#कालाय_तस्मै_नमः_भाग_२
©️जया पाटील
भाग तीन वाचा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून 👇👇https://velvetkavisha.blogspot.com/2021/12/blog-post_25.html
भाग दोन 👇👇......
मागील भागात आपण पाहिलं की सुरेश आणि चंद्रकांत , त्यांच्या लेकी मयुरी आणि नीलिमा यांची अगदीच निखळ मैत्री , जीवाला जीव देणारी. लहानपणापासून त्यांची सोबत कायम होती पण आर्थिक अडचणींमुळे सुरेश शहरात नोकरी करण्यासाठी निघून गेला. जातांना त्याला मदत म्हणून चंद्रकांतने त्याची जमापुंजी दिली. काही दिवसांनी त्याची लेक मयुरीला देखील शहरात शिकायला पाठवेल असं सांगून चंद्रकांतने आनंदाने सुरेशला निरोप दिला. आता पुढे..
सुरेश शहरातील नोकरीच्या ठिकाणी रुजू झाला. नवीन शहरात जम बसवतांना चंद्रकांतने दिलेल्या पैश्यांचा सुरेशला खूप उपयोग झाला. सुरेश ,नीलिमा आणि कुटुंबीय हळूहळू शहराच्या वातावरणात रुळू लागले. सुरुवातीला सुरेश चंद्रकांतला शेजारच्या पीसीओवर बरेचदा फोन करायचा. कधी पत्र पाठवायचा. त्यात भरभरून बोलायचा. पण जसेजसे दिवस पुढे सरकू लागले तसा सुरेशचा फोन येणं बंद झालं.
सुरेशने नवीन मोबाईल घेतला त्यावर एकदा दोनदा बोलणं झालं. त्यानंतर मात्र त्याचा संपर्कच तुटला. नवीन नोकरी मुळे वेळ मिळत नसेल म्हणून सुरेश फोन करत नाही अशीच चंद्रकांतने स्वतःच्या मनाची समजूत घातली.
मयुरी मोठी झाली. तिने बारावीची परीक्षा दिली. त्यात गावातून ती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. चंद्रकांतला खूप आनंद झाला. त्याने बारावीनंतर मयुरीला सुरेशकडे शिकायला पाठवायचं ठरवलं. सुरेशची नीलिमा देखील उत्तम गुणांनी पास झाली.
सुरेशला फोन केला पण त्याच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही. शेवटी त्याने मयुरीच्या शिक्षणाबाबतीत लिहून त्याला एक पत्र पाठवलं. मात्र त्या पत्राचं देखील उत्तर आलं नाही. आता मात्र मयुरीच्या आईचा अर्थातच रेखाचा संताप अनावर झाला. चिडून ती चंद्रकांतला म्हणाली..
"पाहिलं ना मयुरीचे बाबा ,अहो पोरीच्या लग्नाची जमापुंजी तुम्ही तुमच्या मित्राला दिली आणि तो तुमच्या पत्राला साधा प्रतिउत्तर देत नाही. किती बदलले सुरेशभाऊजी शहरात गेल्यावर. अगदी पाठच्या भावाप्रमाणं जपलं तुम्ही त्यांना. आपल्या आईबाबांनी पण त्यांना कधी आईवडीलांची कमी भासू दिली नाही. पोटच्या पोराप्रमाणे जीव लावला त्यांना , पण ते मात्र खूप बदलले. त्यांच्या कडून ही अशी अपेक्षा नव्हती कधीच. "
"नाही ग , माझा सुरेश असा नाहीये. आम्ही लहानपणापासून सगळी सुख-दुःख सोबत जगलो आहे. तो मला कधीच दगा देणार नाही. तो नक्कीच कुठल्या तरी अडचणीत सापडला असेल. मी स्वतः शहरात जातो आणि त्याला भेटतो. बघ कसा चंद्या चंद्या करत मला भेटतो ते. आपल्या मयुरीला पण आपण पुढच्या शिक्षणासाठी त्याच्याकडे ठेवूया. "
चंद्रकांत सुरेशची बाजू सांभाळत आपल्या पत्नीला म्हणाला.
" अहो आधी , सुरेश भाऊजींना भेटा तर खरी. मग पाहू मयुरीच्या शिक्षणाचं काय ठरवायचं ते.." मयुरीची आई ठसक्यात चंद्रकांतला म्हणाली.
तितक्यात मयुरी तिच्या मैत्रिणीची आणि सुरेश काकाची बाजू सांभाळत म्हणाली...
"आई , बाबा बरोबर बोलताय ग. सुरेशकाका नक्कीच काही अडचणीत सापडले असतील. नाहीतर नीलिमा आणि काका आपल्याला असं कधीच टाळणार नाही. माझा विश्वास आहे आई माझ्या आणि नीलिमाच्या मैत्रीवर आणि त्याहूनही जास्त विश्वास आहे बाबा आणि सुरेशकाकांच्या मैत्रीवर."
मयुरीच्या बोलण्यावर तिची आई चिडून म्हणाली.
"पुरे झालं मयुरी तुझं आणि तुझ्या बाबांचं मैत्री पुराण. मला आता सुरेश भाऊजी आणि नीलिमा दोघांवरही विश्वास राहिलेला नाही. मला सगळं स्पष्ट दिसत आहे पण तुमच्या दोघांच्या डोळ्यावरची विश्वासाची झापडं कधी उघडतील कुणास ठाऊक. "
इतकं बोलून चंद्रकांतची पत्नी तिथून चिडून निघून गेली.
सुरेश शहरात गेला. त्याच्या मेहनतीच्या जीवावर तो प्रगती करत गेला. त्याला बढती मिळाली. बराच पैसा मिळू लागला. पैसे आणि नवीन शहराने , तिथल्या वातावरणाने त्याला भुरळ घातली. जीवापाड जपणाऱ्या आपल्या जिवलग मित्राला तो विसरला. शहरातल्या चकाचौंधमध्ये तो गावाकडचं निर्मळ प्रेम विसरला.
इकडे गावी मयुरी देखील डोळ्यात तेल घालून नीलिमाची वाट पाहत बसायची पण नीलिमाला मात्र शहरातील नवीन कॉलेजातील मित्र मैत्रिणींमध्ये मयुरीचा विसर पडला. सुरेश आणि नीलिमा दोघांच्याही मनावर स्वार्थाचा पडदा पडला होता पण चंद्रकांतचा आणि मयुरीचाही सुरेश आणि नीलिमावर पूर्ण विश्वास होता. त्यांच्या मैत्रीवर विश्वास होता.
गावातले सगळेच चंद्रकांतला सांगायचे की सुरेश शहरात जाऊन बदलला. त्याची पत्नी देखील त्याला समजवायची पण चंद्रकांतला कोणाच्याही बोलण्याचा विश्वास नव्हता. शेवटी न राहवून चंद्रकांतने शहरात सुरेशकडे जायचं ठरवलं.
शेजारच्या दादूचा मोबाईल दोन दिवसासाठी वापरायला तो घेऊन आला. ज्यामुळे सुरेशला फोन करणं सोपं होईल. सुरेशला मात्र दादूचा नंबर माहिती नव्हता. शेजारच्या पीसीओ वरून जेव्हा चंद्रकांत सुरेशला फोन करायचा त्यावेळी सुरेश तो फोन उचलायचा नाही आणि उचलला तरी कामात आहे नंतर फोन करतो म्हणून चंद्रकांतचा फोन ठेवून द्यायचा.
मयुरीने देखील नीलिमाला भेटण्यासाठी चंद्रकांतसोबत शहरात जायचा हट्ट धरला. चंद्रकांतने मयुरीला सोबत नेण्यासाठी नकार दिला पण मयुरीच्या हट्टापुढे त्याचं काही एक चाललं नाही. शेवटी मयुरीला घेऊन चंद्रकांत शहरात जाण्यासाठी निघाला. सुरेशने एकदा फोनवर बोलतांना तो शहरात कुठे राहतो त्याबद्दल चंद्रकांतला सांगितलं होतं. चंद्रकांतने तो पत्ता त्याच्याकडे वहीत लिहून ठेवला होता. शहरात जाताना चंद्रकांतने तोच पत्ता सोबत घेतला होता.
मजल-दरमजल करत चंद्रकांत आणि मयुरी शहरात येऊन पोहोचले. स्टॅन्डवर उतरल्यावर रिक्षावाल्याच्या मदतीने ते सुरेशच्या घरी येऊन पोहोचले. सुरेशला सरप्राईज द्यायचं म्हणून म्हणून सोबत आणलेल्या दादूच्या फोनवरून चंद्रकांतने सुरेशला दरवाज्याच्या आड लपून फोन केला. सुरेशचा फोन वाजला. नवीन नंबर होता त्यामुळे त्याने ताबडतोब फोन उचलला. फोनवर चंद्रकांत बोलत होता....
" हॅलो सुरेश , कसा आहेस भावा ..? अरे किती दिवसापासून तुला फोन करतोय पण तुझ्यासोबत काही संपर्कच होऊ शकत नाहीये. तुला पत्रं पण पाठवली. अरे आपली मयुरी आणि नीलिमा दोघांचीही बारावी पूर्ण झाली आहे. मयुरी तर गावच्या शाळेतून पहिली आली आहे. मयुरीला घेऊन उद्या शहरात यायचं ठरवतो आहे. मयुरीला आणि नीलिमाला एकाच कॉलेजला ऍडमिशन घेऊया. आता मयुरीची जबाबदारी पण तुझ्यावरच सोपवणार आहे मी..."
चंद्रकांत एकसारखा फोनवर बोलत होता पण आता मयुरीला आपल्याकडे ठेवून घ्यावं लागणार म्हणून सुरेश चिंतेत पडला होता. मयुरीला सांभाळायचा खर्च आपल्या माथी पडतोय की काय याचे त्याला जाम टेन्शन आलं होतं. चंद्रकांत आपल्या आजूबाजूला असेल याची सुरेशला पुसटशीही कल्पना नव्हती. चंद्रकांतचं बोलणं मध्येच थांबवत तो म्हणाला ...
" चंद्या , खूप आनंद झाला तुझ्यासोबत बोलून पण आता कंपनीत कामाला आलो आहे रे. लवकर काम पूर्ण झालं नाही तर मॅनेजर खूप ओरडेल. मी एक काम करतो मी पटापट माझं काम संपवतो आणि मग निवांतपणे तुला कॉल करतो मग आपण शांतपणे बोलू. उद्याच इकडे यायची घाई करू नकोस. मी तुला फोन करेल तेव्हा इकडे ये म्हणजे मला सुट्टी घेता येईल. "
एवढं बोलून चंद्रकांत काही बोलायच्या आतच सुरेशने फोन कट केला. त्याच्या या वागण्याचं चंद्रकांतला खूप वाईट वाटलं. चंद्रकांतचा फोन ठेवून सुरेशने लगेचच त्याच्या बायकोला हाक मारली...
" अग वंदे ,ऐकतेस का ..! चंद्या इथे शहरात आला आहे. मयुरीला आपल्या घरी ठेवायचं म्हणतो आहे पुढच्या शिक्षणासाठी. मी कसा बसा आता त्याचा फोन ठेवला. उद्या तो इकडे यायचं सांगत होता पण त्याला कसंबसं टाळलं मी. शहरात आपल्याच मुलांचा खर्च आपल्याला जड पडतोय त्यात कुठे आणखी मयुरीची भर पाडू."
" बरं केलंत तुम्ही , उद्या त्यांना इथे यायला नाही म्हणालात ते. आता कुठे आपला संसार मार्गाला लागला आहे आणि आणखीन त्यात एका माणसाची भर नको. तुम्हाला इतके फोन केले ,पत्र पाठवले तर तुम्ही उत्तर दिले नाही यावरून काय ते समजून घ्यावं ना त्यांनी. लोचटा सारखे काय यायला निघाले लगेच शहराकडे. "
सुरेशची बायको वंदना त्याला म्हणाली. तितक्याच नीलिमा पण तिथे आली आणि बोलू लागली...
"बरं झालं बाबा , तुम्ही चंदू काकाला टाळलं ते. आता मी त्या कॉलेजला ऍडमिशन घेणार त्याच कॉलेजला मयुरीला पण ऍडमिशन घ्यावी लागणार. मला शिकून मोठं अधिकारी व्हायचंय त्यात ती इथे आली तर मला मोठे क्लासेस लावता येणार नाही , शेवटी हेवेदार तयार होतोच ना. आता त्यांचा पुन्हा फोन आला ना तर उचलूच नका. "
नीलिमाच्या बोलण्यात सुरेश आणि वंदना होकार मिसळत होते. त्यांचं सगळं बोलणं चंद्रकांत आणि मयुरी ऐकत होते. हे सगळं बोलणं ऐकून त्यांच्या पायाखालची जमिन सरकली होती. डोळे लालबुंद झाले होते , त्यातून अश्रुंच्या धारा वाहत होत्या.
चंद्रकांतने घराचा दरवाजा ठोठावला . सुरेशने दरवाजा उघडला पाहतो तर काय समोर चंद्रकांत उभा. त्याला पाहताच सुरेशला घाम फुटू लागला. मागुन वंदना आणि नीलिमा देखील आले. चंद्रकांत आणि मयुरीला दरवाज्यात पाहून त्यांची भीतीने गाळण उडाली.
" अरे चंद्या , ये ना. आम्हाला सगळ्यांना आश्चर्यचकितचं केलं तू अचानक येऊन. काही कळवलं नाही. मघाशी फोनवर तर उद्या येणार असं म्हणालास तू. मी आताच कंपनीतून आलो आणि वंदनाला म्हणालो की तू येणार आहेस म्हणून. "
सुरेश स्वतःची बाजू सावरत चंद्रकांतला म्हणाला..
" किती बदललास रे सुरेश तू. खोटं बोलण्याचा अभिनय कधीपासून करायला लागलास. तुला मी इथे यायला नको होतं हे खरं सांगितलं असतं तर इतकं वाईट नसतं वाटलं मला जितकं आता तुझ्या खोटं बोलण्याचं वाटतंय. "
"मित्रा , लहानभाऊ म्हणून जपलं होतं तुला. नीलिमाला मयुरीची बहीण म्हणून स्वीकारलं होतं मी. जे करायचे ते आपल्या दोघी मुलींसाठी असाच विचार करायचो पण तू ? तुझ्या देखी आम्ही कोणीच नव्हतो रे तुझे , म्हणूनच तू इतका स्वार्थी झालास. "
" राहता राहिला मयुरीचा खर्च करण्याचा प्रश्न तर त्याची सोय मी केलेली होती. त्याचा भार तुझ्यावर देण्याचा प्रश्नच नव्हता. तसं तू मला स्पष्टपणे सांगूही शकत होता. एकमेकांच्या अडचणी समजून घेण्याइतका समजूतदारपणा आपल्यात नेहमी होता. "
"आपण कधीच एकमेकांसाठी अडचण बनलो नाही तर आता मी तुझ्यासाठी अडचण तयार करेल असं कसं वाटलं तुला? हेच ओळखलं मला तू? हीच जाणीव केलीस तू माझ्या प्रेमाची? मला मयुरीसाठी फक्त तुमची सोबत , तुमचा आधार हवा होता पण तुमच्या मनात मात्र इतका विचित्र भाव असेल आमच्याविषयी याची मला किंचितही जाणीव नव्हती. "
" सगळं जग मला समजावत होतं की तू बदलला आहेस पण मी मात्र ठाम होतो की तू कधीच बदललणार नाही. माझ्या विश्वासाला तडा दिलास रे तू ...! तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणून स्वतःच्याच नजरेत अपमानित झालो मी."
"असो , तू माझ्यासोबत कितीही वाईट वागलास तरीही मी तुझ्याबद्दल कधीच वाईट विचार करणार नाही. यापुढे तुझ्या आयुष्यात टांग अडवायला मी कधीच येणार नाही. सुखाने आयुष्य जग. "
एवढं बोलून चंद्रकांत मयुरीला घेऊन गावी निघून आला. मयुरी तर झालेला प्रकार पाहून तिथे काहीच बोलू शकली नाही. तिला खूप मोठा मानसिक धक्का बसला होता. तिचे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. चंद्रकांत पण मनाने खूप खचला होता , पण मयुरीकडे पाहून तो स्वतःला सावरत होता. विश्वासघाताचे विष पचवणं किती अवघड असतं हे त्याला आज समजत होतं.
चंद्रकांत आणि त्याची पत्नी रेखा मयुरीला खूप समजावत होते पण आपल्या वडिलांच्या अपमानामुळे ती व्यथित झाली होती. तिचे डोळे लालबुंद झाले होते. तिच्या डोळ्यात बदल्याची भावना होती. चिडून ती म्हणाली ...
" बाबा , सुरेशकाका आणि नीलिमाला मी असं सोडणार नाही. आपल्या अपमानाचा बदला मी जरुर घेईल. तुम्ही केलेल्या पैश्याच्या मदतीने ते शहरात स्थायिक झाले. ते कदाचित तुम्ही केलेले उपकार विसरले असतील पण मी मात्र त्यांना या सगळ्या गोष्टींची आठवण करवून देईल. मी या अपमानाचा बदला जरुर घेईल. "
मयुरीला शांत करत चंद्रकांत म्हणाला..
" मयुरी , बाळ तू काहीही करणार नाहीस. आपण कोणाला केलेली मदत कधीही बोलून दाखवायची नसते. देवाच्या दारात प्रत्येकाच्या चांगल्या-वाईट कामांचा हिशेब असतो. त्यामुळे ज्याच्या त्याच्या कर्माची फळं इथेच भोगावी लागतात. समोरच्याला आपली चूक दाखवून देण्यासाठी तो वरचा भगवंत बसला आहे. त्यामुळे आपण कोणाच बद्दल काहीच वाईट विचार करायचा नाही."
असं बोलून चंद्रकांत आणि रेखाने मयुरीची समजूत काढली पण तिच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच सुरु होतं.
मयुरी आपल्या वडिलांच्या आणि नीलिमाने आपल्या मैत्रीच्या केलेल्या अपमानाचा बदला घेऊ शकेल का .? सुरेश आणि चंद्रकांतच्या नात्याला आता पुढे काय वळण मिळेल हे सगळं जाणून घ्यायला तुम्हालाही आवडेल ना . मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी याच कथेचा तिसरा अंतिम भाग वाचायला विसरू नका.
क्रमश :
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात,त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Google
✍©️ जया पाटील
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box