्या प्रेमात पडलो. मला रोजच्या कामात सगळीकडे फक्त पल्लवीच दिसू लागली. पल्लवीचं वागणं बोलणं सगळंच मला खूप मनापासून आवडू लागलं होतं."
" हळूहळू नोट्सच्या निम्मिताने पल्लवी देखील माझ्या सोबत बोलू लागली. आमची मैत्री वाढीस लागली. मला माझ्या मनातील भावना पल्लवीला सांगायच्या होत्या पण त्यामुळे पल्लवी माझ्यापासून दूर जाईल अशी चिंता मला सतावत होती. आपले प्रेम मिळविण्याच्या नादात मी मैत्रीण म्हणुन तर पल्लवीला तर गमावणार नाही ना ...? अशा एक ना अनेक शंका-कुशंकांमुळे मी कधीच स्वतःच्या भावना तिला सांगू शकलो नाही. "
" एक दिवस मी आणि पल्लवी सोबत असतांनाच पल्लवीला घरून फोन आला की तिच्या आईला हार्ट अटॅक आलाय, तिची बहीण घरी एकटी होती, बाबाही बाहेरगावी गेले होते. ही बातमी ऐकून घाबरून पल्लवी रडू लागली. मी तडक पल्लवीच्या घरी गेलो. तिथून आम्ही लगेचच तिच्या आईला हॉस्पिटलाइज्ड केलं. त्यांच्या जीवावरच धोका टळला होता."
" या घटनेमुळे पल्लवी माझ्या आणखीनच जवळ आली. आमची मैत्री अजूनच घट्ट झाली. सगळ्यांसाठी पल्लवी असणारी माझ्यासाठी मात्र आता ती माझी प्रिय मैत्रीण पल्लू झाली. आम्हाला दोघांनाही एकमेकांचा सहवास आवडत होता. मी मात्र या पल्लवीच्या मैत्रीला प्रेम समजून बसलो. "
" या मैत्रीत कॉलेजची दोन-तिन वर्षे भुर्रकन निघुन गेली पण मी मात्र माझ्या भावना पल्लवीला कधीच सांगू शकलो नाही. माझे सगळेच मित्रमैत्रिणी मला आग्रह करत असत की तुझ्या भावना तु पल्लवीला सांगून टाक. त्यांना हो नाही करता करता शेवट मी या गोष्टीला तयार झालो. आणि मग तो दिवस उजाडला. आज आपल्या भावना पल्लवीला सांगून टाकायच्या असं मी ठरवलं."
" मी सकाळी लवकर उठलो. रात्रभर पल्लवीसोबत बोलायला सुरुवात कशी करायची याचाच विचार करत होतो. मस्त पैकी ब्लॅकचेक्सचा टीशर्ट, ब्लू कलरची डेनिम, हातात कडीचं घड्याळ, पायात नवीन स्पोर्ट्स शूज,अशा अंदाजात मी तयार झालो. कितीदा तरी आरश्यात पाहून पल्लवीसोबत काय आणि कस बोलायचं याची प्रॅक्टिस केली आणि पल्लवीला भेटायला कॉलेजला गेलो. पण त्या दिवशी मात्र बराच उशीर झाला तरी पल्लवी कॉलेजला आली नव्हती."
" आज पर्यंत फक्त मनात असलेल्या माझ्या भावना मी पल्लवीला सांगणार होतो. माझं हृदय जोरात धडधडत होतं आणि त्याचवेळी कॉलेजच्या गेट मधुन मला पल्लवी येताना दिसली. ती खूपच खुश दिसत होती. ती धावतच माझ्याकडे आली आणि बोलू लागली ....
" विवेक , मला तुला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे....! सगळ्यात पहिल्यांद्या फक्त तुलाच सांगायचीय कारण तू माझा खूप जवळचा मित्र आहेस ना ! माझ्यासाठी तु खूप खास आहे त्यामुळे खूप काही बोलायचं आहे तुझ्यासोबत.."
" बोल ना पल्लू , मला पण तुला काहीतरी सांगायचं आहे,पण आधी तु सांग पाहू. लेडीज फर्स्ट " विवेक म्हणाला.
पल्लवी लाजून बोलू लागली " अरे आज श्रीकांत सोबत लग्न ठरलं माझं! बाबांच्या ऑफिस मधे साने काका काम करतात ना. त्यांच्या भावाचा मुलगा. मोठा बिझिनेसमॅन आहे. दोन दिवसांपूर्वीच कांदेपोह्यांचा कार्यक्रम झाला. घरचे सगळेच खूप खुश आहेत. सगळं काही ठरलं की सगळ्यात पहिले तुलाच सांगेल असं ठरवलं होतं मी."
" पल्लवीच्या बोलण्यामुळे मी जागीच थबकलो होतो. अंगावर विज कोसळावी असा प्रहार झाला होता माझ्यावर पल्लवीच्या बोलण्याने. मी निशब्द झालो होतो. माझ्यावर कोणीतरी खूप मोठा प्रहार करत आहे असं वाटत होतं मला. माझं पहिलं प्रेम अधुरं राहिलं होतं. मला शांत उभा राहिलेला पाहून पल्लवी माझ्यासोबत बोलू लागली..
" अरे विवेक, तु पण काहीतरी सांगणार होतास ना मला. सांग ना. "
माझ्या डोळ्यातले अश्रु लपवत मी तिला म्हणालो.. " अग पल्लू, काही विशेष नव्हतं. खूप आनंद झाला मला ही गोड बातमी ऐकून. घरचे सगळेच खुश आहेत असं म्हणतेस पल्लू. पण तु खुश आहेस ना? "
" इश्य, असं काय विचारतो आहेस विवेक? श्रीकांत सारखा इतका छान नवरा मिळतोय. मीच काय, कोणतीही मुलगी खुश होणारच.! असंही आईबाबांच्या निर्णयाविरुद्ध मी कधी वागले नसतेच विवेक, पण श्रीकांतला पाहून सगळं सोपं झालं. त्याला पहिल्यांदा पाहिल्यावर ' दिल मे कुछ कुछ होता है ' अशी फीलिंग आली रे !" पल्लवी लाजून बोलत होती.
" शरीरावर विजेचा प्रहार झाल्यावर जसा कंप उठतो शरीरात तसंच वाटत होतं मला त्या क्षणी. पहिल्याच भेटीत पल्लवीला पाहून तिच्या प्रेमात पडलेलो मी मात्र निशब्द झालो होतो. पल्लवी सोडून दुसऱ्या कुठल्याही मुलीचा विचार सुद्धा मी करू शकत नव्हतो, पण पल्लवीचं सुख जर श्रीकांत सोबत असेल तर मी त्यांच्या आयुष्यातून निघुन गेलंच पाहिजे, असं मी ठरवलं. "
" त्यानंतर मात्र नोकरीच्या निमित्ताने मी दुसऱ्या शहरात निघून गेलो. पुन्हा कधीच पल्लवीला संपर्क केला नाही. तिला तिच्या सुखाच्या मार्गावर सोडून मी कायमचा तिच्यापासून दूर गेलो. तिने मला शोधायचा किंवा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला की नाही ते मला माहित नाही पण मी मात्र त्या दिवसानंतर तिला कधीच संपर्क केला नाही."
" पल्लवीपासून दूर गेलो तेव्हा मनाने खूप खचलो होतो मी. पण मी ज्याच्यावर प्रेम केलं त्याचं माझ्यावर प्रेम असेलच असं नाही त्यामुळे स्वतःला समजावलं आणि कामात लक्ष द्यायला सुरुवात केली. खूप दिवस निघून गेले आणि आईने तुझ्याबद्दल सांगितलं. तूला पाहिलं आणि खरंच मनापासून सांगतो मनाने होकाराचा कौल दिला. "
" पल्लवीनंतर कोणत्याच मुलीबद्दल असा विचार माझ्या मनात आला नाही पण तुला पाहून खरंच असं जाणवलं की तुच माझी योग्य जोडीदार आहे. माझ्या आयुष्यात यापुढे तुझ्याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही स्थान नसेल पण तरीही पल्लवी बद्दल तूला सांगावंस वाटलं कारण मला तुला फसवायचं नव्हतं. यानंतर तुला जो निर्णय घ्यायचा तू घेऊ शकते. तुला मला जी शिक्षा द्यायची ती दे. मी ती शिक्षा भोगायला तयार आहे."
हे सगळं बोलतांना विवेकचे डोळे पाणावले. शारदा मात्र निशब्द होऊन एकटक फक्त विवेककडे पाहत होती.
विवेकच्या भूतकाळाबद्दल समजल्यावर शारदाची काय प्रतिक्रिया असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही पण उत्सुक असालच ना ..? मग याच कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका.
क्रमश:
भाग दोन वाचा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2021/12/blog-post_28.html
भाग तीन वाचा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2021/12/blog-post_29.html
प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो. सकाळी सर्वात आधी सकाळी अकरा वाजता तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞
©️ जया पाटील
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात,त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Pinterest /Google
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box