आयुष्याच्या या वळणावर - वैशाली गोस्वामी



आयुष्याच्या या वळणावर 

वैशाली गोस्वामी 


      अहं हह... आळस देत शांतनू उठला खिडकीचा पडदा दूर सारला आणि बाहेरच्या दृश्याच्या प्रेमातच पडला. बा अदब बा मुलायजा रविराज पधारने वाले है..... अशा आवेशात आकाशातले पांढरे शुभ्र ढग सोनेरी साज चढवून आकाशात दिमाखात उभे, आपल्या फेसाळणा-या लाटांवर सोनेरी किरणांना हुलकावणी देण्यासाठी धडपडणारा निळाशार समुद्र... वा-यावर ताल धरत डोलणारी  किना-यावरची झाडे... तो अनिमिष नेत्राने ते दृश्य आपल्या डोळ्यांत सामावून घेऊ लागला. अनिशाला उठवावे म्हणून त्याने तिच्या कडे बघितले तर ती उशीला आपल्या कवेत घेऊन गाढ झोपलेली... तिचे मोकळे  केस पसरलेले, कपाळावर खेळणा-या छोट्या छोट्या बटा, गालावर त्याला घायाळ करणारा तो तीळ..   हलकेसे वाकत त्याने तिच्या गालावर ओठ ठेवले. डोळे किलकिले करत तीने त्याच्याकडे बघितले, त्याच्या मानेत हात घालून स्वतःकडे ओढले आणि त्याच्या ओठांचे दिर्घ असे चुंबन घेतले. 
   ये...बात है... म्हणत त्याने तिला जवळ खेचले.ती त्याला बिलगली. बाहेर समुद्राच्या लाटा आणि आत मदनाच्या लाटा उफाळून आलेल्या... तिकडे सुर्याच्या किरणांनी हळूहळू आसमंत व्यापून टाकला तर इकडे दोघांच्या चेह-यावर समाधानाची लाली पसरलेली.
   लव यु माय स्वीट हार्ट, अलिशाने त्याच्या कानात गुणगुणत कानाचा हलकेच चावा घेतला. त्याने तिला घट्ट आवळून धरले.
  आई गं.. सोड मला, मादक स्वरात ती बोलली.
  नाही.
का?
   एकच कान गोड का?
म्हणजे..
   एकाच कानाचा चावा घेतला ना..
  ओहो.. दे दुसरा कान.. असा चावा घेते ना मग ओरडशील..
  अरे तुम जान भी ले लोगी तब भी हम कुछ नहीं बोलेंगे..
  शी... काही पण का बोलतोस.. त्याच्या ओठावर बोट ठेवत ती बोलली.
  ओके बाबा यापुढे नाही बोलणार... खुश...म्हणत हलकेच तिचा गालगुच्चा घेतला.
   आके तेरी बाहों में हर शाम लगे सिंदुरी...
   चुक... चुक.. 
काय झालं?
   शाम नाही मॅडम... सकाळ सकाळ... बघा बाहेर किती उजाडले ते...
   किती रे अरसिक तु... सकाळ तर‌ रोजच होते पण असे सुंदर क्षण मिळायला भाग्य लागतं.. आज मिळाले तर एंजॉय कर माय लव..
   त्याने तिच्या बोटात आपली बोटे गुंफली.
  हो यार... काय करणार ही सवय एका दिवसात सुटायची नाही त्यासाठी असे भाग्याचे लक्ष लक्ष क्षण पाहिजे असतात..
  हमम.. तीने पडदा बाजूला सारला. बाहेरचा लख्ख उजेड आत आला. समुद्र किना-यावर आता गर्दी वाढली होती.
   चल जाऊ या.. म्हणत ती बेडवरून खाली उतरली. 
  चलललल... तीने त्याला खाली खेचलं.
   अगं हो .. पडशील.
तु असल्यावर पडेल? प्रश्नार्थक नजरेने बघत ती बोलली.
   मी पडू देणार? तिच्या कमरेला आपल्या हातांचा विळखा घट्ट करत तो बोलला. तीने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले,
  आय नो..  माय लव... चल‌ मी पटकन फ्रेश होऊन येते.. म्हणत ती बाथरुममध्ये गेली.पंधरा मिनिटांत बाहेर आली. हलक्या फिरोजी रंगाचा टॉप आणि क्रिम कलरच्या पॅंटमध्ये ती खूप मोहक दिसत होती. तिच्या जवळ जात मिश्कीलपणे तो बोलला, 
  सायंकाळी जाऊ या का?
नो... आत्ताच जाऊ.. त्यांचं धारदार नाक बोटांच्या चिमटीत पकडत,मोठे डोळे करत ती बोलली. तो हसला आणि बाथरूम मध्ये गेला.
   दोघे बाहेर आली. त्याने तिचा हात हातात घट्ट पकडला. समुद्राच्या किनाऱ्यावर ते चालत निघाले. कधी समुद्राच्या पाण्यात उतरत, पाय ओले करत, कधी एकमेकांवर पाण्याचे शिंतोडे उडवत, मस्ती करत ते चालत होते.
   साहेब, फोटो काढा ना.. हातात कॅमेरा घेऊन एक मुलगा त्यांच्या जवळ आला.
    आता नाही नंतर काढू..
फक्त चाळीस रुपयाची एक कॉपी पडेल साहेब.. तो चिवटपणे म्हणाला.
   काढू रे पण आता नाही नंतर.
ठीक आहे साहेब, तो मुलगा चालला गेला.
  दमले रे चालून चालून पाय माझे दुखले 
बसू या गड्या रेतीवरी वेचु थोडे शिंपले.. 
गाण्याची ताण छेडत ती फतकल मांडत खाली बसली.
  अगं...अगं कपडे खराब होतील.. म्हणेपर्यंत तीने त्याला खाली ओढले.
   तु पण ना... लहान मुलीसारखी करते कधी कधी.. तिच्या शेजारी बसत तो‌ बोलला.
  अरे जबाबदारीच्या ओझ्याखाली बालपण कधी अनुभवूच शकले नाही.. सतत धावण्यात आयुष्य गेलं... स्वतःचा कधी विचारच केला नाही.. आता कुठे जरा वेळ‌‌ मिळाला तेव्हा जगावं वाटतंय आपल्या मनासारखे... म्हणत त्याच्या खांद्यावर मान टेकवली.
   बराच वेळ दोघे समुद्राच्या पाण्यात तशीच बसून राहिली.
  चल जाऊयात भूक लागली, म्हणत ती उठली. उठतांंना दोन्ही हातात पाणी घेऊन त्याच्या अंगावर उडवले आणि धावत निघाली.
   थांब ... थांब... म्हणत त्याने तिला पकडले आणि खाली पाण्यात खेचले.
   बस... बस... झाले.. झाले.. ती उठायला गेली.
   नाही.. नाही.. झाले...  म्हणत त्याने तिला खाली झोपवले.
लाटेच्या थंड पाण्याने तिचं अंग न अंग शहारून आले.
    तु पण ना.. ती खोटं खोटं चिडली.
   ऐ किती मस्त वाटतंय ना.. पाण्यात लोळत तो बोलला.
  हं...  जस्ट लव्हली..आलेल्या लाटेत तीने  ही लोळण घेतलं.
   बराच वेळ पाण्यात मस्ती करून ते परत आले. अंघोळ वैगरे आटोपून ते जेवण करायला बाहेर पडले. 
जेवल्यानंतर जवळच्या थिएटर मध्ये चित्रपट बघायला गेले. सायंकाळी बीचवर फेरफटका मारला, जेवण केलं आणि रूमवर आले. 
रूममध्ये येताच तीने त्याचा हात घट्ट पकडला.
    उद्या आपण जाऊ अपुल्या गावा... उदासला सुर तिचा.
   हो गं... वेळ किती पटकन जातो नाही, त्याचा ही स्वर जड झाला.
   हमम..
परत कधी भेटू.. त्याचा कातर स्वर.
   माहित नाही..
तु खुश राहशील गं, तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवत‌ तो बोलला.
   तु पण प्रॉमिस कर आनंदी राहशील.
  प्रयत्न करेल गं.
नक्की..
   हो‌ नक्की, त्याने तिला कवेत घेतलं. तिच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली.
  ऐ, रडायचं नाही.. लवकरच भेटण्याचा प्रयत्न करू.
   सकाळी दोघेही हॉटेल बाहेर पडले. तिला ट्रेन मध्ये बसवून तो विमानतळाच्य दिशेने निघून गेला.
    शांतनू दोन नोकरी करणा-या मुलांचा विधूर पिता आणि अनिशा घरातली मोठी मुलगी, परिवार आणि भाऊ बहिणींना सांभाळता सांभाळता लग्नाचं वय निघून गेलेली. दोघे एका सोशल साईटवर भेटले. समदुःखी म्हणून जवळ आले. घरी लग्नाबद्दल सहज बोलले तर शांतनूच्या मुलांनी त्याला या वयात असले वर्तन शोभत का म्हणत वाट लावली तर तिच्या कमाईला चटावलेल्या तिच्या आईवडील आणि भावाने हे बोलून तिचं बोळवण केलं की या वयात तुझ्याशी कोण‌ लग्न करेल, आमच्यासोबतच रहा.
     महिन्या सहा महिन्यांत कधी एखाद दोन दिवसांसाठी ते भेटत. त्यांच्या या प्रेमाला कधी ओळख मिळेल कोण जाने.

वैशाली गोस्वामी 


disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

Post a Comment

0 Comments