तुम्हीच माझे नंद-यशोदा भाग ६ अंतिम

 


#तुम्हीच_माझे_नंद-यशोदा_भाग_६ अंतिम

©️ जया पाटील 

भाग पाच वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_18.html

मागील भागात आपण पाहिलं की निहारिका आपली आई नाही हे सत्य जेव्हा अन्वीच्या समोर आलं तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला. तिचं मन या गोष्टीचा स्वीकार करण्यासाठी तयार नव्हतं. ती रागाने लाल झाली. तिला निहारिकाचा खूप राग आला. राग ऋषिकेशचाही होता पण निहारिकाच्या पोटातून तिने जन्म घेतला नाही या गोष्टीचं दुःख खूप जास्त होतं.  

रागात अन्वीने स्वतःला एका रूम मध्ये कोंडून घेतलं. घरातील सगळे सदस्य तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते पण अन्वी काहीच समजून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती. खूप प्रयत्नांती रविंद्ररावांच्या सांगण्यावर अन्वीने  रूमचा दरवाजा उघडला. निहारिकाने रडत रडत अन्वीला जान्हवी आणि तिची मैत्री , अन्वीचा जन्म , जान्हवीचा अकस्मात मृत्यू या सगळ्या घटना सांगितल्या. आता पुढे..

जान्हवीच्या मृत्यूबद्दल सांगतांना निहारिकाला अश्रू अनावर झाले. तिला काहीच सुचत नव्हतं. तरीही तिने स्वतःला सावरलं आणि पुन्हा ती अन्वीसोबत बोलू लागली.

" जान्हवीचा मृत्यू मनाला चटका लावून गेला पण अनपेक्षितपणे मी तुझी आई झाली होती. जान्हवी मला बहिणी इतकीच प्रिय होती. तिची सोबत मला आयुष्यभर हवी होती. कितीही संकटं आली तरी आपली मैत्री अशीच कायम ठेवायची असं आम्ही दोघींनीही एकमेकांना वचन दिलं होतं. आमच्या मैत्रीचं नातं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जपलं होतं तिने. "

"तिची साथ तर आयुष्यभर लाभू शकली नाही. पण तिने तुला मला माझ्या पदरात घालून मला कृतार्थ केलं. जान्हवी खूप मोठं दान माझ्या पदरात टाकून गेली अगदी अनपेक्षितपणे. आयुष्यभर तिचा अंश माझ्या सोबतीला देऊन गेली. तुझ्यारूपात मला तिचीच सोबत देऊन गेली ."

" जान्हवीच्या मृत्युनंतर सगळ्यांना सावरायला बराच वेळ गेला. सदाशिवकाका आणि मेघाकाकूंची तर खुप वाईट अवस्था होती. थोडया दिवसात आम्ही थोडे सावरलो. त्यानंतर तुझ्या संगोपनात मी पूर्णपणे गुंतली. माझ्या प्रत्येक गोष्टीत फक्त तू होतीस. उठता बसता प्रत्येक गोष्टीत मला फक्त तुझी आणि तुझीच चिंता असायची. "

"अन्वी तुझ्या येण्यामुळे माझं, ऋषिकेशचे, आईबाबांचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. तुझ्या आमच्या आयुष्यात ,या घरात येण्यामुळे आम्ही सगळे खूप खूप आनंदात होतो.आमच्यासाठी तू आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद बनून आली होती. आम्हाला आनंदी करणारी परी होतीस तू अन्वी ..."

" तुझी अंघोळ , चिऊकाऊ म्हणून तुला घास भरवणं, तुला अंगाई गाऊन झोपवणं, तुझ्या  सोबत खेळणं हे सगळं माझं आयुष्य झालं होतं. तुझ्या बाललीलांमुळे माझा वेळ कसा जात असे हे मलाच कळेनासं झालं होतं. तुझं गोड हसणं, घरभर पळणं, सगळ्या घरात खेळण्यांच्या पसारा करणं, कारणाशिवाय तुझं रुसुन बसणं या सगळ्यात मी पूर्णपणे गुंतली होती ग अन्वी. माझं छोटंस जग फक्त तुझ्या भोवती फिरत होतं. एव्हाना तुच आमचं जग होतीस आणि आताही तुच आमचं जग आहेस. "

" तू मोठी झाली की आम्ही तुझे जन्मदाता नाही हे सत्य तुला नक्की सांगू असं मी आणि ऋषिकेशने ठरवलं होतं. तू दीड वर्षाची झाली. पहिला शब्द तू  बोलली ....आ....आ....उ.... आई ...."

" तुझ्याच्या तोंडून आई ऐकून मला अत्यानंद झाला. गेली आठ-नऊ वर्षे हा शब्द ऐकायला माझे कान तरसले होते. मी तुला छातीशी कवटाळलं. त्याच क्षणी माझ्या डोक्यात विचार सुरु झाले...

" ज्या क्षणी तुला माहिती होईल की मी तुला जन्म दिलेला नाही. त्या क्षणीही तू मला इतक्याच आपुलकीने आई म्हणशील  का..? माझ्या मनाने त्याच क्षणी उत्तर दिलं ...' नाही ' तूला हे सत्य माहित झालं तर तू  मला आई मानणार नाही. मला तुला गमवायचं नव्हतं म्हणून नाही सांगू शकली तुला मी हे सत्य. मी तुला जन्म देऊ शकली नाही तरीही हृदयाने ,माझ्या मनाने मात्र मी तुझी आई झाले आणि आयुष्यभर मी फक्त तुझीच आई आहे आणि राहणार आहे."

"आज जेव्हा तुला तुझ्या जन्माचे सत्य माहित झालं आणि तू चिडलीस. माझ्यापासून दुरावलीस. माझं आईपण नाकारलंस. मला ह्याच सगळ्या गोष्टींची भीती वाटायची म्हणून तुला मी जन्म दिलेला नाही हे सत्य सांगायची मला भीती वाटायची. मला तुला गमवायचं नव्हतं म्हणूनच तुझ्यापासून मी हे सत्य लपवलं. " 

हे सगळं अन्वीला सांगत असतांना निहारिकाला अश्रू अनावर झाले आणि ती तिथून निघून गेली.  

अन्वीच्याही डोळ्यात पाणी होतं. अलकाताई आणि रविंद्रराव अन्वीच्या जवळ गेले आणि तिला कुरवाळत ते म्हणाले...

" बाळ अन्वी , निहारिकाने आता तुला सगळं खरं सांगितलं आहे आणि आता तिचा राग करायचा की नाही हे तू ठरव. आपण नेहमी श्रीकृष्ण भगवानाची कथा पाहतो आणि ऐकतो. भगवान कृष्णाला देवकीने जन्म दिला तरीही त्याचा सांभाळ मात्र यशोदा मातेने केला. यशोदामातेच्या प्रेमातही कुठलीच कमतरता नव्हती. भगवान कृष्णाने देखील दोघांनाही समान स्थान दिले."

"आता तूच ठरव तुला निहारिकाबद्दल काय वाटतं ते ? ती तुला आईचे प्रेम देण्यात कुठेही कमी पडली असेल तर तिला हवी ती शिक्षा तू देऊ शकतेस पण फक्त तिच्या पोटातून तू जन्म घेतला नाहीस या गोष्टीचा तुला राग असेल तर ते मात्र चुकीचं आहे. काही वेळेस रक्तापेक्षा प्रेमाची , जिव्हाळ्याची नाती जास्त श्रेष्ठ असतात. निर्णय पूर्णपणे तुझा असेल अन्वी बाळा , तुझा आजोबा म्हणून मी तुझ्या मनाविरुद्ध कुठलाच निर्णय घेण्याची तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. "  

इतकं बोलून रविंद्रराव तिथून निघून गेले. काही काळ आपण अन्वीला एकटं सोडूया असं घरातील सगळ्यांनी ठरवलं. अन्वी तिच्या आठवणी आठवून खूप विचार करत होती. निहारिकाने तिला लावलेला जीव , अन्वीला थोडं हि काही झाल्यावर कासावीस होणारी निहारिका , अन्वीला हवी ती प्रत्येक गोष्ट आणून देणारा ऋषिकेश, तिचे खूप लाड करणारे आजीआजोबा  अर्थातच रविंद्रराव आणि अलकाताई या सगळ्या गोष्टी अन्वीच्या डोळ्यासमोरून जात होत्या. हा सगळा विचार करता करता तिला झोप लागली.

त्यावेळेस तिला एक स्वप्न पडलं. त्यात अन्वी खूप आजारी होती. अन्वीला बरं वाटावं म्हणून निहारिका सतत देवाच्या धावा करत होती. निहारिका सतत अन्वीच्या जवळ बसून तिची काळजी घेत होती. अचानक अन्वीला जास्तच त्रास होऊ लागला. ती खूप कण्हू लागली. तिला बोलताही येत नव्हतं. तश्याच अवस्थेत ती बोलण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. आ...ई ....आई .....!  

आई शब्दावर अन्वीला अचानक जाग आली. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. पहाट झाली होती. ती धावतच बैठकीच्या खोलीकडे पळाली. निहारिका तिथेच बसून होती. अन्वी तिच्या सोबत बोलत नाही म्हणून तिने जेवणही केलं नव्हतं. रात्रभर ती झोपलीही नव्हती. तिला आधार देण्यासाठी ऋषिकेश, अलकाताई रविंद्रराव पण तिथेच बसून होते पण दिवसभराच्या दगदगीमुळे त्यांना झोप लागली होती.  

निहारिका मात्र जागीच होती. स्वतःच्या हातात अन्वीचा फोटो घेऊन ती एकसारखं त्याला

न्याहळत होती. अन्वीने निहारिकाची ही अवस्था पाहिली. तिला स्वतःचा खूप राग आला. धावत जाऊन ती निहारिकाला बिलगली. अन्वीला आपल्या कुशीत पाहून निहारिकाला अश्रू अनावर झाले. अन्वी आणि निहारिका दोघींनाही अश्रू आवरत नव्हते. त्यांच्या आवाजाने ऋषिकेश , रविंद्रराव आणि अलकाताईंना जाग आली.

" मला माफ कर आई ...मी चुकले. I am really very very sorry. मी खूप वाईट आहे ना..? मी तुला काल किती नको नको ते बोलली तरीपण तू माझा फोटो घेऊन बसली आहेस. I am really sorry.. माझ्यावर रागावणार नाही ना आई..? मला माफ करशील ना आई .." 

अन्वी रडत रडत निहारिकाला म्हणाली. निहारिकाने अन्वीला जवळ घेतले आणि तिचा पटापट खूप खूप पापा घेतला आणि म्हणाली..

" अन्वी बाळा , रडणं बंद कर आधी. माझ्या बाळाच्या डोळ्यात असे अश्रू नाही पाहू शकत मी. तुला असं का वाटलं की मी तुझ्यावर रागावली आहे. मी तुझ्यावर कधीच रागावू शकत नाही. माझं आयुष्य आहेस तू ...तुझ्यापासून तुझ्या जन्माचे सत्य मी लपवलं. त्याबद्दल मलाच माफ कर बाळा..."  

" निहारिका बरोबर बोलते आहे अन्वी , आम्ही तुला जन्म देऊ शकलो नाही तरीही आम्ही मनाने तुझेच आईबाबा आहोत. तु आमच्या हृदयातून जन्म घेतला आहेस बाळा , आम्ही तुझ्यापासून हे सत्य लपवून ठेवलं त्याबद्दल आम्हाला माफ करशील ना अन्वी  .? "  

ऋषिकेश अन्वीला उद्देशून म्हणाला. अन्वी निहारिका आणि ऋषिकेशच्या जवळ जात म्हणाली ..

" खरी चूक तर माझी आहे आईबाबा ..मी तुमच्यावर राग केला. आजी आजोबा मला नेहमी शिकवायचे की जी व्यक्ती आपल्यावर खूप मनापासून प्रेम करते तिचं मन कधीच दुखावू नये पण मी मात्र तुम्हाला दोघांनाही खूप त्रास दिला. भगवान श्रीकृष्णाच्या गोष्टी मी रोज ऐकायची. देवाला सुद्धा यशोदा माता आणि नंदबाबा तितकेच प्रिय होते जितके की देवकीमाता आणि वासुदेव बाबा... आता तुम्हीच माझे वासुदेव- देवकी आहात आणि तुम्हीच माझे नंद-यशोदा आहात..." 

इतके बोलून अन्वी ऋषिकेश आणि निहारिकाला जाऊन घट्ट बिलगली. ऋषिकेश आणि निहारिका अन्वीला प्रेमाने कुरवाळत होते. डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू सगळ्यांना सुखावत होते. 

आईवडील आणि लेकीच्या प्रेमाचा हा सुखद सोहळा डोळ्यात साठवत अलकाताई आणि रविंद्रराव भरून पावले होते.

वाचकहो , तुम्ही सगळेच ही कथा वाचताना भावनावश झाले असणार ना ? आई आणि बाळाचं नातंच तसं असतं. जगातील सगळ्यात जवळचं आणि अनोख नातं...! निहारिकाने अन्वीला जन्म दिला नाही तरीही मनाने मात्र ती अन्वीची आई होती. काही नाती रक्ताने जोडली जात नाही तरीही त्या नात्यातील प्रेमाचा , मायेचा ओलावा त्या नात्याला श्रेष्ठ बनवतो. काही वेळेस रक्ताच्या नात्यापेक्षा मनाची बंधने अधिक जवळची असतात. अन्वी आणि निहारिका दोघी मायलेकींमध्ये असंच प्रेम वाढत राहो या शुभेच्छा देऊन ही कथा संपवते आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात अशीच मायेचा ओलावा असणारी नाती असावी हीच सदिच्छा. 

समाप्त..!

तुम्हाला ही कथा कशी वाटली. तुमचे अभिप्राय आम्हाला कळविण्यास विसरू नका. लवकरच अश्याच नवनवीन कथा घेऊन तुमच्या भेटीला येत राहू. तुम्हीही तुमच्या लाईक्स ,कंमेंट्सच्या माध्यमातून तुमचे अभिप्राय आम्हाला कळवत रहा.

धन्यवाद ...🙏🙏

प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो.  सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞

✍©️ जया पाटील

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात, त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

फोटो साभार - Pinterest/Google 







 








Post a Comment

0 Comments