कालाय तस्मै नमः भाग अंतिम

#कालाय_तस्मै_नमः_भाग_अंतिम

©️जया पाटील 



भाग एक वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक 

भाग दोन वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2021/12/blog-post_43.html

मागील भागात आपण पाहिलं की सुरेश आणि नीलिमाचा स्वार्थीपणा चंद्रकांत आणि मयुरीच्या समोर आला. आपल्या जिवलग मित्राच्या अशा वागण्यामुळे चंद्रकांत खूप खचला. मयुरीला तर त्यांचा खूप राग येत होता. मयुरीने आपल्या अपमानाचा बदला घेण्याचं ठरवलं पण आपण कधीच कोणाला स्वतःहून त्रास द्यायचा नाही. ज्याच्या त्याच्या चुकीची शिक्षा त्याला बरोबर मिळते. आपल्या कर्माची फळं इथेच भोगावी लागतात. त्यामुळे आपण फक्त चांगल वागायचं अशी चंद्रकांतने मयुरीची समजून काढली. आता पुढे...  

सुरेशच्या वागण्यामुळे चंद्रकांत मनाने खूप खचला होता. ज्या सुरेशवर आपण इतका विश्वास टाकला , त्याच्यावर भावाप्रमाणे प्रेम केले तो कसा इतका स्वार्थी होऊ शकतो तेच चंद्रकांतच्या लक्षात येते नव्हतं. मयुरीलाही नीलिमाच्या वागण्याचं खूप वाईट वाटत होतं. शेवटी प्रत्येक जण स्वार्थासाठी काहीही करू शकतं. त्यामुळे यापुढे कोणातच जीव अडकवायचा नाही. आपल्या कष्टाने खूप मोठं व्हायचं आणि आपल्या आईबाबांना सुखी करायचं. त्यांनी आजवर खूप कष्ट केले. त्यांना उतारवयात कोणतंच काम करू द्यायचं नाही. खूप पैसा कमवायचा. त्यासाठी खूप शिकायचं असं मयुरीने मनोमन ठरवलं.

शहरात मयुरीला एकटं ठेवण्यासाठी चंद्रकांतचे मन मानत नव्हते म्हणून मयुरीने जवळच्या मोठ्या गावात सायन्स ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलं. रोज अपडाउन करून ती खूप थकून जात असे पण तिची जिद्द तिला प्रत्येक संकटातून बाहेर काढत होती. मयुरीच्या शिक्षणासाठी पैसे उभे करण्यासाठी चंद्रकांत दिवसरात्र कष्ट करत होता.

इकडे सुरेशचे मात्र सगळं काहीतरी व्यवस्थित चालू होतं. कंपनीत त्याला बढती मिळाली होती. हातात बऱ्यापैकी पैसा होता. त्यामुळे नीलिमाला त्याने शहरातल्या चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं. तिला शहरातील नामांकित क्लासेस मध्ये प्रवेश घेतला. नीलिमाची पुढील अभ्यासाची तयारी सुरु झाली.

मयुरी अत्यंत खडतर परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करत होती तर नीलिमाचं शिक्षण व्यवस्थित सुरु होतं. आपल्याला जिवापाड जपणाऱ्या मयुरीला तर ती पार विसरून गेली होती. हळूहळू 

दिवस पुढे सरकत होते. नीलिमा आणि मयुरी दोघांचंही ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. नीलिमाचं नशीब चांगले की तिला लगेचच शासकिय कार्यालयात कारकून म्हणून नोकरी मिळाली.

सुरेशला आभाळ फक्त दोनचं बोट उरलं होतं. शिक्षण संपल्यावर आपल्या लेकीला लगेचच नोकरी मिळाली म्हणून त्याला गर्व आला होता. गावातील त्याच्या इतर मित्रांकडून त्याला चंद्रकांत आणि मयुरीची माहिती मिळत होती. मयुरी अजूनही शिक्षण पूर्ण करून घरीच आहे याच्याबद्दल जेव्हा त्याला समजलं तेव्हापासून त्याला नीलिमाचा जास्त अभिमान वाटू लागला.   

इकडे मयुरीने मात्र स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तयारी सुरु केली. ती रात्रंदिवस अभ्यास करत होती. तिच्या कष्टाला यश मिळाले. तिने पूर्व परीक्षा पास केली. तिने मुख्यपरीक्षा आणि मुलाखतीची तयारी सुरु केली.  

चंद्रकांत आणि मयुरीने तिच्या अभ्यासाबाबतीत कुठेही वाच्यता केली नाही कारण मुलीच्या बढाया मारणं चंद्रकांतला कधीच पटलं नाही. थोड्याश्या यशाने कधीच झाकोळायचं नसतं तेव्हाच आपण खऱ्या यशाला प्राप्त करू शकतो असं चंद्रकांतचे म्हणणं होतं.  

नीलिमा तिच्या नवीन नोकरीवर रुजू झाली. सुरुवातीला थोडा त्रास झाला आणि मग हळूहळू ती नोकरीत सेटल झाली. सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम रित्या पार पाडू लागली. पण नोकरीत फक्त जबाबदाऱ्या पार पडून उपयोग नसतो. सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांची मनं ओळखून काम करावं लागतं.  

नीलिमाच्या कार्यालयातील दोन तीन सहकारी आलेल्या लोकांची पैश्यासाठी सतत पिळवणूक करत असत. नीलिमाने त्यांना एकदा दोनदा समजवायचा प्रयत्न केला पण तू तुझं बघ आम्ही आमचे पाहू म्हणून त्यांनी तिला गप्प केले. त्यानंतर मात्र नीलिमाने याकडे कधीही लक्ष दिले नाही. नीलिमाला सिनियर क्लार्क म्हणून बढती मिळाली. तिच्या सहकार्यांना ते फारसे रुचलं नाही.

खरंच किती विरोधाभास होता ज्या चंद्रकांतने स्वतः कष्ट करून मित्राला मदत केली त्याच्या आयुष्यात अजूनही कष्टच होतं तर वेळेवर मित्राने केलेल्या मदतीला विसरून ही सुरेशचे सगळं व्यवस्थित सुरु होतं. पण देवाच्या दारात प्रत्येकाला न्याय मिळतोच.

एक दिवस निलीमाच्या कार्यालयात जवळच्या गावातील दोन शेतकरी काही कागदपत्रांसाठी आले. त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नीलिमाच्या त्या सहकार्यांनी पैश्याची मागणी केली. त्यांना पैसे देणं मंजूर नव्हते पण नाईलाजास्तव त्यांनी होकार कळवला. त्यांनी याबद्दल लाचलुचपत विभागाला कळवलं.  

लाचप्रतिबंधक अधिकाऱ्यांनी यासाठी सापळा रचला परंतु कुठून तरी नीलिमाच्या सहकार्यांना याची पुसटशी कल्पना आली आणि त्यांनी स्वतः जाळ्यात न फसता नीलिमाला जाळ्यात अडकवलं. नीलिमाची काही एक चुकी नसतांना ती लाच घेतांना पकडली गेली. तिला नोकरीवरून सस्पेंड करण्यात आलं.नीलिमा खूप खचली.  

इकडे मयुरी राज्यसेवा आयोगाची मुख्यपरीक्षा पास झाली. आता फक्त मुलाखतीची औपचारिकता बाकी होती. मयुरीच्या कष्टाला फळ मिळणार हे निश्चित होतं. मयुरी मुलाखत उत्तीर्ण झाली आणि नीलिमाच्याच ऑफिसला मुख्याधिकारी म्हणून रुजू झाली.चंद्रकांतला खूप आनंद झाला. मयुरी आणि चंद्रकांतच्या चांगल्या वागण्याचं फळ त्यांना प्राप्त झालं.

नीलिमाच्या नोकरीच्या टेन्शन मुळे सुरेश आणि नीलिमाला मयुरीच्या यशाबद्दल काहीच समजलं नाही. नीलिमाच्या ऑफिस मधल्या बऱ्याच लोकांना माहिती होतं की ती निर्दोष आहे म्हणून त्यांनी तिला ऑफिस मधील मुख्यअधिकाऱ्यांची भेट घेण्यास सांगितली कदाचित त्यामुळे चौकशी लागून तिला निर्दोष मुक्तता मिळू शकेल.  

नीलिमाने मुख्याधिकारींची भेट घ्यायची ठरवली. बरेच दिवस ती घरी असल्यामुळे ऑफिस मधील अधिकारी बदलले आहे याची तिला कल्पना नव्हती.

नीलिमा तिच्या कागदपत्रांची फाईल घेऊन ऑफिस मध्ये गेली. त्यावेळेस मुख्याधिकारींनी तिला आत बोलावलं. समोर गेली तर मयुरी त्या खुर्चीवर बसलेली. नीलिमासाठी तो खूप मोठा आश्चर्याचा धक्का होता. पण मयुरीला तिथे पाहून तिला आनंदही झाला...

" मयुरी ,तू इथे ..अग किती आनंद झाला मला तुला इथे पाहून ..." नीलिमा बोलती झाली.

" मयुरी नाही मॅडम म्हणायचं. तुम्ही एका सिनियर ऑफिसर सोबत बोलत आहात मिस नीलिमा. तुम्हाला इतके साधे मॅनर्स नाहीत. "  

मयुरीचा अटीट्युड नीलिमाला थक्क करणारा होता. तिने अदबीने मयुरीला तिच्या निर्दोष असल्याबद्दल सांगितलं. पण चौकशीनंतर सगळं काही ठरेल आणि त्याआधी मी तुमची काहीच मदत करू शकत नाही असं सांगून मयुरीने नीलिमाला परत पाठवलं.

नीलिमा घरी आली. तिने घडलेला सगळा प्रकार सुरेशच्या कानावर घातला. त्यावेळी नीलिमा आणि सुरेशला आपल्या वागण्याची लाज वाटत होती. रडत रडत नीलिमा सुरेशला म्हणाली...

" बाबा , आपल्याच वाईट कर्माची फळं आपण भोगतोय. चंद्रकांत काकांच्या मदतीमुळे आपण इतकी प्रगती करू शकलो. आपण त्यांना विसरलो. त्यांना अपमानित केलं. तोच फेरा आपल्या नशिबात आला."  

"माझा जॉब आता फक्त मयुरीच वाचवू शकते पण ती तसं करणार नाही याची मला खात्री आहे. प्लीज काहीतरी करा बाबा. माझी नोकरी वाचवणं आता फक्त तुमच्या हातात आहे. आपण चंद्रकांत काकांना भेटू. हवं तर त्यांच्या हातापाया पडू पण मयुरीला माझी मदत करायला सांगा. "  

सुरेशने नीलिमाच्या बोलण्याला होकार दर्शवला आणि ते दोघेही चंद्रकांतला भेटण्यासाठी गावी जायला निघाले. आपल्या दारात सुरेशला पाहून चंद्रकांतला आनंद झाला. चंद्रकांतला पाहताच सुरेश त्याचे पाय धरून रडू लागला..

"मला माफ कर चंद्या... मी चुकलो. माझं यश फक्त माझं एकट्याचं आहे असं समजून तू केलेल्या अनंत उपकारांची मी जाणीव ठेवली नाही. मी खरंच खूप चुकलो. मला माफ कर. मला माफ कर चंद्या. "

"माझ्या नीलिमाची नोकरी वाचवणं आता फक्त मयुरीच्या हातात आहे. तिच आता आम्हाला या संकटातून वाचवू शकते. तिला आम्हाला मदत करायला तयार कर. तुझे हे उपकार आम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही. " 

एवढं बोलून सुरेश चंद्रकांतच्या पायावर डोकं ठेऊन ओक्साबोक्शी रडू लागला. चंद्रकांतने त्याला सावरलं आणि तो बोलू लागला..

" माझी माफी मागण्याची गरज नाही मित्रा... तुझ्या चुकीचा तुला पश्चाताप झाला यापेक्षा दुसरी मोठी गोष्ट कुठलीच नाही. नीलिमाला मी आजही माझी मुलगीच समजतो त्यामुळे तिच्या भविष्यासाठी जी मदत लागेल. नियमानुसार जे काही मयुरीला करणं शक्य असेल ते ती नक्की करेल याची मी खात्री देतो. "  

चंद्रकांतच्या इतक्या चांगल्या बोलण्यामुळे सुरेश आणि नीलिमा स्वतःच्याच मनातून उतरले. त्यांना स्वतःच्याच वागणुकीचा खूप पश्चाताप झाला. मयुरीला नीलिमाच्या त्या सहकार्यांबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. तिने या गोष्टीची चौकशी करण्यासाठी एक गुप्त चौकशी पथक नेमले.  

त्यांनी सापळा रचून त्या दोषी लोकांना पकडून दिले. चौकशीअंती त्यांनी नीलिमा निर्दोष असून त्यांनी मुद्दामहून तिला या प्रकरणात अडकवलं याची कबुली दिली. या कबुली जबाबामुळे नीलिमाची निर्दोष मुक्तता झाली. तिला तिची नोकरी परत मिळाली. 

मयुरीचे आभार मानण्यासाठी नीलिमा तिला भेटायला आली. साश्रूनयनांनी नीलिमाने मयुरीची माफी मागितली. मयुरीने मोठ्या मनाने तिला माफ केले आणि म्हणाली ...

"नीलिमा, तु निर्दोष सिद्ध झालीस कारण तूझी बाजू  सत्याची होती. ज्यावेळी तुम्ही माझा आणि माझ्या बाबांचा अपमान केला त्यावेळेस माझ्या मनात खूप वेळा आले की मी अपमानाचा बदला घ्यावा पण बाबांनी माझ्या ह्या विचाराला कधीच प्रेरित केलं नाही. त्यांनी नेहमीच मला सगळ्यांबद्दल सकारात्मक विचार करायला शिकवलं. त्यांच्या या चांगुल पणामुळेच मी आज इथे येऊन पोहोचली."

"सत्कर्माचे फळ उशीरा का होईना आपल्या प्राप्त होतेचे ही त्यांची शिकवण मला खरंच पटली आहे. काळ हा कधीच कोणासाठी थांबत नाही. काळ हा बलवान आहे. कधी तो आपल्या आयुष्यात सुखाचा दरवळ घेऊन येतो तर कधी दुःखाची चादर आपल्यावर ओढवून निघून जातो पण त्यातून मिळणारी शिकवण मात्र आयुष्याचे सार शिकवून जाते म्हणूनच तर म्हणतात कालाय तस्मै नमः .... !

समाप्त ! 

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

फोटो साभार - Google & Instagram 

✍©️ जया पाटील















Post a Comment

0 Comments