माझ्या माहेरचा मान मलाच जपायला हवा भाग ४


#माझ्या_माहेरचा_मान_मलाच_जपायला_हवा_भाग_४

©️जया पाटील

भाग एक वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक  करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_54.html

भाग दोन वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_23.html

भाग तीन वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/03/blog-post_24.html


मागील भागात आपण पाहिलं देशमुख आणि मोहिते दोघीही कुटुंबाच्या परस्परसंमतीने आदिराज आणि अवंतीचा साखरपुडा धामधुमीत पार पडतो. सगळेच खूप आनंदी असतात. जुलै महिन्याच्या शेवटी त्यांचा साखरपुडा पार पडतो त्यामुळे तुळशीविवाह झाल्याशिवाय विवाह मुहूर्त नसतात. 

कार्तिकी एकादशी झाली की लगेचच काही दिवसात लग्नाचा मुहूर्त काढून विवाहसोहळा आटोपून घेऊ असं दोघांच्याही घरातील जेष्ठव्यक्ती ठरवतात. साखरपुडा होण्याच्या आधी अवंती आणि आदिराजचं फारसं बोलणं झालेलं नसतं. त्यामुळे आदिराज साखरपुड्याच्या दिवशी अवंतीचा नंबर घेतो. आदिराजच्या आईला मात्र आदिराजचं अवंतीसोबत बोलणं होऊ द्यायचं नसतं कारण सामान्य कुटुंबातली मुलगी अवंती सून म्हणून त्यांना फारशी रुचत नाही. आता पुढे...  

साखरपुड्याचा कार्यक्रम अगदीच थाटामाटात पार पडतो. सगळेच खूप खुश असतात. आता लवकरच लग्नाची धावपळ सुरु होणार असते. आदिराजचं कांदेपोह्यांच्या कार्यक्रमानंतर अवंतीसोबत एकदाही बोलणं झालेलं नसतं. त्यामुळे त्याला अवंतीला जाणून घ्यायचं असतं. तिच्या आवडीनिवडी त्याला समजून घ्यायच्या असतात. त्यामुळे साखरपुड्याच्या वेळी झालेल्या भेटीत आदिराज अवंतीचा फोननंबर घेतो. हे निर्मलाताई पाहतात. त्यावेळी त्या आदिराजला म्हणतात..  

" अरे आताशी साखरपुडा झाला आहे. लग्न झालं नाही तुमचं. त्यामुळे हे फोनवर बोलणं वगैरे नको इतक्यात. तू मुलगा आहेस पण अवंती मुलगी आहे. तिच्या बाबांना नाही आवडणार हे सगळं. मी ऐकलं आहे की प्रकाशरावांना ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाही. त्यामुळे तुझ्या अश्या वागण्यामुळे अवंतीला बोल खावा लागेल कारण प्रकाशराव तुला तर काहीच बोलू शकणार नाही. त्यामुळे जे काही वागशील ते अगदी काळजीपूर्वक वाग. "  

निर्मलाताईंच्या बोलण्यामुळे आदिराजच्या मनात गोंधळ उडतो. अवंतीसोबत बोलायचं की नाही..? असं प्रश्नचिन्ह आदिराजच्या मनात निर्माण होतं. निर्मलाताईंना आदिराजला अवंतीपासून दूर ठेवायचं असतं म्हणूनच प्रकाशरावांना अवंतीसोबत आदिराजचे लग्नाआधी बोलणे आवडणार नाही असं त्या आदिराजला सांगतात.

आदिराजसोबत बोलं झाल्यावर त्या अवंतीला जाऊन भेटतात. निर्मलाताई अवंतीला अगदी प्रेमाने म्हणतात...

" अवंती बाळा ,मला तुला काही सांगायचं आहे. आदिराजने तुझा फोन नंबर घेतला आहे खरं पण प्लीज त्याच्यासोबत लग्न होईपर्यंत थोडं कमीच बोल. म्हणजे माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नको पण आदिराजचे बाबा जुन्या चालीरीतींना मानतात. त्यामुळे लग्नाआधी तुम्ही दोघांनीही जास्त बोललेलं नाही आवडणार त्यांना. तसेच तुझ्या बाबांना पण नाही आवडणार या गोष्टी. पूर्वीच्या काही गोष्टी खरंच बरोबरच होत्या. मुलं खूप उथळ असतात त्यामुळे मुलींनी सांभाळून असायला हवं. हे सगळं मी तुला माझी होणारी सून म्हणून नव्हे तर लेक म्हणून सांगत आहे. बाकी तुझी मर्जी...."

अवंतीला गोंधळात टाकून निर्मलाताई निघून गेल्या. अवंतीलाही त्यांचं बोलणं योग्य वाटतं त्यामुळे सध्या तरी आदिराजसोबत जास्त बोलायचं नाही असं अवंती ठरवते. 

साखरपुडा पार पडतो. घरी गेल्यावर आदिराज अवंती सोबत बोलू की नको या विचारात असतो. त्यावेळी तिथे एकनाथराव येतात. आदिराजला गोंधळलेले पाहून एकनाथराव त्याला विचारतात..

" आदिराज , कसल्या गोंधळात पडला आहेस सध्या ..? तुला मनापासून आवडलेल्या मुलीसोबत आजच तुझा साखरपुडा झाला आहे, आता सगळं काही आलबेल आहे. तरीही तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन आहे..का ..? काही प्रॉब्लेम आहे का..? "

" टेन्शन नाही बाबा , पण मनात एक प्रश्न आहे. मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमानंतर मी अवंतीला आजच भेटलो. लग्नालाही काही दिवस वेळ आहे पण मला तिच्या आवडी निवडी जाणून घ्यायच्या आहेत. तिच्यासोबत बोलण्यासाठी मी तिचा फोननंबर घेतला पण तिच्या घरच्यांना तिचं लग्नाआधी माझ्यासोबत बोलणं आवडेल की नाही..?"

" आदिराज , किती हळवा आहेस तू. तुम्ही एकमेकांना जाणून घेणार तेव्हाच संसार करणं सोपं होईल तुम्हाला. त्यामुळे तू अवंतीसोबत नक्की बोल. कधीतरी तिला भेट फक्त एक लक्षात ठेव कुठल्याच गोष्टीचा अतिरेक होता कामा नये. आपल्या मर्यादा आपण नेहमी सांभाळायला हव्या. माझ्या बोलण्याचा मतितार्थ तुला समजलाच असेल असं मी समजतो. " 

एवढं बोलून एकनाथराव तिथून निघून जातात. त्यांच्या समजावण्यामुळे आदिराजचा मनातला गोंधळ मात्र दूर होतो.   

त्या रात्री आदिराज अवंतीला मेसेज करतो. 

" हाय अवंती..आदिराज हीयर.." 

अवंती मेसेज वाचते पण त्यावर ती काहीच उत्तर देत नाही. आदिराजला थोडं विचित्र वाटतं पण अजून सगळं नवीन आहे. त्यामुळे अवंतीला अवघड होत असेल म्हणून तो या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. दोन दिवस उलटून जातात.

आदिराज पुन्हा एकदा अवंतीला मेसेज करतो. 

"हाय अवंती  , हावू आर यु...? "

तो पण मेसेज ती वाचते पण आदिराजला काहीच रिप्लाय देत नाही. आदिराजला खूप विचित्र वाटते. तो पुन्हा अवंतीला मेसेज करतो .

" आय कॅन अनडस्टॅंड ... तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी दोघांसाठीही हे नातं नवीन आहे. त्यामुळे माझ्यासोबत बोलतांना तुला थोडं अवघडल्यासारखं वाटत असेल पण आपल्या आयुष्याची एक नवीन सुंदर सुरुवात होणार आहे. मग त्यासाठी आपल्या दोघांनाही एकमेकांना समजुन घ्यायला हवं ना आणि हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण एकमेकांसोबत आपल्या फीलिंग्स , आपले विचार शेयर करू. त्यासाठी आपण बोलायला तर हवंच ना ...प्लीज माझ्या या सांगण्याचा नक्की विचार करशील. "  

हा मेसेज देखील अवंतीने वाचते पण नो रिप्लाय.  खरं तर अवंतीला पण आदिराजसोबत बोलायचं असतं पण निर्मलाताईंच्या सांगण्यामुळे ती गप्प असते. आदिराजच्या मेसेज बद्दल अवंती सुलोचनाताईंना सांगते. त्यावेळेस सुलोचनाताई तिला सांगतात.

"आदिराजसोबत मर्यादा ठेवून बोल. हळूहळू एकमेकांना जाणून घ्या. संयम ठेव पण त्याला टाळू मात्र नकोस. त्यामुळे तो तुला दुरावेल.न बोलल्यामुळे तुमच्यात गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे हळूहळू त्याच्यासोबत बोल."  

असा सल्ला त्या अवंतीला देतात. आईच्या समजावण्यामुळे अवंती आदिराजला रिप्लाय करायचा ठरवते पण मन अजूनही गोंधळात असतं. अवंती आपल्या मेसेजेसला उत्तर देत नाही म्हणून आदिराज खूप टेन्शन मध्ये येतो. तितक्यात अवंतीचा रिप्लाय येतो. 

"आय एम फाईन ..थँक्यू .."  

तिचा मेसेज पाहुन आदिराजच्या जीवात जीव येतो. हळूहळू अवंती मोकळेपणाने आपल्यासोबत नक्कीच बोलेन अशी आदिराज  स्वतःची समजूत घालतो. अवंतीही तुटक तुटक का असेना आदिराजसोबत बोलू लागते. फोनवर ती फारशी बोलत नाही. काम आहे , ऑफिसचा कॉल आहे असं सांगुन ती आदिराजला टाळते. त्यामुळे फक्त मेसेज आणि कॉल मधून आदिराज ला तिच्या मनाचा अंदाज येत नाही म्हणूनच तो अवंतीला भेटायचं ठरवतो.  

त्याआधी तो प्रकाशराव आणि एकनाथरावांकडून  अवंतीला भेटण्याची परवानगी मागतो. प्रकाशराव लगेचच होकार देतात कारण आदिराजचा प्रामाणिकपणा आणि विनम्रता त्यांना भावते.निर्मलाताईंना याबाबतीत काहीच माहिती नसतं. दोघीकडच्या जेष्ठाकडून परवानगी मिळाल्यावर तो अवंतीला भेटण्याविषयी कळवतो. मात्र त्यावर अवंती निर्मलाताईंच्या बोलण्यामुळे घाबरून आदिराजला स्पष्ट नकार देते. आदिराजच्या दोनदा-तीनदा समजावल्यावर अवंतीचा नकार होकारात बदलतो. रविवारी सायंकाळी भेटायचं ठरतं.  

ऑफिस सुटल्यावर आपण छत्रपती चौकात भेटूया असं आदिराज अवंतीला कळवतो. अवंतीही होकार कळवते. ऑफिस सुटल्यावर ते ठरलेल्या वेळेस ठरलेल्या ठिकाणी येतात. अवंतीच्या ऑफिसचा कॅब ड्राइवर तिला छत्रपती चौकात उतरवतो. तिथून अवंती आदिराज सोबत जाणार असते. आदिराज देखील वेळेवर पोहोचतो. 

"  हाय अवंती , जवळच्याच आकाश कॅफेला जाऊया का ..? म्हणजे फार उशीर होणार नाही आपल्याला आणि निवांत गप्पापण करता येतील." आदिराज अवंतीला म्हणतो.

" ओके.. चालेल " अवंती

दोघेही कॅफे मध्ये पोहोचतात. आदिराज अवंतीला तिच्या आवडीची कॉफी दोघांसाठीही ऑर्डर करायला सांगतो. दोघांचीही पहिलीचं भेट असते त्यामुळे एकमेकांसोबत नेमकं काय बोलायचं दोघांनाही सुचत नाही. 

अवंती तिच्या हाताच्या बोटांशी खेळत खाली मान घालून बसलेली असते. तिचा नर्वसनेस आदिराजच्या लक्षात येतो. आदिराजची देखील सेम फीलिंग असते. पण असं गप्प बसून कसं चालेल म्हणून तो बोलायला सुरुवात करतो.

" अवंती , गेली कित्येक दिवस आपण सोबत आहोत. एंगेज आहोत पण अजूनही आपल्या दोघांनाही एकमेकांच्या आवडीनिवडी माहित नाही. मला सांगशील तुझ्या हॉबीज काय आहेत..? तुला नेमकं काय आवडतं..?तुझ्याबद्दल सांग. ..मला ऐकायला आवडेल .."  

आदिराजने सुरुवात केल्यावर अवंती बोलू लागते. 

" मला मूवी पाहण्याची आणि फिरायची खूप आवड आहे. ट्रेकिंग करायला पण मला खूप जास्त आवडतं. लहानपणी जेव्हा आम्ही सगळे फिरायला जायचो तेव्हा मला प्रत्येक ऍडव्हेंचर करायचं असायचं पण तू अजून लहान आहेस म्हणून मला बाबा नेहमीच काही करू देत नसतं.

" तुला माहिती आहे , दोन वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही मालवणला फिरायला गेलो होते त्यावेळेस स्कुबा डायविंगसाठी जेव्हा मी समुद्राच्या आत गेले आणि मला पाण्याबाहेर यायला जरा उशीर झाला, तेव्हा तर आईने रडून रडून गोंधळ घातला होता. तिला समजावतांना बाबा आणि निखिल दोघांच्याही नाकी नऊ आले होते. अगदीच पॅरासिलिंगच्या वेळेसही माझ्या काळजीने आईला चक्कर आली होती. आईला या सगळ्या गोष्टींची खूप भीती वाटते पण मला मात्र खूप आवडतं हेच सगळं.."  

"अरे वा...तू इतकी धाडसी असशील असं वाटत नव्हतं मला अवंती. छान! मला पण आवडतात नवनवीन गोष्टी एक्सप्लोर करायला. त्यातून नवीन काही शिकायला. तू माझा बेस्ट ट्रॅव्हलिंग पार्टनर असशील हे मात्र खरं. हो की नाही ...? दे टाळी ..." 

आदिराजने टाळी देण्यासाठी अवंतीसमोर आपला हात पुढे केला. अवंतीने त्याच्या हातावर टाळी दिली. अभिनवला झालेला हा तिचा दुसरा स्पर्श होता. त्यानंतर मात्र अचानक तिने आपला हात पटकन मागे घेतला. लाजली असेल आदिराजला मनातून वाटून गेलं.  

आदिराज आणि अवंती दोघांच्याही बऱ्याच गप्पा रंगल्या. अवंतीने तिचे आवडते डेस्टिनेशन, तिचे हॉबी, तिचे मित्रमैत्रिणी , याबाबतीत सांगितलं. अवंती एकसारखी बोलत होती. 

आदिराजने हळूच विषय चेंज करायचा म्हणून ऑफिसच्या कामाचा विषय काढला. तो स्वतः कुठल्या टेक्नॉलॉजीवर काम करतो त्याबद्दल माहिती सांगितली. अवंतीच्या कामाबद्दल जाणून घेतलं. अवंतीचा विविध क्षेत्रातील अभ्यास आणि तिचं नॉलेज पाहून आदिराज खूप इंप्रेस झाला. त्याने अवंती कडून त्या नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा व्यक्त केली. अवंतीने देखील मोठ्या मनाने होकार दिला.

गप्पांमध्ये बराच वेळ निघून गेला. आदिराजने आता निघूया म्हणून अवंतीला सांगितलं. अवंतीला घरी सोडून आदिराज त्याच्या घरी गेला. आजच्या भेटीवरून हळूहळू का असेना अवंती मोकळी बोलेल असा आदिराजला विश्वास वाटला. त्याने याबद्दल एकनाथरावांना आणि  निर्मलाताईंना देखील सांगितलं. अवंती नवीन आहे. त्यामुळे तुमच्या नात्याला वेळ दे ,असा एकनाथरावांनी त्याला सल्ला दिला. आदिराजला अवंतीपासून दूर ठेवण्याचा आपला प्लॅन फसलेला पाहून मात्र निर्मलाताईंचा तिळपापड झाला.

अवंती आणि आदिराजला एकमेकांपासून दूर करण्यात निर्मलाताई यशस्वी होतील का..? अवंती आणि आदिराजचा विवाहसोहळा निर्विघ्न पार पडेल का?काय असेल अवंती आणि आदिराजच्या नात्याचं भविष्य.? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी याच कथेचा पुढचा भाग वाचायला मात्र विसरू नका.

क्रमश :

प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो.  सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞

✍©️ जया पाटील

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात, त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 


फोटो साभार - Pinterest/Google 





Post a Comment

0 Comments