चुकीला क्षमा नाही" - वैशाली गोस्वामी



चुकीला क्षमा नाही" - वैशाली गोस्वामी

 हॅलो, राजीव अरे पुढच्या महिन्यात आपल्या बॅचचं रियुनियन करायचं ठरत आहे. तु कुठला बाहेरचा दौरा काढू नकोस, शशीधर ने सकाळीच फोन करून राजीव ला तंबी दिली.

अरेवा छानच की.. कोण ठरवतंय..

 प्रणित आणि बल्लु ठरवत आहे. येत्या रविवारी जरा वेळ काढ आपण दोघही जाऊया.

ठीक आहे जाऊया.

आणि हो..आपल्या बॅचचा वाॅट्सअप ग्रुप बनवला आहे त्यात तु थंब दाखवून दे पटकन..चल आता ऑफिसची वेळ आहे.नंतर सावकाश कॉल करतो तुला, शशीधर ने फोन कट केला.   

राजीवच्या ह्रदयात काहीतरी हललं.. मनाच्या कोप-यातला आठवणींचा एक छोटासा कप्पा व्याकुळ झाला..

आठवणींचा कसं असतं ना.. काहीतरी निमित्त लागतं आठवायला.. निमित्त घडलं तर ह्रदयाचा तो विस्मरणात गेलेला कप्पा मग जीवाला चैन पडू देत नाही.

राजीव ने वाॅट्सअप ग्रुप उघडला... कोण कोण आहेत ते बघितले पण छे....नाव नाही दिसले... तो हिरमुसला.

राज... ऑफिसला जायचं नाही का? अलिशाच्या आवाजाने तो भानावर आला.

बस अंघोळीलाच जातोय, म्हणत तो बाथरूम मध्ये गेला.

आज ऑफिसमध्येही त्याचं मन लागत नव्हतं. अर्ध्या दिवसाची सुटी टाकून तो बाहेर पडला. जवळ असलेल्या तलावाजवळ गाडी थांबवली. दुपारी तलावाजवळ फारशी गर्दी नव्हती. एका झाडाच्या सावलीखाली त्याने गाडी लावली. मोबाईल उघडला. ग्रुप चेक केला... नाव दिसले नाही...

येणार की नाही..

मनाची घालमेल सुरू झाली.

भुतकाळ नकळत डोळ्यासमोर यायला लागला.

छोट्याशा गावातून शहरातल्या सगळ्यात चांगल्या अभियांत्रिकी कॉलेज मध्ये शिक्षणासाठी तो आलेला. गावातील वातावरणातून थेट शहरात आल्यामुळे भांबावलेला. आधीच अबोल असलेला तो कॉलेज मध्ये आल्यापासून अजूनच अबोल झाला. सुरवातीला मित्र असे भेटलेच नाही. पण पहिल्या सत्राचा रिझल्ट लागला आणि वर्गातला एक हुशार विद्यार्थी म्हणून तो समोर आला. आता हुशार म्हटले तर त्याची मदत घेण्यासाठी बरेचजण त्याच्याशी बोलू लागले. तो त्यांना मदत करायचा पण त्यांच्यात सहजपणे मिसळणे त्याला जमायचे नाही. चौथ्या सत्राला त्याची ओळख अपुर्वाशी झाली.. म्हणजे अपुर्वा  स्वतःहून त्याच्याशी नोट्सच्या निमित्ताने बोलली.

अपुर्वा निमगोरी, मध्यम बांधा, लांब केसांची वेणी घातलेली, हस-या आणि बोलक्या डोळ्यांची प्रथमदर्शनीच त्याला आवडून गेली. तिच्यामुळे हळूहळू तो इतरांमध्ये मिसळू लागला. त्याला तिच्याशी बोलायला आवडायचे. पण कधीच आपल्या भावना उघडणे तो दाखवायचा नाही.  शशीधर, समीर, कृतिका, अपुर्वा आणि तो असा पाच जणांचा मस्त ग्रुप जमला.

सहाव्या सेमिस्टर मध्ये प्रोजेक्ट मध्ये तो आणि अपुर्वा सोबत आले. तासंतास प्रोजेक्ट वरून बोलणं व्हायचं. बरेचदा त्याला वाटायचे की अपुर्वाचे डोळे त्याच्या ह्रदयाचा ठाव घेताहेत. त्याच्याकडे बघतांना तिचे डोळे खुप बोलके असायचे. एकदा असेच दोघे बोलत होते. अभ्यावरून गाडी वैयक्तिक जीवनाकडे वळली.

तु पुढे काय करायचे ठरविले अपुर्वा?  कॅंपस मध्ये चांगली नोकरी मिळवायची आहे.

पुढे शिकणार नाहीस का?

नाही रे बाबा आता बससस झालं तेवढं शिक्षण पुरे. तु शिकणार आहेस का?

हो, ग्रॅज्युएशन झाल्यावर एखादं वर्ष नोकरी नंतर पुढे एमबीए करणार.

छान. मी तर नोकरी आणि तु जर रेडी असलास तर लग्न... मिश्कीलपणे ती बोलली.

लग्न... अचानक तो गंभीर झाला. हे बघ अपुर्वा मी अजून लग्नाचा विचार केलेला नाहीये.

मी कुठे तुला उद्याचं लग्न कर म्हणतेय... तु सेटल झाल्यावर करुया.

बघुया, म्हणत तो उठून चालला गेला. आपण प्रेमा बिमाच्या वाटेला जाऊन आपल्या करियरची वाट लावायची नाही हे फार पूर्वीच त्याने ठरवले होते. या घटनेनंतर तो पुर्वी सारखा मनमोकळेपणाने तिच्याशी बोलणे टाळू लागला.त्याची कोरडी प्रतिक्रिया बघून हळूहळू अपुर्वाही त्याच्याशी मोजकेच बोलू लागली.  हसरी खेळकर असणारी अपुर्वा हळूहळू अबोल होत गेली.

शेवटचे वर्ष होते. सगळे प्रोजेक्ट आणि कॅंपस सिलेक्शन मध्ये व्यस्त होते.

अभिनंदन, राजीव तु एकदम चमकलास. मस्त कंपनी आणि पॅकेज मिळालं तुला, शशीधर  त्याला मीठी मारत बोलला.

तुमचं पण अभिनंदन, तुम्ही पण चांगल्या कंपन्यांमध्ये प्लेस झालात.

अरे मित्र कोणाचे आहोत आम्ही..तुझेच ना.. समीर ने त्याला दणकून मीठी मारली.

आज पार्टी करुया.. कृतिका ने म्हटलं आणि सगळे ओरडले..

हो.... आज या सगळ्यांमध्ये अपुर्वा नव्हती.पहिल्यांदा राजीवच्या मनात सल उठली. आपला आनंद तिच्यासोबत साजरा करावा असं त्याला मनोमन वाटत होतं. पण.... अपुर्वा शेवटच्या इंटरव्ह्यू नंतर कॉलेजला आलीच नव्हती.

शशी, अपुर्वा कुठे आहे? न रहावून त्याने विचारले.

अरे तिच्या मामाचं ऑपरेशन का काय आहे म्हणून ती गावी गेली आहे. तुला नाही सांगितले का?

नाही..

विसरली असेल कदाचित.

त्या दिवशी त्याचं मन पार्टीत लागले नाही. दुस-या दिवशी कृतिका त्याच्या रूमवर आली.

राजीव, हे तुझे नोट्स आणि पुस्तकं आहेत. अपुर्वा ने तुला द्यायला सांगितले होते पण मी विसरूनच गेली होती. काल घरी जाण्या अगोदर सामानाची बांधाबांध केली तेव्हा हे बंडल सापडले.चल मी निघते.. बाय.. म्हणत ती निघून गेली.

त्याने बॅग मधून पुस्तके काढून चाळली. एका ठिकाणी एक पत्र दिसले.धडधडत्या अंतःकरणाने ते उघडले.

प्रिय राजीव

तु मला कधी आवडायला लागलास ते मलाच कळले नाही. शेवटचा दीड वर्ष तुझ्यासोबत प्रोजेक्टच्या निमित्ताने जो घालवला तो मी कधी विसरू शकणार नाही. तुला मी माझ्या मनातल्या भावना सांगितल्या. त्यानंतर तु मला टाळतोय हे लक्षात आले माझ्या. तुझ्या डोळ्यात मी माझ्या साठी प्रेम अनुभवलं होतं पण कदाचित तो माझा भास असेल. असो. तु खुप यशस्वी हो अशी कामना करते. माझं लग्न ठरलंय.

कभी किसी को मुक्कमल जहाॅं नहीं मिलता... अपुर्वा.

ते पत्र वाचून तो खूप रडला. आपण अतिशय चुकीचे वागलो याचा पश्चात्ताप झाला. अपुर्वा आपल्याला मनापासून आवडतं होती. एक मैत्रीणचं नाही तर तिच्यात आपली जोडीदार आपण बघत होतो पण करियर घडविण्याच्या उन्मादात आपण तिच्यासोबत चुकीचे वागलो ही सल आजपर्यंत मनातून गेली नाही. तिला भेटून एकदा तिची क्षमा मागावी... त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. खिन्न मनाने तो उठला आणि घरी निघाला. जवळपास तेवीस वर्षानंतर सगळी भेटणार होती. सकाळी साडे सातला शशी आला.

यार मज्जा येईल नाही आज.. इतक्या वर्षानंतर आपण भेटणार... तसं फोनवर बोलणं झालंय ब-याच जणांशी पण प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद कुछ और ही है मित्रा.. शशी त्यांच्या नेहमीच्या शैलीत बोलत होता. अपुर्वाचं येणं निश्चित नव्हतं त्यामुळे राजीव मनातून दुःखी होता. गाडी रिपोर्ट जवळ पोहचली. बल्लु, प्रणित, समीर,आदिती, उज्ज्वला पोहोचले होते. बाकी एक एक करत येत होते. सगळा परिसर त्यांच्या गप्पा, जोक्स, हसण्याने दुमदुमत होता. अचानक त्याचं लक्ष गेट कडे गेलं.. कृतिका सोबत अपुर्वा येत होती. काळानुरूप बदल झालेला होता पण स्वभाव पुर्वीसारखाच होता. गप्पांचा ऊत आलेला.काय बोलु आणि किती बोलु अशात दुपार झाली. जेवण झाल्यावर सगळे थोडे सुस्तावले.

कशी आहेस? राजीवने अपुर्वाला विचारले.

मी छान आहे.. तु कसा आहेस? तिचा प्रतिप्रश्न.  मी पण छान आहे... आपण तिकडे बागेत जाऊया का?

तिकडे कुठल्या प्रोजेक्ट वर चर्चा करणार आहात, शशीधर मागुन ओरडला. आल्यावर सांगतो... म्हणत अपुर्वा त्याच्यासोबत आली. एका बाकावर दोघेही बसले.

कालपासून एकच इच्छा होती की तु आज यावं.. अपुर्वा ने त्याच्या डोळ्यात बघितले.

तुझ्या सोबत मी खूप वाईट वागलो..सॉरी गं..त्याचा गळा भरून आला.

जे झाले ते झाले.. आता परत त्या गोष्टींना उजाळा द्यायचा नाही.

चुकलो गं मी.. मला तु हवी होतीस पण करीयरच्या नादात तुला गमावून बसलो..

राजीव ते आपल्या आयुष्याचं स्वप्न होतं असं समजून विसरून जायचं.

खूप चुकीचे वागलो मी तुझ्यासोबत.. मला क्षमा कर गं, त्याचे डोळे भरून आले.

राजीव... काही चुकांना कधीच माफी नसते.. अपुर्वाचेही डोळे भरून आले. बराच वेळ दोघे निशब्द बसून राहिले. चल जाऊया सगळी चहासाठी बोलावत आहेत, अपुर्वा बोलली आणि निघाली. राजीवही तिच्या मागोमाग निघाला.

वैशाली गोस्वामी

 

 disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

 

 

 

 

Post a Comment

0 Comments