विश्वासाची दोरी नात्याला उद्धारी भाग २

#विश्वासाची_दोरी_नात्याला_उद्धारी_भाग_२

©️जया पाटील


भाग एक वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇👇https://velvetkavisha.blogspot.com/2021/12/blog-post_27.html

मागील भागात आपण पाहिलं लग्नाच्या पहिल्या रात्रीच विवेकने शारदाला त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल म्हणजेच पल्लवीबद्दल सांगितलं. मात्र पल्लवीला तो कधीच आपल्या भावना सांगू शकला नाही आणि तिचं लग्न श्रीकांतसोबत झालं. आता पुढे...

" पल्लवीनंतर कोणत्याच मुलीबद्दल असा विचार माझ्या मनात आला नाही पण तुला पाहून खरंच असं जाणवलं की तुच माझी योग्य जोडीदार आहे. माझ्या आयुष्यात यापुढे तुझ्याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही स्थान नसेल पण तरीही पल्लवीबद्दल तूला सांगावंस वाटलं कारण मला तुला फसवायचं नव्हतं. यानंतर तुला जो निर्णय घ्यायचा तू घेऊ शकते. तुला मला जी शिक्षा द्यायची ती दे. मी ती शिक्षा भोगायला तयार आहे."  

" शारदा , तुला वाटत असेल मी तुला हे सगळं का सांगतो आहे ..? कारण आपल्या नात्याची सुरुवात ही लपवाछपव करून मला करायची नाही. आपल्या भविष्यात कदाचित तुला पल्लवीबद्दल माहित झालं तर तो तुझा विश्वासघात ठरेल. तुझ्यासाठी हे सगळं अनपेक्षित आहे पण तुझं मन दुखावलं असेल तर मला माफ कर. तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे शारदा ..." 

विवेक एकटाच बोलत होता. शारदा मात्र एकटक विवेककडे पाहत होती. तिचे डोळे पाणावलेले होते. विवेकने तिच्या हातावर थोपटलं आणि ती भानावर आली आणि बोलू लागली..

" विवेक, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधीतरी हे वळण येतंच. कॉलेजच्या अल्लड वयात कोणीतरी आपल्याला आवडणं ही भावना साहजिकच आहे पण आज इतक्या वर्षांनी ती गोष्ट तुम्ही तुमच्या बायकोला वाईट वाटू नये म्हणून कबूल करत आहात या पेक्षा मनाचा मोठेपणा कुठलाच नाही. कदाचित पल्लवीला ह्या भावना समजल्या असत्या आणि ती तुमच्या सोबत असती तर ती जगातील सगळ्यात नशीबवान मुलगी असली असती. असो पण विवेक नावाचा हिरा देवाने फक्त माझ्यासाठी तराशला यापेक्षा मोठी भाग्याची गोष्ट कुठलीच नाही माझ्यासाठी...! "  

" तुम्हाला खरं सांगू ,आपल्या भविष्यात मला चुकूनही पल्लवीबद्दल समजलं असतं तर खरंच माझा खूप मोठा गैरसमज झाला असता पण आज तुम्ही हे सगळं सत्य माझ्यासमोर कबूल केलं त्यामुळे तुमच्याविषयी असलेला माझ्या मनातील आदर अजून वाढला आहे. माझा इतका विचार करणारा आणि जीवास जीव देणाऱ्या नवऱ्यापेक्षा अजून दुसरं मला काहीच नको आहे."

" माझ्या भूतकाळाबद्दल सांगायचं तर लहानपणापासून मी थोडी एकाकी होते. माझ्या या स्वभावामुळे कोणासोबत मैत्री करून त्याच्या प्रेमात पडेपर्यत गोष्ट पोहोचलीच नाही. देवाला तुम्हाला माझ्या आयुष्यात आणायचं होते म्हणूनच मी कधी कोणाच्या प्रेमात पडले नाही असंही असेल कदाचित ! "

इतके बोलून शारदा विवेकच्या जवळ जाऊन हलकेच त्याच्या मिठीत शिरली. शारदाने त्याला मनापासून स्वीकारलं होतं त्याचाच पुरावा होता हा. आतापर्यंत हलकी असलेली मिठी विवेकने घट्ट केली. त्या दोघांनीही स्वतःला एकमेकांकडे सुपूर्द केलं. हळूहळू त्यांच्यातलं अंतर मिटलं. शरीरावरचा एक एक कपड्याचा भार हलका होत गेला. त्याचा तो वेडावणारा स्पर्श तिला सुखावून टाकत होता.  

दोघंही या नवख्या प्रेमाची एक अनोखी धुंदी अनुभवत होते. तापलेली शरीरं तरी देखील प्रेमाचा अनोखा गारवा सुखावत होता त्यांना. ओठांची खडाजंगी अन् सुस्काऱ्यांची आवर्तने  सावरत वेडावलेले ते दोघे एकमेकांच्या मिठीत बंदीस्त झाले होते तेही आयुष्यभरासाठी...! विवेक आणि शारदा दोघांचही कण न् कण चेतावणारं एक अनोख मिलन पार पडलं होतं. त्या रात्री शारदा आणि विवेक मनाने आणि शरीराने एकरूप झाले होते.  

विश्वासाच्या पायावर त्यांच्या सुंदर सुखरूप संसाराची सुरुवात झाली होती. नोकरीच्या निमित्ताने ते दुसऱ्या शहरात स्थायिक झाले. विवेक आणि शारदाचा संसार अगदी सुखात सुरु होता. लग्नानंतरचे मोहरलेले दिवस आनंदात जात होते. रात्र संपूच नये असे दोघांनाही वाटत होतं.  

सगळं काही अगदी छान सुरु होतं. त्यात सोने पे सुहागा म्हणजे लवकरच शारदाने गोड बातमी दिली. शारदा आई होणार होती. त्यामुळे ती खूप खुश होती. एक वेगळंच तेज होतं तिच्या चेहऱ्यावर. शारदाला नऊवा महिना सुरु झाला. तिचं डोहाळंजेवण देखील खूप थाटामाटात पार पडलं. पूर्ण दिवस भरले आणि एक दिवस तिला बाळंतकळा सुरु झाल्या. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.  

गोविंद घ्या अन गोपाळ घ्या असं म्हणत सगळ्या सवाष्णींनी झोपाळा झुलवला. बाळाच्या आत्याने त्याच्या कानात " हर्षित "  म्हटलं आणि हुर्रर्र ....असं करून त्याचे कान फुंकले. 

हर्षितच्या येण्याने शारदा आणि विवेकचा संसार पूर्ण झाला होता. छोट्या हर्षितच्या बाललीलांमुळे शारदाचा वेळ कसा जाऊ लागला हे तिलाच कळेनासं झालं. त्याचं गोड हसणं, घरभर पळणं, सगळ्या घरात खेळण्यांच्या पसारा करणं, कारणाशिवाय त्याचं रुसुन बसणं या सगळ्यात शारदाचा वेळ कुठं जात असे ते तिलादेखील समजत नसे.  

बघता बघता हर्षित चार वर्षाचा झाला. विवेक आणि शारदाच्या संसारात कसलीच कमतरता नव्हती. सगळी सुखं शारदाच्या पायाशी लोटांगण घालत होती. विवेकला देखील ऑफिसमध्ये बढती मिळाली त्यामुळे पैश्याची आवकही वाढली पण त्यामुळे त्याला ऑफिसमधून यायला उशीर होत असे.  

एक दिवस हर्षित खूप चिडचिड करत होता त्यामुळे शारदा त्याला घेऊन खाली सोसायटीच्या गार्डन मध्ये घेऊन गेली. इतकी सारी खेळणी पाहून हर्षित खूप आनंदी झाला. त्या दिवशी हर्षितला त्याच्यासोबत खेळण्यासाठी अजून एक नवीन मैत्रिण मिळाली होती. तिचं नाव होतं गार्गी. गार्गीच्या आईसोबत शारदा बोलत होती तेव्हा तिला माहित झालं की ते काही दिवसच झालेत या सोसायटीमध्ये रहायला आले आहेत.

त्या दोघांचही बोलणं सुरु असतांना हर्षितचा झोपाळा खेळतांना हात सुटला आणि तो जोरात पडला. त्याच्या कपाळावर मोठी जखम झाली. खूप रक्त वाहत होतं. हर्षितला इतकं लागलेलं पाहून शारदा खूपच घाबरली. ती घाबरून रडायला लागली. त्यावेळेस तिथे असलेल्या गार्गीच्या आईने शारदाला सावरलं आणि लगेचच ऑटोने शारदा आणि हर्षितला घेऊन ती हॉस्पिटलला निघाली.  

डॉक्टरांनी लगेचच हर्षितला ऍडमिट केलं. त्याच्या जखमांची मलमपट्टी केली. धोका टळला होता. तरीही डोक्यावर मार लागला असल्यामुळे आपण अजून थोडा वेळ ऑब्झरव्हेशन मध्ये ठेवूया, त्यानंतर तुम्ही हर्षितला घरी घेऊन जाऊ शकतात मात्र काही दिवस त्याला खूप जास्त जपावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. शारदाने विवेकला फोन करू झालेला सगळा प्रकार सांगितला. विवेक ताबडतोब ऑफिसमधून हॉस्पिटलला जाण्यासाठी निघाला.  

विवेक लगेच हॉस्पिटलला पोहोचला. तेव्हा शारदाने रडत रडत त्याला मिठी मारली तेव्हा त्याने शारदाचे सांत्वन करत तिला झालेल्या प्रकाराबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली...

" विवेक, खेळता खेळता हर्षित पडला आणि मी खूपच घाबरली. पण त्यावेळेस माझ्यासोबत असणाऱ्या गार्गीच्या आईने मला हिम्मत दिली आणि त्यांनीच हर्षितला हॉस्पिटलमध्येच दाखल केलं. चला आपण त्यांना भेटूया. "  

असं म्हणून शारदा विवेकला गार्गीच्या आईकडे घेऊन गेली. गार्गीची आई पाठमोरी उभी होती. शारदाने त्यांना आवाज दिला. तशी ती मागे फिरली. विवेक आणि तिची नजरानजर झाली. विवेकला पाहून ती म्हणाली...

" विवेक , तू ...इथे ...! " बोलतांना तिच्या आवाजात एक कंप जाणवत होता.  

" पल्लवी ....तू  आणि इथे..?  " थरथरत्या ओठांनी विवेक म्हणाला. शारदाला पल्लवी बद्दल माहित होतं पण तिने पल्लवीला कधीच पाहिलं नव्हते. विवेक आणि पल्लवीची भेट झाली त्यावेळेस शारदाही तिथंच बाजूला उभी होती. गार्गीची आई दुसरी तिसरी कोणी नसून विवेकची कॉलेजची मैत्रीण पल्लवी आहे हे तिच्या लक्षात आलं. काही क्षण शारदा खूप विचारात पडली.

पल्लवी पण इतक्या वर्षांनी विवेकला भेटून खूप आनंदी झाली. आनंदाने त्याला मिठी मारू की दुखाःने त्याला धरून रडू ? इतकी वर्षे कुठे गेला होतास मला सोडून याचा जाब विचारू ? किती बोलू आणि काय करू ? अशा अनेक गोष्टींनी पल्लवीच्या मनात गर्दी केली पण शारदाला पाहून ती भानावर आली. 

विवेक शांतपणे म्हणाला ...

" हॅलो पल्लवी, ही माझी पत्नी शारदा. थँक्यू तू माझ्या मुलाला हर्षितला ऍडमिट केलं. त्याबद्दल खरंच खूप थँक्यू.." 

" अरे विवेक थँक्यू काय म्हणतोस. कोणालाही संकटात मदत करायची ही गोष्ट मी तुझ्याकडूनच शिकली आहे आणि तू मलाच थँक्यू म्हणतो आहेस. किती वर्षांनी भेटतो आहेस तू. श्रीकांत आणि माझं लग्न ठरलं. त्यानंतर मात्र तू गायबच झाला. तुला शोधण्याचा तुला कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केला पण तुझ्यासोबत कॉन्टॅक्टच झाला नाही. "

" प्रत्येकजण आपापल्या व्यापात गुंतून जातं हे मान्य आहे मला. मी पण तितकीच गुंतली होती पण तरीही तुझं अचानक निघून जाणं व्यथित करायचं मला. का विवेक असा अचानक मला काहीही न सांगता निघुन गेला? त्याला काहीच सांगावसं नाही वाटलं मला जातांना ? इतकी परकी होते का मी त्याला? असे प्रश्न वारंवार माझ्या मनात येत रहायचे पण त्याचं काहीच उत्तर मिळालं नाही मला. "

" त्यानंतर काही दिवसांनी माझं लग्न झालं. मी आणि श्रीकांत दुसऱ्या शहरात शिफ्ट झालो.

माझा आणि श्रीकांतचा सुखाचा संसार सुरु झाला. आमच्या संसारवेलीवर सुखाचा बहर आला. आमच्या आयुष्यात आनंदी आनंद घेऊन एक गोड परी आली. ती म्हणजे माझी गार्गी.मी माझ्या संसारात पूर्णपणे गुंतून गेली होती. पण नियतीला मात्र माझं सुख पाहवलं नाही."

" श्रीकांतचा व्यवसाय खूप मोठा होत होता पण व्यवसाय अजूनही मोठा करायचा आहे या अट्टाहासामुळे त्याचं समाधान होतचं नव्हतं. वारंवार मोठंमोठे कर्ज घेऊन तो त्याच्या व्यवसायात गुंतवत होता. "

मी श्रीकांतला वारंवार सांगायची ....

" श्रीकांत , फार जास्त हाव बरी नव्हे. व्यवसाय वाढविण्यासाठी तु खूप जास्त कर्ज घेतोय. त्या कर्जाचा भार आपल्याला पेलायला हवा. उगाच, नको त्या गोष्टींचा मोह नको. आपण आपल्याकडे आहे त्यात देखील खूप खुश आहोत आणि या पुढे देखील खुश राहू शकतो. पैश्यांची इतकी गुंतवणूक आपल्याला पेलणार आहे का ? याचा विचार आधी कर आणि मग गुंतवणूकीचा विचार कर. आपल्याला शक्य नाही त्या गोष्टी करून आपण संकटाना आमंत्रण देऊ. त्यामुळे हा अट्टाहास सोड. प्लीज ..! "

" परंतु पैशाचा मोह कधीच कोणाला आपली चूक समजु देत नाही. श्रीकांतने देखील तेच केलं. स्वतःच्या व्यवसायासोबत आणखी पार्टनरशिप मधल्या व्यवसायात पैसे गुंतवले पण त्याचे पार्टनर मात्र बदलले आणि त्यामुळे श्रीकांतला खूप मोठं नुकसान सहन करावं लागलं. तो खुप कर्जबाजारी झाला, खुप जास्त निराश झाला."  

" तेव्हाही मी त्याला वारंवार समजावलं की आपण आलेल्या प्रसंगाला सामोरे जाऊया. या सगळ्यातून नक्की काहीतरी मार्ग निघेल पण श्रीकांतची निराशा मात्र संपली नाही. श्रीकांतच्या मित्रांनी दिलेला धोका त्याला सहन झाला नाही. उदासीनतेने घेरलेल्या माझ्या श्रीकांतने माझा, गार्गीचा, त्याच्या आईबाबांचा कुणाचाही विचार न करता आत्महत्या केली. तो तर हे जग सोडून निघून गेला पण मी मात्र पूर्णपणे उध्वस्त झाली."

" इतकं दुःख देऊनही माझ्या परीक्षा संपल्याच नाही. श्रीकांतच्या आत्महत्येला त्याच्या आईबाबांनी मला जबाबदार धरलं. मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर मात्र मी माहेरी निघून आली कायमचीच. "  

" आता मी आईबाबांसोबत राहतेय पण आईबाबा थकले आहेत त्यात त्यांच्यावर माझी आणि गार्गीची जबाबदारी टाकून मला त्यांचा भार वाढवायचा नाहीये. त्यामुळे मी आता पुन्हा नव्याने उभे राहण्याचा प्रयत्न करतेय. बरेच इंटरव्हिव दिल्यावर दोन महिन्यांपूर्वी मला चांगला जॉब मिळाला. पण आमच्या राहत्या घरापासून ऑफिस खूप दूर असल्यामुळे आईबाबा आणि मी तुझ्या सोसायटीमध्ये काही दिवसांपूर्वी शिफ्ट झालो. "  

" तू माझ्याच सोसायटी मध्ये राहूनही मला कधी नजरेसही पडला नाही आणि आज असं अचानक आपण एकमेकांसमोर आलो. माझं भाग्यचं खूप खराब आहे म्हणून माझ्या आयुष्यात चांगली माणसं येऊनही त्यांची साथ मात्र मला फार काळ लाभत नाही. श्रीकांतची साथ मला लाभली नाही आणि तू माझा सगळ्यात चांगला मित्र होतास पण तू देखील सगळ्या संकटांमध्ये मला एकटीला सोडून निघून गेलास. माझा प्रिय मित्र, वेलविशर नसतांना माझं काय होईल याचा जरासुद्धा विचार केला नाहीस तु ? श्रीकांतने देखील अर्ध्या वाटेवर साथ सोडली माझी आणि तु देखील! "

इतकं बोलून पल्लवी रडू लागली. श्रीकांत बद्दल ऐकून विवेकला खूप धक्का बसला. शारदाही सगळं काही ऐकत होती. विवेक मात्र एकदम शांत झाला होता. पल्लवीच्या जवळ जाऊन तिचं सांत्वन करावं असं त्याला वाटून गेलं पण पल्लवीला समजावलं तर शारदाला काय वाटेल? तिला हे सगळं आवडेल की नाही? पल्लवी इतक्या संकटात होती पण मी मात्र तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही?  अश्या एक ना अनेक शंका त्याच्या मनात येत होत्या. त्यामुळे काही एक न बोलता तो शांतपणे उभा होता. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्याची अवस्था झाली होती.  

विवेक आणि पल्लवीची अशी अचानक झालेली भेट विवेक आणि शारदाच्या आयुष्यावर काय परिणाम करेल? शारदा विवेक आणि पल्लवीच्या या मैत्रीच्या नात्याला स्वीकारेल की नाही ? हे सगळं जाणून घ्यायचं आहे ना ? मग याच कथेचा अंतिम भाग वाचायला विसरू नका.

क्रमश :

भाग तीन वाचा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2021/12/blog-post_29.html

प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो.  सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞

✍©️ जया पाटील

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात, त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

फोटो साभार - Pinterest/Google 




Post a Comment

0 Comments