विश्वासाची दोरी नात्याला उद्धारी भाग अंतिम

#विश्वासाची_दोरी_नात्याला_उद्धारी_भाग_अंतिम 

©️जया पाटील


भाग एक वाचा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून 👇👇 

भाग दोन वाचा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून 👇👇

भाग अंतिम 👇👇

मागील भागात आपण पाहिलं की विवेकच्या लग्नापूर्वीची मैत्रीण पल्लवी अनपेक्षितपणे त्याच्या समोर आली. तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला आणि त्यामुळे ती जॉबच्या निम्मिताने त्या शहरात आली असं पल्लवीने विवेकला सांगितलं. अचानक आपल्या जवळच्या मित्राला  पाहून तिला अश्रू अनावर झाले. विवेकला देखील तिचं सांत्वन करावं असं मनापासून वाटलं पण त्याची बायको शारदा समोर आहे. तिला हे आवडेल की नाही ह्या विवंचनेत विवेक अडकून पडला होता. आता पुढे... 

श्रीकांतबद्दल सांगताना पल्लवीला अश्रू अनावर झाले. श्रीकांत बद्दल ऐकून विवेकला खूप धक्का बसला. शारदाही सगळं काही ऐकत होती. विवेक मात्र एकदम शांत झाला होता. पल्लवीच्या जवळ जाऊन तिचं सांत्वन करावं असं त्याला वाटून गेलं पण पल्लवीला समजावलं तर शारदाला काय वाटेल? तिला हे सगळं आवडेल की नाही? पल्लवी इतक्या संकटात होती पण मी मात्र तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही? अश्या एक ना अनेक शंका त्याच्या मनात येत होत्या. त्यामुळे काही एक न बोलता तो शांतपणे उभा होता. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्याची अवस्था झाली होती.  

शारदाला सगळा प्रकार लक्षात आला. विवेकच्या मनातील गोंधळ तिने अचूक हेरला आणि तिने पल्लवीला जवळ घेतलं आणि तिचं सांत्वन केलं आणि तिला म्हणाली ..

" पल्लवी, रडू नकोस. अग प्रत्येक माणसाची साथ आपल्या आयुष्यात ठरलेली असते. श्रीकांत तुला सोडून गेले पणे गार्गीकडे पाहून तुला खंबीर व्हावंच लागेल आणि हो आता तुला गाईड करायला, तुला मदत करायला तुझा चांगला मित्र विवेक आहेच ना. विवेक तुला नक्की मदत करतील. विवेकसोबत मला पण तुझी चांगली मैत्रीण समज. आम्ही दोघंही तुला साथ देऊ. "  

शारदाचं बोलणं ऐकून विवेक खूप आश्चर्यचकित झाला. त्यानंतर हर्षितचा डिस्चार्ज झाला आणि सगळे घरी गेले. त्यावेळेस विवेक घरी आल्यावर शारदाला म्हणाला..

" शारदा, अगदी निशंकपणे तू पल्लवीला म्हणालीस की मी तिला मदत करेल. पूर्वायुष्यातील पल्लवीविषयी असलेल्या माझ्या भावना तुला माहित आहे, अर्थात त्या फक्त तेव्हापुरत्याच मर्यादित होत्या. आता माझ्यासाठी तू आणि हर्षितचं माझं आयुष्य आहात. माझं सर्वस्व आहात, पण तुला आधीचं सगळं माहित असूनही तू इतक्या विश्वासाने सांगितलं तिला की मी तिला मदत करेल. तुला आवडेल हे सगळं? शेवटी मेंदूने कितीही ठरवलं तरीही काही गोष्टींना स्वीकारायला मन मात्र तयार होत नाही. पुन्हा एकदा विचार कर. "  

" नाही विवेक, पुन्हा विचार करण्यासारखी ही गोष्ट नाही. तुमच्या पल्लवीबद्दलच्या भावनांविषयी मला माहित आहे पण पल्लवीला मात्र ह्या गोष्टीची कल्पना सुद्धा नाही. अशा अवस्थेत तिला तिचा चांगला मित्र म्हणून तुमच्याकडून आधाराची, मदतीची अपेक्षा आहे. लग्नाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही मला पल्लवीबद्दल सांगितलं त्या क्षणीच तुम्ही माझा विश्वास जिंकला होता विवेक. त्यामुळे आता माझ्या मनात कुठलीच शंका येणार नाही. "

" तुम्ही निश्चिन्त रहा. मनातले सगळे किंतु परंतु काढून टाका. तुम्ही एका संकटात सापडलेल्या स्त्रीला मदत करत आहात. हे खूप पुण्याचं काम आहे. तुम्ही निर्मळमनाने ते काम करा. पल्लवी मनाने खचली आहे तिचा आधार व्हा. मलाही एका मैत्रीण म्हणून तिच्यासाठी जे करणं शक्य होईल ते मी नक्की करेल. "

शारदाने घातलेल्या समजुतीमुळे विवेक थोडा निश्चिन्त झाला. दुसऱ्या दिवशी विवेक आणि शारदा पल्लवीच्या घरी जाऊन तिला आणि तिच्या आईबाबांना भेटले. पल्लवीचे आईबाबा विवेकला परिचित असल्यामुळे त्यांनाही त्याला भेटून खूप आनंद झाला.

विवेक पल्लवीला शक्य तितकी मदत करू लागला. शारदाही हर्षितला घेऊन गार्गीसोबत खेळण्यासाठी पल्लवीच्या घरी जाऊ लागली. पल्लवीच्या आईबाबांचं चेकअप, गार्गीची ऍडमिशन अशा सगळ्या गोष्टींसाठी विवेकने पल्लवीला खूप मदत केली. श्रीकांतच्या पॉलिसी आणि इतर सरकारी कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी ही विवेकने पल्लवीला खुप मदत केली. पल्लवीच्या कुटुंबाचा विवेक भक्कम आधार बनला होता. शारदाची आणि पल्लवीची पण खूप गट्टी जमली होती.सगळं खूप छान चालू होते.  

पल्लवीच्या आईबाबांना काही कामानिमित्त पल्लवीच्या लहानबहिणीकडे जावं लागणार होतं पण पल्लवीला एकटं सोडून कसं जावं असा प्रश्न त्यांना सतावत होता. पल्लवीच्या आईने ही शंका शारदाला बोलून दाखवली. शारदाने सांगितलं की आम्ही पल्लवीकडे लक्ष देऊ तुम्ही अगदी निश्चिन्त राहा. शारदाने दिलेल्या आश्वासनामुळे काळजीमुक्त होऊन पल्लवीचे आईबाबा गावी गेले.  

शारदा पल्लवीची तिचे आईबाबा नसतांनाही विचारपूस करत होती. विवेकही अडल्या नडल्या गोष्टीला तिची मदत करत होता. शारदाच्या समजूतदारपणामुळेच आपण पल्लवीची मदत करू शकतो आहे. खरंच मी खूपच नशीबवान आहे. मला शारदासारखी बायको मिळाली असं मनोमन विवेकला वाटत होतं आणि त्यासाठी तो मनोमन परमेश्वराचे आभार मानत होता.

एक दिवस जवळच राहणाऱ्या शारदाच्या मावशीची तब्बेत अचानक खराब झाली त्यामुळे तिच्या काकांनी शारदाला तिकडे येण्यास सांगितलं. काही वेळात मी परत येते असं विवेकला सांगून शारदा निघून गेली. तिने हर्षितला सोबत नेलं. तिथे पोहोचल्यावर मात्र मावशीची तब्येत खूप जास्त खराब होती म्हणून तिने रात्रभर तिथंच थांबायचं ठरवलं. शारदाने तसं विवेकला फोन करून कळवलं. विवेकनेही होकार दिला.  

इकडे गार्गीची तब्बेत बरी नसल्यामुळे पल्लवी अस्वस्थ होती. रात्री अकरा वाजता गार्गीला खूप जोरात थंडी वाजून आली. गार्गीची अवस्था पाहून पल्लवी खूप घाबरली. घाबरून तिने विवेकला फोन केला. विवेक लगेच पल्लवी आणि गार्गीला घेऊन जवळच्या हॉस्पिटलला गेला. त्यावेळी तो गार्गीला घेऊन हॉस्पिटलला जातो आहे हे शारदाला कळविण्यासाठी त्याने शारदाला फोनही लावला पण शारदाचा फोन स्विचऑफ आला.  

गार्गीला हॉस्पिटलमध्ये नेल्यावर तिला डॉक्टरांनी काही टॅबलेट लिहून दिल्या आणि इंजेक्शन देऊन घरी घेऊन जाण्यास सांगितलं. ऍडमिट करायची गरज नाही असं सांगितल्यामुळे विवेक गार्गी आणि पल्लवीला घेऊन घरी आला. विवेक घरी जायला निघणार त्यावेळेस पल्लवी त्याला म्हणाली ...

" विवेक, प्लीज तुझी हरकत नसेल तर आजच्या दिवस इथेच थांबशील. गार्गीला अजूनही बरं वाटत नाहीये. मला खूप भीती वाटते आहे. आईबाबा पण नाही. तू थांबलास तर तितकाच आधार होईल मला.."  

काय करू, शारदा घरी नाही. तिला हे सगळं आवडेल की नाही. अश्या अनेक गोष्टी विवेकच्या मनात सुरु होत्या. पल्लवीला मदत करण्यासाठी शारदा कधीच नाही म्हणणार नाही. गार्गीची अवस्था खूपच खराब होती. शेवटी गार्गीकडे पाहून खूप विचार पूर्वक त्याने तिथे थांबायला होकार दिला. विवेकने पुन्हा एकदा शारदाचा फोन ट्राय केला पण फोन स्विचऑफ येत होता. न राहवून त्याने सगळ्या गोष्टी लिहून शारदाला मेसेज पाठवला जेणेकरून जेव्हा शारदा फोन ऑन करेल त्यावेळेस तिला सगळ्या गोष्टी समजतील.   

गार्गीला खूप ताप होता. ती तापामुळे कण्हत होती. विवेकने पल्लवीला गार्गीच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सांगितल्या. पल्लवी पलंगावर बसून गार्गीच्या कपाळावर पट्ट्या ठेवत होती. विवेकही गार्गीजवळ बसून होता. पल्लवी गार्गीच्या डोक्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवत होती. पट्टी गार्गीच्या डोळ्यावर झाकली गेल्यामुळे गार्गी अस्वस्थ झाली म्हणून विवेक ती पट्टी नीट करण्यासाठी पुढे सरसावला. त्याचवेळी पल्लवीनेही हात पुढे केला. विवेकला पल्लवीचा स्पर्श झाला. त्याला आणि तिला दोघांनाही अवघडल्यासारखं झालं. काही वेळा क्षणिक मोहामुळे खूप मोठ्या चुका होतात. विवेकला मात्र तसं घडायला नको होतं.

आपल्याकडून चुकूनही कुठली चूक व्हायला नको म्हणून तो गार्गीजवळून उठला आणि समोर खुर्ची घेऊन तिथे जाऊन बसला. इंजेक्शन आणि गोळ्यांच्या पॉवर मुळे गार्गीला झोप लागली. थोड्या वेळात पल्लवीचाही डोळा लागला तसा विवेक बेडरूम मधून उठून हॉल मध्ये सोफ्यावर येऊन बसला. त्याने झोपण्याचा प्रयत्न केला पण मनातल्या अस्वस्थतेमुळे त्याला झोपही येत नव्हती. शेवटी मोबाईलवर तो यूट्यूब व्हीडिओ पाहत वेळ घालवू लागला.

पल्लवीला अचानक जाग आली तर विवेक तिथे दिसला नाही. त्याला शोधायला ती रूम मधून बाहेर आली. त्याचवेळेस विवेकला पाण्याची लहान लागली म्हणून तो देखील किचन मध्ये जायला निघाला होता. तेव्हाच पल्लवी समोर आली आणि त्यांची टक्कर झाली. पल्लवीचा हात विवेकच्या पाठीवर आला आणि विवेकचा हात पल्लवीच्या कंबरेवर. खरं तर मोहात पडणारा क्षण होता हा. पण अगदी विज चमकल्यावर आपण जसं दचकतो तसं दचकून विवेक मागे झाला आणि पुन्हा त्याच्या जागी जाऊन बसला.  

पल्लवीपण गार्गीजवळ जाऊन बसली. दोघांच्याही हृदयाची धडधड वाढली होती. अजून काही क्षण तसेच असते तर आपण मोहात पडू शकलो असतो असं विवेकला मनोमन वाटून गेलं पण नाही शारदाचं प्रेम आणि तिचा माझ्यावरचा विश्वास माझा तोल ढळू देणार नाही असाही विवेकला पक्का विश्वास होता. 


रात्र ओसरली. पहाटे पहाटे विवेकला झोप लागली. बराच वेळ मोबाईल वापरल्यामुळे मोबाईलची बॅटरी संपली आणि फोन स्विचऑफ झाला. पहाटे शारदाच्या मावशीला बरं वाटू लागलं म्हणून मग तिने काकांना तिला आणि हर्षितला घरी सोडायची विनंती केली. शारदा सकाळी लवकर  घरी आली. घराला कुलूप पाहून तिला आश्चर्य वाटलं. विवेक कुठे बाहेर जाणार होता तर त्याने आपल्याला कळवलं कसं नाही म्हणून तिने मोबाईल चेक केला तर मोबाईल बंद आहे हे तिच्या लक्षात आलं. आपलीच चूक आहे आपण मोबाईल चार्ज केला नाही त्यामुळे विवेकने फोन करायचा प्रयत्न केला असेल तरी फोन बंद असल्यामुळे फोन लागलाच नसेल असा शारदाने मनोमन विचार केला.  

शेजारच्या काकूंकडे विवेकने घराची चावी दिली असेल एखादेवेळी म्हणून तिने प्रभाकाकूंना आवाज दिला.

" काकू, विवेक चावी देऊन गेले आहेत का? मी मावशीकडे गेली होती. इतक्या लवकर येईल असं त्यांना मी कळवलं नाही. माझा फोन पण बंद होता त्यामुळे त्यांनी फोन करायचा प्रयत्न केला असेल तरीही तो कनेक्ट झाला नसेल. तुम्हाला जातांना काही सांगून गेले का ते ? "  

" नाही ग शारदा, विवेक काहीच सांगून गेला नाही पण रात्री उशीरा तो मला पल्लवीसोबत बाहेर जातांना दिसला. आता तू घरी नाहीस मग गेला असेल मैत्रिणीसोबत फिरायला. तू माझ्या मुलीसारखी आहे म्हणून तुला एक सल्ला देते आहे. तू त्याला जरा जास्तच मोकळीक दिली आहे. शेवटी पुरुषचं ते. मोहात पडायला वेळ नाही लागत त्यांना. घरात बायको असली तरी मुलांना बाहेर पण मैत्रीण लागते. आजकाल तर हे सगळं सवयीचं झालं आहे."

" फोन लावून बघ त्याला. लागतो की नाही ते. लागला तरी तो तुझा फोन उचलतो की नाही याची पण खात्री नाही. तुला काही कळायला नको म्हणून एखाद्यावेळेस फोन बंद सुद्धा करून ठेवला असेल त्याने. तुला खात्री करायची असेल तर फोन करून पहा त्याला. अरे हो , तुझा फोन बंद आहे म्हणालीस ना, मग हवं तर माझ्या फोनवरून फोन लाव. " प्रभाकाकू स्वतःचा फोन शारदाला देत म्हणाल्या.

प्रभाकाकूंच्या बोलण्याचा शारदाला खूप राग आला. तिचे डोळे रागाने लाल झाले. तिने प्रभाकाकूंच्या हातातून फोन घेऊन विवेकला फोन लावला. फोन स्विचऑफ येत होता. प्रभाकाकूंचं बोलणं खरं झालं होतं. शारदा तडक पल्लवीच्या घरी गेली. बेल वाजवली. विवेकने दरवाजा उघडला. बाहेर शारदा होती. खांद्यावर हर्षित झोपलेला होता. तितक्याच पल्लवीपण तिथे आली. शारदाला पाहून विवेक अचंबित झाला. तिचे डोळे रागाने लाल झाले होते.  

" विवेक, अच्छा तर इथे आहात तुम्ही. मला घराची चावी हवी आहे, द्या लवकर. " शारदा विवेकला म्हणाली. तिच्या आवाजात खूप राग  होता हे विवेकला जाणवलं. शारदाला न माहिती आपण पल्लवीकडे आलो याचा शारदाला राग आलेला दिसतोय. प्रकरण गंभीर दिशेला वळण घेतंय हे विवेकने हेरलं. शारदाचा विश्वास आपण गमावणार तर नाही ना ? असा विवेकला प्रश्न पडला.

विवेकने घराची चावी शारदाच्या हातात दिली आणि ती काहीही न बोलता चावी घेउन तिथून निघून गेली. पल्लवीला पण शारदाचा राग लक्षात आला. आपण शारदा नसतांना विवेकला आपल्या मदतीला बोलवायला नको होतं. आपण खूप मोठी चूक केली याची पल्लवीला जाणीव झाली. झालेल्या प्रकारामुळे विवेक काही क्षण तसाच उभा राहिला. भानावर आल्यावर लगेच तो शारदाच्या मागे घरी गेला. वाटेत प्रभाकाकू उभ्याच होत्या. त्या विवेकला म्हणाल्या..

" काय मग विवेक, तुला पल्लवीकडे पाहून शारदा चांगलीच भडकलेली दिसते आहे. तिचा राग पण बरोबरच आहे म्हणा. नवऱ्याला एखाद्या परस्त्री सोबत पाहून कोणत्याही बायकोला रागच येईल." प्रभाकाकूंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्यांना काही एक न बोलता विवेक घरात गेला. घरात आला तेव्हा शारदा त्याला तिथे दिसली नाही. तिला शोधण्यासाठी तो बेडरूमकडे गेला तर बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता. विवेक अस्वस्थपणे बेडरूमच्या बाहेर फेऱ्या मारत होता. तोपर्यंत शारदा हर्षितला बेडरूम मध्ये झोपवून बाहेर आली. शारदा रूम मधून बाहेर आली ,अन् विवेक शारदाला समजवू लागला ...

" शारदा, आय एम सॉरी. माझी चूक झाली. मला माफ कर. तू समजते आहे तसं काहीच नाही. गार्गीची तब्येत बरी नव्हती म्हणून मला पल्लवीचा फोन आला. तिला हॉस्पिटलला नेण्यासाठी मी तिथे गेलो. गार्गीला हॉस्पिटल मधून आणल्यावर सुद्धा तिची अवस्था खूप खराब होती. अशा अवस्थेत एकट्या पल्लवीला काहीच सुचणार नाही म्हणून मी तिथे थांबलो. मी तुला रात्रीपासून कितीतरी वेळा फोन केले पण तुझा फोन सारखा स्विचऑफ येत होता. शेवटी मी तुला मेसेज करून सगळं कळवलं. हवं तर तुझा मोबाईल चेक कर. "  

शारदाने मात्र एका शब्दाने उत्तर दिलं नाही. शारदाच्या मौनामुळे विवेक आणखीन घाबरला आणि तो पुन्हा बोलू लागला..

" शारदा, मला माफ कर. तुझं मन मी दुखावलं असेल तर खरंच मला माफ कर पण असा अबोला धरू नकोस. तुझ्याजागी तू बरोबर आहेस पण तुझी शपथ मी कुठलंच वाईट काम केलं नाही. मी प्रामाणिक आहे तुझ्यासोबत. माझा विश्वास कर. प्लीज काहीतरी बोल. मला रागव. हवं तर माझ्या कानाखाली वाजव. मी तेही सहन करेल पण प्लीज माझ्यासोबत बोल. माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मी नाही जगू शकणार तुझ्या शिवाय.." 

एवढं बोलत असतांनाच विवेकच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. ते पाहून शारदा बोलू लागली.  

" विवेक, हो मला राग आला आहे पण या गोष्टीचा नाही की मी नसतांना रात्रभर तुम्ही पल्लवीसोबत होतात. तर मला या गोष्टीचा राग आला की माझा तुमच्यावर ,माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे या गोष्टीची तुम्हाला खात्री नाहीये. ती खात्री असती तर तुम्ही तुमची काहीही चुकी नसतांना माझी माफी मागितली नसती. "  

" विवेक, तुम्ही माझा श्वास आहात. माझा विश्वास आहात. तुम्ही माझी कधीच फसवणूक करणार नाही याची मला खात्री आहे. ज्यावेळी पल्लवी तुमच्या आयुष्यातून निघून गेली होती त्यावेळी सुद्धा तुम्ही मला तुमच्या पूर्वाआयुष्यातील गोष्टी फक्त आणि फक्त माझा विश्वास तुटू नये म्हणून मला सांगितल्या. तो माणूस आज माझी फसवणूक कशी करू शकेल? प्रत्येक नात्याचा पाया हा विश्वासावर टिकून असतो आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. "  

" माझ्या आईबाबांनी मला लहानपणापासून शिकवलं आहे की जोपर्यंत आपण एखादी गोष्ट स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही किंवा स्वतःच्या कानाने ऐकत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीवर कधीच विश्वास ठेवायचा नाही कारण आपल्या नात्यांमध्ये दुरावा आणण्यासाठी प्रभाकाकूंसारखे काही विघ्नसंतोषी लोक नेहमीच टपलेले असतात. त्यामुळे नवरा बायकोतला विश्वास आणि प्रेम टिकवणं सर्वस्वी फक्त आपल्या हातात असतं."

" जेव्हा विश्वास मजबूत असतो, तेव्हा नात्यामध्ये प्रेमाची कमतरता कधीच येत नाही. कधी कधी जी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर दिसते तसं प्रत्यक्षात काहीच नसतं. त्यामुळे फक्त वरवर दिसणाऱ्या गोष्टींना भुलून तुमच्यावर अविश्वास दाखविण्याची चुकी मी कशी करेन. आपल्या नात्याची,आपल्या प्रेमाची गाठ इतकी कमजोर नाही की इतक्या छोट्याश्या गोष्टीमुळे ती कमजोर होईल."  

एवढं बोलून शारदाने त्याला घट्ट मिठी मारली. शारदाच्या बोलण्यामुळे विवेक खूपच भारावला. त्याक्षणी त्याला शारदासारखी पत्नी मिळाली म्हणून स्वतःचाच खूप अभिमान वाटत होता. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यामुळे तो पुढे काहीच बोलू शकला नाही पण शारदाच्या बोलण्याला प्रतिउत्तर म्हणून त्याने शारदाने त्याला  मारलेल्या मिठीची पकड घट्ट केली. गैरसमजांचं सावट दूर झालं होतं. अबोला कधीच मिटला होता. दोघांची मिठी घट्ट झाली तशी श्वासांची गती वाढू लागली. हृदयाच्या स्पंदनानी ताल धरला. विश्वासाच्या पायावर उभारलेल्या त्यांच्या स्वप्नांच्या नगरीत ते दोघंही जाऊन पोहोचले. विश्वासाच्या या अदृश्य दोरीने उद्धरिलेल्या या अनोख्या नात्याला प्रेमाच्या गारव्याशिवाय अजून हवं तरी काय होतं...!

 समाप्त !

✍©️ जया पाटील

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात, त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे, कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  " वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

फोटो साभार - Pinterest/Google 







Post a Comment

0 Comments