तुम्हीच माझे नंद-यशोदा भाग ५



 #तुम्हीच_माझे_नंद-यशोदा_भाग_५

©️ जया पाटील 

भाग चार वाचा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_17.html

मागील भागात आपण पाहिलं की जान्हवीच्या मृत्यूनंतर निहारिका आणि ऋषिकेश अन्वीचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करत होते. निहारिकाने आपल्याला जन्म दिला नाहीये , आपण तिचं दत्तक मुल आहोत या गोष्टीची मात्र अन्वीला कल्पना नव्हती. जान्हवीचे आईबाबाही आपल्या नातीला अधूनमधून भेटायला येत मात्र त्यांनी अन्वीला तिच्या जन्माचं सत्य कधीच सांगितलं नाही. असंच ते एकदा जान्हवीच्या आत्याला घेऊन अन्वीला भेटायला आले आणि त्या आत्याने अनपेक्षितपणे अन्वीसमोर तिच्या जन्माचे सत्य उघड केले. निहारिका आणि ऋषिकेश आपले जन्मदाता नाहीत ही गोष्ट समजल्यावर अन्वीला प्रचंड राग आला. आता पुढे...

निहारिका आपली आई नाही हे सत्य जेव्हा अन्वीच्या समोर आले तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला. तिचे मन या गोष्टीचा स्वीकार करण्यासाठी तयार नव्हते. ती रागाने लाल झाली. तिला निहारिकाचा खूप राग आला. राग ऋषिकेशचाही होता पण निहारिकाच्या पोटातून तिने जन्म घेतला नाही या गोष्टीचे दुःख खूप जास्त होते.

ज्या गोष्टीची निहारिकाला भीती वाटत होती. तीच गोष्ट घडली होती. ' तू माझी आई नाही. ' अन्वीच्या या शब्दांनी निहारिकावर खूप मोठा आघात केला होता. रागात अन्वी आत पळाली. ती रडत होती. तिने तिच्या रूमचा दरवाजा आतून लावून घेतला. तिच्या मागे निहारिका ,ऋषिकेश , रविंद्रराव , अलकाताई , सदाशिवराव, मेघाताई, साधना आत्या सगळेच धावले. सगळे तिला दरवाजा उघड म्हणून विनवत होते पण ती मात्र काहीच ऐकून घ्यायच्या मनःस्थितीत नव्हती. साधना आत्याला तिच्याकडून झालेली चूक लक्षात आली. बोलायच्या ओघात आपण खूप मोठी चूक केली याची त्यांना जाणीव झाली. त्यांना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप झाला पण आता काहीच उपयोग नव्हता.  

" अन्वी बाळा , ऐक ना ..माझं ऐकून तर घे. बाळा मी तुला जन्म दिला नाही हे सत्य असले तरीही तू माझीच लेक आहे. माझं खूप प्रेम आहे ग अन्वी तूझ्यावर ....! तू अशी रुसली तर नाही जगू शकणार मी. खूप तप केल्यानंतर आलीस तू माझ्या आयुष्यात. तुझ्या आईवर असा राग करू नकोस ना बाळा. एकदा मी काय सांगते ते ऐकून तरी घे. हवं तर त्यानंतर राग कर माझ्यावर पण माझ्याशी बोल ना ..अन्वी ...प्लीज ...अन्वी दार उघड ना .."  

निहारिका अन्वीला समजावण्याच्या प्रयत्न करत होती. निहारिकाला अश्रू अनावर झाले होते. ती हमसून हमसून रडत होती पण तिच्या या रडण्याचा अन्वीवर काही एक परिणाम होत नव्हता. ऋषिकेशही अन्वीला प्रेमाने समजण्याचा प्रयत्न करत होता. अलकाताईंनी , जान्हवीच्या  आईबाबांनीही अन्वीला समजविण्याचा प्रयत्न करून पाहिला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

खूप वेळ लोटला होता. शेवटी सदाशिवराव आणि मेघाताईंनी तिथून जायचा निर्णय घेतला कारण तिथे थांबून त्यांना निहारिकाच्या वाटेत आणखीन अडथळे आणायचे नव्हते. निहारिका रडून रडून हैराण झाली होती. रविंद्ररावांनी हळूच अन्वीला आवाज दिला. अन्वी तिच्या आजोबांची खूप लाडकी होती. त्यांच्यात नात आजोबा असूनही मैत्रीचं सुरेख नातं होतं.  

रविंद्रराव अगदी शांतपणे अन्वीला म्हणाले...

" बाळा अन्वी , तुझा राग तुझ्या जागी अगदी बरोबर आहे पण तुझ्यापासून निहारिकाने ही गोष्ट का लपवली या मागे पण काही कारण असेल. फक्त एकदा तू निहारिकाचे म्हणणं ऐकून घे. त्यानंतर तुझा जो निर्णय असेल तो आम्हा सगळ्यांना मान्य असेल. अन्वी , आजोबांचं ऐवढं म्हणणं ऐकशील ना ..? आपण एकमेकांना प्रॉमिस केले आहे ना की कितीही राग आला तरीही एकमेकांचं म्हणणं ऐकल्याशिवाय कुठल्याच निर्णयावर पोहोचायचं नाही. आजही फक्त एकदा आमचे म्हणणं ऐकून घे. "  

रविंद्ररावांचे बोलणं ऐकून पाच मिनिट अन्वीने विचार केला आणि हळूच बेडरूमचा दरवाजा उघडला. अन्वीला बाहेर पाहून निहारिकाच्या जीवात जीव आला. तिने अन्वीला जवळ घेऊन कुरवाळलं आणि अश्रुंना वाट मोकळी करून दिली. अन्वी मात्र निहारिका पासून दूर जाऊन उभी राहिली. अन्वीच्या वागण्यातील बदल निहारिकाच्या लक्षात आला. ती हळूच अन्वीला म्हणाली ...

" अन्वी , रागावली आहे ना माझ्यावर... तुझं पण बरोबर आहे. तुझ्या जन्माचं सत्य मी तुझ्यापासून लपवलं ही खूप मोठी चूक झाली ग माझ्याकडून , पण आता मात्र तुला मी तुझ्या जन्माबद्दल सगळं काही सांगणार आहे. त्यानंतरही मी तुला चुकीची वाटली तर मला तू देशील ती शिक्षा मान्य असेल." निहारिका अन्वीला जान्हवीचे सत्य सांगतांना तिच्या भूतकाळात हरवली. निहारिकाने बोलायला सुरुवात केली.

" खूप घट्ट मैत्री होती जान्हवी आणि माझ्यामध्ये. मी आणि जान्हवी दोघीही बालपणाच्या मैत्रिणी. प्रत्येक गोष्ट घेतांना एकमेकांच्या आवडीची घेणं , छोट्यामोठ्या अडचणीत एकमेकांना साथ देणं अशा छोट्या पासून मोठ्या सगळ्या गोष्टींत आम्हाला एकमेकांची सोबत गरजेची वाटत असे. "

" वेगवेगळ्या आयांच्या पोटी जन्म घेतलेल्या आम्ही मनाने मात्र अगदी सख्ख्या बहिणी होतो. वेळ पुढे जात होता परंतु आमची मैत्री आणखीन घट्ट होत होती. एकमेकांच्या सोबतीने आमचं कॉलेजचं शिक्षण पण पूर्ण झालं. आमच्या दोघींसाठी घरच्यांनी वरसंशोधनाला सुरुवात केली. घरातले आम्हा दोघींनाही चिडवत असत.."

"अगं मुलींनो , एकमेकांना सोडून तुमचं पान हालत नाही. लग्न करून तर दोघीही वेगवेगळ्या घरी जाणार ..मग कसे होईल गं तुमचे ..? "

"जान्हवी आणि माझं त्यावर उत्तर लगेच तयार असे .. "दोन सख्खे भाऊ असतील ना त्यांच्या सोबतच आम्ही लग्न करू म्हणजे एकाच घरात आम्ही दोन्ही मैत्रिणी जावा- जावा .. मग काय नुसती धम्माल असेल आमची ...परंतु  ह्या सगळ्या झाल्या बोलायच्या गोष्टी....."

"त्यादरम्यान माझ्यासाठी ऋषिकेशचं स्थळ सांगून आले. ऋषिकेश मुंबईला राहणारा ,चांगल्या पदावर नोकरीला, समजदार आणि गुणी मुलगा त्यामुळे घरातील सगळ्यांनाच त्याचे स्थळ आवडले होते. कांदेपोह्यांचा कार्यक्रम पार पडला आणि ऋषिकेशने आमच्या लग्नासाठी आपला होकार कळवला."

"माझं लग्न ठरलं आणि मी जान्हवीला सोडून जाणार म्हणुन जान्हवी खूप नाराज झाली. मला  देखील जान्हवीला सोडून जायचं दुःख होतं पण आपण एकच शहरात तरी यायला हवे अशी प्रार्थना कर म्हणुन मी जान्हवीची समजूत घातली."

"माझा आणि ऋषिकेशचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. ऋषिकेशचे अनेक मित्र लग्नासाठी उपस्थित होते. त्यातच एक होता अनिकेत. अनिकेतला जान्हवी पाहताक्षणीच खूप मनापासून आवडली आणि लग्न करेल तर जान्हवीसोबतच असे त्याने ठरवून टाकले. त्यावेळेस मात्र तो आर्थिक दृष्ट्या सेटल नव्हता त्यामुळे त्याने त्यावेळेस जान्हवीला मागणी घातली नाही."

"लग्नानंतर मी आणि ऋषिकेश मुंबईला सेटल झालो. नवीन लग्नानंतर आम्ही दोघेही एकमेकांना वेळ देत होतो , एकमेकांना समजून घेत होतो. आईबाबा आणि आम्ही दोघंही खूप खुश होतो. लग्नाला दोन वर्ष झाली आणि आम्हालाही बाळ असावं असे आम्हाला वाटू लागलं. आम्ही डॉक्टर ,दवाखाना सगळे प्रयत्न केले पण बाळाचं सुख आम्हाला मिळालंच नाही. लग्नाला तोवर चार वर्ष झाली."

"जान्हवीने पुढचं शिक्षण पुर्ण केलं त्यामुळे तिच्या आईबाबांनी तिच्या लग्नाची घाई केली नाही. 

इकडे अनिकेतही चांगल्या कंपनीत नोकरीला लागला. नीट सेटल झाला. त्यामुळे त्यावेळेस अनिकेतने जान्हवीला लग्नासाठी मागणी घातली. जान्हवीच्या घरच्यांनी होकार कळवला. एकच शहरात जान्हवी आणि मी राहू या विचारानेच मला खूप आनंद झाला. जान्हवीचं लग्न अनिकेत सोबत पार पडलं. चहूकडे आनंदी आनंद होता त्यामुळे मी देखील खूप खुश होती पण आपल्याला अजून मुलबाळ नाही या गोष्टीची जाणीव खूप त्रासदायक होती."

"दिवस लोटत होते. मी खूप निराश झाली होती. आईबाबा आणि ऋषिकेश मला नेहमी समजवायचा प्रयत्न करायचे पण काय करू मला आई व्हायचं होतं. माझ्यानंतर जान्हवीचं लग्न झालं आणि वर्षभरानेच तिने गोड बातमी दिली. मलाही खूप आनंद झाला पण स्वतःच्या आयुष्यात आई होण्याचा आनंद नाही म्हणून मी दुःखी झाले. "

"जान्हवीच्या डोहाळे जेवणात जान्हवीच्या सासूबाईंनी मला बाळ नाही म्हणून माझा खूप अपमान केला. त्यामुळे निराश होऊन मी एकदा स्वतःला संपवायचा प्रयत्न केला. ऋषिकेश वेळेवर घरी आला आणि मी वाचली.या सगळ्यातून सावरत असतांना पुन्हा पुन्हा आत्महत्या करण्याचे विचार डोक्यात येऊ लागले. एकदा पुन्हा तसाच प्रयत्न करायचा ठरवला तेवढ्यात ऋषिकेशचा फोन आला की जान्हवी आणि तिच्या कुटुंबियांचा मोठा ऍक्सीडेन्ट झाला आहे. त्यात अनिकेतचे आईबाबा जागीच मृत्यूमुखी पडले. अनिकेत आणि जान्हवी सिरीयस होते."

"सुदैवाने तुला मात्र काहीच इजा झाली नव्हती. मी घाईने दवाखान्यात पोहोचली. तुला हॉस्पिटलच्या नर्सने माझ्याकडे सोपवलं. इवल्या इवल्या डोळ्यांनी तु माझ्याकडे पाहून हसत होती. तुला पाहताच आई झाल्याचा भास झाला मला पण जान्हवीची तब्येत सिरीयस असली तरीही ती जिवंत होती म्हणून स्वतःच्या भावनांना आवर घातला मी. "

" दोन दिवसांनी अनिकेतची मृत्यूसोबतची झुंज अपयशी ठरली आणि तो देवाघरी निघून गेला. जान्हवी शुद्धीवर आली. ती उपचाराना साथ देत होती पण दोन तिन दिवसात तिला अनिकेत आणि घरच्यांच्या मृत्यूबद्दल समजलं आणि ती मनाने खचली. तिने मला आणि ऋषिकेशला रूम मध्ये बोलावलं आणि म्हणाली..

" निहारिका , मैत्रीण म्हणून अगदी शेवटपर्यन्त माझी साथ निभावलीस पण अजून एक गोष्ट हवी आहे मला. अनिकेत ,आईबाबा सगळेच सोडून गेलेत मला आणि तुमच्याशिवाय माझ्या परिवारात कोणीच नाही. मला वाटत नाही मी आता फार काळ जगू शकेल पण त्यापूर्वी मी अन्वीची जबाबदारी तुझ्यावर टाकते आहे. तू तिची आई बनून तिचा सांभाळ कर. ऋषिकेश आणि तू अन्वीचे कायद्यानेही आईबाबा व्हा. तेही माझ्यासमोर म्हणजे मी समाधानाने देवाकडे जाईल. माझ्या डोळ्यासमोर माझ्या लेकीला मला तुम्हा दोघांकडे सोपवायचं आहे. प्लीज माझी ही शेवटची इच्छा पूर्ण कर. "  

"तिला नकार नाही देऊ शकलो आम्ही. त्यानंतर एक दिवस जान्हवीला प्रचंड त्रास होत होता. तिने तुला घेऊन मला जवळ बोलावलं. धाप लागत असतांना सुद्धा ती बोलण्याचा प्रयत्न करत होती. ती म्हणाली..

" निहारिका.. माझ्या मातृत्वाचे दान मी तुझ्या पदरात टाकतेय ...माझी वेळ संपली आहे परंतु तू मात्र अन्वीचा आईच्या रूपात सांभाळ कर. तिला आईची कमी कधीच जाणवू देऊ नकोस ...आता तूच तिची आई हो...आणि जान्हवीने प्राण सोडला. "

"जान्हवीचा मृत्यू मनाला चटका लावून गेला पण अनपेक्षितपणे मी तुझी आई झाली होती. जान्हवी खूप मोठे दान माझ्या पदरात टाकून गेली होती अगदी अनपेक्षितपणे ...आमच्या मैत्रीचे नाते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जपले होते तिने... मला आईपणाचे सुख देऊन गेली होती माझी जान्हवी. आयुष्यभर तिचा अंश माझ्या सोबतीला देऊन गेली होती. तुझ्यारूपात मला तिचीच सोबत देऊन गेली होती. " निहारिकाला जान्हवीचे सत्य सांगतांना अश्रू अनावर झाले होते.

निहारिकाने अन्वीला जान्हवी आणि अनिकेत तिचे खरे आईबाबा आहेत हे सत्य सांगितलं पण तरीही निहारिकाबद्दल अन्वीच्या मनात असलेला राग जाईल की नाही..? अन्वी पुन्हा निहारिकाला आई म्हणून स्वीकारेल की नाही..? निहारिका अन्वीला पुन्हा गमावणार तर नाही ना ..? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी याच कथेचा पुढचा अंतीम भाग वाचायला मात्र विसरू नका.

या कथेचे पुढील सर्व भाग रोजच्या रोज तुम्हाला आमच्या ' वेलवेट कवीशा ' या फेसबुक पेजवर वाचण्यास मिळतील. पेजची लिंक खाली दिलेली आहे. 👇👇

https://www.facebook.com/VelvetKavisha/

प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो.  सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞

✍©️ जया पाटील

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात, त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

फोटो साभार - Pinterest/Google 







 





Post a Comment

0 Comments