तुम्हीच_माझे_नंद-यशोदा_भाग_२


#तुम्हीच_माझे_नंद-यशोदा_भाग_२

©️ जया पाटील 

भाग एक वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_14.html

मागील भागात आपण पाहिलं की जान्हवीच्या डोहाळेजेवणात जान्हवीच्या सासूबाईंनी निहारिकाचा तिला मुल नाही म्हणून अपमान केला. त्यांचे हे बोलणं तिच्या जिव्हारी लागलं.आपल्या नशिबात आईपण नाही पण निदान ऋषिकेशला बाबा होता यावं म्हणून त्याच्या आयुष्यातून कायमचा निघून जाण्याचा निहारिकाने निर्णय घेतला.

ऋषिकेश ऑफिसला गेला असतांना अलकाताई आणि रविंद्ररावांचे जेवण बनवून निहारिका थकली आहे म्हणून थोडा आराम करते असं सांगून लवकर तिच्या रूममध्ये निघून गेली. तिने झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतला आणि ती झोपी गेली. तिने स्वतःला संपवण्यासाठी इतकं कठीण पाऊल उचललं. आता पुढे....

निहारिका रूम मध्ये जाऊन दहा मिनिट झाले आणि तेवढ्यात ऋषिकेश ऑफिसहून घरी आला. आज तो जरा लवकर घरी आला होता. निहारिकाला जरा बरं नाही म्हणून ती झोपली आताच असं अलकाताईंनी ऋषिकेशला सांगितलं. निहारिकाने औषधं घेतली की नाही याची चौकशी करण्यासाठी ऋषिकेश बेडरूम मध्ये गेला तर निहारिका निपचित पडली होती आणि बाजूला झोपेच्या गोळ्यांची बाटली रिकामी पडली होती.

निहारिकाला अशा अवस्थेत पाहून ऋषिकेशला घाम फुटला. तो जोरात ओरडला तसं अलकाताई आणि रविंद्रराव देखील धावतच रूम मध्ये आले. निहारिकाची अवस्था पाहून त्यांना पण धक्का बसला. ताबडतोब ते निहारिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टरांनी निहारिकाची तपासणी केली तेव्हा तिची हालत गंभीर आहे याबद्दल त्यांनी ऋषिकेश आणि कुटुंबियांना कल्पना दिली.  

ऋषिकेश ,अलकाताई आणि रविंद्रराव निहारिकाच्या आयुष्यासाठी प्रार्थना करत होते. अलकाताई तर हॉस्पिटल मधल्या गणपती बाप्पासमोर साकडं टाकून बसल्या होत्या. चोवीस तास उलटले तशी निहारिकाच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली. अजूनही धोका टळला नाही परंतु  परिस्थिती स्टेबल आहे आणि निहारिका उपचारांना प्रतिसाद देत आहे. अठ्ठेचाळीसतास ऑबसेर्व्हशन मध्ये ठेवावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं.

ऋषिकेशने डॉक्टरांना निहारिकाच्या मानसिक अवस्थेबद्दल कल्पना दिली तेव्हा डॉक्टर म्हणाले निहारिका शुद्धीत आल्यावर सुद्धा तिच्या मनावर ताण येईल अशी गोष्ट घडता कामा नये. यामुळे तिला स्ट्रोक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्य तितक्या प्रेमाने आणि शांततेत तिला सांभाळून घ्यावं लागेल. यापुढेही ती पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू शकते त्यामुळे तिला खूप जपावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. आम्ही पूर्णपणे निहारिकाची काळजी घेऊ असा रविंद्ररावांनी डॉक्टरांना विश्वास पटवून दिला.

काही तासात निहारिका शुद्धीत आली. तेव्हा समोर बसलेल्या ऋषिकेशला पाहून ती रडू लागली. तिचा आवाज ऐकून लगेचच अलकाताई आणि रविंद्रराव धावत रूम मध्ये आले. रडत रडत ती ऋषिकेशला म्हणाली..

" का वाचवले मला ऋषिकेश ? मी कुठल्याच कामाची नाहीये. मी तुला बाबा होण्याचे सुख देऊ शकत नाही. मी तुझ्या आयुष्यातून निघून गेल्यावर सुखी झाला असता तू ...का वाचवलंस मला ..? "

" आई बाबा , तुम्हाला नातवंड पाहायचा आनंद नाही देऊ शकत मी. तुमच्या घराण्याला वारस देऊ शकत नाही मी. तरीही का वाचवलेत मला ..?" 

" निहारिका , तू माझं आयुष्य आहेस. तुला सोडून जगण्याचा विचारही नाही सहन करू शकत नाही मी. मला सोडून निघून जाण्याचा विचार तरी कसा  आला तुझ्या मनात..? " असं बोलून ऋषिकेशने तिला जवळ घेतलं.

" बाळ निहारिका , ज्या दिवशी तू लग्न करून या घरात आली त्या क्षणापासून आम्ही तुझा मुलगी म्हणून स्वीकार केला. तुझ्या आईबाबांना सोडून जाण्याची हिम्मत कशी झाली तुझी..? कसं जगणार होतो आम्ही तुला सोडून..? यापुढे कितीही काहीही झालं तरी असा वेडा वाकडा विचार मनात आणायचा नाही. कधी असा विचार डोक्यात आला तरी आमचा विचार करून तो विचार पळवून लावायचा " असं म्हणत अलकाताईंनी निहारिकाच्या डोक्यावर हात फिरवला.  

आपल्या कुटुंबियांचे आपल्यावरील प्रेम पाहून निहारिकाचं हृदय भरून आलं. आपण खरंच चुकलो. आपण पुढचा विचार केला नाही. तिच्या या चुकीची तिला जाणीव झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा ओघळू लागल्या. स्वतःला सावरत निहारिका ऋषिकेशला म्हणाली..

" प्रत्येक मुलगा किंवा मुलगी स्वतःच्या सुखी संसाराची , मुलाबाळांची स्वप्न पाहतात पण तुझी ही सगळी स्वप्नं माझ्यामुळे धुळीस मिळाली. आणि यापुढेही तू माझ्यासोबत असतांना ती स्वप्नं कधीच पूर्ण होणार नाहीत त्यामुळे तुझ्याचं सुखासाठी मी हा निर्णय घेतला होता ऋषिकेश. माझ्यात मातृत्वचं नाही तर जन्माला येऊन माझा काय उपयोग.? एक पत्नी म्हणून अपत्याचं सुख मी तुला द्यायला हवं ते नाही देऊ शकली रे मी तुला. i am really sorry ..."

निहारिकाचा हात हातात घेत ऋषिकेश म्हणाला..

" निहारिका तू मला सोडून निघून गेल्यावर मी दुसऱ्यासोबत सुखी होईल असं तुला वाटत असेल तर ते साफ खोटं आहे. मला प्रत्येक आनंद आणि दुःख फक्त तुझ्या सोबत जगायचं आहे. "

"आपल्या दोघांबद्दल मला सगळं काही आधीच माहित आहे निहारिका, दोष आपल्या दोघांतही नाही, तु तरीही स्वतःला का अपराधी समजतेस ..? या सगळयात तुझा काहीच दोष नाही. त्यामुळे स्वतःला अपराधी समजणं आधी बंद कर. आणि राहता राहिला प्रश्न माझ्या स्वप्नांचा .. , तर तुझी देखील ही सगळी स्वप्नं असतीलच ना .... , पण आपण दोघंही सोबत असतांना मला ही स्वप्नं फारशी महत्वाची वाटत नाही कारण देव सगळ्यांना सगळंच देतो असं नसतं. "

" आपलं दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम असणंच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे बाकी इतर कुठलेही प्रश्न त्याच्या पुढे मला कमी महत्वाचे वाटतात. राहता राहिला प्रश्न आईबाबा होण्याचा तर ही एक सुंदर भावना आहे , उर्मी आहे. motherhood or parenhood is a behaviour.. ! "

" स्वतः जन्म दिला म्हणजेच आईवडील होता येते असं नाहीये , आईबाबा होण्यासाठी आपल्याच पोटात मुल वाढवावं असे काही नसतं. सहवासानेही प्रेम , माया निर्माण होतेच कि ....

या जगात कितीतरी जोडपी अशीच आहेत कि ज्यांना मुल होऊ शकत नाही पण याचा अर्थ असा  नाही कि ते चांगला संसार करू शकत नाही. मला माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती मिळाली आहे यापेक्षा अजून मोठे मला काहीच नको आणि माझ्या ह्या निर्णयात मला माझ्या आईबाबांची देखील साथ आहे. त्यामुळे स्वतःला दोषी ठरवणे सोडून दे. निहारिका.." 

" ऋषिकेश , अगदी बरोबर बोलतो आहेस. 

स्वतःला दोषी ठरवू नको. तुझ्यात मातृत्व नाही.  

असं कस म्हणू शकतेस तू निहारिका.? राहता राहिला प्रश्न आई होण्याचा.. तर आई होणं ही एक सुंदर भावना आहे आणि ती प्रत्येक स्त्रीमध्ये कायमच असते. "

" निहारिका , तू ऋषिकेशच्या बाबांची आणि माझी सेवा ज्या मायेने करते. तेही मातृत्वचं आहे.

मी जेव्हा हतबल , हताश होते , तेव्हा मायेने मला समजावते. तेव्हा मला तुझ्यात माझ्या आईची छबी दिसते. ऋषिकेश जेव्हा थकून भागून ऑफिस मधून घरी येतो. तेव्हा प्रेमाने त्याची काळजी घेतांनाही तुझ्यात आईचीच माया असते. आईपण मागुन आणावे लागत नाही निहारिका...

ते प्रत्येक स्त्रीमध्ये जन्मताचं असते. "  

अलकाताईंनी घातलेल्या या समजुतीमुळे निहारिकाला अश्रू अनावर झाले. निहारिकाने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्यामुळे तिची पोलीस जबानी झाली. तिचं समुपदेशन करून तिला घरी आणण्यात आलं.

काही दिवस ऋषिकेश ऑफिसात सुट्टी घेऊन निहारिकाला घेऊन महाबळेश्वर जाऊन आला. निहारिकाची बालमैत्रीण जान्हवी पण कायम तिच्या संपर्कात होती. निहारिकाला धीर देण्याचा प्रयत्न करत होती. जान्हवीचेही भरते दिवस होते , तिला नऊवा महिना सुरू होता. जान्हवी गर्भवती असल्यामुळे ते पाहून निहारिकाला वाईट वाटू नये म्हणून  जान्हवी निहारिकाला प्रत्यक्ष भेटायचं टाळत होती पण निहारिकाला आनंदात ठेवण्यासाठी जान्हवी आणि तिचा पती अनिकेतही ऋषिकेशची खूप मदत करत होता.

निहारिकाला आनंद मिळावा म्हणून अलकाताई , रविंद्रराव सगळेच मनापासून प्रयत्न करत होते. निहारिकाही हळूहळू स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. वरवर ती सावरली असं दाखवत असली तरीही मनातली जखम मात्र ताजी होती. यातच दोन महिने निघून गेले.

निहारिकाने नव्याने ऑफिस जॉईन केलं. स्वतःला कामात पूर्णपणे गुंतवून घेतलं. त्यामुळे तिची मानसिक अवस्था सुधारली. पण पुन्हा एकदा ऑफिस मधल्या तिच्या एका महिला सहकाऱ्याने तिच्या दुखऱ्या नसेवर पाय ठेवला. तिला बाळाबद्दल पुन्हा पुन्हा विचारलं आणि निहारिकाला खूप वाईट वाटलं.  

ती घरी आली पण डोक्यात मात्र तेच विचार सुरु होते. अलकाताई आणि रविंद्रराव पण महत्वाच्या कामानिमित्त बाहेर गेले होते. एरवी निहारिकासोबत कुणीतरी एक जण नेहमी घरी थांबत असे पण आज मात्र दोघांनाही कामानिमित्त सोबत बाहेर जाणे गरजेचे होतं. ऋषिकेशही ऑफिसला गेला होता. निहारिकाच्या डोक्यात पुन्हा आत्महत्येचे विचार उसंडी मारत होते.  

आज पुन्हा झोपेच्या गोळ्या नको म्हणून तिने फॅनला ओढणी बांधली. पलंगावर स्टूल ठेवला. निहारिका वरती चढणार तितक्यात निहारिकाचा मोबाईल वाजू लागला. दोनदा तिने वाजणाऱ्या फोन कडे दुर्लक्ष केले, पण पुन्हा पुन्हा कॉल येणं सुरूच होतं..

क्रमशः

निहारिकाला कोणाचा फोन आला असेल..? निहारिका तो फोन उचलेल का ..? आलेला तो फोन निहारिकाला आत्महत्या करण्याच्या या पातकापासून रोखण्याचा प्रयत्न करून शकेल का..? निहारिका आणि ऋषिकेशची सोबत तुटणार तर नाही ना ? असे अनेक प्रश्न सतावत असतील तर तुम्हाला. मग या सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला पुढच्या भागात मिळतील म्हणूनच या कथेचा पुढचा भाग वाचायला मात्र विसरू नका.

प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो.  सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞

✍©️ जया पाटील

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात, त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

फोटो साभार - Pinterest/Google 










 


Post a Comment

0 Comments