एका सांजेला - श्रीनिवास गेडाम



एका सांजेला

श्रीनिवास गेडाम

सत्तर अंशीच्या दशकात  आमच्या विदर्भातील अनेक मुलं मुली मराठवाड्यातील औरंगाबादला  मिलिंद महाविद्यालयात शिकायला  जायची. माझा जिवलग  मित्र रवी सुद्धा  याच कॉलेजात शिकायला गेला होता. घरची परिस्थिती खुपच हलाखीची होती. रविच्या मामाने स्वतःहून  रविच्या शिक्षणाचा  भार सहन करून त्याला औरंगाबादला शिकायला पाठविलं. यात मामाचा  पण थोडाफार स्वार्थ होता. मामाला एकुलती एक मुलगी होती जी दिसायला छान असलीतरी एका

डोळ्यानं अधू होती. भाचा शिकला तर  तिचं पण भलं होईल. दोघांचं लग्न लावून देता येईल असा मामा विचार करीत होता.

रविची तब्येत तशी  ठीकठाक असलीतरी  काही दिवसांपासून त्याच्या पोटात सारखं दुखत होतं. एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यावर त्याला अपेंडिक्स झाल्याचं निदान करण्यात आलं. रवी  मित्रांच्या मदतीने घाटी येथील शासकीय  इस्पितळात एडमिट झाला. वेळ संयकाळची होती. सूर्य मावळतिकडे  किंचित झुकला होता. रविला  वॉर्डात भरती करून त्याचे मित्र रूमवर निघून गेले.   दवाखान्यात भरती होण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती. वॉर्डात एकप्रकारचा  वेगळाच दर्प पसरला होता. त्याच्या शेजारचा पेशंट वेदनेमुळे  थोडा जास्तच विव्हळत होता. त्याला  क्षणभर वाटलं पळून जावं चुपचाप इथून!

एडमिट झाल्यावर त्याला त्याच्या बेडवर एक बँकेचं पासबुक सापडलं होतं. त्यावर  संध्या साबळे असं ठळक अक्षरात लिहलेलं होतं.  थोड्याच वेळात एक तेवीस चोवीस वर्षाची सुंदर तरुणी वार्डात दाखल झाली. सकाळच्या पाळीतील  नर्सची ड्युटी संपत  आल्याने तिचा चार्ज घ्यायला  ही आली असावी असं त्याला वाटलं.  "गुड इव्हनिंग संध्या!.... ये मी तुझीच वाट बघत होते!...."   

"जाशील गं, एवढी काय घाई आहे? "

" घाई आहे संध्याबाई! तू काय सध्या अविवाहित आहेस! उद्या लग्न झालं की, तुला पण घरी जाण्याची घाई असेल!"

" बरं ते जाऊ दे! निर्मला, तुला एखादं बँकेचं पासबुक सापडलं का गं इथे? मला तर वाटतं ते इथेच कुठंतरी

राहिलं असावं!  ए, सापडलं असेल तर दे ना! हवं तर नाश्ता चारते तुला!"

" नाही  सापडलं गं! तुझी शपथ! सापडलं असतं तर दिलं नसतं का? "

" बरं.... तू निघ आता. मी बघते  कुठं सापडतं काय? "

दोन नर्समध्ये झालेल्या संभाषणावरून रविला कळलं की, रात्र पाळीसाठी आलेल्या नर्सचं नाव संध्या आहे. पासबुक परत करण्यापूर्वी  तिची थोडी मजा घ्यावी या उद्देशाने त्याने संध्येला पाणी प्यायला मागितलं. तिने एक जळजळीत कटाक्ष त्याच्यावर टाकला.

" प्लिज द्या ना सिस्टर पाणी प्यायला!  खूप तहान लागलीय केव्हापासून!"

संध्येनं थोड्या नाराजीनंच  त्याच्या हातात ग्लास कोंबला.   " नाव काय सिस्टर तुमचं? "

"तुला काय करायचं माझ्या नावाशी? "

" इच्छा नसेल तर नका सांगू!  पण....सांगितलं तर त्यात तुमचाच फायदा आहे! "

" माझा फायदा कसा काय? "

" तुमचं हरवलेलं  पासबुक कुठं मिळू शकतं हॆ मी शंभर टक्के बरोबर सांगू शकतो!"

" अरे वा, तुला जादूबिदू येते की काय? "

" हवं तर तसंच समजा!"

"ए, बाबा, मी आधीच परेशान आहे. अजून कशाला त्रास देतोस मला? निवांत पड थोडा अन मलाही माझं काम करू दे! कळलं?"

रवी मनात म्हणाला, ' वातावरण अधिक तापविण्यात अर्थ नाही. देऊन टाकू या तिचं पासबुक! ' त्यानं पासबुक काढलं नि सरळ तिच्या हातात दिलं. तिनं    आळीपाळीनं  रविकडे नि पासबुकाकडे  पाहिलं. तिचा आधीचा मूड एकदम बदलला. चेहऱ्यावर अतिशय नम्र भाव आणून तिने रविची क्षमा मागितली!  रवी म्हणाला,  क्षमा जरूर करतो पण एक अट आहे!"

" कुठली अट ? "

" अट खूप साधी आहे. मी जोवर वार्डात आहे माझी काळजी करायची! सर्व सहकार्य करायचं!"

" फक्त एवढंच ना? मी पुर्ण काळजी घेईन! काय हवं नको ते बघेन! तुम्हाला अजिबात बोअर होऊ देणार नाही!" ती खळाळून  मनापासून हसली.  हसतांना तिच्या गालाला सुंदर खळी पडली होती.

संध्येमुळे रविचे वार्डातील दिवस खूप छान जात होते. त्याला वाटायचं तो वार्डात नसून संध्येच्या घरी आहे. 

त्याला हवं नको ते सगळं मिळत होतं. कशाचीच म्हणून फिकीर नव्हती. सगळ्या पेशंटना तपासून झाल्यावर ती सर्वात शेवटी रविकडे यायची.आणि गप्पा मारत बसायची. तिची फिरकी घेण्याच्या उद्देशाने एकदा रवी म्हणाला, काय मॅडम सगळ्यात शेवटी माझा नंबर? अन्याय नाही का  हा माझ्यावर? " तिने  यावर काही एक न  बोलता रवीच्या पाठीत हलकेच रट्टा लगावला! रवीच्या शेजारचा पेशंट दगावला तेव्हा रवी  खूप घाबरला होता. त्याचं ऑपरेशन होतं तेव्हाही  त्याला खूप भीती वाटली होती. संध्येनं प्रत्येक परिस्थितीत रविला सांभाळून घेतलं. ऑपरेशन झाल्यावर  त्याची पुरेपूर काळजी घेतली. फळं, ज्यूस, टॉनिक कशाची म्हणून कमतरता पडू दिली नाही. रवी कधी कधी तिला म्हणायचा, " कां करताय तुम्ही एवढं माझ्यासाठी? कोण लागतोय मी तुमचा? "

" एक मैत्रीण म्हणून मी हॆ सगळं करते. ज्या दिवशी तुम्ही इथून जाल  त्या दिवशी मला इथे अजिबात करमणार नाही! झोप लागणार नाही इतकी सवय झालीय तुमची!

" इतका जीव कुणावर लावणं बरोबर नाही मॅडम! डिस्चार्ज मिळाल्यावर मला  इथून निघतांना असह्य वेदना होतील त्याचं काय? "

" तुम्ही अट घातली होती ना त्याचं पालन करते. दुसरं काही नाही!"

" बाप रे, माझी अट मलाच भारी पडणार असं दिसतंय एकंदरीत!"

दोघंही कसंनुसं हसली पण डोळ्यातून एकदोन अश्रू  आपसूक बाहेर पडलेत. त्यांना रोखता आलं नाही.

डिस्चार्ज चा दिवस उगवूच नये असं दोघांनाही वाटायचं पण शेवटी डिस्चार्ज चा  दिवस उगवलाच! दोघंही  खूप भावुक नि निशब्ध झाले होते. काय बोलावं, कसं बोलावं दोघांनाही कळत नव्हतं. रविला सोडायला ती खाली आली तेव्हा अश्रूचा बांध धो धो करून वाहू लागला. त्यात दोघंही चिंब भिजलेत. सगळं काही निशब्ध नि शब्दापलीकडचं होतं.

डिस्चार्ज होऊन पंधरा वीस दिवस लोटलेत पण कुणी कुणाला भेटलं नाही. त्यावेळी मोबाईलचा शोध पण  लागला नव्हता नाहीतर तर दोघांनाही  बोलता आलं असतं. एकदिवस योगायोगाने दोघांची भटकेल गेटजवळ अकस्मात भेट झाली. संध्या घाईत असल्याने जास्त बोलली नाही. पण.... जाता जाता म्हणाली, उद्या  संध्याकाळी पाच साडेपाचला बीबीच्या मकबऱ्यातील बगीच्यात  मला एकटेच न चुकता भेटा. खूप महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी! जमेल ना? "

" हो नक्की जमेल! "

दुसऱ्या दिवशी रवी न चुकता बीबीच्या मकबऱ्याजवळ  सायंकाळी ठीक पाच वाजता तिची आतुरतेने  वाट बघत उभा होता.  ठीक साडे पाचला ती  आटो रिक्षातून उतरली. दोघांनी एकदुसऱ्याला बघून स्मित हास्य केलं. संध्येनं काळ्या रंगाचा सलवार सूट नि लाल रंगाचा जिन्स परिधान केला होता जो तिच्या गोऱ्या कांतीवर खूपच शोभून दिसत होता. रवी नि संध्या दोघंही गेट पार करून आत गेले. एक निवांत जागा शोधून दोघंही बसले. थोडावेळ एकदम निरव शांतता पसरली.  काय बोलावं, कुठून सुरवात करावी दोघांपैकी कुणालाच समजेना. शेवटी रवीच बोलता झाला. " वाह संध्याजी, खुपच सुंदर दिसताय तुम्ही या ड्रेसमध्ये! "

" रियली सुंदर दिसते? "

" ऑफ कोर्स सुंदर दिसताय! खोटं कशाला बोलू मी? "

" आपल्या माणसानं स्तुती केली की, खरंच आनंद होतो. " 

" एनी वे, कशासाठी बोलवलत मला? "

" ते पण सांगते! थोडं आरामात बोलू! घाई कसली 

करताय? मुख्य विषयाला हात घालण्याआधी तुम्ही एक छानसं गाणं म्हणावं अशी माझी मनापासून इच्छा आहे.....गाणं ऐकल्यावर मलाही थोडं रिलॅक्स होता येईल!"

" पण तुम्हाला कुणी सांगितलं मी गातो म्हणून!"

" तुमच्या मित्रांनी सांगितलं! दुसरं कोण सांगणार? "

" हो का.... मग तर तुमच्यासाठी गावचं लागेल मला! अरे हो... पण कुठलं गाणं गाऊ या वेळेला? "

" आनंद सिनेमातलं,  कही  दूर  जब दिन ढल जाये हॆ गाणं येतं तुम्हाला? "

" येतं की.... मलाही हॆ गाणं खूप आवडतं. "

"सूर्य मावळण्याच्या बेतात आहे. संपुर्ण आकाश रंगबिरंग्या छटांनी माखून गेलं आहे अशावेळी अजून अन्य कुठलं गाणं गाणार?"

" खरंय तुमचं म्हणणं! "

" मग वेळ कसली लावताय? पटकन गा की! "

रवीनं एकवेळ मावळत्या सूर्याकडे पाहिलं. डोळे गच्च मिटले आणि देहभान विसरून  पुर्ण  मनाने  गाऊ लागला. गाणं संपलं तरी  संध्या आपल्याच तंद्रित होती. रविने खांदे हलवून तिला जागं केलं.

" गाणं संपलं मॅडम! उघडा डोळे! "

" हॆ गाणं जेव्हा कधी ऐकते पुर्ण देहभान  विसरून जाते. कशाचं म्हणून भान राहत नाही. "

" इतक्या लहान वयात इतकं सिरीयस असणं बरोबर नाही मॅडम! जस्ट रिलॅक्स युवरसेल्फ!"

" पटतंय तुमचं म्हणणं रवी!  बरं.... आपण आता मुख्य विषयाकडे वळू! एक साधा प्रश्न विचारतेय,  मी

आवडतेय कां तुम्हाला? "

यष्टीवर  अचानक चेंडू यावा तसा तो तिचा प्रश्न होता.

"  खूप खूप आवडताय मॅडम! तुमचा स्वभाव नि सौंदर्य पण लाजबाब आहे! "

" मग कराल माझ्याशी लग्न? " यावर रवीनं काय बरं उत्तर द्यावं? तो एकदम निरुत्तर झाला.....

" मी नर्स ना....? त्यामुळे तुमच्या मनात माझ्या  चारि  त्र्याबद्दल काही प्रश्न असतील! पण खरं सांगते मी मामा मामीच्या कडक शिस्तीत वाढलेली मुलगी आहे.

मी अशी तशी नाही हॆ लक्षात घ्या!"

" तुम्ही  म्हणता ते सारं खरं आहे. पण.... तरीही नाही करू शकत तुमच्याशी लग्न! तुम्हाला गमवणं म्हणचे हिरा गमवणं आहे! मी आईवडील गमवल्यावर मामा मामींनी मला सांभाळलं. त्यांना एकच संतान आहे. तिही मुलगी असून एका डोळ्याने अधू आहे. मला तिच्याशी लग्न करून मामाचे  किंचित उपकार फेडायचे आहेत. मी चूक करतोय काय तुम्हीच सांगा

संध्याजी? तुमच्याशी लग्न करून दोन दोन स्त्रियांना फसवणं होईल असं नाही का वाटत तुम्हाला? "

" रवी तुमच्या जागी अन्य दुसरं कुणी असतं तर सहज मला फसवू शकलं असतं. पण... तुम्ही चरित्र्यवान आहात म्हणून तसं केलं नाही. मला या आधीही तुमच्याबद्दल आदर होता. आता तर अजून वाढला!

यु आर रियली ग्रेट मिस्टर रवी! चला निघू या.... अंधार गडद होण्याच्या आतच घराला पोहचू या.  अवकाळी पाऊस येण्याची लक्षणं  पण दिसत आहेत. Hurry. Up, लवकर पाऊल उचला! "मिस्टर रवी "  गेटवर पोहचल्यावर  संध्येनं रवीला एकदा डोळे भरून पाहिलं.  By करून रिक्षात बसली. रिक्षा डोळ्याआड होईपर्यंत रवी नुसताच बघत  राहिला आणि नंतर जड, लांब  पावले  टाकीत बेगमपुऱ्यातील रूमकडे निघाला..... रूमवर पोहचता पोहचता त्याच्या चेहऱ्यावर  अवकाळी पावसाचे  दोन  चार थेंब घरंगळत पडले. आज रात्रभर  अवकाळी पाऊस बरसेल असं वाटत होतं.....

 

कथाकार.... श्रीनिवास गेडाम,

disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

Post a Comment

0 Comments