तुम्हीच माझे नंद-यशोदा भाग १



 #तुम्हीच_माझे_नंद-यशोदा_भाग_१


©️ जया पाटील 


डॉक्टरांच्या कॅबिनमधून अतिशय निराश होऊन निहारिका बाहेर पडली. काही एक न बोलता ती वेगाने पुढे चालू लागली. 


" निहारिका , थांब. अग कुठे निघालीस..? माझ्यासाठी थांब. " असं बोलून ऋषिकेश तिला अडवविण्याचा प्रयत्न करत होता. निहारिका मात्र काही एक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. चालत चालत ती एका श्रीकृष्णाच्या मंदिरात येऊन थांबली. देवापुढे नतमस्तक होऊन ती देवासोबत बोलू लागली...


" तुच बाळकृष्णाचं रुप घेऊन यशोदेच्या जीवनात आनंद घेऊन आला पण माझ्या पदरात हा आनंद कधी देशील रे मधुसूदना..? हरली आहे रे मी आता...! आता तुझ्या शिवाय दुसरा कुणीच आधार नाही. तुच आता काहीतरी कर माझ्या जीवनातला अंधार मिटविण्यासाठी...! "  


इतकं बोलून निहारिका रडू लागली. तितक्याच मागुन आलेल्या ऋषिकेशने तिला सावरलं. तेव्हा ती ऋषिकेशला उद्देशून म्हणाली..


" देव अजून किती परीक्षा पाहणार आहे रे ऋषिकेश आपली. खूप दिवस वाट पहिली पण आईबाबा होण्याची आपली इच्छा कधीच पूर्ण होणार नाही का रे..? आपल्या आयुष्यात हा सुखाचा बहर कधीच येणार नाही का..? मागच्या जन्मात असं कुठलं मोठं पाप केलं होतं ज्याची शिक्षा मला या जन्मात भोगायला लागत आहे. वांझपणाचा हा शाप नकोसा वाटतो रे मला.."


" सहा वर्ष झाली त्या क्षणाची वाट पाहते आहे पण जवळ येण्याऐवजी तो क्षण माझी परीक्षा पाहत अजूनच लांब लांब जातोय. उद्या जान्हवीचं डोहाळेजेवण आहे. जान्हवीसाठी मला खूप आनंद होतोय पण तरीही तिच्या आनंदात सहभागी होण्याची हिम्मत नाहीये माझ्यात. जान्हवी माझी प्रिय मैत्रीण असली तरी ती माझी बहीणचं आहे. आपल्या बहिणीच्या आयुष्यात आनंद आहे याचा मला पण आनंद आहे पण तरीही तिथे येणाऱ्या बायकांच्या नजरा आणि प्रश्न सहन करण्याची ताकद नाही रे माझ्यात..."


" आपल्या नंतर चार वर्षांनी लग्न झालं तरीही आपल्या आधीच हा आनंद जान्हवीच्या आयुष्यात आला. जान्हवी साठी मी खुश असली तरीही स्वतःचं दुःख डोकं वर काढतंच रे कितीही नाही ठरवलं तरीही..." 


" किती दिवस अजून मी सहन करायचं रे ऋषिकेश. मी थकली आहे. मलाही बाळ हवं आहे. मलाही माझं आईपण मिरवायचं आहे. छोट्याश्या दुडू-दुडू धावणाऱ्या इवल्या इवल्या पावलांच्या मागे धावत त्यांना हळूच उचलून घ्यायचं आहे मला. लपाछपीच्या खेळात लुटुपुटु हरायचा अभिनय मलाही करायचा आहे. मला ही आई व्हायचंय. मला ही आई व्हायचंय ऋषिकेश...."  


इतकं बोलून निहारिकाच्या संयमाचा बांध फुटला आणि ती हमसून हमसून रडू लागली. ऋषिकेश तिला सावरण्याचा प्रयत्न करतचं होता पण अजूनपर्यंत बाप न होण्याचा सल त्याच्याही मनाला घायाळ करत होता.


ऋषिकेश आणि निहारिका एक मध्यमवर्गीय जोडपं. सहा वर्षांपूर्वी एका नातेवाईकांच्या लग्नात निहारिकाला अलकाताईंनी पाहिलं.

पहिल्याच नजरेत त्यांनी तिला सून म्हणून पसंत केली. नातेवाईकांकडून निहारिकाची सगळी माहिती घेऊन, अलकाताई आणि त्यांचे पती रविंद्रराव दोघांनीही निहारिकाला त्यांच्या मुलासाठी ,अर्थातच ऋषिकेशसाठी मागणी घातली.


रीतसर कांदेपोह्यांचा कार्यक्रम पार पडला. ऋषिकेश आणि निहारिकाची नजरानजर झाली. 

ऋषिकेशला पाहून पहिल्या नजरेतच निहारिका त्याच्या प्रेमात पडली. ऋषिकेशची अवस्था देखील वेगळी नव्हती. निहारिका अगदी सुंदर सजून हातात चहाचा ट्रे घेऊन जेव्हा बाहेर आली,

तेव्हा ऋषिकेश तिच्याकडे पाहतच राहिला.

जणू स्वर्गातून अप्सरा पृथ्वीवर उतरून समोर उभी आहे असा भास ऋषिकेशला झाला.

  

निहारिका तिच्या गोर्या कांतीवर सुंदर पिवळ्या  रंगाची साडी , त्यावर सुंदर मखमली लाल रंगाचे ब्लॉउज , गळ्यात एक नाजूकशी चैन , हातात मोत्यांचे तोडे , गुलाबीसर हातात एक नाजूक नक्षीची अंगठी , कपाळावर नाजूक टिकली , 

बनाना क्लिप मध्ये बांधलेले केस  , हा सगळा पेहराव लेवून जेव्हा बाहेर आली , तेव्हा ऋषिकेश  पाहताक्षणीच तिच्यावर लट्टू झाला . हा सगळा सौंदर्यसाज निहारिका वर खूपच शोभून दिसत होता.


गोरा रंग , चाफेकळी नाक , तपकिरी बुरसट डोळे , काळेभोर केस , गोर्या कांतीवर चेहऱ्यावर रेंगाळणारी काळ्या केसांची बट निहारिकाचे सौंदर्य आणखीनच खुलवत असे. ऋषिकेश तर निहारिकाला पाहून पहिल्याच नजरेत क्लीन बोल्ड झाला.


ऋषिकेश आणि निहारिका दोघांनीही एकमेकांना आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकारायचं ठरवलं. दोघांचाही विवाह संपूर्ण परिवार आणि नातेवाईकांच्या साक्षीने मोठ्या थाटामाटात पार पडला.  


निहारिका आता ऋषिकेशच्या घराची गृहमंत्री झाली होती. अलकाताई , रविंद्रराव ,ऋषिकेश आणि निहारिका असा त्यांचा चौकोनी परिवार खूप आनंदात होता. निहारिकाच्या येण्यामुळे अलका ताई आणि रविंद्ररावांच्या आयुष्यातील मुलीची कमतरता भरून निघाली होती.


निहारिकाने घरात येताच तिच्या लाघवी स्वभावाने सगळ्यांचं मन जिंकून घेतलं होतं. ऋषिकेश आणि निहारिका दोघांचेही लग्नानंतरचे मोरपंखी स्वप्नांनी सजलेले , आनंदाने मोहरलेले दिवस अगदी सुखात जात होते.  


ऋषिकेश मुंबईत एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत होता.

निहारिका देखील एका छोट्या फर्म वर काम करत होती. दोघांचा अगदी राजाराणीचा संसार सुरु होता. एकमेकांसोबत वेळ घालवणं , रुसणं आणि एकमेकांना मनवणं अश्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे दोघांचाही संसार बहरत चालला होता. एक छानसा जोडीदार जो फक्त आपल्यावर प्रेम करेल आणि आपल्याला समजून घेईल यापेक्षा जास्त काय हवं असतं एका मुलीला ? ऋषिकेशच्या प्रेमळ वागणुकीमुळे निहारिका खूपच खुश होती.


लग्नानंतर काहीकाळ गेल्यानंतर सगळ्याच जोडप्यांना वाटतं तसं आता आपल्याही जीवनात  एका छोट्याश्या पाहुण्याचं आगमन व्हावं असं  ऋषिकेश आणि निहारिका दोघांनाही वाटत होतं.

लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली, आता आपणही आईबाबा व्हावं असं ऋषिकेश आणि निहारिका दोघांनाही वाटत होतं. अलकाताई आणि रविंद्ररावांचीही आता आपण नातवंड खेळवायची इच्छा होती. परंतु पूर्वसंचित म्हणा किवा त्यांचं दुर्दैव म्हणा निहारिकाची आई होण्याची इच्छा मात्र काही केल्या पुर्ण होत नव्हती.


व्रत वैकल्य करणं, कोणी काही उपाय सांगितला तो करणं. ब्राह्मण ,ज्योतिष सगळं काही करून झालं होतं. त्या जोडीला दवाखान्याच्या वाऱ्या पण सुरूच होत्या. उपवास , डॉक्टर , दवाखाना , नवस काहीच फळाला येत नव्हतं आणि निहारिका निराश होत होती. 


ऋषिकेश आणि निहारिकाच्या लग्नाला पाच वर्ष झाली. डॉक्टरांनी त्यांना आय व्ही एफ ट्रीटमेंट करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्लानुसार सगळी प्रोसिजर पूर्ण केली. पण निहारिकच्या बाबतीत मात्र त्या ट्रीटमेंटला यश आले नाही.

त्यामुळे निहारिका पूर्णपणे खचली.


ऋषिकेश निहारिकाला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. 

रविंद्रराव आणि अलकाताई देखील निहारिकाची  अगदी पोटच्या लेकीप्रमाणे काळजी घेत होती. 

निहारिकाच्या पोटी मुल असावं ही रविंद्रराव आणि अलकाताईंची पण इच्छा होती. पण नशिबापुढे कोणाचचं चालत नसतं. कोणी कितीही टोमणे मारले तरीही रविंद्रराव आणि अलकाताईंचा मात्र निहारिकाला भक्कम पाठिंबा होता. तो पाठिंबाच निहारिकाचा मोठा आधार होता.


कुटुंबीयांचा कितीही आधार असला तरीही आई होणं सगळ्याच स्रियांच्या आयुष्यात महत्त्वाचं असतं , त्याचप्रमाणे ते निहारिकाच्या आयुष्यात देखील महत्त्वाचं होतं कारण मुल एका स्रीच्या आयुष्याला जगण्याचा खरा अर्थ देते.

निहारिका दिवसेंदिवस खचत चालली होती. निहारिकाची ही अवस्था मात्र ऋषिकेशला पहावत नव्हती. तो तिला या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत होता.


आजही डॉक्टरांनी प्रयत्न करण्याशिवाय आपल्या हातात काहीच नाही असं सांगितलं आणि निहारिकाचा धीर खचला. मंदिरातून समजावून ऋषिकेशने निहारिकाला घरी आणले. दुसऱ्या दिवशी निहारिकाची बालमैत्रीण जान्हवीचं डोहाळेजेवण होतं. नाखुशीनेच निहारिका जान्हवीसाठी तिच्या ओटीभरणाच्या कार्यक्रमाला गेली. निहारिकाला पाहून जान्हवीला खूप आनंद झाला पण तिथे असलेल्या जान्हवीच्या सासूबाईंना अर्थातच गीताकाकूंना निहारिकाचं तिथं येणं फारसं रुचलं नाही. निहारिकाचा अपमान करायच्या उद्देशाने त्या म्हणाल्या ...


" किती कमनशिबी आहेस ग तू निहारिका , अगं लग्नाला सहा वर्ष झाली. पण अजूनही पोटी मुलबाळ नाही. किती परीक्षा घेतोय ग बाई देव तुझी... ! मुलांशिवाय स्त्रीला पूर्णत्व येतचं नाही.

ऋषिकेशला पण किती वाईट वाटत असेल?

अलकाताई आणि रविंद्रराव पण नातू किंवा नातीचं तोंड पाहण्यासाठी तरसले असतील.

पण इतकी वर्ष झाली अजून पण तुझ्या पदरात हे सुख आलं नाही."


" किती वाईट वाटत असेल ग निहारिका तुला..? त्यातल्या त्यात अश्या प्रसंगी तर तूला खूपच त्रास होत असेल. जेव्हा तुझ्यासमोर तुझ्यानंतर लग्नझालेल्या मुलींचे ओटीभरण समारंभ होतात. आजतर जरा जास्तच वाईट वाटत असणार तुला कारण जान्हवी तर तुझ्या सगळ्यात जवळची मैत्रीण. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत एकमेकांची सोबत करणाऱ्या तुम्ही. आज मात्र जान्हवीच्या आनंदात तुला सहभागीही होता येत नाहीये आणि तिची सोबतही करता येत नाहीये."


" खडतर परीक्षा आहे तुझी निहारिका...

इतका चांगला नवरा, कुटुंब , पैसाअडका , स्वताःचे घर. कशाची म्हणून कमतरता नाही. पण पोटी मुलबाळ तेवढं नाही. "


गीता काकूंचं बोलणं निहारिकाच्या खूप जिव्हारी लागलं. जान्हवीलाही आपल्या सासूबाईंच्या अश्या वागण्याचा खूप राग आला पण घरातील सगळी वडीलधारी मंडळी समोर असल्यामुळे ती  तिच्या सासूबाईंना काहीच बोलू शकली नाही. तिचा नाईलाज झाला. खरंतर एका स्त्रीचं दुःख एका स्त्री पेक्षा दुसरं कोणी समजू शकत नाही पण इथे तीच स्त्री तिच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करत होती.


निहारिकाने मोठ्या मनाने जान्हवीचा ओटीभरणाचा कार्यक्रम पार पडला आणि ती घरी  आली. कार्यक्रम होऊन आठवडा पार पडला तरीही गीता काकूंचं बोलणं तिच्या मनातून जातचं नव्हतं. आपणच कमनशिबी असल्यामुळे ऋषिकेशला बाप होण्यापासून वंचित राहावं लागत आहे असे नको नको ते विचार तिच्या डोक्यात सूरू होते.  


निहारिकाला माहिती होतं की ऋषिकेशचं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. त्यामुळे तिने कितीही सांगितलं तरीही तो बाबा होण्यासाठी कधीच दुसरं लग्न करणार नाही याची तिला खात्री होती. कारण यापूर्वीही याबाबतीत निहारिकाने त्याला याबद्दल सांगितलं होतं तेव्हा त्याने प्रत्येक वेळी हा विषय टाळला होता.  


ऋषिकेशला तरी बाप होण्याचा आनंद प्राप्त व्हावा असं निहारिकाला वाटत होतं पण आपण त्याच्या आयुष्यात आहोत तोपर्यंत हे शक्य नाही म्हणून निहारिकाने टोकाचा निर्णय घ्यायचा असं मनाशी ठरवलं. ऋषिकेश ऑफिसला गेला असतांना अलकाताई आणि रविंद्ररावांचे जेवण बनवून निहारिका थकली आहे म्हणून झोपते आहे असं सांगून लवकर तिच्या रूममध्ये निघून गेली. तिने झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतला आणि ती झोपी गेली. तिने स्वतःला संपवण्यासाठी इतकं कठीण पाऊल उचलले.


क्रमशः


काय होईल निहारिकाच्या आयुष्यात पुढे?निहारिकच्या या टोकाच्या निर्णयाचा ऋषिकेशच्या आयुष्यावर काय परिणाम होईल?

निहारिका आणि ऋषिकेशचा संसार इथेच संपेल की अजूनही काही नवीन वाढून ठेवलं आहे नियतीने त्यांच्या भविष्यात..? हे सगळं जाणून घ्यायचंय ना. मग याच कथेचा पुढचा भाग वाचायला मात्र विसरू नका.


प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो.  सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞


✍©️ जया पाटील


सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात, त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.


धन्यवाद!🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 


फोटो साभार - Pinterest/Google 










 

Post a Comment

0 Comments