#तुम्हीच_माझे_नंद-यशोदा_भाग_४
©️ जया पाटील
भाग तीन वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_16.html
मागील भागात आपण पाहिलं की निहारिकाच्या मनात पुन्हा एकदा आत्महत्या करण्याचे विचार सुरु झाले. ती आत्महत्येचा प्रयत्न करणार तितक्याच निहारिकाला तिची मैत्रीण जान्हवीचा ऍक्सीडेन्ट झाला आहे असं ऋषिकेशने फोन करून तिला सांगितलं. निहारिका हॉस्पिटलला पोहोचली.
जान्हवीचे सासूसासरे आणि पती अनिकेत मेंदूला प्रचंड मार लागल्यामुळे वाचू शकले नाही पण जान्हवी मात्र उपचारांना साथ देत होती. जान्हवीला शुद्ध आली पण आपल्या कुटुंबियांच्या मृत्यूबाबतीत समजल्यावर ती खूप खचली. सुदैवाने जान्हवीची दोन महिन्याची लेक अन्वी मात्र सुखरूप होती. जान्हवीची तब्येत पुन्हा ढासळू लागली. अन्वीची जबाबदारी निहारिका आणि ऋषिकेशवर टाकून जान्हवी निजधामाच्या प्रवासाला निघून गेली. आता पुढे ...
जान्हवीने अन्वीचा निहारिकाच्या हातात दिलेला छोटासा हात पाहून निहारिकाला एकदम भरून आलं. तिने निपचित पडलेल्या जान्हवीचे डोळे दोन्ही हाताने बंद केले आणि कृतज्ञतेने देवाच्या घरी गेलेल्या जान्हवीच्या शांत देहाकडे पाहत निहारिका म्हणाली...
" मी आयुष्यभर सुखी रहावं म्हणून हे मातृत्वाचं दान तू माझ्या पदरात टाकून गेलीस जान्हवी. खरं तर ज्यावेळी मी अन्वीला पहिल्यांदा माझ्या कुशीत घेतलं त्याच क्षणी मी तिची आई झाली होती पण तुझ्या जीवात जीव असेपर्यंत मी तिच्यावर कशी हक्क सांगणार होती..? तुझी अमानत म्हणून तिला जपत होती मी ,पण आज मात्र किती मोठ्या मनाने तू तुझ्या मातृत्वाचा ,अन्वीवरचा हक्क सोडून मला कृतार्थ करून या जगातून निघून गेलीस. "
" प्रत्येक आईसाठी आपलं बाळ सगळ्यात अमूल्य असतं आणि त्याला दुसऱ्याकडे सोपवतांना किती त्रास होतो हे फक्त एक आईच समजू शकते. तुलाही खूप त्रास झाला असेल ना जान्हवी ..? तुझे हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही पण काळजी करू नकोस. जान्हवी आणि अनिकेतची आठवण असलेल्या आपल्या अन्वीला मी जीवापाड जपेन. मी तिची आई होईल ....आई ..."
इतकं बोलत असताना निहारिकाला अश्रू अनावर झाले. ऋषिकेशने तिला सावरलं. त्याचवेळेस अलकाताई आणि रविंद्रराव देखील हॉस्पिटलला पोहोचले. जान्हवीचे आईबाबा सदाशिवराव आणि मेघाताई पण तिथेच उपस्थित होत्या. आपल्या लेकीचा , जावयाचा मृत्यू पचवणं त्यांना खरंच खूप अवघड होतं पण जान्हवीने अन्वीला निहारिकाकडे सोपविण्याचा निर्णय मात्र त्यांना मनापासून मान्य होता.
कोणी कोणाला समजवावे आणि कोणी कोणाचे अश्रू थांबवावे कोणालाच काही समजत नव्हते. खरंतर ती वेळच तशी होती. देवाने दुश्मनावरही अशी वेळ आणू नये. ऋषिकेशने जान्हवीच्या आईबाबांना धीर दिला. अलकाताई आणि रविंद्रराव पण त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत होते.
दवाखान्यातील तो प्रसंग सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. ऋषिकेशने जान्हवीच्या अंतयात्रेची तयारी केली. विधिपूर्वक जान्हवीला निरोप देण्यात आला. जान्हवीचे श्राद्ध आणि इतर विधी पार पडले. थोड्या दिवसांनी जान्हवीचे आईबाबाही थोडं सावरले. त्यांचं दुःख विसरण्यासारखं नव्हतचं मुळी पण स्वतःला समजावून सावरण्याशिवाय समोर दुसरा पर्यायही नव्हता. निहारिका अन्वीचा सांभाळ उत्तम प्रकारे करत होती त्यामुळे त्यांच्या चिंतेचा भार थोडा हलका झाला होता.
अन्वीच्या येण्यामुळे निहारिकाचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. अन्वीच्या येण्यामुळे ऋषिकेश , अलकाताई आणि रविंद्रराव पण खूप आनंदात होते. छोट्याश्या अन्वीकडे पाहून निहारिका भरून पावत असे. अन्वीची अंघोळ , चिऊकाऊ म्हणून तिला घास भरवणं , तिला अंगाई गाऊन झोपवणं , तिच्या सोबत खेळणं हे सगळं निहारिकाचे आयुष्य झालं होतं.
छोट्या अन्वीच्या बाललीलांमुळे निहारिकाचा वेळ कसा जात असे हे तिलाच कळेनासं झालं होतं. तिचं गोड हसणं, घरभर पळणं, सगळ्या घरात खेळण्यांच्या पसारा करणं, कारणाशिवाय तिचं रुसुन बसणं या सगळ्यात निहारिका पूर्णपणे गुंतली होती.
अन्वी नऊ महिन्यांची झाली. एक दिवस अचानक तिला थोडा ताप आला आणि निहारिका खूप घाबरली. अन्वीला न्यूमोनिया असल्याचे निदान झाले. निहारिका खूप घाबरली. अन्वी हॉस्पिटलमध्ये असतांना रात्रभर अन्वीला बरं कर म्हणून ती देवाच्या धावा करत होती. एक आई आपल्या लेकीच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करत होती. सुदैवाने अन्वी या आजारातून सुखरूप बाहेर पडली. त्यानंतर मात्र निहारिका तिला आणखीनच जास्त जपू लागली.
अन्वीचा पहिला वाढदिवस जवळ आला. वाढदिवसाच्या रात्री बारा वाजता निहारिकाने तिचा गोड पापा घेतला. ऋषिकेश मायलेकींचं हे प्रेम डोळ्यात साठवत होता. छोटी अन्वी गाढ झोपली होती पण इतक्या झोपेतही आईचं प्रेम तिला समजलं आणि तिने निहारिकाचा हात आपल्या इवल्याश्या हातांनी घट्ट धरला. त्यावेळी निहारिकाला अश्रू अनावर झाले.
निहारिकाने अन्वीला हातात उचलून घेतलं. छोट्या अन्वीला हातात घेताच आयुष्यभराचे समाधान प्राप्त झाल्याचा आनंद निहारिकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. अन्वीच्या माथ्यावर एक गोड पापा घेऊन निहारिका भरून पावली. हातातील अन्वीला पाहून निहारिका मनोमन अन्वीसोबत बोलु लागली. अन्वीच्या गोड चेहऱ्याकडे पाहून निहारिका म्हणाली...
" बाळ अन्वी , तुझ्या येण्याने माझं आयुष्य जणू इंद्रधनुष्याच्या सप्तरंगी रंगाने रंगून गेलं आहे. ज्या दिवशी तू पहिल्यांदा माझ्या कुशीत आली त्या दिवसापासून आज पर्यंत तुझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्या डोळ्यासमोर तरळत आहे. तु माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट आहेस आणि यात ऋषिकेशने म्हणजे तुझ्या बाबाने मला साथ दिली नसती तर आज परिस्थिती काही वेगळी असती. तुझे आजी-आजोबा देखील माझ्या या सुखी क्षणाचे भागीदार आहे. आपल्या परिवाराच्या या अनमोल साथीमुळेच तू माझ्या आयुष्यात आनंद घेऊन आलीस."
अन्वीचा पहिला वाढदिवस मोठया थाटामाटात पार पडला. त्यावेळेस निहारिकाने सदाशिवराव आणि मेघाताईंना अर्थातच जान्हवीच्या आईबाबांना ही आमंत्रित केले. आपल्या लेकीचा अंश इतक्या आनंदात मोठा होतांना पाहून , अन्वीला आईबाबा आणि आजीआजोबांचे मिळणारे प्रेम पाहून ते खूप आनंदी झाले. जेव्हाही तुम्हाला अन्वीला भेटावसं वाटेल त्यावेळेस तुम्ही इथे येऊ शकतात असं रविंद्ररावांनी सदाशिवरावांना सांगितलं.
हळूहळू अन्वी मोठी होत होती. अन्वी मोठी झाली की आपण तिचे जन्मदाता नाही हे सत्य आपण तिला नक्की सांगू असं निहारिका आणि ऋषिकेशने ठरवलं होतं. अन्वी दीड वर्षाची झाली. पहिला शब्द ती बोलली....आ....आ....उ.... आई ...."
अन्वीच्या तोंडून आई ऐकून निहारिकाला अत्यानंद झाला. गेली आठ-नऊ वर्षे हा शब्द ऐकायला तिचे कान तरसले होते. आज मैं उपर आसमा नीचे अशी तिची अवस्था झाली होती. निहारिकाने अन्वीला छातीशी कवटाळलं. त्याच क्षणी तिच्या डोक्यात विचार सुरु झाले...
" ज्या क्षणी अन्वीला माहिती होईल की मी तिला जन्म दिलेला नाही. त्या क्षणीही ती मला इतक्याच आपुलकीने आई म्हणेल का..? नाही...तिला हे सत्य माहित झालं तर ती मला आई मानणार नाही....नाही....निहारिका....हे सत्य मी अन्वीला कधीच सांगणार नाही. कधीच नाही. मी नाही जगू शकणार अन्वी माझ्यापासून दुर गेली तर....मीच तिची आई आहे..."
निहारिका मनातल्या मनात बोलत होती. तिने हा विचार ऋषिकेशला ही बोलून दाखवला. निहारिकाला वाईट वाटू नये म्हणून ऋषिकेशने ही तिच्या होकारात होकार मिसळला. अन्वी मोठी होत होती. अभ्यास , वक्तृत्व , चित्रकला सगळ्याच गोष्टीत अन्वी खूप हुशार होती. शाळेत , सोसायटीमध्ये ती सगळ्यांची खूपच लाडकी होती. अलकाताई आणि रविंद्ररावांचे तर पंचप्राण तिच्यात वसलेले होते. अन्वी दहा वर्षाची झाली. त्यावेळेस सदाशिवराव आणि मेघाताई तिला भेटण्यासाठी घरी आले. अधून मधून ते अन्वीला भेटायला नेहमी येत पण रविंद्ररावांचे मित्र म्हणून. अन्वी जान्हवीची मुलगी आहे. आपली नात आहे हे सत्य त्यांनी कधीच अन्वीला सांगायचा प्रयत्न केला नाही. अन्वी निहारिकाला आपली आई मानते आणि ती आनंदी आहे. आपण तिला डोळे भरून पाहू शकतो यातच ते खूप खुश होते.
यावेळीही त्यांना अन्वीची आठवण आली म्हणून ते तिला भेटायला आले. मात्र सोबत साधना आत्या पण होत्या. साधना आत्या जान्हवीच्या दूरच्या आत्या होत्या. त्यांनीही जान्हवीच्या मुलीला पाहायचा हट्ट धरला होता म्हणून सदाशिवराव साधना आत्याला सोबत घेऊन आले. सदाशिवराव निहारिकाच्या घरी आले. निहारिकाने त्यांचं खूप छान स्वागत केलं. अन्वी त्यावेळेस घरी नव्हती. ती शाळेत गेली होती. थोडावेळाने अन्वी शाळेतून घरी आली. ती खूप खुश होती. अन्वी घरी येऊन रविंद्ररावांना येऊन बिलगली आणि म्हणाली ...
" आजोबा , आज शाळेत चित्रकलेची स्पर्धा होती. त्यात मला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. आता तुम्ही पण मला बक्षीस द्या. आजीला पण मी आज मला मस्त पैकी शिरा करून खायला द्यायला सांगणार आहे. "
" अरे वा...आमच्या परीराणीला बक्षीस मिळालं मग तर तुला गिफ्ट द्यायलाच हवं. तू सांगशील ते गिफ्ट देईल मी तुला. पण आधी आपल्याकडे कोण आलं आहे ते तर पहा..?"
घरी आलेल्या सदाशिवरावांना आणि मेघाताईंना पाहून अन्वीला खूप आनंद झाला. त्यांना ती गावाचे आजी-आजोबा म्हणत असे.
" अरे वा..गावाचे आजी आजोबा ..तुम्ही कधी आले. आज तर खूपच मज्जा आली. आता तर तुम्ही पण आले आहात मग आई काहीतरी छान बनवणार जेवायला.....मज्जाच मज्जा! "
हसणाऱ्या अन्वीला पाहून साधना आत्याला खूप आनंद झाला. त्या अन्वीला जवळ घेत म्हणाल्या...
" बाळ अन्वी , किती मोठी झालीस तू... किती हुशार आहेस. मी ऐकलं आहे की खूपच सुंदर चित्र काढतेस तू...? कोणाकडून शिकलीस...? "
" थँक्यू आजी , मी आई कडून शिकली आहे चित्र काढायला. तिला पण लहानपणापासूनच चित्र काढायची आवड होती. आता मी तिची मुलगी आहे मग मी शिकणारच ना ..चित्र काढायला.."
" तिची मुलगी ...? अग पण तू तरी जान्हवीची मुलगी आहे. जान्हवी माझी भाची.. निहारिकाने तर तुला दत्तक घेतलं आहे...." साधना आत्या अचानक बोलून गेल्या. सगळीकडे स्मशान शांतता पसरली.
" दत्तक ...दत्तक म्हणजे काय आजी ..? "अन्वीने साधना आत्याला विचारलं. सदाशिवराव आणि मेघाताई साधना आत्याला इशारे करून थांबविण्याचा प्रयत्न करत होते पण साधना आत्याला अन्वीला हे सत्य माहित नसल्याची जाणीव नव्हती त्यामुळे त्या सतत बोलत होत्या.
" आपण एखाद्या बाळाला आपल्या पोटात वाढवून जन्म देऊ शकलो नाही तर आपण दुसऱ्याच्या मुलाला सांभाळण्यासाठी आपलं मुल म्हणून आणणं म्हणजे दत्तक मुल ..." साधना आत्या अन्वीला म्हणाल्या.
एवढ्याश्या बाल मनावर आपल्या बोलण्यामुळे काय आघात झाला आहे याची साधना आत्याला जाणीवच नव्हती. साधना आत्याचं बोलणे ऐकून अन्वी एकदम सुन्न झाली. तितक्याच निहारिका आणि ऋषिकेश अन्वीच्या समोर आले. अन्वी रागाने लालबुंद झाली...
" खोटं बोललीस तू माझ्यासोबत... मी तुझ्या पोटातून जन्म नाही घेतला. म्हणजे तू माझी आई नाहीस. तुम्ही कोणीच नाही माझे....तुम्ही फसवलं मला ...खोटारडे आहात तुम्ही सगळे...आई ...बाबा .. तुम्ही सगळ्यांनी फसवलं मला..खोटारडे आहात तुम्ही सगळे..i hate u...." अन्वी रडत रडत बोलत होती.
ज्या गोष्टीची निहारिकाला भीती वाटत होती. तीच गोष्ट घडली होती. ' तू माझी आई नाही. ' अन्वीच्या या शब्दांनी निहारिकावर खूप मोठा आघात केला होता. रागात अन्वी आत पळाली. ती रडत होती. तिने तिच्या रूमचा दरवाजा आतून लावून घेतला. तिच्या मागे निहारिका ,ऋषिकेश आणि सगळेच धावले. सगळे तिला दरवाजा उघड म्हणून विनवत होते पण ती मात्र काहीच ऐकून घ्यायच्या मनःस्थितीत नव्हती.
क्रमश:
अन्वी आता निहारिकाला आपली आई मानू शकेल का ..? ऋषिकेश आणि निहारिकाला आईबाबा म्हणून आता अन्वी स्वीकारू शकेल का..? सत्य समजल्यावर अन्वीचा निर्णय काय असेल..? तुम्हालाही जाणून घ्यायचंय ना. मग याच कथेचा पुढचा भाग वाचायला मात्र विसरू नका.
या कथेचे पुढील सर्व भाग रोजच्या रोज तुम्हाला आमच्या ' वेलवेट कवीशा ' या फेसबुक पेजवर वाचण्यास मिळतील. पेजची लिंक खाली दिलेली आहे. 👇👇
https://www.facebook.com/VelvetKavisha/
प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो. सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞
✍©️ जया पाटील
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात, त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Pinterest/Google
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box