आणि पाडवा गोड झाला भाग २

आणि पाडवा गोड झाला भाग २

लेखिका - Velvet Kavisha ✍️


भाग १ 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/11/blog-post.html

मागील भागात आपण पाहिलं - -

स्वप्नीलला कळलं होतं की, गौरी मुंबईला यायला निघालीय. पण गौरीला ते माहित नव्हतं. ती येतेय म्हणून स्वप्नीलला खुप आनंद झाला होता. त्याच आनंदात तो गाडी घेऊन निघाला. 

आता पुढे......

गौरी पाऊण तासात पोचेल. पाच मिनिटे तर इथेच गेलीत. पंधरा मिनिटे घरी पोचायला लागतील अजून.  स्वप्नीलरावं काहीतरी करा आता, मॅडम तुमच्यासाठी येताहेत एवढ्या दूर! 

नाही म्हटलं तरी उशीरच झाला पोचायला.  पंधरा वीस मिनिटांत येईल गौरी. सिक्युरिटी गार्डकडे चावी देऊन गाडी पार्क करायला सांगितली आणि स्वप्नील लिफ्टने वर आला. सोबत कोणीतरी एक हेल्पर होता. 

---------------------------

गौरी लगबगीने वर आली. "किती उशीर झाला यार! साडेबारा एकला पोचायचं तर पार दोन वाजले." ती  स्वतःवर आणि शिवशाहीवर प्रचंड चिडली होती. एकतर स्वप्नीलला सांगितलं नव्हतं ती येणार म्हणून. ऑफिसच्या वॉचमन काकांकडून माहिती काढून घेतली होती म्हणून माहिती होतं म्हणा की तो काही एवढ्या लवकर गावी जायला निघणार नाही ते.. पण काही जुगाड करून निघाला असता तर चुकामूक नसती का झाली?"

मनातल्या मनात विचार करत ती घरापाशी येऊन पोचली. पर्समधून किल्ली काढून दरवाजा उघडला. आत येण्यासाठी पाऊल टाकलं आणि हबकलीच..

पायाखाली फुलांच्या पाकळ्यांचा सडा होता. 

"आईये मेमसाब"  तिच्या अंगावर पाकळ्या उडवत स्वप्नीलने तिचं स्वागत केलं. 

"अरे!!" तिला आश्चर्य वाटलं होतं फार. 

"कुछ मत बोलिये.. तशरीफ़ लाईये, ये बंदा आपके खिदमत में हाजीर है।" स्वप्नीलने स्मित हास्य करत म्हटलं.

तिच्याकडून पर्स घेऊन ती टेबलवर ठेवली आणि तिची बोटं हातात पकडून चालू लागला.

तिला कळत नव्हतं, काय बोलावं ते! तिने त्या पाकळ्यावरून एक एक पाऊल टाकत चालायचं ठरवलं. खरंतर मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पोटात फुलपाखरं बागडत होती. सगळं आतल्या आत दाबून धरत, पाकळ्यांच्या वाटेवर चालत ती बाथरुमपाशी येऊन पोचली.

स्वप्नीलने दरवाजा उघडला. बाथरुमच्या मोकळ्या जागेत एक पाट मांडला होता. त्याच्या बाजूला फुलांच्या पाकळ्या पसरल्या होत्या. दोन वाट्या दिसत होत्या. एका वाटीत उटणं आणि दुसऱ्या वाटीत सुगंधी तेल. 

तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्याने डोळ्यानेच तिला पाटावर बसायला सांगितलं. ती भारावल्यासारखी बसली. तो पुढ्यात येऊन गुडघे टेकून बसला. तिचा हात हातात घेतला, बोटांनी तेल घेऊन ते हळुवार तिच्या हातावर लावलं.

त्यावर उटणं लावलं. साडी गुडघ्यापर्यंत वर घेऊन पायांना ही तेल उटणं लावून झालं. 

गात्र गोठल्यासारखी तिची अवस्था झाली होती. तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं. तसं तर बाथटबमध्ये कितीतरी वेळा एकत्र बाथ घेतला होता. तरीही आजचा स्वप्नील काही वेगळाच होता.

ती त्याच्याकडे एकटक पाहत होती. तोवर तो झुकून कानापाशी आला. "अभ्यंगस्नान करताय ना मॅडम?" म्हणाला. 

तिने होकारार्थी मान हलवली. 

त्याने हलकेच पदराची पीन काढून बाजूला ठेवली. पदर काढून पोटाजवळ ठेवला.  बादलीतलं गुलाबाच्या पाकळ्या, गुलाबजल आणि सुगंधी अत्तर घातलेलं मगभर गरम पाणी तिच्या उजव्या खांद्यावर ओतलं.

शहारा उठला अंगावर. "मी करूं आंघोळ..?" तिने टाळूला चिकटलेली जीभ कशीबशी जाग्यावर आणत विचारलं. 

"हं..." बोटांचं उटणं त्याने तिच्या दोन्ही गालाला लावलं आणि दरवाजा ओढून बाहेर आला. 

ती तशीच पुतळ्यासारखी बसलेली. आज सगळंच अनाकलनीय होतं तिच्यासाठी.

एरवी ती उटणं लावायची त्याला, दिवाळीच्या पहिल्या दिवशी. स्वप्नील पुरुषार्थ मिरवणारा नसला किंवा तिच्याशी फ्रेंडली वागत असला तरी हे असं काही करेल असं तिला अजिबात वाटलं नव्हतं. त्याच्या वागण्यात प्रेम दिसतंय, वासना नाही. नाहीतर अशा ह्या एकांतात साहेब सुटलेच असते. 

ती स्वतःच्या विचारात खुदकन हसली. बादलीतलं पाणी कधीच संपलं होतं. तिने शॉवर ऑन केला आणि आंघोळ उरकली. 

"अरे, आपण तर तसेच आत आलोय. कपडे कुठेत?" तिने डोक्यावर हात मारला.

"गौरी, तुझे कपडे!" स्वप्नीलने दरवाजावर टकटक करत गौरीला आवाज दिला. तिने दरवाजाच्या फटीतून हात बाहेर काढून कपडे आत घेतले. 

तिच्या मावशीने दिलेली, तिला आवडणारी जरदोशी वर्क केलेली "नेव्ही ब्ल्यू" साडी. तिने कपाटात मॅचिंग परकर ब्लाऊजसहीत ठेवलेली. स्वप्नीलने आता टॉवेलसोबत तीच आणून दिली होती. 

"स्वप्नील, केसांचा पंचा देतोस का जरा?" तिने विचारलं आणि त्याने आणून दिला. 

तिने केस पुसून पंचात गुंडाळले. टॉवेल अंगभर गुंडाळून साडी खांद्यावर टाकून, परकर ब्लाऊज हातात घेऊन बाहेर आली. स्वप्नील पण किती वेडा.. ओल्या जागेत ती साडी कशी नेसणार होती?. 

बेडरूममध्ये जात ती छान तयार झाली. 

बाहेर आली तर स्वप्नीलने एक पाट मांडला होता. पुन्हा फुलांच्या पाकळ्यांची रांगोळी बनवली होती. एका ताटात निरांजन, सुपारी, हळदीकुंकूचा करंडा, एका वाटीत मिठाई, बाजुला सोन्याची अंगठी आणि तांदूळ. गौरी ते पाहून हैराण झाली. एवढ्या लांबून ह्याला ओवाळयला आले तर ह्यानेच तयारी केलीय स्वतःच्या ओवाळणीची. काय तरी उत्साह..🤦‍♀️

"अरे.... मी केली असती ना सगळी तयारी?" तिने म्हटलं.

"तू जरा शांत राहशील?" त्याने तिची बोटं हातात धरत म्हटलं. 

"ये अशी, इकडे बस.." त्याने तिला पाटाजवळ आणत पाटावर बसायला सांगितलं.

"अरे..." 

"श् ऽ श्ऽ  श् ऽ ऽ ऽ ऽ" 

ती शांतपणे पाटावर बसली. त्याने हळदकुंकू तिच्या कपाळावर लावलं. तांदूळ डोक्यावर टाकले. अंगठी पाच वेळा गोल फिरवली. तिला ओवाळलं आणि ताट खाली ठेवून मिठाईचा तुकडा तिच्या तोंडाजवळ नेला. 

रागावून गेली होती ती! गावी गेल्यापासून मुलांकडून खुशाली घेतली त्यांची पण स्वतः फोन केला नव्हता. त्याच्याशी बोलली ही नव्हती. आणि तो वेडा तिच्यावर जीव उधळून टाकत होता. आल्यापासून भारावलेली ती आनंदाने वेडी झाली. आनंदाचा एक हुंदका गळ्याशी आला आणि ओठातून बाहेर आला. डोळे पाणावले. त्याने मिठाईचा तुकडा तिला भरवला. तिचे डोळे डबडबले होते.

"अगं वेडाबाई, रडतेस का? माझं चुकलं का काही?  एवढ्या लांबून आलीस माझ्यासाठी माझ्यावरचा राग विसरून. दरवर्षी तू ओवाळतेस ना पाडव्याला तेव्हा मी रडतो का असं?" त्याने तिचा चेहरा हातात घेत विचारलं. खरंतर स्वप्नीलला काय बोलावं काही कळत नव्हतं. 

"नाही रे.. वेड्या आनंदाश्रू आहेत ते! तुला माहिती नाही मी किती लकी आहे. पाडव्याला नवऱ्याकडून उटणं लावून, ओवाळून घेणारी मी पहिली बायको असेन. तू पाडव्याचा इव्हेंट केलास अगदी. तू ओवाळलंस पण मी गिफ्ट काहीच आणलं नाही. सॉरी. " तिने त्याच्या डोळ्यात पाहत म्हटलं. 

"माझं गिफ्ट कसं वसूल करायचं ते माहिती आहे मला..." त्याने डोळा मारत म्हटलं.

"चावटपणा पूरे! चल गुपचूप तयार हो, ओवाळू दे तुला. श्रीवर्धनला जायचंय. तीन वाजलेत. निघेपर्यंत अजून एक तास जाईल."  तिने त्याच्या दंडाला धरून वर उठवत म्हटलं. 

"चल लवकर, उटणं लावून देते." गौरी बाथरुममध्ये जाता जाता म्हणाली.

"मी आता आंघोळ करूं?" स्वप्नीलने विचारलं. 

"मग काय घाणेरड्या तुला तसाच ओवाळू? पहाटे लवकर गेलेलास ना? आंघोळ केलीस त्याला ही दहा तास उलटून गेलेत.." गौरीने हसत म्हटलं.

"म्हणून आल्यापासून मिठीत आली नाहीस होय?" 

"वेळ तरी दिलास का? उगाच काहीतरी बोलू नकोस." तिने त्याच्या दंडावर चिमटा काढत म्हटलं. 

"आई ग्गंऽ मेलो मेलो..." 

"चल्. बस पटकन पाटावर..." गौरीने त्याला बसायला सांगितलं आणि तेल लावून घेतलं.  उटण्याची वाटी हातात घेऊन पूर्ण अंगाला लावलं. चूळ मारायली पसाभर पाणी दिलं आणि उरलेलं पाणी त्याच्या खांद्यावर ओतलं. 

"करशील ना आता आंघोळ?" गौरीने विचारलं. 

"नाही ऽ ऽ ऽ " त्याने तिच्या अंगावर पाणी उडवत म्हटलं. 

"कर गुपचूप आंघोळ, कामं वाढवलीस माझी. मी जाते. मला आवरायचं आहे. तू ये आवरून. कपडे ठेवते तुझे बाहेर. साडी भिजवून ठेवलीस सगळी. बदलून येते." गौरी बाहेर जायला वळली, तेवढ्यात स्वप्नीलने तिचा हात पकडला.  उभा राहत तिला मिठीत घेतलं. 

"आय लव्ह यू..." त्याने कानात म्हटलं तिच्या. 

"स्वप्न, सोड ना प्लीज. कसंबसं आवरलंय आल्यापासून स्वतःला." गौरीच्या तोंडून कितीतरी दिवसांनी त्याने "स्वप्न" नाव ऐकलं होतं. 

"किती दिवसांनी 'स्वप्न" म्हटलंस मला, गौरी? आपल्यासाठी वेळ काढायला हवा गं. हल्ली बिझनेस, मुलांचं शिक्षण यातच अडकून गेलोय. पायाला भिंगरी लावून घेतलीय..." 

"हं.. आजपासून नक्की सुरुवात करुं. काल दिवसभर तुझी आठवण येत होती, रात्री झोप लागेना. आज इकडे यायचा प्लॅन केला तेव्हा जरा निवांत वाटलं." - - गौरी

"तुला माहिती नाही तू येणार म्हणून किती आनंद झाला मला ते!" 

"कळला, दिसला आणि जाणवलाही... आता आवरून ये ना बाहेर पटकन." 

"हं...." 

गौरीने त्याच्या गालावर ओठ टेकवले आणि बाहेर आली. बेडरूममध्ये जात कपाटातून त्याचे कपडे आणून दिले. दरवाजावर नॉक केलं. 

स्वप्नीलने हात बाहेर काढून कपडे घेतले. तेवढ्यात तिने त्याचा हात पकडला. 

"मी येणार हे कोणी सांगितलं तुला? " तिने विचारलं.

"अप्पांनी... ए पण काळजीने विचारलं गं त्यांनी तू पोचलीस का म्हणून. एक वाजून गेला आणि तुझा फोन लागत नव्हता. रागावू नकोस त्यांच्यावर तुझं सरप्राइज स्पॉइल झालं म्हणून... " त्याने दरवाजातून मान बाहेर काढून सांगितलं. 

"नाही रे... रागवतेय कसली. माई अप्पांना कधी काही बोलते का रे मी? उलट अप्पांना छानसं गिफ्ट देणार आहे. त्यांच्यामुळे सरप्राइज द्यायला आलेल्या मला आज छान सरप्राइज मिळालंय..." ती स्वतःशीच हसत म्हणाली. 


क्रमशः

पुढील भागात 

लेखिका - Velvet Kavisha ✍️




Post a Comment

2 Comments

Please do not enter any spam link in the comment box