माझ्या माहेरचा मान मलाच जपायला हवा भाग १



#माझ्या_माहेरचा_मान_मलाच_जपायला_हवा_भाग_१

©️जया पाटील

"अवंतीचे बाबा , अहो किती वेळ लावणार एवढंसं  काम करायला. मुलाकडची मंडळी येतीलच इतक्यात. जरा घाई करा. पाहुणे मंडळी येण्याच्या आधी आपलं सगळं आवरून व्हायला हवं. " 

सुलोचनाताई अर्थातच अवंतीची आई प्रकाशरावांना धाक कम समजावणीच्या सुरात सांगत होत्या. नववधू होण्यासाठी बावरलेल्या अवंतीच्या घरी ही सगळी गडबड सुरु होती.

अवंतीच्या बऱ्याच मैत्रिणींच्या लग्नाची पत्रिका तिला मिळाली आणि अवंतीच्या घरचे तिच्यापाठी लग्नाचा तगादा लावू लागले. आईच्या उपदेशाची गंगा तर हिमालयातून वाहू लागली. भगीरथाने हिमालयातून गंगेला प्रसन्न करून पृथ्वीतलावर अवतारण्यास प्रवृत्त केले होते पण उपवर मुलीच्या आईला मात्र प्रसन्न न करताच ती खूप काही बोलू लागते जसे की अवंतीची आई ... 

" मुलीचं लग्न योग्य वयातच झालं पाहिजे. तसंही तुझ्या बऱ्याच मित्र- मैत्रिणींच्या लग्नाच्या पत्रिका येत आहेत. कुठल्याच आईबाबांना मुलगी लग्न करून पाठवायची इच्छा नसते , कितीही झालं तरीही काळजाचा तुकडा स्वतःपासून दुर करणं अवघड असतं परंतु मुलीची जात आपापल्या घरीच शोभते वगैरे वगैरे ..."  

असो हा झाला उपदेश. मग अवंतीच्या घरच्यांनी चार पाच स्थळं शोधली आणि फायनली एक मुलगा त्यांना योग्य वाटला म्हणून त्याला मुलगी पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. अवंतीने कॉम्पुटर मध्ये Msc पूर्ण केले होते. कॅम्पस प्लेसमेंट मध्ये तिलाही चांगल्या कंपनीत जॉब मिळाला होता. पाहायला येणारा मुलगा आदिराज देखील आय टी क्षेत्रातच काम करणारा होता.  

आदिराज निर्मला आणि एकनाथ देशमुख यांचा एकुलता एक मुलगा होता. एकनाथ देशमुख बँकेत उच्च पदावर कार्यरत होते. निर्मलाताई देखील एका मोठ्या कंपनीत मोठ्या पोस्टवर काम करत होत्या मात्र नुकतीच त्यांनी  स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. आदिराज त्यांचा एकुलता एक मुलगा. आदिराज देखील एका मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला होता. कॅम्पस सिलेक्शन मुळे त्याला सुरुवातीलाच चांगली सॅलरी होती.

वडिलोपार्जित शेती आणि शेतीपूरक उद्योगांमुळे पूर्वीपासूनच देशमुख कुटुंब आर्थिक दृष्ट्या अत्यंत सधन होतं. या उच्च्भ्रू कुटूंबात आपली मुलगी अगदी सुखात राहील असं प्रकाशरावांना वाटलं. शिक्षण, पैसा, छोटं कुटुंब अशा सगळ्याच बाबी चांगल्या असल्यामुळे प्रकाशरावांना अवंतीसाठी ही अगदी योग्य सोयरीक वाटली.

प्रकाशराव मोहिते एका छोट्या कंपनीत काम करणारे साधारण कर्मचारी. अवंती प्रकाशराव आणि सुलोचनाताईंची जेष्ठ कन्या. निखिलची लाडकी ताई. खूप काही श्रीमंत नसले तरीही खाऊन - पिऊन सुखी असलेले कुटुंब .काटकसरी बायको गुणी , संस्कारी मुले त्यामुळे त्यांचा संसार अगदी सुखात चालू होता. थोडक्यात सांगायचं तर आर्थिक श्रीमंती खूप नसली तरीदेखील खूप मोठी मनाची श्रीमंती असलेले हे प्रकाशरावांचे एक समाधानी कुटुंब होते.

प्रकाशरावांनी रीतसर एकनाथरावांना भेटून त्यांच्या कुटुंबाला अवंतीला पहायला येण्याचं निमंत्रण दिलं. एकनाथरावांनीही विनम्रतेने प्रकाशरावांचं निमंत्रण स्वीकारलं. पुढच्याच आठवड्यात कांदेपोह्यांचा कार्यक्रम ठरला. 

आज वरपक्षाकडची पाहूणेमंडळी , नवरा मुलगा अवंतीला पाहायला येणार असल्यामुळे घरात सगळीकडे लगबग सुरु होती. मुलगी बघण्याचा कार्यक्रम म्हणजे एखाद्या इव्हेंट पेक्षा कमी नसतो.

वधुपरिक्षेसाठी पाहूणे येणार हे माहित पडल्यावर अवंतीच्या घरच्यांची तयारी सुरु झाली होती. घरातील चादरी , पडदे कोणत्या रंगाचे असावेत इथपासून ते कुठल्या कपात कुठल्या ट्रेमध्ये पाहुण्यांना चहा द्यायचा इथपर्यंत सर्व ठरवलं जात होतं.

मुलाकडचे पाहूणे येणार म्हणून नवीन बेडशीट , चादर , वर्षानुवर्षे कपाटात ठेवलेली क्रोकरी , नवीन शो पिसेस सगळ्यांनी आज दिवाणखान्यात मोकळा श्वास घेतला होता. अवंतीच्या आईची येणाऱ्या पाहुण्यांना करायच्या पाहुणचाराची वर्दळ सुरु होती. हे सगळे करत असतानाच तिच्या प्रश्नांची अवंतीवर सरबत्ती सुरु होती. 

" अवंती , आलेल्या पाहुण्यांसाठी स्वतःच्या हाताने पोहे बनवशिल का ..? कुठली साडी घालणार आहेस ...? फार जास्त मेकअप करू नकोस. बऱ्याच लोकांना आवडत नाही ग इतका नट्टा पट्टा. आपण आपलं साधंच राहिलेलं बरं ..."  

" मुलासोबत त्याच्या घरची मोठी माणसं पण असणार आहेत त्यामुळे पदर व्यवस्थित खांद्यावर सांभाळून ठेव. तुम्हा आजकालच्या मुलींना तरी खूप मोकळीक मिळाली आहे. नाहीतर आमच्यावेळेस तर एक क्षण सुद्धा डोक्यावरून पदर पडलेला चालत नसे. ( अवंतीची आई गेली  फ्लॅशबॅक मध्ये ...आमच्यावेळी असे होते अँड ऑल .. )

" जरा फ्रेश हो जा. पटकन आटोप म्हणजे पाहूणे आल्यावर धावपळ होणार नाही. कंटाळली आहेस का माझे इतके प्रश्न ऐकून ..? "

अवंतीची आई तिला म्हणाली.

" नाही ग आई. मी कशाला कंटाळेल ..." 

अवंती आईचं मन मोडायचं नाही म्हणून म्हणाली.

पाहूणे यायची वेळ झाली तशी अवंतीच्या जीवाची मात्र घालमेल वाढली. कसं बसायचं ? कसं बोलायचं? कसं हसायचं? काय सांगायचं? कोणाकडे बघायचं, कसं बघायचं? त्याच्याकडे पाहायचं की नाही? कसा असेल तो? आवडेल का मला तो? हा सगळा विचार करून अवंतीच्या मनाचा गोंधळ आणखीनच वाढीस लागला होता.

तितक्यात पाहूणे आले. एकनाथराव , आदिराज आणि निर्मलाताई अगदी सांगितलेल्या वेळेस अवंतीच्या घरी पोहोचले. पाहुणे आल्यावर लगेच निखिलने अर्थातच अवंतीच्या भावाने पाणी देत त्यांचं स्वागत केलं. प्रकाशरावांनी एकनाथरावांच्या परिवारासोबत त्यांच्या घरातील सगळ्या सदस्यांची ओळख करून दिली.

निखिल पोहे आणि सोनपापडी असा नाश्ता घेऊन दिवाणखान्यात आला. सगळ्यांनी नाश्ता करायला सुरुवात केली. निखिल आत गेला आणि अवंतीचा इंटरव्हिव सूरू होणार म्हणून तिला चिडवू लागला. तितक्यात बाहेरून अवंतीला दिवाणखान्यात बोलवणं आल्याचं कळालं. 

अवंतीच्या जीवाची धाकधूक वाढली. अवंतीने स्वतःला पुन्हा एकदा आरश्यात न्याहाळलं. साडी वगैरे व्यवस्थित आहे ना याची खात्री केली.

घाबरत घाबरत अवंती दिवाणखान्यात गेली.  सोफ्यावर एकनाथराव आणि आदिराज समोर बसले होते. बाजूच्या खुर्चीवर निर्मलाताई बसल्या होत्या. अवंतीने आल्याबरोबर चहाचा ट्रे सेंटर टेबलवर मधोमध ठेवला. एकनाथराव आणि निर्मलाताईंना वाकून नमस्कार केला. टेबलवरील चहाचा ट्रे उचलून सगळयांच्या हातात अवंतीने चहाचा कप दिला आणि एका जागेवर उभी राहिली.

" अवंती , बाळ उभी का ...? बस ना ..." 

एकनाथराव अवंतीला म्हणाले. एकनाथरावांनी बसायला सांगितल्यावर ती समोरच्या खुर्चीवर बसली. तिचा हा नम्रपणा सगळयांनाच खूप भावला.  

आकाशी बॉर्डर असलेली गुलाबी रंगाची शिफॉन साडी , त्यावर तसंच मॅचिंग ब्लॉउज , कपाळावर नाजूक टिकली , गळ्यात नाजुकशी मोत्याची सर,   ओठावर लाईट ब्राउन लिपस्टिक, बनाना क्लिप मध्ये बांधलेले केस अशी साधी सोज्वळ तयार होऊन जेव्हा अवंती बाहेर आली तेव्हा आदिराज तिच्याकडे पाहतच राहिला.अवंतीला पाहताक्षणीच तो तिच्यावर लट्टू झाला.

 साध्या अवतारात पण ती खूपच सुंदर दिसत होती. मुळातच तयार होण्याची अवंतीला गरजच नव्हती कारण देवाने अस्सल सौंदर्याचं दान तिला भरभरून दिलं होतं. गोरापान रंग, चाफेकळी नाक, गुलाबी गोबरे गाल,तपकिरी बुरसट डोळे त्यावर रेखलेली काजळाची रेघ..मुळातच समोरच्याला भुरळ पाडणाऱ्या टपोऱ्या डोळ्यांना खुलवणारी , निमूळती हनुवटी,  काळेभोर केस , गोर्या कांतीवर चेहऱ्यावर रेंगाळणारी काळ्या केसांची बट अवंतीचं सौंदर्य आणखीनच खुलवत असे. आदिराज तर अवंतीला पाहून पहिल्याच नजरेत क्लीन बोल्ड झाला.

सगळे निरखून फक्त अवंतीकडेच पाहत होते त्यामुळे अवंतीचा पुतळा झाला होता. काय करावं आणि काय नाही असा तिच्या मनाचा गोंधळ झाला होता.

अवंतीने सगळ्यांना दिलेल्या चहाचा आस्वाद घेतल्यावर मग तिच्या प्रश्नोत्तराचा तास सुरु झाला. आयपीस परीक्षेची मुलाखत देणं सोपं पण हा कांदेपोह्यांचा कार्यक्रम कठीण आहे असं  अवंतीला मनोमन वाटू लागलं होतं.  

एकनाथरावांनी अंकिताला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. 

" बाळ अवंती तुझं पूर्ण नाव काय ..?" 

" अवंती प्रकाशराव मोहिते. " 

" तुमचं मुळगाव ..? "

" सागाव.." 

" तुझं शिक्षण काय ..?  कुठून पूर्ण केलेस..? " 

" Msc कॉम्पुटर. इथल्याच श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कॉलेजमधून पूर्ण केले. "

" तुम्ही किती भावंड आहात ..? "

" मला एक भाऊ आहे. "  

" बाळा , तुला किती भाऊ आहे तर एक पण तुम्ही किती भावंड आहात तर दोन. भावंड म्हणजे त्यात तू देखील आलीच ना ,म्हणूनच दोन. असं स्वतःला विसरून कसं चालेल ..? हो कि नाही ..?"

एकनाथरावांनी हसतच अवंतीला सांगत वातावरण हलकंफुलकं करण्याचा प्रयत्न केला. सगळे दिलखुलास हसले. अवंतीने हसतच एकनाथरावांच्या म्हणण्यावर मान डोलावली.

निर्मलाताईंना प्रकाशरावांची आर्थिक परिस्थिती फारशी आवडली नाही पण घरी जाऊन एकनाथरावांसोबत बोलू म्हणून त्यांनीही फॉर्मॅलिटी म्हणून अवंतीला काही प्रश्न विचारले.

"अवंती , तुला चांगला स्वयंपाक करता येतो ना ..? कारण माझा आदिराज एकदम खवय्या आहे. त्याला वेगळे वेगळे पदार्थ खाण्याची खूप आवड आहे. " निर्मलाताई अवंतीला म्हणाल्या.

" हो , बऱ्यापैकी सगळा स्वयंपाक जमतो मला .."अवंती  

" अभ्यास सोडून इतर काही छंद ..जसे शिवणकाम , विणकाम , ब्युटीपार्लर ..? "निर्मलाताई.

" यातले काही नाही जमत पण मला चित्र काढायला खूप आवडतं." अवंती शांतपणे म्हणाली.

"अरे , चित्र काढायला आवडतात चांगली गोष्ट आहे पण याचा संसाराला काही उपयोग नाही ना ...असो .." निर्मलाताई अगदी पटकन बोलून गेल्या. अवंतीला थोडं अवघडल्यासारखं वाटलं.

निर्मलाताईंनी अवंतीला तिच्या भविष्याविषयी आणखी काही प्रश्न विचारले.

" अवंती , तुला करियर आणि संसार दोघंही मॅनेज करायचं आहे ..? ते तू कसे काय जमवून आणशील ..? " 

" संसार आणि करियर मॅनेज करतांना कुटुंबाची साथ असणं खूप महत्वाचं आहे. तुमची साथ मिळाली तर मी नक्कीच माझं करियर उत्तम रित्या घडवू शकते. " 

अवंतीने आत्मविश्वासाने निर्मलाताईंना उत्तर दिलं. निर्मलाताईंना मात्र अवंतीचं उत्तर फारसं आवडलं नाही. एकनाथराव आणि आदिराजला अवंतीच्या या उत्तराचा खूपच अभिमान वाटला. एकनाथराव अवंतीला प्रतिउत्तर करत म्हणाले..

" खूप छान अवंती. मला अश्याच उत्तराची अपेक्षा होती. तू आणि आदिराज दोघंही आमच्यासाठी सारखेच आहात. तुझं करियर करतांना आम्ही तुला संपूर्ण साथ देऊ. तू खूप मोठी हो. तुझी प्रगती आमच्यासाठी आणि तुझ्या आईबाबांसाठी खूप मोठं भूषण असणार आहे. " 

सुलोचनाताईही पडद्याआड पाहुण्यांचं बोलणं ऐकत होत्या. एकनाथरावांच्या या उत्तराचा प्रकाशराव आणि सुलोचनाताईंना खूपच आनंद झाला. आपली मुलगी खरंच खूपच नशीबवान आहे असं त्यांना मनातून वाटून गेलं. प्रकाशरावांनी आणि एकनाथरावांनी आदिराजला देखील अवंतीला काही प्रश्न विचारण्यास सांगितलं. आदिराजने मात्र नम्रतेने नकार दिला.

एकनाथराव आदिराजकडे पाहत म्हणाले..

" आदिराज आणि अवंती तुम्हाला दोघांनाही  एकांतात काही बोलायचं असेल तर बोलू शकतात. तुमच्या फ्युचर प्लॅन्स विषयी काही डिस्कस करायचं असेल तर करू शकतात. " 

" नाही नाही ..नको ..याची काहीच गरज नाही. " 

निर्मलाताई एकनाथरावांना मध्येच अडवत म्हणाल्या.

" अग निर्मला ..असं का म्हणत आहेस..? मुलं आपल्या समोर मोकळेपणानं बोलू शकणार नाही. त्यांची देखील भविष्याची स्वप्न असतील. एकमेकांविषयी काही अपेक्षा असतील. बोलू देऊया त्यांना मोकळेपणाने.."  

एकनाथराव निर्मलाताईंना समजावणीच्या सुरात म्हणाले. निर्मलाताईंनी नाराजीने एकनाथरावांना होकार दिला. 

निखिल अवंती आणि आदिराजला घेऊन वरच्या मजल्यावर गेला. निखिल असल्यामुळे आदिराज ला थोडं अवघडल्यासारखं होत होतं. आदिराजची अस्वस्थता पाहून निखिल थोड्या दुर अंतरावर जाऊन उभा राहिला.

आदिराज अवंतीसोबत काय बोलायचं या विचारात पडला. पाच मिनिट विचार करून दीर्घ उसासा सोडत तो अवंतीला म्हणाला ...

" अवंती , पहिलाच प्रश्न असा विचारतोय मी की ज्यामुळे तुला थोडं अवघडल्यासारखं वाटू शकत.

राग मानू नकोस थोडं स्पष्टपणे बोलतोय. तुझ्या आयुष्यात दुसरी कोणी व्यक्ती असेल किंवा तुझ्या घरचे तुझ्यावर कुठलाही दबाव आणत असतील तर आताच सांग. मी स्वतःहून या लग्नाला नकार देईल. तुझ्यावर कुठलाच दोष येणार नाही. " 

आदिराजच्या या प्रश्नावर अवंती थोडी गोंधळली पण तरीही ती स्वतःला सावरत म्हणाली ..

" नाही , तसं काहीच नाही. " 

" ओके , मग छानच आहे. तुझ्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल काही अपेक्षा असतील ना. त्या सांग मला.." 

आदिराज अवंतीला म्हणाला.

" अ...हा...तश्या काही जास्त अपेक्षा नाहीत माझ्या. फक्त मला समजुन घ्यावं आणि मला माझ्या करियर साठी सप्पोर्ट करावा. तुमचं स्थळ सांगून आलं तेव्हापासून मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे. राग मानू नका पण थोडं स्पष्ट सांगायचं म्हटलं तर मी खूप साधारण कुटुंबात वाढलेली मुलगी आहे. आमच्यापेक्षा आर्थिक दृष्ट्या तुम्ही खूप जास्त सधन आहात. आपल्या घरच्यांच्या आर्थिक परिस्थितीतील तफावतीमुळे आपल्यात वितुष्ट तर निर्माण होणार नाही ना ..?"  

"माझे आईबाबा तुमची त्यांच्या परीने शक्य तितकी हौसमौस नक्कीच करतील फक्त सगळ्या गोष्टी त्यांना डोईजड नको व्हायला. प्लीज राग मानू नका इतकं स्पष्टपणे सगळं सांगितल्याबद्दल." 

"अवंती ,राग काय त्यात..? आपल्या कुटुंबाचा विचार करणं ही चांगलीच गोष्ट आहे. मला तुझा स्पष्टपणा खूप आवडला आणि तू सुद्धा ..." 

आदिराज अचानक बोलून गेला. त्याच्या या बोलण्यावर अवंती खूप लाजली. तिला पुढे काय बोलायचं कळेना झालं तरीही काहीतरी बोलायला हवं म्हणून ती आदिराजला म्हणाली..

" तुमच्याही काही अपेक्षा असतील माझ्याकडून  तर सांगा मला. "

" पहिल्यांदा हे मला तुम्ही आम्ही म्हणणं बंद कर. इतक्या फॉर्मॅलिटी करायची गरज नाही. खरं सांगायचं तर माझ्यापण फार अश्या अपेक्षा नाहीत माझ्या जोडीदाराकरून. फक्त माझ्या कुटुंबाला सांभाळून घ्यावं. माझे आईबाबा खूप साधी माणसं आहेत ग. त्यांना समजुन घ्यावं आणि सांभाळून घ्यावं हीच माफक अपेक्षा आहे माझी.  

" आणि हो असं समजू नकोस की फक्त माझ्या आईबाबांना सांभाळून घेण्याबद्दल बोलतोय. मी देखील तुझ्या आईबाबांची काळजी घेईलच. एकमेकांच्या कुटुंबीयांची आपण दोघांनीही काळजी घ्यावी हीच एक छोटीशी अपेक्षा आहे माझी. " 

आदिराजच्या बोलण्यावर अवंतीची कळी  खुलली. आदिराजला तर पहिल्या नजरेतचं अवंती आवडली होती पण आता तिच्या कुटुंबावर तिचं प्रेम पाहुन आदिराजला अवंतीबद्दल खूप आदर वाटला. अवंतीला देखील आदिराज मनापासून आवडला.

आदिराज-अवंतीचं बोलणं झाल्यावर निखिल आणि ती दोघंही खाली आली. अजून थोड्या गप्पा झाल्या. एकनाथरावांनी आदिराजला इशारा केला 'आता निघूया ' म्हणून.

लवकरच उत्तर कळवतो असं प्रकाशरावांना  सांगून एकनाथराव आणि कुटुंबीय तिथून निघाले. एकनाथराव आणि आदिराज दोघंही खूप खुश होते पण निर्मलाताई मात्र नाराज होत्या.

क्रमश:

अवंती-आदिराज दोघांच्या लग्नाला निर्मलाताई होकार देतील का ..? निर्मलाताईंच्या नाराजीमुळे आदिराज अवंतीसोबत लग्न करायला नकार देईल का ? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी याच कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका. 

प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो.  सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞

✍©️ जया पाटील

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात, त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

फोटो साभार - Pinterest/Google 










 


Post a Comment

0 Comments