#माझ्या_माहेरचा_मान_मलाच_जपायला_हवा_भाग_२
©️जया पाटील
भाग एक वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_54.html
मागील भागात आपण पाहिलं की प्रकाशरावांनी एकनाथ देशमुख यांच्या एकुलत्या एक मुलाला अर्थातच आदिराजला आपली लेक अवंतीला पाहण्यासाठी आमंत्रित केले. देशमुख कुटुंब शहरातील उच्चभ्रू वस्तीत राहणारा श्रीमंत परिवार होता. एकनाथरावांनी प्रकाशरावांचे आमंत्रण अगदी नम्रतेने स्वीकारले. कांदेपोह्याचा कार्यक्रम पार पडला. आदिराज आणि एकनाथरावांना सोज्वळ साधी ,शालिन अशी अवंती खूप मनापासून आवडली.
आदिराजची आई निर्मलाताईंना मात्र अवंतीच्या बाबांची साधारण परिस्थिती फारशी रुचली नाही. कार्यक्रम संपल्यावर लवकरच उत्तर कळवतो असं प्रकाशरावांना सांगून एकनाथराव आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रकाशरावांचा निरोप घेतला. एकनाथराव आणि आदिराज दोघंही खूप खुश होते पण निर्मलाताई मात्र नाराज होत्या. घरी जाऊन आपण याबाबतीत आदिराज आणि एकनाथरावांना सांगू असं निर्मलाताईंनी ठरवलं. आता पुढे ...
अवंतीला पाहून घरी आल्यावर एकनाथराव आणि आदिराज खूपच खुश होते पण निर्मलाताईंना मात्र प्रकाशरावांची साधारण परिस्थिती , त्यांचे साधारण वागणे फारसे आवडले नाही. थोडक्यात निर्मलाताईंना प्रकाशराव अगदीच मिडलक्लास वाटले. आल्याबरोबर त्यांनी प्रकाशरावांच्या साधारण परिस्थितीबद्दल , अवंतीच्या साध्या राहणीमानाबद्दल असलेली त्यांची नाराजी आदिराज आणि एकनाथरावांसमोर व्यक्त केली.
निर्मला ताईंना स्वतःला नटण्या-मुरडण्याची भारी हौस ...! कुठंही गेलं तरी चार लोकांनी आपल्या सौंदर्याचं कौतुक करायलाच हवं अशी त्यांची इच्छा असे. त्यांची इच्छा नेहमीच पूर्ण देखील होत असे कारण वयाच्या पन्नाशीत देखील त्या वीस वर्षाच्या मुलीला लाजवतील इतक्या सुंदर दिसत असत. आपल्या स्वतःची काळजी घेणं. पार्लर , मसाज सेशन ,योग्य डायटिशियनच्या सल्ल्याने डाईट घेणं यामुळे त्यांनी स्वतःला खूप मेंटेन केलं होतं.
त्यामुळेच आपल्या मुलाची होणारी बायको देखील अशीच हौशी असावी आणि तिच्या राहणीमानाचं आणि सौंदर्याचं देखील असंच खूप कौतुक व्हावं असं त्यांना वाटत होतं त्यामुळेच या स्थळाबाबतीत त्या थोड्या नाराज होत्या. अवंतीचा साधेपणा त्यांना आवडला नाही ,त्यामुळेच अवंतीला पाहून आल्यानंतर त्यांनी त्यांची मनातील नाराजीची भावना घरातील सगळ्यांना बोलून देखील दाखवली.
निर्मलाताई आदिराज आणि एकनाथरावांना म्हणाल्या...
" लग्न ,नोकरी ,साखरपुडा इतक्या पुढच्या गोष्टी करायची तुम्हाला आजच गरज नव्हती. अजून त्या मुलीला आपण होकार दिलेला नाही. मुलगी शिकलेली आणि सुंदर असली तरीही ती खूप साधारण कुटुंबातली आहे. आदिराज आपला एकुलता एक मुलगा आहे. त्याची हौसमौस नको का पूर्ण व्हायला..? मला नाही वाटत की प्रकाशराव मोहिते आपल्या सगळ्या इच्छा आपल्या ऐपतीप्रमाणे पूर्ण करू शकतील."
" अहो ,मुलाकडची मंडळी आली म्हटल्यावर चार गोडाचे पदार्थ तरी त्यांनी नाश्त्याला ठेवायला हवे होते पण ते तर सरळ पोहे आणि सोनपापडी देऊन मोकळे झाले. त्यांचे घर पण किती साधारण वस्तीत आहे. ते पण फक्त वन बेडरूम हॉल किचन. एका साध्या कंपनीत काम करणाऱ्या वर्कर माणसाची मुलगी आपल्या घराण्याच्या स्टेटसला तरी शोभायला हवी ना.आदिराजचं सासर आपल्या तोलामोलाचं असायलाच हवं ना."
" अवंती दिसायला सुंदर असली तरीही तिचं राहणीमान किती साधारण आहे. मला माझ्या आदिराजसाठी अतिशय स्टॅंडर्ड आणि स्टायलिश राहणारी मुलगी हवी आहे. आदिराज आणि आदिचे बाबा मी तुम्हाला स्पष्टच सांगते मला ही सोयरीक मान्य नाही. तुम्ही प्रकाशरावांना आपला नकार कळवून टाका. "
निर्मलाताई एका दमात बोलून गेल्या. एकनाथराव आणि आदिराजला त्यांचं बोलणं आवडलं नाही. आईच्या बोलण्यामुळे आदिराज खूप नाराज झाला.आदिराजला त्याच्या आईच्या बोलण्याचा खूप राग आला. तो चिडून म्हणाला...
" आई ,प्रत्येक गोष्टीची तुलना तू पैश्याच्या किमतीत नको करत जाऊस. अवंतीच्या बाबांची परिस्थिती बेताची असली तरी त्याने तुझ्या स्टेटसला काहीच फरक पडत नाही. आपल्या इतका पैसा त्यांच्याकडे नसला तरीही कष्टाने कमवून त्यांनी आपलं स्वतःचं विश्व निर्माण केलं आहे. खाऊन पिऊन सुखी परिवार आहे त्यांचा."
"आपल्याकडे येणारी मुलगी मनाने निर्मळ आणि सोज्वळ आहे. ती उत्तम गृहिणी आणि सून होणार असेल तर तिच्या माहेरची परिस्थिती आपण का पाहावी. राहता राहिला माझ्या हौशीचा प्रश्न तर ती आपण आपल्या पैश्यांनी सुद्धा करू शकतो. पैसा कमी असला म्हणून आपण कोणाला कमी लेखावं ही गोष्ट मला मान्य नाही."
"आय एम सॉरी आई पण स्पष्टपणे सांगतो,
मला अवंती मनापासून आवडली आहे. मला अपेक्षित असलेल्या जोडीदाराचे सगळे गुण अवंती मध्ये आहेत. फक्त तिच्या माहेरची परिस्थिती साधारण आहे ह्या एकाच गोष्टीवरून मी तिला नकार देणार नाही. मी लग्न करेल तर तिच्यासोबतच करेल. "
" आदिराज , अरे पण...माझं ऐकून तरी घे."
" आई , मला अजून काहीच बोलायचं नाहीये या विषयावर.."
इतके बोलून आदिराज आपल्या रूम मध्ये निघून गेला.
आदिराज निघून गेल्यावर मग एकनाथराव निर्मला ताईंना समजावणीच्या सुरात म्हणाले ...
"अग निर्मला , सगळ्यात पहिले मुलाची पसंती ती आपली पसंती असते आणि संसार त्या दोघांनाही करायचा आहे. राजाने केली आणि राणी झाली हे आपण मान्य करायला हवं आणि राहता राहिला अवंती च्या साधेपणाचा प्रश्न ...? तर प्रत्येक व्यक्तीचं काही तरी वेगळं वैशिष्ट्य असतं."
" प्रत्येक व्यक्ती कुठल्या न कुठल्या बाबतीत स्पेशल असते. अवंतीचं देखील तसंच आहे. तिच्यातला साधेपणा अगदी सगळ्यांच्या मनाला भावतो,स्पर्श करतो. तोच साधेपणा तिला खऱ्या अर्थाने स्पेशल बनवतो..... ! "
" जेव्हा आपण प्रसादाचा शिरा बनवतो त्यावेळेस देखील आपण फक्त चवीपुरतेच काजू , बदाम , मनुका टाकतो ... का ...? तर मुळ शिऱ्याची चव तशीच राहावी. इतर पदार्थानी मुळ चव जायला नको म्हणून. तसंच अन्वीबाबतीत देखील आहे. तिचा साधेपणा हा तिचं मुळ स्वरूप आहे. मेकअप,स्टाईल ह्या सगळ्या गोष्टी फक्त तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. या सगळ्यात तिचा मुळ साधेपणा दाबला जाईल आणि ते मला,आदिराजला देखील नकोय. अवंती जशी आहे तशीच उत्तम आहे. "
" राहता राहिला प्रश्न प्रकाशरावांच्या आर्थिक परिस्थितीचा तर पैश्यापेक्षा संस्कार आणि प्रेम हे नेहमीच श्रेष्ठ असतं. पैसे कमी असले म्हणून माणूस म्हणून समोरचा व्यक्ती कमी ठरत नाही. शेवटी आपल्या लेकाचा आनंद तोच आपला आनंद .... ! हो की नाही ....? "
"त्यामुळे निर्मला, आता मनातील सगळ्यात शंकांना दुर सारून तु आपल्या आदिच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात कर. वरमाय होणार आहेस तु ....तुझा थाट देखील तसाच असायला हवा की नाही.."
आदिराजच्या हट्टापुढे नमुन आणि एकनाथरावांच्या समजावण्यामुळे निर्मलाताईंनी आदिराज आणि अवंतीच्या लग्नाला होकार दिला. त्यांच्या मनातली नाराजी मात्र कायम होती.
एकनाथरावांनी प्रकाशरावांना फोन करून आदिराजचा होकार कळवला. लवकरच साखरपुडा आणि लग्नाची तारीख निश्चित करू असं ठरलं.
होकार कळविल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रकाशराव एकनाथरावांच्या घरी आले. एकनाथरावांनी त्यांचं उत्तम स्वागत केलं. तेव्हा आदिराजही तिथेच उपस्थित होता. प्रकाशराव आले तेव्हापासून त्यांच्या चेहऱ्यावर एका प्रकारची अस्वस्थता होती. त्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता एकनाथरावांनी अचूक हेरली. ते शांतपणाने प्रकाशरावांना म्हणाले ...
" प्रकाशराव ,काही चिंता आहे का..? तुम्ही अगदी निश्चिन्त होऊन मला तुमची चिंता सांगू शकतात. मनात कुठलाच किंतु ठेऊ नका. मोकळेपणाने बोला. तुम्हाला काळजी करण्याचं काही एक कारण नाही. "
असं बोलून एकनाथरावांनी प्रकाशरावांच्या मनावरचा ताण दूर केला.एकनाथरावांनी वातावरण हलकं केलं असलं तरीही प्रकाशरावांच्या चेहऱ्यावर तणाव अजूनही जाणवत होता. एकनाथरावांना नेमकं कसं सांगायचं याचं प्रकाशरावांना टेन्शन आलं होतं.
प्रकाशराव आदिराज आणि एकनाथरावांना उद्देशून म्हणाले...
" राग मानू नका एकनाथराव पण मला आदिराज आणि तुम्हाला काही सांगायचं आहे. आदिराज , हे लग्न होकारात किंवा नकारात बदलण्यापूर्वी काही गोष्टी मला तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत. तुमच्या मनात पुढे जाऊन कुठलाही किंतु नको म्हणूनच ही गोष्ट मी एकनाथरावांच्या समक्ष तुम्हाला विचारत आहे. "
"आदिराजच्या मनात कुठलाही किंतु नाहीये प्रकाशराव.. " एकनाथ प्रकाशरावांच्या बोलण्याला प्रतिउत्तर देत म्हणाले.
प्रकाशराव पुढे बोलू लागले...
" राग मानू नका एकनाथराव,पण काही गोष्टी मला आदिराजसोबत स्पष्टपणे बोलायच्या आहेत. आदिराज ,राग मानू नका पण आम्ही मध्यमवर्गीय माणसं आहोत. एकनाथरावांसारखं वैभव आमच्याकडे नाही.
" आम्हाला शक्य आहे आणि आमची ऐपत आहे तितकी तुमची हौसमौस आम्ही नक्कीच करू. आम्हाला देखील एकच मुलगी ,एकच जावई असणार आहे. फक्त आमच्या मिळकतीनुसारच हे सगळं करू हे मात्र तितकचं खरं आहे. "
" ही परिस्थितीची दरी उद्या उठून तुमच्या आणि आमच्यात दुरावा निर्माण करू नये यासाठी मी तुम्हाला आजच सगळ्या गोष्टीची जाणीव करून देत आहे. माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला समजला असेल. "
प्रकाशरावांच्या बोलण्यावर एकनाथराव म्हणाले..
" अगदीच बरोबर म्हणाले प्रकाशराव तुम्ही. पैसा हे फक्त आपल्या हवी ती गोष्ट मिळविण्याचे एक माध्यम आहे पण सगळी सुखं पैश्याने विकत घेताच येतात असं मात्र नक्कीच नाही. आमच्या आदिराजलाही ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. आम्हीही ह्या गोष्टीचा विचार केला आहे त्यामुळे तुम्ही अगदीच निश्चिन्त राहा. "
एकनाथरावांच्या बोलण्यामुळे प्रकाशराव आनंदी झाले. आदिराजने नजरेनेच एकनाथरावांच्या बोलण्यात होकार मिसळला. लग्नाची बोलणी ठरली. प्रकाशरावांना आर्थिक दृष्ट्या सोयीस्कर पडावं म्हणून एकनाथरावांनी साखरपुडा स्वतः करायचा ठरवला. साखरपुडा मुलाकडे तर लग्न मुलीकडे असं ठरलं. निर्मलाताई सोडून वर आणि वधू दोन्ही पक्षाकडची मंडळी खूपच खुश होती.
येत्या पंधरा दिवसात आदिराज आणि अवंतीचा साखरपुडा उरकून टाकूया असं एकनाथराव प्रकाशरावांना म्हणाले. त्यांनीही होकार दिला. साखरपुड्याची तारीख निश्चित झाली. दोन्ही परिवारांची साखरपुड्याच्या तयारीची लगबग सुरु झाली.
क्रमश:
अवंती आणि आदिराजचा साखरपुडा निर्विघ्न पार पडणार का ..? कसे असेल अवंती आणि आदिराजच्या नात्याचे भविष्य..? निर्मलाताई या साखरपुड्यात काही विघ्न तर निर्माण करणार नाही ना ..? अवंती आदिराजच्या श्रीमंत कुटुंबात ऍडजस्ट करू शकेल का ..? हे सगळं जाणून घ्यायची तुम्हालाही उत्सुकता असेलच ना ..? मग त्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला मात्र विसरू नका.
क्रमश :
प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो. सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞
✍©️ जया पाटील
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात, त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Pinterest/Google
.jpeg)
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box