#तुम्हीच_माझे_नंद-यशोदा_भाग_३
©️ जया पाटील
भाग दोन वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_15.html
मागील भागात आपण पाहिलं की निहारिकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण देवाच्या कृपेने ती सुखरूप होती. आपल्याला मुल नाही. या मानसिक आघातातून ती स्वतःला सावरत होती पण पुन्हा पुन्हा लोकांच्या त्याच प्रश्नांना सामोरं जातांना तिच्या मनात पुन्हा आत्महत्या करण्याचे विचार सुरु झाले.
ती ऑफिसमधून घरी आली तेव्हा घरीच कोणीच नव्हते. अलकाताई आणि रविंद्रराव दोघंही महत्वाच्या कामानिमित्त बाहेर गेले होते. ऋषिकेशही ऑफिसला होता. हीच योग्य वेळ आहे स्वतःला संपविण्याची असं निहारिकाने मनोमन ठरवलं. आज पुन्हा झोपेच्या गोळ्या नको म्हणून तिने फॅनला ओढणी बांधली. पलंगावर स्टूल ठेवला. निहारिका वरती चढणार तितक्यात निहारिकाचा मोबाईल वाजू लागला. दोनदा तिने वाजणाऱ्या फोन कडे दुर्लक्ष केले, पण पुन्हा पुन्हा कॉल येणं सुरूच होतं..आता पुढे
निहारिकाने वाजणाऱ्या फोनकडे पाहिलं तर मोबाईल स्क्रीनवर ऋषिकेशचा नंबर फ्लॅश होत होता. ऋषिकेशसोबत बोललो तर आपला विचार पुन्हा बदलेल म्हणून वाजणाऱ्या फोन कडे निहारिकाने दुर्लक्ष केले पण फोन पुन्हा पुन्हा वाजत होता म्हणून निहारिकाने फोन उचलला तर ऋषिकेश तिकडून रडत होता. त्याच्या आवाजात एक कंप होता.
" हॅलो निहारिका ..., हॅलो ..." ऋषिकेशला पुढे काही बोलणे सुचतचं नव्हतं.
" ऋषिकेश , बोल ना ..तू इतक्या टेन्शन मध्ये का आहेस..? काय झालं बोल ना .." निहारिका ऋषिकेशला म्हणाली.
" निहारिका , जान्हवी ,अनिकेत आणि त्याचे आईबाबा त्यांच्या गावाकडे जात असतांना त्यांच्या कारचा ऍक्सीडेन्ट झाला आहे. काका काकू जागीच मृत्यू पावले आहेत. अनिकेत आणि जान्हवी दोघांचीही तब्येत गंभीर आहे. तू लवकर सिटी हॉस्पिटलला ये. "
" आणि अन्वी ...जान्हवीचे बाळ . .ती कशी आहे...? "अकस्मात निहारिकाच्या मनात अन्वीचा विचार आला.
" देवकृपेने बाळ अगदी सुखरूप आहे. पण अनिकेत आणि जान्हवी खूपच सिरीयस आहेत. मला काहीच सुचत नाहीये. मी सिटी हॉस्पिटलला आहे. तू आईबाबांना घेऊन पटकन सिटी हॉस्पिटलला ये. " एवढं बोलून ऋषिकेशने फोन ठेवला.
आपल्या प्रियमैत्रिणीच्या ऍक्सीडेन्टची बातमी ऐकून निहारिकाला खूप मोठा धक्का बसला. ती लगेचच हॉस्पिटलला जायला निघाली. निहारिका घराबाहेर पडत असतांनाच अलकाताई आणि रविंद्रराव परत आले. निहारिकाने झालेली घटना त्यांना सांगितली आणि तेही आल्यापावली निहारिकासोबत हॉस्पिटलला जाण्यासाठी निघाले.
जान्हवी निहारिकाची लहानपणापासूनची खूप जवळची मैत्रीण होती. त्यांचे एकमेकांशिवाय पानही हालत नसे. अनिकेत ऋषिकेशचा कॉलेजचा मित्र होता. निहारिका आणि ऋषिकेशच्या लग्नात अनिकेतने जान्हवीला पाहिलं आणि तो तिच्या प्रेमात पडला.
ऋषिकेश आणि निहारिकाच्या लग्नानंतर चार वर्षांनी जान्हवीचं अनिकेतसोबत लग्न झालं. सुरुवातीला जान्हवी आणि निहारिका सतत सोबत राहत असत पण जान्हवीच्या डोहाळजेवणात अनिकेतच्या आईने निहारिकाचा अपमान केला. त्यामुळे निहारिकाला धक्का बसला.
त्यानंतर थोड्या दिवसातच निहारिकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. निहारिकाच्या आत्महत्या करण्याच्या प्रयत्नाला जान्हवीने स्वतःला दोषी ठरवलं. त्यात जान्हवी गर्भवती होती म्हणून निहारिकाला अजून जास्त वाईट वाटू नये म्हणून जान्हवी तिला भेटण्याचं टाळत असली तरीही जान्हवी निहारिकाच्या कायम संपर्कात होती. फोन करून जान्हवी निहारिकाला धीर देण्याचा प्रयत्न करत होती.
थोड्याच दिवसात जान्हवीने एका गोड परीला जन्म दिला. अनिकेत आणि जान्हवीची लेक म्हणून बाळाचे नाव ठेवण्यात आले "अन्वी ". अन्वीच्या येण्यामुळे जान्हवीचा संपूर्ण परिवार खूप आनंदात होता. अन्वी दोन महिन्याची झाली. तिला घेऊन सगळा परिवार गावी जाण्यासाठी निघाले आणि वाटेत होत्याचं नव्हतं झालं. ऍक्सीडेन्ट मध्ये छोट्या अन्वीने आजीआजोबांना गमावलं आणि आता तिचे आई बाबा पण जन्म मृत्यूची लढाई लढत होते.
निहारिका , अलकाताई आणि रविंद्रराव हॉस्पिटलला पोहोचले. अनिकेत आणि जान्हवीची हालत अत्यंत गंभीर होती. हाता पायाला लावलेल्या नळ्या , सगळ्या रक्ताने ओघळत असणाऱ्या जखमा , एका एका श्वासासाठी झगडणाऱ्या जान्हवी आणि अनिकेतला पाहून निहारिकाला अश्रू अनावर झाले. हतबल होऊन ती ऋषिकेशला बिलगून ती रडू लागली.
सुदैवाने छोट्या अन्वीला मात्र कुठलीच गंभीर दुखापत झाली नव्हती. तिच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला नर्सने निहारिका जवळ आणून दिले. छोट्या अन्वीला आपल्या हातात पाहून निहारिका खूप सुखावली. तिच्यातली आई अन्वीला पाहून सुखावली होती. जान्हवी बरी होईल तोपर्यंत मी अन्वीला जीवापाड जपेल असं निहारिकाने मनात ठरवलं. अन्वीच्या येण्यामुळे काही क्षणांपूर्वी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेली निहारिका पूर्णपणे बदलली होती. आत्महत्येच्या विचाराचा मागमूसही तिच्या डोक्यात शिल्लक उरला नव्हता.
चोवीस तास अनिकेत जीवन मरणाच्या लढाईत झुंजत होता पण शेवटी त्याची लढाई तो हरला. खूप प्रयत्न करूनही मेंदूला गंभीर दुखापत असल्यामुळे डॉक्टर त्याला वाचवू शकले नाही. अनिकेतचा मृत्यू निहारिका आणि ऋषिकेशला खूप मोठा धक्का पोहोचवून गेला. अनिकेतच्या परिवारातील आता जवळचा कुठलाच सदस्य या जगात नव्हता. ऋषिकेशनेच त्याच्या अंतिमसंस्काराची जबाबदारी त्याच्या इतर भाऊबंदांसोबत सोबत पार पाडली.
जान्हवी मात्र उपचारांना साथ देत होती. अट्ठेचाळीस तास गेल्यावर तिला शुद्ध आली. तिच्या तब्येतीत सुधारणा होत होती. चार ते पाच दिवस तिच्यापासून अनिकेतच्या निधनाची बातमी लपवून ठेवण्यात आली होती पण कितीही लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी कधी ना कधी सत्य बाहेर येतेच. जान्हवी शुद्धीतर आली तशी ती पुन्हा पुन्हा अनिकेतला भेटण्याचा हट्ट करत होती. जान्हवीने अनिकेतला भेटण्याचा परत परत हट्ट केल्यावर तिला हळूहळू अनिकेतच्या, आईबाबांच्या मृत्यूबद्दल सांगण्यात आलं.
जान्हवीला त्यावेळेस झालेल्या दुःखाची कल्पनाही न केलेली बरी...! जान्हवीसाठी हा खूप मोठा धक्का होता पण त्याच वेळेस निहारिकाने तिला अन्वीला भेटवलं. आपल्या लेकीला निहारिकाच्या कुशीत सुखरूप पाहून जान्हवीला खूप आनंद झाला. अन्वीकडे पाहून तिच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. निहारिका आणि ऋषिकेश तिची खूप काळजी घेत होते पण अचानक जान्हवीची तब्येत पुन्हा खालावू लागली.
एक दिवस जान्हवीने निहारिकाला आणि ऋषिकेशला भेटण्यासाठी बोलावलं. ती निहारिकाला आणि ऋषिकेशला म्हणाली...
" निहारिका , मैत्रीण म्हणून अगदी शेवटपर्यन्त माझी साथ निभावलीस पण अजून एक गोष्ट हवी आहे मला. अनिकेत ,आईबाबा सगळेच सोडून गेलेत मला आणि तुमच्याशिवाय माझ्या परिवारात कोणीच नाही. मला वाटत नाही मी आता फार काळ जगू शकेल पण त्यापूर्वी मी अन्वीची जबाबदारी तुझ्यावर टाकते आहे. तू तिची आई बनून तिचा सांभाळ कर. ऋषिकेश आणि तू अन्वीचे कायद्यानेही आईबाबा व्हा. तेही माझ्यासमोर म्हणजे मी समाधानाने देवाकडे जाईल. माझ्या डोळ्यासमोर माझ्या लेकीला मला तुम्हा दोघांकडे सोपवायचं आहे. प्लीज माझी ही शेवटची इच्छा पूर्ण कर. "
इतकं बोलून थरथरत्या हाताने जान्हवीने निहारिका आणि ऋषिकेश समोर हात जोडले. जान्हवीच्या , एका आईच्या विनंतीला निहारिका आणि ऋषिकेश नकार देऊ शकले नाही. त्यांनी जान्हवी समोरच अन्वीला कायद्याने दत्तक घेतले. दिवंसेदिवस जान्हवीची तब्येत खूप खराब होत होती. इकडे निहारिका अन्वीचा अगदी उत्तम प्रकारे सांभाळ करत होती. पण अजूनही ती जान्हवीची लेक होती. जान्हवी जिवंत असेपर्यंत अन्वीच्या आईपणाचा हक्क मी जान्हवीकडून हिरवून घेणार नाही असं निहारिकाने मनोमन ठरवलं होतं. निहारिका रोज अन्वीला जान्हवीला भेटण्यासाठी हॉस्पिटलला घेऊन जात असे.
एक दिवस जान्हवीला खूप जास्तच त्रास होत होता. तिला अन्वीला भेटायचं होतं. डोळेभरून तिला पाहायचं होतं. तिने निहारिकाला आत बोलावलं. निहारिकाच्या हातात अन्वीला पाहून जान्हवीला रडू आलं पण त्याचबरोबर ती समाधानी होती की आपली लेक योग्य हातात आहे. तिने अन्वीचा पापा घेतला. जान्हवीने अन्वीचा हात निहारिकच्या हातात दिला आणि अडखळत जान्हवी बोलु लागली ...
निहारिका... माझ्या मातृत्वाचे दान मी तुझ्या पदरात टाकतेय ...आता हा त्रास सहन होत नाहीये ग. मुक्त व्हायचं आहे मला आता. आता पर्यंत अन्वीच्या चिंतेमुळे मी जगत होती पण आता मात्र माझी लेक योग्य हातात आहे याची खात्री आहे मला. अन्वीच्या आईच्या रूपात तिचा सांभाळ आता तु कर. "
हे बोलतांना जान्हवीचा आवाज खोल खोल जाऊ लागला. तिला धाप लागू लागली.
ऋषिकेशने डॉक्टरांना आता बोलावले.
जान्हवीची अशी अवस्था पाहून निहारिका आणि ऋषिकेशला अश्रू अनावर झाले.तश्याच अवस्थेत जान्हवी बोलत होती.
" ऋषिकेश ,अनिकेतची कमतरता अन्वीला कधीच जाणवू देऊ नकोस. निहारिका , ऋषिकेश , माझ्या लेकीला पोटच्या लेकीप्रमाणे जपा. तिला आईबाबांची कमी कधीच जाणवू देऊ नका. आता तूच तिची आई हो निहारिका आणि तुच तिचा बाबा ....बाबा ......ऋषि.....केश..."
निहारिकाने अन्वीला जान्हवीच्या जवळ नेलं. थरथरत्या हाताने जान्हवीने अन्वीचा पापा घेतला आणि ती अन्वीचा हात ऋषिकेश आणि निहारिकाच्या हातात देण्याचा प्रयत्न करू लागली.
जान्हवी अन्वीचा हात निहारिकच्या हातात देण्याचा प्रयत्न करत असतांनाच तिला जोरात धाप लागली. गळ्यातून खरखर आवाज येऊ लागला. आणि एक मोठा उसासा घेतांनाच जान्हवीने जीव सोडला. अन्वीचा हात निहारिकच्या हातात देतांनाच जान्हवीची प्राणज्योत मालवली.
ऋषिकेश आणि निहारिकाला अश्रु अनावर झाले होते. अनपेक्षितपणे निहारिका अन्वीची आई झाली होती. जान्हवीचा हात हातात घेऊन निहारिका रडतचं बोलु लागली ....
" खूप मोठे दान माझ्या पदरात टाकून गेलीस ग जान्हवी ...... अगदी अनपेक्षितपणे ...!
आपल्या मैत्रीचे नाते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जपलेस तु ... ! परंतु तु काळजी करू नकोस. अन्वीला आईची कमी कधीच जाणवणार नाही. तिचा मी खूप चांगला सांभाळ करेल."
" आपल्या लेकीला मी स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त जपेल कारण तिच्या रूपात मी माझ्या जान्हवीला जपणार आहे. माझ्या जिवलग मैत्रिणीला जपणार आहे. तुझ्या आठवणींना जपणार आहे .तुला जपणार आहे ....! आम्ही अन्वीला जन्म देणारे देवकी आणि वासुदेव नसलो तरीही तिचा यशोदा आणि नंद बनून आमची लेक बनून नक्कीच तिचा सांभाळ करू. तिला जपू. "
क्रमश:
अनपेक्षितपणे निहारिका आई झाली होती पण मातृत्व म्हणजे अनेक अडथळ्यांची शर्यत. कसा असेल निहारिकाचा अन्वीची आई होण्याचा प्रवास...? तुम्हालाही जाणून घ्यायचंय ना. मग याच कथेचा पुढचा भाग वाचायला मात्र विसरू नका.
या कथेचे पुढील सर्व भाग रोजच्या रोज तुम्हाला आमच्या ' वेलवेट कवीशा ' या फेसबुक पेजवर वाचण्यास मिळतील. पेजची लिंक खाली दिलेली आहे. 👇👇
https://www.facebook.com/VelvetKavisha/
प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो. सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞
✍©️ जया पाटील
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात, त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Pinterest/Google
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box