#माझ्या_माहेरचा_मान_मलाच_जपायला_हवा_भाग_३
©️जया पाटील
भाग एक वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_54.html
भाग दोन वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_23.html
मागील भागात आपण पाहिलं की आदिराज आणि त्याचे कुटुंबीय अवंतीच्या घरी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाला जातात. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो. आदिराजला अवंती पसंत पडते. एकनाथरावांना सुद्धा अवंती सून म्हणून मान्य असते परंतु अवंतीच्या बाबांच्या साधारण परिस्थितीमुळे आदिराजच्या आईला मात्र ही सोयरीक फारशी रुचत नाही. त्या अवंतीला सून करून घेण्यास नकार देतात. मात्र आदिराज त्यांचं काही एक ऐकत नाही. एकनाथरावांच्या समजावण्यावर आदिराजच्या हट्टापुढे नमुन निर्मलाताई या संबंधाला होकार देतात.
दोघीही कुटुंबांच्या आपसी संमतीने ते आधी साखरपुडा करून काही दिवसांनी लग्न करायचं असा निर्णय घेतात. साखरपुडा मुलाकडे करायचा तर लग्न मुलीकडे असं परस्पर संमतीने ठरतं. येत्या पंधरा दिवसात साखरपुड्याची तारीख असल्यामुळे दोघीही कुटुंबांची लगबग सुरु होते. आता पुढे....
एकनाथराव निर्मलाताईंना अवंतीसाठी दागिन्यांची खरेदी करायला सांगतात. नाखुशीनेच निर्मलाताई खरेदीला सुरुवात करतात. आदिराजही त्यांच्या मध्ये मोठ्या उत्साहाने सामील होतो.
एकनाथराव आणि निर्मलाताई अवंतीसाठी एक महागातली छानशी कांजीवरम मोठ्या काठाची साडी घेतात. डार्क मोरपंखी रंग , त्यावर गोल्डन जरीच्या बुट्ट्या आणि गोल्डन नक्षीकाम असलेला भरजरी पदर. साडीतील ब्लॉउजपीस काढून त्या अवंतीला ब्लॉउज शिवण्यासाठी तिच्या घरी पाठवतात.
साडीसोबतच ते अवंतीसाठी सुंदरसा नाजूक राणीहार, नेकलेस, कानातले ,हिऱ्याची अंगठी, नथ , साखळ्या आणि सोन्याचे तोडे घेतात. दिखाव्यासाठी का होईना निर्मलाताई अवंतीसाठी सगळ्या मेकअपच्या वस्तूंची खरेदी करतात. साखरपुड्याच्या एक दिवस आधी त्या फळ - सुकामेवा या सगळ्या वस्तू आणून सुंदर नक्षीदार टोपल्यांमध्ये सजवून घेतात.
दोघीही कुटुंबीय आपल्या नातेवाईकांना द्यायच्या शगुनाची खरेदी करतात. सगळ्या पाहुण्यांची यादी तयार होते. आमंत्रण देऊन होतात.
प्रकाशरावांच्या घरी देखील खूप तयारी सुरु असते. अवंतीला एकनाथरावांनी पाठविलेली महागातली साडी पाहून प्रकाशरावांना मनोमन वाटतं की आपण घेतलेला साधारण ड्रेस आदिराजला आवडेल की नाही ? त्यामुळे ते एकनाथरावांच्या घरी जातात.
हळूच आपले दोन्ही हात जोडून आदिराज आणि एकनाथरावांना ते म्हणतात...
" व्याहीसाहेब , माझ्या लेकीसाठी इतकी सुंदर आणि उंची साडी पाठवली पण तसंच जावयांना घेणं मला जमेल का ? या बाबतीत थोडा सांशक आहे म्हणून मला शक्य तितके पैसे मी तुम्हाला देतो. त्यात तुमची भर टाकून तुम्ही छानसा ड्रेस घ्या. मी गरिबाने पै पै जमवून एक चैन आणि अंगठी केली आहेस तुम्हाला ती गोड मानून घ्या. "
हे बोलतांना प्रकाशराव खूप भावुक होतात. एकनाथराव त्यांना सावरतात. आदिराज त्यांना म्हणतो..
" बाबा , तुम्ही अवंतीचे बाबा असले तरीही मला माझ्या बाबांइतकाच तुमचाही आदर आहे. प्रत्येक गोष्ट पैश्यात तोलायची नसते. त्या वस्तू मागचे प्रेम आणि भावना महत्वाच्या असतात. तुमच्या त्या भावना अगदी खऱ्या आहेत. त्यामुळे मला हे पैसे नकोत. तुम्ही तुमच्या आवडीने जसा ड्रेस आणणार तोच मी घालणार. असे पैसे देऊन मला लाजवू नका. "
आदिराजच्या बोलण्यावर एकनाथराव देखील त्याच्या होकारात होकार मिळवतात.
" प्रकाशराव ,अहो मनात कुठलाच किंतु ठेऊ नका. प्रत्येक बाप आपल्या मुलांना सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मनातली चिंता सोडून द्या. "
एकनाथराव आणि आदिराजच्या बोलण्यामुळे प्रकाशरावांच्या मनातील किंतु दूर होतो. ते त्यांच्या परिस्थितीप्रमाणे आदिराजसाठी एक छानसा सूट ,चैन आणि अंगठी घेतात.
आदिराज एकनाथरावांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांना त्याचा साखरपुडा खूप धुमधड्याक्यात करायचा असतो त्यामुळे ते अगदीच जोरात तयारीला लागलेले असतात.
एकनाथरावांच्या मुलाचा साखरपुडा म्हणजे तो खास असणारच...! साखरपुड्याचा व्हेन्यू , तिथले डेकोरेशन,थीम्स,जेवणाचा आणि नाश्त्याचा मेनू,डेझर्ट या सगळ्या गोष्टी एकनाथराव स्वतः इव्हेंट प्लँनर्स सोबत चर्चा करून ठरवत असतात.
शेवटी तो दिवस येतो. प्रकाशराव अवंतीला घेऊन आणि एकनाथराव आदिराजला घेऊन आपापल्या कुटुंबियांसोबत ठरलेल्या वेळेस तयार होऊन साखरपुड्याच्या लोकेशनला पोहोचतात. एका मोठ्या रिसॉर्टमध्ये साखरपुडा पार पडणार असतो.
साखरपुड्याचा हॉल खूप सुंदर पद्धतीने सजविलेला असतो. दाराच्या बाहेरच खूप सुंदर आणि मोठी रांगोळी रेखाटलेली असते. स्टेजच्या आजूबाजूला सुंदर पाण्याचे कृत्रिम धबधबे डेकोरेशन साठी सजवलेले असतात. स्टेजच्या पाठीमागे फुलांच्या साहाय्याने मोराची आरास करण्यात आलेली असते. त्यावर अवंती आणि आदिराजचे दोन मोठे फोटो सजवून लावलेले असतात.
खूप सारे फोकस लाईट स्टेजची शोभा वाढवतात. झुंबरांची सजावट खूपच मनमोहक वाटत असते. सगळ्या हॉल मध्ये आणि बाजूच्या गार्डन मध्येही फुलमाळा आणि लायटिंग लावण्यात आलेली असते. सनईचे सुर वातावरण प्रसन्न बनवत असतात.
रिसॉर्टच्या गेटवरच एकनाथराव आणि निर्मलाताई पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभे असतात. शुभ्र पांढरा कुर्ता आणि पायजमा, त्यावर एक राखाडी जॅकेट, हातात उंची घड्याळ, बोटात दोन अंगठ्या, गळ्यात सोन्याची चैन असा त्यांचा पेहराव असतो. चेहऱ्यावरची पांढरी दाढी त्यांच्या व्यक्तिमत्वाला चांगलीच शोभा आणत असते.
त्यांच्या शेजारीच निर्मलाताई उभ्या असतात. मोरपंखी रंगाची महाराणी पैठणी साडी. त्यावर मोराची डिझाईन केलेलं कॉन्ट्रास्ट ब्लॉउज, कपाळावर मेडीयम साईझची टिकली,भांगात भरलेला सिंदूर, दोन्ही हातात साडीला मॅचिंग रंगाच्या बांगड्या, त्यातून हळूच डोकावणाऱ्या सोन्याच्या ठसठशीत पाटल्या आणि बांगड्या, गळ्यात सुंदरशी चंद्रमणी ठुशी, सुंदर राणीहार, ठसठशीत सोन्याचं मंगळसूत्र, हातात हिऱ्याची अंगठी असा पेहराव निर्मलाताईंच्या सौंदर्याची शोभा वाढवत असतो.
निर्मलाताईंच्या समोर सुलोचनाताई मात्र अगदी साध्या पोशाखात असतात. छानशी काठपदर साडी, गळ्यात नाजूक मंगळसूत्र, हातात दोन दोन काचेच्या बांगड्या आणि त्यात एक एक नाजूक सोन्याची बांगडी , डोक्यावर घेतलेला पदर त्यांच्या शालीनतेला दर्शवत असतो. निर्मलाताई सुलोचनाताईंकडे पाहुन एक जळजळीत कटाक्ष टाकतात. तेवढ्यात एकनाथराव निर्मलाताईंना वधूपक्षाचे स्वागत करण्यासाठी बोलावतात. नाईलाजाने त्या स्वागत समारंभात सहभागी होतात.
गेटवरच एकनाथराव आणि निर्मलाताई प्रत्येक पाहुण्यांचं गुलाबाचं फुल देऊन स्वागत करतात. प्रकाशराव जेव्हा अवंतीला घेऊन रिसॉर्टला पोहोचतात. त्यावेळी मुलाकडचे आणि मुलीकडचे हा फरक न करता एकनाथराव त्यांचंही आनंदाने स्वागत करतात. सनई ,चौघड्याच्या सुरांनी अवंतीचं स्वागत करण्यात येतं. अवंतीच्या स्वागतासाठी पायघड्या टाकण्यात आलेल्या असतात. अवंती आणि तिच्या कुटुंबियांवर फुलांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत करण्यात येतं. आदिराजला वाईट वाटू नये म्हणून नाखुशीनेच का होईना पंचारती घेऊन निर्मलाताई दारात उभ्या असतात. आरती ओवाळून त्या अवंतीचे होणारी वधू म्हणून स्वागत करतात.
अवंती घरूनच तयार होऊन आलेली असते पण तिच्या साधारण राहणीमानामुळे आपली शोभा होऊ नये म्हणून निर्मलाताई तिच्यासाठी खास मेकअप आर्टिस्ट बोलावतात. त्या अवंतीला तयार होण्यासाठी रूम मध्ये पाठवतात. पाटावर नेसायची पहिली साडी आणि दागदागिने तिच्या सोबत देतात.अवंती तयार होण्यासाठी रूममध्ये जाते.
आलेल्या पाहुण्यांची तेथील मदतनीस काळजी घेतात. अवंती तयार होऊन स्टेजवर येते. मरून रंगाच्या पैठणीत ती खूपच खुलून दिसत असते. मरून रेडिश पैठणी , त्यावर बुट्ट्यांची रेलचेल , सुबक नारळी काठ ,पिसारा फुलविलेल्या मोरांची नक्षी. सगळंच कसं सुरेख जमून येतं.
गळ्यातील चिंचपेटी, लांब तन्मणी, कानात सुंदर इअरकफ, दंडावर सुंदरसे खडे आणि मोतीचे बाजूबंद, केसांचा जुडा आणि कपाळावर पाडलेल्या भांगातून सजणारी नाजुकशी बिंदी, नाकाची शोभा वाढविणारी नथ, हातात साडीला मॅचिंग बांगड्या आणि मोत्याचे तोडे हा सगळा पेहराव अवंतीचे सौंदर्य आणखीनच खुलवतात.
मुळातच तो गोरा रंग आणि त्यावर चढलेला दागिन्यांचा साज! विलक्षण सौंदर्य ते, नक्षत्रासारखे अनुपम, कोणालाही भुरळ पाडेल असे! अगदी अप्सरेसोबत तुलना व्हावी अशीच असते अवंती, अगदी लावण्यवतीच जणू !
अवंती पाटावर येऊन बसते. एकनाथराव आणि निर्मलाताई तिची गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे पूजा करतात. घरची होणारी लक्ष्मी म्हणून तिचं पाद्यपूजन केलं जातं. तिच्यासाठी घेतलेला सगळा शगुन निर्मलाताई तिच्या हातात देतात. मुलाकडच्या पाच सवाष्णी अवंतीची ओटी भरतात. सजविलेला साखरेचा पुडा तिच्या हातात देतात. सासरची साडी आणि दागिने परिधान करण्यासाठी अवंती पुन्हा तिच्या रूम मध्ये जाते.
त्यानंतर आदिराज तिथे येतो. पर्ल रंगाचा कुडता , रेडिश मरून रंगाची चुडीदार , त्यावर सुंदरसा ब्रोच , पायात कोल्हापुरी चप्पल या सगळ्या पेहरावात आदिराज अगदीच राजकुमार भासत असतो. तो देखील विडा घेऊन पाटावर येऊन बसतो. प्रकाशराव आणि सुलोचनाताई त्याची देखील गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे पुजा आणि पाद्यपूजन करतात. त्याच्यासाठी घेतलेले कपडे त्याच्या हातात देतात. मुलीकडच्या पाच सवाष्णी आदिराजचं औक्षण करतात आणि तो पुन्हा तयार होण्यासाठी निघून जातो.
अवंती तिचा सासरचा पेहराव म्हणजेच निर्मलाताईंनी घेतलेली कांजीवरम साडी, नेकलेस, राणीहार,नथ,सोन्याचे तोडे, कानातले, साखळ्या सगळं काही परिधान करून हॉल मध्ये येते. या सगळ्यात देखील ती खूपच सुंदर दिसत असते. आदिराजची श्रीमंती, त्याचा परिवार आणि त्यांचा नम्रपणा पाहून मंडपातील प्रत्येक जण मनोमन फक्त हेच बोलत असतो..
"अवंती, खरंच खूप नशीबवान आहे. तिला अगदी योग्य जोडीदार आणि उत्तम परिवार मिळाला आहे. "
अवंतीच्या मागोमाग आदिराज देखील तयार होऊन येतो. राखाडी कलरचा सूट, त्याला साजेसे शूज, हातात छान असे घड्याळ, डोक्यावर टोपी अश्या पेहरावात तो अगदीच राजबिंडा दिसत असतो. त्याची विनम्रता त्याच्या वागण्यातून , बोलण्यातून जाणवते. आलेली पाहूणे मंडळी इतका सुशील आणि हुशार जावई मिळाल्याबद्दल प्रकाशरावांचे अभिनंदन करतात. आपल्या लेकीचं सुख आणि तिचा जोडीदार पाहून प्रकाशरावांचा उर गर्वाने फुलून येतो.
अंगठ्यांची पूजा करून गुरुजी आदिराज आणि अवंतीच्या हातात अंगठ्या देतात. सर्वप्रथम अवंती आदिराजच्या हातात अंगठी घालते. तिचा तो पहिला स्पर्श आदिराजला मोहवून जातो. आदिराज आपल्या गुडघ्यांवर बसतो आणि अवंतीचा हात हातात घेऊन तिच्या हातात अंगठी घालतो. सगळ्यांना त्याचा हा रोमँटिक अंदाज खूप भावतो. अवंतीही मनापासून हसते.
एकनाथराव आणि प्रकाशराव दोघंही एकमेकांना नारळ देत व्याहीभेट घेतात.आलेल्या पाहुणे मंडळीला मानाचे टोपी रुमाल देण्यात येतात.
साखरपुड्याच्या कार्यक्रम अगदीच थाटामाटात पार पडतो. सगळेच खूप खुश असतात. आता लवकरच लग्नाची धावपळ सुरु होणार असते.. साखरपुड्याच्या वेळी झालेल्या भेटीत आदिराज अवंतीचा फोन नंबर घेतो. निर्मलाताईंना मात्र आदिराजने अवंतीचा नंबर घेतलेला आवडत नाही.
" अरे आताशी साखरपुडा झाला आहे. लग्न झालं नाही तुमचं. त्यामुळे हे फोनवर बोलणं वगैरे नको इतक्यात. तू मुलगा आहेस पण अवंती मुलगी आहे. तिच्या बाबांना नाही आवडणार हे सगळं. "
निर्मलाताई आदिराजला सांगतात. खरं तर त्यांना आदिराजला अवंतीपासून दूर ठेवायचं असतं म्हणूनच प्रकाशरावांना अवंतीसोबत आदिराजचे लग्नाआधी बोलणं आवडणार नाही असं त्या आदिराजला सांगतात.
क्रमश :
आदिराज आणि अवंती एकमेकांसोबत बोलू शकतील का..?निर्मलाताईंच्या वागण्यामागचे गुपित आदिराजला समजू शकेल का..? काय असेल आदिराज आणि अवंतीच्या नात्याचं भविष्य ..? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी याच कथेचा पुढचा भाग वाचायला मात्र विसरू नका.
प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो. सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞
✍©️ जया पाटील
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात, त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Pinterest/Google
.jpeg)
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box